पेनिसिलियम : कवकांच्या (बुरशीसारख्या हरितद्रव्यहीन वनस्पतींच्या) ⇨ स्कोमायसिटीज (धानीकवक) या वर्गातील यूॲस्कोमायटी उपवर्गातील व स्परजिलेसी कुलातील एक वंश. पूर्वी याचा समावेश फंजाय इंपरफेक्टाय (अपूर्ण कवक वर्ग) या कवक वर्गात करण्यात येत असे. पेनिसिलियम वंशातील जाती सर्वत्र आढळतात. यातील बहुतेक जातींमुळे फळे, भाज्या, मांस, शिजविलेले अन्न इ. कुजून त्यांची नासाडी होते. सर्व जाती शवोपजीवी [मृत जैव पदार्थांवर उपजीविका करणाऱ्या शवोपजीवन ] असून त्यांची वाढ धान्ये, कापड इत्यादींवरही होते.

पेनिसिलियमचे कवकजाल (तंतूंचे जाळे) काचाभ (काहीसे पारदर्शक) व शाखायुक्त असते. तंतूमध्ये अतिसूक्ष्म मध्यवर्ती छिद्र असलेले पडदे असतात. तसेच कोशिकांत (पेशींत) एक किंवा अनेक प्रकले (कोशिकेतील क्रियांवर नियंत्रण ठेवणारे जटिल गोलसर पुंज केंद्रके) असतात. शेजारी असलेल्या दोन कवकजालांच्या तंतूंचा परस्परांशी संयोग (संधी) होऊन असम प्रकलयुक्त तंतू बनतात. काही जातींत अनेक तंतूंच्या एकत्र झालेल्या जुडग्यास जालाश्म म्हणतात ही प्रसुप्तावस्था असते. कवकजालावर उभे शाखाहीन किंवा शाखायुक्त विबीजुक दंड (प्रजोत्पादक सूक्ष्म घटक बनविणाऱ्या अवयवांचा दांडा) असतात. शाखा असल्यास त्यापासून वा दंडाच्या टोकापासून कुंचल्यासारख्या लहान शाखा (प्रांगले) येतात व त्यावर विबीजुकधारक विशिष्ट अवयव असतात [‘कवक या नोंदीतील आ. (आ) पहावी]. त्यापासून एकावर एक अशा विबीजुकांच्या (कोनिडीयांच्या) मालिका निर्माण होतात. ही विबीजुकनिर्मिती अलैंगिक पद्धतीने होते. विबीजुके काहीशी लंबगोलाकार वा गोलाकार आणि चमकणाऱ्या रंगांची अथवा काचाभही असतात. पक्व विबीजुके मालिकेच्या टोकांपासून सुटी होऊन हवेत तरंगतात आणि वाऱ्याने फैलावली जातात. पोषक परिसरात विबीजुके रुजल्यानंतर कवकजाल तयार होते. प्रयोगशाळेतील सूक्ष्मजंतुसंवर्धके (वाढ होण्यास योग्य अशी माध्यमे) अनेकदा ह्या विबीजुकांमुळेच दूषित होतात. पेनिसिलियमच्या पुंजक्यांना समूह असेही म्हणतात. हे पुंजके हिरवे वा निळसर रंगाचे असून त्यांचा पोत मखमलीसारखा असतो. पेनिसिलियमच्या सु. २० जातींत लैंगिक प्रजोत्पादन घडून येते. यामध्ये धानीयोनी व रेतुकाशय या नावे ओळखले जाणारे तंतू (स्त्री-व पुं-गंतुकाशये-जननेंद्रिये) यांचा संपर्क होतो व टोकास असलेल्या कोशिकांतील प्राकलांचा (सजीव द्रव्यांचा) संयोग होतो. त्या संयुक्त कोशिकेपासून धानीफल बनते व नंतर त्यात धानीबीजुके (पिशवीसारख्या कोशिकेत म्हणजे धातीन तयार झालेली बीजुके) बनतात. धानीफल बंद व गोळीसारखे असून ते आपोआप फुटते व बीजुके बाहेर पडतात नंतर ती वाऱ्याने पसरविली जाऊन रुजल्यावर नवीन कवकजालांची निर्मिती होते. अशा काही जातींचा समावेश टेलरोमायसीजकार्पेन्टेलीज या वंशांत केलेला आढळतो.

पेनिसिलियम वंशातील पहिली जाती १८२४ साली एच्. एफ्. लिंक या शास्त्रज्ञांनी वर्णिली असून या वंशात सु. ७०० हून अधिक जाती आहेत त्यांपैकी काही जातींमुळे चीज (काममबेअर व रॉकफर्ट चीज), तसेच सायट्रिक अम्ल, ग्लुकॉनिक अम्ल, वसाम्ले, मॅलॉनिक अम्ल, ऑक्झॅलिक अम्ल, गॅलिक अम्ल, फ्यूमेरिक अम्ल इ. रसायने आणि पेनिसिलिने, ग्रिझिओफलव्हीन इ. ⇨ प्रतिजैव पदार्थ (अँटिबायॉटिक्स) मिळतात. तसेच काही जाती मानवाला व वनस्पतींना रोगकारक आहेत. पेनिसिलियम क्रस्टॅशियम (पे. ग्लॉकम) या जातीमुळे ग्रसनी-कर्ण-नलिकेच्या (घसा व कान यांना जोडणाऱ्या नलिकेच्या) बुळबुळीत व नाजुक त्वचेचा चिरकारी दाह होतो. पे. कम्यून या जातींमुळे श्वसन तंत्रात व मूत्र तंत्रात संसर्ग होतो. पे. इटालिकमपे. डिजिटॅटम या जातींमुळे ⇨ सिट्रस वंशातील (लिंबू वंशातील) फळांना रोग होतात. जर फळांवर ओरखडे इ. असतील, तर हे रोग जलद होतात. योग्य हाताळणी व भरणी केल्यास, तसेच फळांवर गुंडाळण्यात येणारी आवेष्टने डायफिनिलयुक्त असल्यास फळांचे नुकसान कमी होते. पे. इटालिकममुळे फळांना मऊकूज हा रोग होतो व फळांवरील बुरशी निळसर हिरवी असते. पे. डिजिटॅटम या जातीमुळे रोगट फळ आकसते व वाळते. यावरील बुरशी पिवळट हिरव्या वा ऑलिव्ह हिरव्या रंगाची असते पे. एक्सपॅन्सममुळे साठवणीतील सफरचंद व नासपती यांना मऊकूज होते. कवकजालातील तंतू तयार होणे हा बुरशीचा गुणधर्म आहे. ही बुरशी करड्या हिरव्या रंगाची असते. पेनिसिलिन हा सुपरिचित प्रतिजैव पदार्थ पे. क्रायसेजिनमपे. नोटॅटम या जातींपासून मिळवितात.

पहा : कवक पेनिसिलीन प्रतिजैव पदार्थ बुरशी.

संदर्भ : 1. Burrows, W. Textbook of Microbiology, Lon⇨on, 1965.

2. Frobisher, M. Fun⇨amentals of Microbiology, Tokyo, 1961.

3. Raper, K. B. Thom, C. Manual of Penicillia, Balthimore, 1949.

4. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol., I, Tokyo, 1955.

मोघे, पू. गं. परांडेकर, शं. आ.