किण्वन : सूक्ष्मजीवाच्या क्रियेमुळे किंवा प्राण्यांपासून वा वनस्पतींपासून मिळणाऱ्या एंझाइमांमुळे (जीवरासायनिक विक्रियांची गती वाढविण्याचे कार्य करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांमुळे) कार्बनी (जैव) पदार्थांचे अपघटन (लहान रेणू असलेल्या दुसऱ्या कार्बनी पदार्थांमध्ये रूपांतर) होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन किंवा आंबणे किंवा कुजणे असे म्हणतात. या क्रियेत उष्णता निर्माण होते व कार्बन डाय-ऑक्साइड किंवा इतर वायू तयार होता आणि ते बाहेर पडत असताना पदार्थाला फेस येतो.

दुधाचे दही बनविणे, फळे व धान्ये ह्यांपासून मद्य तयार करणे पिठापासून पाव तयार करणे इ. किण्वनाच्या क्रिया फार पूर्वीपासून माहीत आहेत. किण्वन क्रियेचा उपयोग मद्य, प्रतिजैव (अँटिबायोटिक) पदार्थ, जीवनसत्त्वे, पाव, ॲसिटिक अम्ल, लॅक्टिक अम्ल इ. पदार्थांच्या निर्मितीत केला जातो.

किण्वनाचे स्वरूप, इतिहास व औद्योगिक उपयोग यांसंबंधीची माहिती ‘औद्यागिक सूक्ष्मजीवशास्त्र’ या स्वतंत्र नोंदीत विस्तृतपणे दिलेली आहे.

दीक्षित, व. चिं.