शस्त्रक्रिया तंत्र : (शल्यचिकित्सा सर्जरी). शरीराच्या एखाद्या भागातील दुखापत, व्यंग किंवा विकार यांच्यावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया आणि कौशल्यपूर्वक पुनःस्थापन या तंत्रांचा प्रामुख्याने वापर करणारी वैद्यक शाखा. शल्यचिकित्सा हा अधिक सर्वसमावेशक शब्द असून त्यात या शाखेतील कारणमीमांसा, विकृतिविज्ञान, निदान, शस्त्रक्रिया, उपचारांची निष्पत्ती यांचा विचार अभिप्रेत असतो. शस्त्रक्रिया तंत्र या शब्दाने केवळ शस्त्रक्रियेचा किंवा शस्त्रक्रियात्मक शल्यचिकित्सेचा बोध होतो.

शस्त्रक्रिया किंवा कौशल्यपूर्ण हाताळणी यांचा उपयोग बहुधा शरीराच्या एखाद्या भागापुरता मर्यादित अशा रोगासाठी केला जातो उदा., अर्बुद (कोशिकांच्या – पेशींच्या – अत्याधिक वाढीमुळे निर्माण झालेली निरुपयोगी गाठ), जखम किंवा मुका मार, विशिष्ट इंद्रियांचा विकार, रचनात्मक दोष इत्यादी. सार्वदेहिक विकार किंवा शरीरभर पसरणाऱ्या औषधयोजनेची आवश्यकता असणारे विकार यांचा विचार शल्यचिकित्सेमध्ये होत नाही उदा., मधुमेह, रक्तदाब, शरीरभर पसरणारी जंतुजन्य संक्रामणे (संसर्ग) इत्यादी.

इतिहास : शस्त्रांचा उपयोग उपचारासाठी करण्याची सुरुवात उत्तर अश्मयुगात झाली असावी कारण इ.स.पू. ६०,००० ते १०,००० या काळातील काही मानवी सांगाड्यांच्या कवट्यांना गोल छिद्रे पाडलेली दिसून आली. शरीरात प्रवेश केलेल्या रोगजनक दैवी शक्तींना बाहेर काढून टाकण्यासाठी अशा प्रकारची ‘शल्यकर्मे’ केली जात असावीत.

प्राचीन भारतीय, इजिप्शियन, चिनी व सुमेरियन संस्कृतींच्या अभ्यासकांना त्या-त्या ठिकाणी वैद्यकीय उपचारांसाठी शस्त्रक्रिया होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. इतकेच नव्हे, तर औषधींच्या तुलनेत त्यांचा वापर अधिक प्रगत होता असे दिसते. भारतात सुश्रुतकालीन चिकित्सकांनी वापरलेली १२१ लोखंडी उपकरणे सर्वज्ञात आहेत. इ.स.पू. ७०० च्या सुमारास चरमावस्थेस पोहोचलेल्या या आयुर्वेदीय शल्यतंत्राने अनेक अवघड शस्त्रक्रिया विकसित केल्या होत्या. उदा., मोतीबिंदू काढणे, उदरपाटन करून (उदरावर छेद घेऊन) गर्भ बाहेर काढणे, मूत्राशयातील अश्मरी (मुतखडे) काढणे. कपाळावरील त्वचेचा काही भाग खाली वळवून त्यापासून कृत्रिम नाकपुड्या तयार करण्यासारख्या दीर्घकाल चालणाऱ्या किचकट पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियाही भारतीय वैद्य करू शकत. विद्यार्थ्यांना शल्यकर्माचे प्रशिक्षण देण्यासाठी व प्रायोगिक स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मृत प्राण्यांचे मांस, फळे, घट्ट द्रवाने भरलेल्या चामडी पिशव्या यांचा उपयोग केला जाई. भारतातील ही शल्यतंत्रे प्रथम अरब साम्राज्यात व तेथून युरोपमध्ये पोहोचली, असे मानले जाते. [→ शल्यतंत्र व शालाक्यतंत्र].

सुमेरियन संस्कृती व तिच्यापासून निर्माण झालेल्या बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये शल्यचिकित्सकाचा व्यवसाय प्रतिष्ठित व जबाबदारीचा गणला जात असावा. इ.स.पू. १७०० च्या सुमारास सम्राट ⇨ हामुराबी  यांनी घालून दिलेल्या आचारसंहितेप्रमाणे शल्यचिकित्सकांना रुग्णांनी द्यावयाचा मोबदला आणि अयशस्वी शस्त्रक्रियांबद्दल त्यांच्याकडून प्राप्त करावयाची नुकसानभरपाई यांसारख्या गोष्टी निश्चत ठरवून दिल्या होत्या. ईबर्सच्या पपायरसामध्ये आढळलेल्या माहितीप्रमाणे इजिप्तमध्ये इ.स.पू. १५५० मध्ये साखमेत देवतेचे पुरोहित अनेक लहानलहान शस्त्रक्रिया करीत असत उदा., सुंता करणे, गळू कापणे, तापलेल्या सळईने डाग देणे इत्यादी.

चीनमध्ये इ.स.पू. १८००च्या सुमारास हुआ ताओ नावाचे प्रसिद्ध शल्यचिकित्सक होऊन गेले. जखमी सैनिकांना मद्याच्या प्रभावाखाली ठेवून त्यांच्या जखमा ते शस्त्रक्रियेने स्वच्छ करीत असत. विषारी बाणांमुळे चिघळत असलेले मांस खरवडून काढणे, सूचिचिकित्सा, अग्निकर्म यांसारखी शल्यकर्मे त्या काळी चीनमध्ये प्रचारात होती. प्राचीन ग्रीक साम्राज्यात व त्यानंतर इ.स. पहिल्या शतकात रोमन साम्राज्यातही प्रामुख्याने सैनिकांच्या जखमांसाठीच शल्यकर्मे केली जात. सेल्सस या कोशकारांच्या नोंदीनुसार सुमारे २०० उपकरणे त्या वेळी शस्त्रक्रियांसाठी उपलब्ध होती.

शवविच्छेदनावरील धार्मिक निर्बंधांमुळे इसवी सनाच्या सुरुवातीच्या सुमारे एक हजार वर्षांत मानवी शरीररचनेबद्दलचे ज्ञान अप्रगत राहिले. प्राण्यांचे विच्छेदन आणि सैनिकांच्या जखमांवर उपचार करताना मिळालेली तुटपुंजी माहिती यांच्या आधारे वैद्यकीय व्यावसायिक काही आडाखे बांधत असत. मध्ययुगीन युरोपात रॉजर फ्रुगार्ड यांचा एक ग्रंथ (११८०), गाय डी चॉलिआक्स यांचा ग्रेट सर्जरी (१३६३) आणि जॉन ऑर्डन (१३०७–१३९०) यांचा युद्धातील जखमांवरील ग्रंथ यांमध्ये तत्कालीन ज्ञानाचे संकलन आढळते. तेराव्या शतकापासून शस्त्रक्रिया तंत्र ही एक स्वतंत्र विद्या म्हणून मान्यता पावू लागली. नाभिक, नाभिक-शल्यचिकित्सक आणि स्वतंत्रपणे शल्यचिकित्सा करणारे वैद्य असे तीन प्रकारचे व्यावसायिक या विद्येचा उपयोग करीत. मोडलेली हाडे बसविणे, अग्निकर्म, गळवे कापणे, जखमांवर उपचार करणे यांसारखी विविध कामे करणाऱ्या या व्यावसायिकांवर त्यांची ‘गिल्ड’ नावाची संघटना नियंत्रण ठेवत असे. हळूहळू या विद्येला वैद्यकाची एक शाखा म्हणून प्रतिष्ठा मिळू लागली. सुरुवातीस इटलीमधील बोलोन्या विद्यापीठाने शल्यचिकित्सेचे शिक्षण देण्यास स्वीकृती दिली. पुढे फ्रान्समध्ये व सर्व युरोपभर विद्यापीठांनी हा विषय शिकविण्यासाठी स्वतंत्र प्राध्यापक नेमले.

सोळाव्या शतकात ⇨ अँड्रिअस व्हेसेलिअस  यांचा मानवी शरीराच्या रचनेवरील विस्तृत ग्रंथ प्रसिद्ध झाला (१५४३). ⇨ आंब्रवाझ पारे (१५१०–१५९०) या पॅरिस विद्यापीठातील शल्यचिकित्सकांचा व्यासंगी अभ्यास आणि व्हेसेलिअस यांचा ग्रंथ यांमुळे शल्यचिकित्सकांचा व्यासंगी अभ्यास आणि व्हेसेलिअस यांचा ग्रंथ यांमुळे शल्यचिकित्सेच्या प्रगतीस वेग आला. शारीरविषयक जाणीव, रक्तस्राव थांबविण्यासाठी डाग देण्याऐवजी सुती किंवा रेशमी धाग्याने रक्तवाहिनी बांधण्याचे तंत्र, जखमांच्या मलमपट्टीसाठी गरम तेलाऐवजी सौम्य अशा अंड्याच्या बलकाचा वापर ही पारे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाची काही उदाहरणे आहेत. जर्मनीमधील  फेब्रिशियस हितडेनस (१५६०–१६३४)आणि प्रख्यात चित्रकार ⇨ लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) यांची शरीररचनेची वर्णने यामुळेही सोळाव्या शतकातील प्रगतीस हातभार लागला. इंग्लंडमध्ये आठवे हेन्री यांच्या कारकिर्दीत शल्यचिकित्सक व नाभिक यांचे एकत्र संघटन होऊन टॉमस विकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक राजमान्य संस्था निर्माण झाली. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठा व नियंत्रण या दृष्टींनी शल्यचिकित्सकांची प्रगती लक्षणीय ठरली. या शतकात युरोपमध्ये विद्यापीठात शिकलेल्या वैद्यांबरोबरच नाभिक, मुतखडा काढणारे आणि बहुविध तंत्रे वापरणारे फिरस्ते शस्त्रक्रिया करण्याचा व्यवसाय करीत असत. त्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली.

सतराव्या शतकात भौतिक व रसायनशास्त्रातील प्रगतीच्या आधारे शरीरक्रियाविज्ञानाचा पाया घातला गेला परंतु त्यामानाने शल्यचिकित्सेत विशेष बदल झाला नाही. अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विकृतिविज्ञान व सूक्ष्म जीवशास्त्राचाविकास होऊ लागला. अने पूयजनक (पू तयार होणाऱ्या) रोगांमध्ये व जखमा चिघळण्यामध्ये सूक्ष्मजंतूंची वाढ हाच एक महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो, हे स्पष्ट झाले. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या तंत्रात स्वच्छतेकडे जास्त लक्ष देणे अपरिहार्य ठरले. परिणामतः त्यांच्या यशस्वितेचे प्रमाणही वाढू लागले. इंग्लंडमध्ये ⇨ विल्यम हंटर (१७१८–१७८३) व  ⇨जॉन हंटर (१७२८–१७९३) या बंधुद्वयांनी शारीर व विकृतिविज्ञान यांच्या आधारे शल्यचिकित्सेत अनेक तांत्रिक सुधारणा घडवून आणल्या. विशेषतः जॉन हंटर यांनी आपल्या अध्यापनात जखमा व त्या भरून येण्याची प्रक्रिया यांमधील विकृतिवैज्ञानिक बदलांवर अधिक भर दिला. याच काळात हेन्री ग्रे (१८२७–१८६१) यांचा ‘अनॉटॉमी:  डिस्क्रिप्टिव्ह अँड सर्जिकल’ हा ग्रंथ तयार झाला (१८५८). अजूनही छत्तीसाव्या आवृत्तीच्या रूपात `ग्रेज ॲनॉटॉमी’ या नावाने हा ग्रंथ वैद्यकीय अभ्यासात लोकप्रिय आहे.

आधुनिक शल्यचिकित्सेची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर झाली, असे म्हणता येईल. आधुनिकता प्राप्त करून देणारे तीन क्रांतिकारक घटक या सुमारास उपलब्ध झाले.

(१) १८४६-४७मध्ये इथर, क्लोरोफॉर्म व नायट्रस ऑक्साइड ही द्रव्ये शुद्धिहरणासाठी वापरली जाऊन वेदनारहित शस्त्रक्रिया अस्तित्वात आली. १८७०च्या सुमारास स्थानिक संवेदनाहरणही प्रचारात आले.

(२) शस्त्रक्रियेत निर्जंतुकता साधण्यासाठी जोसेफ लिस्टर (१८२७–१९१२) यांनी कारबॉलिक आम्लांचा वापर सुरू केला (१८६५). काही वर्षांनी ही पद्धत मागे पडून सर्व साधने, कापडी पट्ट्या वगैरे उकळून घेण्यास (१८८०) आणि त्याहीपेक्षा समाधानकारक अशा वाफेच्या मदतीने निर्जंतुक करण्यास (१८८६) प्राधान्य मिळू लागले.

(३)  ⇨ रूडोल्फ लूटव्हिख कार्ल फिरखो   यांनी १८६०च्या सुमारास कोशिकीय विकृतिविज्ञानावर भर देऊन प्राचीन रससिद्धांतास निरोप दिला. त्यामुळे इंद्रियातील विकृतीसाठी ते इंद्रिय काढून टाकणे किंवा विकृत ऊतकाचा (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकासमूहाचा) तेवढा भाग काढणे तर्कशुद्ध ठरले. अशा रीतीने इंद्रिय वा विकृत भाग काढून टाकणाऱ्या आक्रमक शल्यचिकित्सेला सैद्धांतिक आधार मिळाला.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस (१८९५) क्ष-किरणांच्या शोधामुळे शल्यचिकित्सेपूर्वी अचूक निदान करण्याची सुविधा प्राप्त झाली. तसेच लॉर्ड जोसेफ लिस्टर यांनी शरीराच्या अंतर्गत भागांच्या दुरुस्तीसाठी सुती वा रेशमी धाग्यांऐवजी मेंढीच्या आतड्यापासून तयार केलेला ⇨  तात   या नावाने ओळखला जाणारा धागा वापरात आणला. अनेक नवीन उपकरणे व जखमेतील द्रवाचा निचरा होण्यासाठी रबरी नळी घालून ठेवण्याची पद्धत यांचेही श्रेय लिस्टर यांना आहे. सर जेम्स पॅजेट (१८१४–१८९९) यांनी या काळात विकृतिविज्ञानात बरीच भर घातली. शस्त्रक्रियेत झालेल्या रक्तस्रावाची भरपाई करण्यासाठी रुग्णाला दुसऱ्या व्यक्तीचे रक्त देण्याचे अनेक प्रय या शतकात अंशतः यशस्वी झाले. परंतु १९००मध्ये ⇨ कार्ल लँडस्टायनर यांनी मानवी रक्तगटाची परस्परांशी असंयोज्यता (न जुळण्याचा गुणधर्म) दाखवून दिल्यानंतरच रक्ताधानाचे तंत्र विकसित झाले. पहिल्या महायुद्धाच्या काळात हॅरोल्ड डेल्फ गिलीज यांनी सैनिकांवर पुनर्रचनात्मक (रोपण) शस्त्रक्रिया (प्लॅस्टिक सर्जरी) करण्यास सुरुवात केली. नंतर मॅकिंडो यांनी हे तंत्र अधिक विस्तृत प्रमाणात वापरले.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जवळजवळ संपूर्ण शरीर शल्यकर्माच्या उपचारांनी सुसाध्य आहे, असे वाटण्याइतपत शस्त्रक्रियेतील कौशल्याची स्थिती होती. येथून आधुनिक शल्यचिकित्सेच्या दुसऱ्या, पर्वाची सुरुवात झाली. शरीरक्रियेचे सखोल जीवरासायनिक ज्ञान, हॉर्मोनांच्या निमिर्तीमधील अंतःस्रावी ग्रंथींची माहिती आणि औषधे तथा रक्ताची कमतरता भरून काढणारे विद्राव यांचा उपयोग या वैशिष्ट्यांनी युक्त असे हे पर्व १९५०पर्यंत चालू होते. या काळात शस्त्रक्रियेतील तंत्रिकाजन्य आघात व रक्तस्रावामुळे निर्माण होणारा आघात [→ अभिघात] यांमुळे कमी झालेल्या रक्तदाबावर औषधे व विद्राव यांची उपाययोजना होऊ लागली. जंतुसंक्रामणासाठी केवळ प्रतिबंधात्मकच नव्हे, तर उपचारात्मक अशी सल्फा औषधे, प्रतिजैविक (अँटिबायोटिक) व धातुसंयुगे मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. अवटु-आधिक्य किंवा अधिवृक्क ग्रंथीची अर्बुदे यांवर शस्त्रक्रियेने अतिरिक्त वाटणारा भाग काढणे शक्य झाले. मधुमेही रुग्णांवरही अतिरिक्त वाटणारा भाग काढणे शक्य झाले. मधुमेही रुग्णांवरही कोणतीही शस्त्रक्रिया टाळण्याची आवश्यकता उरली नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या उपचारांच्या परिणामाचे सांख्यिकीय विश्लेषण करण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे शस्त्रक्रियांची इष्टानिष्टता वस्तुनिष्ठपणे अजमावणे शक्य झाले. या सर्व बदलांमुळे शस्त्रक्रियांची विविधता, संख्या आणि यशस्विता यांत लक्षणीय वाढ झाली.

शल्यचिकित्सेचे तिसरे पर्व १९५० सालाच्या सुमारास सुरू झाले. आधुनिक भौतिकीय तंत्रज्ञानाने वैद्यकात प्रवेश करण्यास सुरुवात केल्यामुळे किरणोत्सर्गी समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण अणूभार भिन्न असलेले आणि भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे त्याच मूलद्रव्याचे पक्रार), लेसर किरण, संगणकीकृत क्रमवीक्षण (सीटी-स्कॅन), स्वनातीत लेखन (अल्ट्रासोनोग्राफी), अंतर्दर्शक इ. अनेक साधने रोगनिदानासाठी उपलब्ध झाली. परिणामतः केवळ अन्वेषणासाठी होणाऱ्या उदरच्छेदनासारख्या शस्त्रक्रियांची जागा छेद न घेताही करता येणाऱ्या अनाक्रमक निदान कार्यांनी घेतली. तसेच मोठ्या शस्त्रक्रियांच्या जागी बिनटाक्याच्या अंतर्दर्शकाच्या मदतीने होणाऱ्या शस्त्रक्रिया जास्त सुरक्षित ठरू लागल्या.⇨ टॉन्सिल  वा आंत्रपुच्छाची (ॲपेंडिक्सची) संक्रामणे प्रतिजैविकांनी आटोक्यात येत असल्याने त्यांसाठी होणाऱ्या शस्त्रक्रियांची संख्या घटू लागली. याउलट वृक्काचे (मूत्रपिंडाचे) प्रतिरोपण, स्वच्छमंडलाचे प्रतिरोपण (नेत्रदान), रोपण आणि सौंदर्यवर्धन, हृदयातील झडप बदलून कृत्रिम साधन बसविणे, पार्किन्सन कंपवातासाठी मेंदूतील तंत्रिकामार्गाचे [→ तंत्रिका तंत्रे] छेदन यांसारखी नवीन शल्यकर्मे प्रचारात येऊ लागली. मानवनिर्मित नायलॉन, डेक्रॉन यांसारखे पदार्थ किंवा अगंज (स्टेनलेस) पोलाद व्हायटालियम (कोबाल्ट व क्रोमियम यांची मिश्रधातू), टिटॅनियम इत्यादींपासून कृत्रिम झडपा, सांधे यांसारखे अवयव तयार करून ते बसविण्याच्या पद्धतींना चांगले यश मिळू लागले. या सर्व परिवर्तनांमुळे शल्यचिकित्सेच्या अनेक उपशाखा अस्तित्वात आल्या. मूलभूत शल्यचिकित्सेचे शिक्षण घेतल्यानंतर प्रगत प्रशिक्षणाच्या दृष्टीने स्वतंत्र गणल्या जाणाऱ्या काही उपशाखांची नावे पुढे दिली आहेत यांतील काही शाखा (क्र.११ ते १४) परंपरेने सुरुवातीपासूनच शिक्षणक्रमात आहेत:

(१) जठरांत्र शल्यचिकित्सा (२) उरहृदयशल्यचिकित्सा (३) मूत्रमार्ग शल्यचिकित्सा (४) तांत्रिका शल्यचिकित्सा (५) पुनर्रचनात्मक शल्यचिकित्सा (६) प्रतिरोपण शल्यचिकित्सा (७) अर्बुद शल्यचिकित्सा (८) अभिघात शल्यचिकित्सा (९) वाहिनी शल्यचिकित्सा (१०) बालरोग शल्यचिकित्सा (११) विकलांग शल्यचिकित्सा (१२) स्त्रीरोगविज्ञान (१३) नेत्रवैद्यक आणि (१४) कर्णनासाकंठ विकारविज्ञान.

शल्यचिकित्सेची साधारण तत्त्वे : विकारांची कारणे : शल्यचिकित्सेसाठी आलेला विकार वा दोष पुढीलपैकी एखाद्या कारणाने उद्‌भवलेला असू शकतो.

इजा : अपघात, अभिघात किंवा आत्मघातामुळे शरीराच्या कोणत्याही भागाला इजा होऊ शकते. बाहेरून दिसू शकणारी इजा अनेक प्रकारांची असते. उदा., मुका मार बसून त्वचेखाली काळेनिळे होणे, खरचटणे, त्वचा वेडीवाकही फाटणे (विदारण), खोल जखम, आरपार जाणारी जखम, आतील इंद्रियांना दृश्यमान करणारी किंवा बाहेर काढणारी जखम तीव्र अम्लासारखी संहत रसायने अंगावर पडल्यामुळे त्वचेला फोड येणे, भाजल्यामुळे ऊतक जळून काळे पडणे, दीर्घकाळ बर्फात राहिल्यामुळे हातापायांना होणारी हिमबाधा इत्यादी. बाहेरून न दिसणाऱ्या इजांमध्ये डोक्यावरील आघातामुळे मेंदूत रक्तस्राव, मेंदूचा संक्षोभ (कार्यात खळबळ), छाती किंवा पोटावरील आघातामुळे फुप्फुस, यकृत, वृक्क, प्लीहा यांसारख्या भरीव (घन) अंतस्त्यांचे विदारण व रक्तस्राव, जठरात आधीच असलेला व्रण फुटणे, चुकून गिळलेल्या वस्तूमुळे पचनमार्गास दुखापत होणे, हाड मोडणे, सांधा मुरगाळणे, स्नायू किंवा कंडरा ओढले जाऊन फाटणे यांचा समावेश होतो. [→ जखमा आणि इजा].

संक्रामण : त्वचेवरील सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या संक्रामणाचे रूपांतर गळवांमध्ये होऊ शकते स्नायू, सांधे, अस्थिमज्जा यांसारख्या अधिक खोलीवरील संक्रामणांमुळे अशीच पूयीभवनाची (पू निर्माण होण्याची) प्रक्रिया होऊन तिच्यामुळे रचनात्मक बदल घडताता किंवा अन्यत्र संक्रामण पसरण्याचा धोका असतो. दीर्घकालिक संक्रामणामुळे मूत्रवहिनी, मूत्राशय यांचे संकोचन होऊन प्रवाहात अडथळा निर्माण होतो. मूत्रमार्ग व पित्तमार्ग यांत अश्मरी (खडा) निर्माण होण्यातही संक्रामणाचा वाटा असतो. सूक्ष्मजंतूंपेक्षा आकारमानाने मोठे असे परोपजीवीदेखील पर्याक्रमणामुळे अडथळे निर्माण करू शकतात उदा., आतड्यातील जंत, लसिका तंत्रामधील हत्तीरोगाची कृमी इत्यादी. प्रभावी संक्रामणरोधके, प्रतिजैविके आणि कृमिघ्ने यांच्यामुळे संक्रामणजन्य दोषांचे प्रमाण आता कमी होऊन त्यासाठी शस्त्रक्रियांची फारशी जरूर पडत नाही. [→संसर्गजन्य रोग].

अर्बुदे : उत्स्फूर्तपणे निर्माण होणाऱ्या शरीरास निरुपयोगी ऊतकांची निश्चित कारणे अजून अज्ञात आहेत. उतार वयात त्यांचे प्रमाण वाढते. घात नसणाऱ्या सुदम (सौम्य) अर्बुदांचा दुष्परिणाम त्यांच्या विस्तारामुळे आणि पोषणावरील भारामुळे होतो. आसपासच्या ऊतकांवर, पोकळ इंद्रियांच्या अंतर्भागांवर किंवा रक्तवाहिन्या व तंत्रिकांवर (मज्जातंतूंवर) त्यांचा दाब पडल्यामुळे अडथळे निर्माण होतात. मारक किंवा घातक अर्बुदांच्या बाबतीत मात्र प्रारंभिक अवस्थेतही, कितीही लहान आकारमान असले, तरी त्यांचे उच्चाटन करणे आवश्यक असते. शस्त्रक्रिया, किरणोपचार [→प्रारण चिकित्सा] व कर्करोधी औषधे यांच्या संयुक्त उपयोगाने हे साधता येते. अष्ठीला (प्रोस्टेट) व अवटू ग्रंथींच्या वाढीचे स्वरूप अर्बुदासारखे नसून अतिवृद्धीचे असले, तरी त्यांच्या लक्षणांपासून लवकर मुक्त होण्यासाठी शल्यचिकित्सा आवश्यक ठरते. अघातक वाढीचे रूपांतर मारक अर्बुदात होण्याचा धोका टाळण्यासाठीही कधीकधी शस्त्रक्रियेने आवश्यक वाढ काढून टाकावी लागते. [→ अर्बुदविज्ञान].

उपजत दोष : गर्भावस्थेत काही ऊतकांचा अपुरा विकास झाल्यामुळे नवजात अर्भकात शारीरिक दोष आढळतात. उदा., वरचा ओठ फाटल्यासारखा दिसणे [→ खंडौष्ठ] , मणक्यांच्या कमानी पूर्णपणे बंद न झाल्यामुळे द्विखंडित पृष्ठवंश, नाभि-अंतर्गळ, खंडित तालू [टाळूला भोक असणे, → खंडतालु], हृदयातील आंतरनिलय पडद्यास छिद्र असणे, झडपांचे दोष इत्यादी. यांतील काही दोष गंभीर स्वरूपाचे असून त्वरित दुरुस्त करावे लागतात. याउलट प्रौढावस्थेपर्यंत लक्षात न येणारे दोषही सुप्तस्वरूपात लहान मुलांमध्ये अस्तित्वात असतात. उदा., द्विभिन्न गर्भाशय, वंक्षण ⇨अंतर्गळ, मानेतील बरगडी (ग्रैव पर्शुका), स्थानांतरशील वृक्क इत्यादी.

रक्तपुरवठ्यातील दोष : रक्तवाहिन्यांमध्ये दीर्घकाल टिकून असलेल्या दोषांमुळे एखाद्या क्षेत्रातील ऊतकांमध्ये कायम स्वरूपाचे बदल घडून येतात. उदा., रोहिणीसंकोचामुळे होणारा ऊतकमृत्यू किंवा नीलाक्लथन शोध आणि खोलावरच्या नीलांमध्ये क्लथन झाल्याने (रक्त साखळल्याने) निर्माण होणारी वेदनायुक्त सूज. ⇨ अपस्फीत – नीला  प्रामुख्याने गुडघ्यांच्या मागील बाजूंस आढळतात व त्याही वेदनायुक्त सूज निर्माण करू शकतात. अल्पकालिक तीव्र दोषांचे प्रमाण अधिक गंभीर असतात. उदा., मेंदूतील रक्तवाहिनीचे क्लथन झाल्याने होणारा पक्षाघात किंवा रक्तस्राव होऊन निर्माण झालेल्या गाठीचा मेंदूवर दाब पडणे, आतड्यांच्या वाहिनीमधील तीव्र क्लथनामुळे घडणारा आंत्रघात आणि आंत्राचा (आतड्याचा) ऊतकमृत्यू [→ रक्ताभिसरण तंत्र].

वयोवर्धनामुळे घडणारे ऱ्हसनात्मक बदल : हातापयांचे सांधे, पाठीचा कणा यांतील ऊतकांची झीज होऊन त्यामुळे व्यंगांची नर्मिती होते [ → विकलांग चिकित्सा वृद्धावस्था].

विकृतिवैज्ञानिक बदल : शल्यचिकित्सेसाठी आलेल्या दोषाची निर्मिती झाल्यापासून गेलेला काळ, निर्मितीचे मूळ कारण, तात्पुरते उपचार इ. अनेक घटकांवर ऊतकातील विकृतिवैज्ञानिक बदलांचे स्वरूप अवलंबून असते. त्यांपैकी काही बदल पुढीलप्रमाणे असतात.

(अ) प्राकृत शरीररचनेचा भंग. उदा., जखम, अस्थिभंग, रक्तकिंवा इतर द्रव्यांचा वहिनीमध्ये छेद, त्वचेचे स्तर निघून येणे वगैरे.

(आ) उदरपोकळी, संधिगुहिका यांसारख्या नैसर्गिक अवकाशांमध्ये (पोकळ भागांत) रक्त, पू, रक्तजल, पचनमार्गातील किंवा मूत्रमार्गातील द्रव यांसारखे पदार्थ साठणे किंवा इंद्रिये अथवा ऊतक आपली नेहमीची जागा सोडून इतरत्र येणे उदा., अंतर्गळ. मोडलेल्या हाडाचे टोक स्नायूत किंवा त्वचेत घुसणे. तसेच पोकळ इंद्रियांची अनैसर्गिक जोडणी घडून येणे उदा., मूत्राशय व मलाशय यांमध्ये नाडीव्रणाची निर्मिती.

(इ) इजा, संक्रामण, रक्तपुरवठ्यातील दोष यांमुळे प्रतिक्रियात्मक तीव्र ऊतकशोथ. परिणामतः सूज, वाढलेले तापमान, लाली, स्पर्शासह्यता, वेदना, श्वेतकोशिकांची रक्तवहिनीबाहेर मोठ्या प्रमाणात उपस्थिती इ. गोष्टी आढळतात. कार्यक्षमतेत बाधा येते.

(ई) उपचारांच्या अभावी तीव्र शोथाचे रूपांतर दीर्घकालिक शोथात होते. लसीका कोशिकांचे [→ लसीका तंत्र] बाहुल्य, सूत्रल (तंतुमय) ऊतकाची निर्मिती, उघड्या व्रणात लवकर न भरून येणारा कणिकायन ऊतक, नैसर्गिक प्रतिष्ठापनाच्या प्रक्रियेत जाड, वेड्यावाकड्या व्रणाची निर्मिती, सांध्यांच्या हालचालींना मर्यादित करणारे तंतुमय संकोचन, जखमेतून खोल पसरत जाणारी कोटरे (नाडीव्रण) इ. परिणाम यातून संभवतात.

(उ) ऱ्हसनात्मक बदलांमुळे कार्यशील विशिष्ट ऊतकांच्या जागी संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकाची निर्मिती होऊन कार्यक्षमतेत कमतरता येते उदा., जठरातील पाचक स्राव कमी होणे, सांध्यांची हालचाल व वजन पेलण्याची क्षमता ओसरणे.

(ऊ) नेहमीच्या विशिष्ट कार्य करणाऱ्या ऊतकांच्या ऐवजी त्यांच्याशी पोषणासाठी स्पर्धा करणाऱ्या अर्बुदकोशिकांची वाढ, अर्बुद मारक असेल, तर कोशिकांचे आसपासच्या ऊतकांवर आक्रमण, तसेच लसीका तंत्रात प्रवेश करून नजीकच्या लसीका ग्रंथींची वाढ, तेथून शरीरभर प्रसार इ. परिणाम संभवतात. सुरुवातीच्या अवस्थेत अबाधित कार्यक्षमता आणि तीव्र ऊतकशोथाचा अभाव यांमुळे अर्बुदाची वाढ सहजासहजी लक्षात येत नाही.

(ए) दीर्घकाळ रक्तपुरवठ्यात व्यत्यय आल्याने ऊतक किंवा इंद्रियाची अपवृद्धी, स्नायूंच्या बलाचा ऱ्हास, संवेदनांमध्ये व्यत्यय, प्रतिकारशक्ती घटल्यामुळे जंतुसंक्रामणाची शक्यता, व्रण (क्षत) निर्मिती आणि अखेरच्या अवस्थेत संपूर्ण ऊतकमृत्यू (कोथ). उदा., मधुमेह, रोहिणी विलेपी विकार, वाहिनीक्लथन, शोथ यांसारख्या विकारांमुळे हातापायांच्या बोटांमध्ये होणारे बदल.

लक्षणे : विकाराचे स्थान, तेथे घडून येत असलेले बदल आणि रुग्णाची मानसिक-शारीरिक संयोजनक्षमता यांवर लक्षणांचे स्वरूप व तीव्रता अवलंबून असते. उदा., जठराचा व्रण अन्न घेतल्यावर वेदना निर्माण करतो, तर आंत्रातील तशाच स्वरूपाचा पचनज व्रण उपाशी असताना वेदनाशील ठरतो व अन्नामुळे वेदना शमते. कालांतराने जठरव्रणाचे रूपांतर कर्करोगात झाल्यास वेदना कमी होऊन अम्लन्यूनतेमुळे अपचन व भूक मंदावणे ही लक्षणे पुढे येतात.

शल्यचिकित्सकाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये तीव्र वेदना, दीर्घकालिक सौम्य वेदना, अस्वस्थतेची जाणीव, अपसंवेदन, कार्यात्मक उणिवेचे आकलन, शारीरिक व्यंग, स्पष्टपणे जाणवणारी विद्रुपता किंवा दोष आणि उतारवयात कर्करोगाबद्दल भीती यांचा समावेश होतो. त्यांपैकी वेदना हेच बव्हंशी वैद्यकीय मदत मागण्याचे कारण दिसून येते.

वेदनेची निर्मिती पुढील अनेक कारणांमुळे होऊ शकते. रुग्णाला प्रश्न विचारून सविस्तर वर्णन मिळविल्यास निदानास मदत होते.

(१) रासानिक पदार्थ आणि सूक्ष्मजंतूंच्या वाढीतून निर्माण होणारी चयापचयी (शरीरात सतत चालणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतून बनणारी) द्रव्ये यांचा संपर्क त्वचा किंवा कुरतडणारी वेदना जाणवते.

(२) अल्परक्ततेमुळे ऊतकात तीव्र, पकडल्यासारखी, आवळल्यासारखी किंवा चिरडल्यासारखी वेदना जाणवते. स्नायूंपासून ती निघत असल्यास हालचालींनी तीव्रता वाढते. उदा., हृदयविकारांचा झटका किंवा रोहिणी क्लथन शोथामुळे लंगडत चालावे लागणे. तंत्रिकेच्या रक्तपुरवठ्यात बाधा आल्यास विश्रांत अवस्थेतही वेदना तीव्रपणे जाणवत राहते.

(३) अरेखित (मृदू) स्नायूंच्या आकुंचनामुळे जाणवणारी ‘शूल’ या प्रकारची वेदना मधूनमधून होत राहते. तीक्ष्ण हत्याराने टोचल्यासारखी ही वेदना अनेक मिनिटे टिकून राहू शकते परंतु मधल्या काळात मात्र केवळ अस्वस्थता जाणवते किंवा पूर्ण आराम मिळतो. [→ शूल].

(४) यकृतासारखे घन (भरीव) इंद्रिय सुजून त्याचा बाह्य पटलावर (संपुटावर) ताण पडल्यास एकाएकी मंद, अस्पष्ट, परंतु उत्तरोत्तर अधिकाधिक जाणवणारी वेदना सुरू होते. ती सतत टिकून राहते पण तिचा स्थाननिर्देश निश्चितपणे करता येत नाही. अशाच प्रकारचे दुखणे पित्ताशय, जठर यांसारखी पोकळ इंद्रिये आतील दाब वाढल्यामुळे फुगू लागतात तेव्हा जाणवते.

(५) तंत्रिकाजन्य वेदना सतत तीव्रपणे जाणवत राहते. तंत्रिका तंतूंना जखम होणारा आघात, हाडाचा किंवा इतर कठीण ऊतकाचा दाब, रक्तपुरवठ्यात बाधा किंवा कर्करोगाच्या कोशिकांचे आक्रमण अशी या वेदनेची कारणे असू शकतात.

वेदनेच्या शक्य तेवढ्या निश्चित स्थानाप्रमाणेच तिचे पसरणे हेदेखील कारणाचा शोध घेण्यासाठी उपयोगी ठरते. उदा., वृक्कातील वेदना पाठीकडून पुढच्या बाजूला पसरत येऊन नंतर खाली जांघेपर्यंत पोहोचते. वेदनानिर्मितीचा प्रतिक्षेपी परिणाम म्हणून उलटी होणे, मळमळणे, छातीत धडधडणे, घाम फुटणे किंवा क्वचित प्रसंगी बेशुद्धी यांसारखी लक्षणे आढळतात. यांशिवाय विकारग्रस्त अवयवांच्या आसपासचे स्नायू आकुंचन पावून ताठरपणा निर्माण होतो. तपासण्यासाठी हाताने स्पर्श केला असता संरक्षक अशी वाढ या ताठरपणात निर्माण होते. वेदना वाढविणारे किंवा आराम देणारे घटक कोणते यांचा विचार निदानास मदत करतो. उदा., खाणे, पाणी पिणे, विश्रांती, विशिष्ट अवस्थेत बसणे व झोपणे. रोगग्रस्त भागात नेहमी वेदना न जाणवता केवळ दाबले असतानाच किंवा स्पर्श केल्यास वेदना जाणवते, अशी तक्रारही रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत रुग्ण कधीकधी करतात. [→ वेदना].

कार्यात्मक उणीव हे लक्षण वेदनेइतके सहजासहजी लक्षात येत नाही. पचन तंत्राच्या विकारात भूक मंदावणे, अपचन, मलविसर्जनाची अनियमितता यांसारखे बदल जाणवले तरी तिकडे दुर्लक्ष होऊ शकते. उत्सर्जन तंत्रातील दोषांमुळे लघवीचा रंग बदलणे, वारंवारता कमी-जास्त होणे किंवा रक्त जाणे या घटना काहीशा अधिक गांभीर्याने घेतल्या जातात. स्नायूंचा अशक्तपणा, लंगडत चालणे यांसारख्या कार्यात्मक बदलांतून रक्तवाहिन्यांमधील दोष प्रतीत होऊ शकतात परंतु काहीविकारांच्या बाबतीत कोणतीही उणीव न जाणवल्यामुळे वेदना किंवा अस्वस्थता अथवा दृश्य चिन्हे निर्माण होईपर्यंत रुग्णाला कसलीच शंका येत नाही. उदा., आंत्रपुच्छशोथ, स्तनामधील अर्बुद, वृषणार्बुद, अंतर्गळ, आयोडिनाच्या अभावी होणारी अवटू ग्रंथींची वाढ इत्यादी. नित्याच्या किंवा नैमत्तिक शारीरिक तपासणीत असे विकार उघडकीस येतात.

दृश्य स्वरूपातील व्यंगे, उदा., कुबड, तिरळेपणा, त्वचेवरील वा त्वचेखालील सहजपणे लक्षात येणारे उंचवटे, आवाळू यांसारख्या लक्षणांकडेही दीर्घकाळ दुर्लक्ष होऊ शकते. [→रोग].

शारीरिक तपासणी व चाचण्या : वरीलपैकी कोणत्याही लक्षणांमुळे रुग्ण शल्यचिकित्सकाकडे आल्यास प्रथम त्या लक्षणांची सुरुवात, तीव्रता, आरामदायक व पीडादायक घटक इत्यादींबद्दल महिती मिळविली जाते. त्यानंतर शरीरपरीक्षा केली जाते. यात लक्षणांचा संदर्भ लक्षात घेऊन विशिष्ट भागाचे निरीक्षण, स्पर्शपरीक्षा (परिस्पर्शन, म्हणजेच प्रथम वरवर हलक्या हाताने आणि नंतर अधिक दाब देऊन खोलवर तपासणे), प्रताडन (बोटाने ठोकून त्वचेखालील ऊतकांच्या घनतेचा किंवा पोकळीचा अंदाज घेणे) आणि ध्वनिश्रवण यांचा समावेश होतो. स्नायूंच्या किंवा सांध्यांच्या हालचालींची मर्यादा पाहिली जाते. तसेच विकाराचा संबंध अन्यत्र कुठे असल्यास तो जाणण्यासाठी संपूर्ण शरीराची परीक्षाही केली जाते. लसीका ग्रंथींची वाढ, संक्रामण किंवा कर्कार्बुद रक्ताद्वारे इतरत्र पसरल्याची चिन्हे, उपजत दोषांचे अस्तित्व, रक्ताभिसरणाची स्थिती व शस्त्रक्रिया आवश्यक झाल्यास विचारात घ्यावयाचे प्रतिकूल घटक (मधुमेह, रक्तदाब, वृक्कविकार, स्थूलता इ.) यांची माहिती या परीक्षेतून मिळते. शरीरपरीक्षा पूर्ण झाल्यावर तात्पुरते निदान आणि उपचारांची स्थूल रूपरेषा उपलब्ध होतात.

निश्चित स्थानिकरणासाठी व शल्यकर्माची पूर्वतयारी म्हणून काही चाचण्या शल्यचिकित्सक करवून घेतात. त्यांची निवड करताना आवश्यकता, उपलब्धता, खर्च, उपचारांमुळे होणाऱ्या परिणामांची प्रगती पाहण्याचे नियोजन व रोगाबद्दलच्या ज्ञानात भर टाकणारे संशोधन करण्यासाठी योगदान या सर्व गोष्टी विचारात घेण्यात येतात. स्थूलमानाने या चाचण्यांचे पुढील प्रकार आहेत : (१)  इजा किंवा विकृती यांचे निश्चित स्थान व विस्तार यांबद्दल आणि आसपासच्या ऊतकांबद्दल निश्चित मार्गदर्शन करणारे चित्र उभे करणाऱ्या चाचण्या. उदा., साधे क्ष-किरण चित्रण, विरोधजनक क्ष-किरण चित्रण, संगणकीय क्रमवीक्षण, स्वनातील चित्रण, किरणोत्सर्गी द्रव्य देऊन क्रमवीक्षण वगैरे. [→वैद्यकीय उपकरणे]. (२)अंतर्दर्शकाच्या मदतीने अंतस्त्यामधील विकाराचे किंवा अवकाशीय दोषांचे प्रत्यक्ष दर्शन. उदा., जठरदर्शन, भ्रूणदर्शन, मूत्राशयदर्शन, संधिदर्शक [→ परिदर्शक]. (३) विकारग्रस्त ऊतकाचा नमुना सूक्ष्मदर्शनासाठी घेणाऱ्या ⇨ जीवोतक परीक्षांची तंत्रे. उदा., त्वचेचा छेद घेऊन अधस्त्वचीय ऊतक कातरीने कापून घेणे, सूक्ष्मसूचिकेच्या मदतीने अर्बुदातील द्रवाचा नमुना शोषून घेणे, अंतर्दर्शकातून नमुना घेणे, गर्भजलपरीक्षण, गर्भवेष्टांकूर जीवोतक परीक्षा इत्यादी. (४) रक्त, रक्तजल, मूत्र इ. जैव द्रवांच्या रासायनिक विश्लेषणातून विकारग्रस्त ऊतकांपासून निर्माण होणारी एंझाइमे (वितंचके), प्रथिने, यांबद्दल महिती देणारी तंत्रे. (५) कुटुंबीय आनुवंशिक विकारांच्या लक्षणांची निर्मिती होण्याआधीच निदान करणाऱ्या डीएनए विश्लेषक चाचण्या. उदा., बृहदांत्रातील (मोठ्या आतड्यातील) ग्रंथिअर्बुदयुक्त अर्श [→ रोगनिदान].

शल्यचिकित्सेतील उपचारांचे प्रकार : शल्यचिकित्सेत अवलंबलेल्या उपचारांचा उद्देश शरीराच्या नैसर्गिक रोगनिवारक प्रक्रियेत अडथळा आणणारे घटक दूर करून व्याधिग्रस्त किंवा क्षतिग्रस्त (इजा झालेल्या) भागाची प्रतिष्ठापना (दुरुस्ती) होण्यास मदत करणे हा असतो. यासाठी उपकरणांच्या मदतीने हस्तक्षेप करण्यापूर्वी औषधे, आहार, विश्रांती, व्यायाम, किरणोपचार यांसारख्या अनाक्रमक उपचारांची शक्यता व त्यांपासून भविष्यकाळात त्याच दोषाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता विचारात घेतली जाते. आघातजन्य जखमांच्या बाबतीत शल्यकर्माची मदत न घेतली तर जखम बरी होण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालते व विद्रूप व्रण मागे राहतात. तसेच तंतुमय ऊतकाची निर्मिती अधिक प्रमाणात व वेडीवाकडी होऊन, त्यामुळे एखाद्या तंत्रिकेवर किंवा वाहिनीवर दाब येण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शस्त्रक्रिया करताना पुढीलपैकी एक किंवा अनेक तंत्रे वापरली जातात. त्यांच्या जोडीला औषधोपचारादि इतर तंत्रांचा वापरही करता येतो.

शस्त्रक्रियेची तंत्रे : (१) छेदन : त्वचा किंवा श्लेष्मल (बुळबुळीत) पटलावर पुरेसा मोठा छेद घेऊन त्याखाली असलेल्या विद्रधीमधील द्रव आणि मृत ऊतकाचा निचरा होऊ देणे.  (२) दुरुस्ती : त्वचा, पटल किंवा अंतस्त्य यामधील जखम, फुटलेला व्रण किंवा छिद्र धाग्याने शिवून बंद करणे. त्यापूर्वी जखम स्वच्छ करून तिच्या वेड्यावाकड्या कडा कापून टाकल्या, तर जखम लवकर बरी होऊन व्रणाची खूण कमीत कमी राहते. (३) उत्पाटन : व्याधिग्रस्त ऊतक, इंद्रिय किंवा अर्बुद अथवा दुरुस्त न होऊ शकणारा अवयव पूर्णपणे काढून टाकणे.  (४) बंधन : रक्तस्राव थांबविण्यासाठी रक्तवाहिनी चिमट्याने पकडून धाग्याने बांधणे किंवा उष्णतेने (विद्युत् शलाकेने) डाग देऊन बंद करणे. (५) स्वच्छन अथवा विसंदूषण : शरीरात घुसलेली बाह्य वस्तू किंवा कण शोधून काढून टाकणे. याबरोबरच कधीकधी नष्ट ऊतक कर्तन करून जखम स्वच्छ करावी लागते. (६) पोकळ स्नायुयुक्त वाहिन्यांमधील (उदा., अन्न, पित्त, मूत्र इत्यादींच्या वाहिन्यांमधील) अडथळे दूर करणे. हे अडथळे वाहिनीच्या अंतर्भागातील (उदा., खडे, कृमी) असतात किंवा सूत्रल ऊतकाच्या निर्मितीमुळे संकोचन झाल्यामुळे निर्माण होतात. (७) सांध्यांची हालचाल मर्यादित करणारे किंवा उदरपोकळीत आतड्यांभोवती पाशनिर्मिती करणारे तंतुमय ऊतक काढून टाकून कार्यक्षमता पूर्वस्थितीस आणणे. (८) नैसर्गिक प्रतिष्ठापनास मदत करण्यासाठी दुखावलेल्या भागास विश्रांती देणारे आणि हालचाल टाळणारे बंधनात्मक उपचार. उदा., प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आच्छादन बसविणे, हाडांना धातूंच्या पट्ट्या किंवा खिळे बसविणे, छातीला चिकटपट्ट्या लावून बरगड्यांची हालचाल कमी करणे. (९) अवयवांची पुनर्रचना करणाऱ्या पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करणे. (१०) प्रतिरोपणाने अन्य व्यक्तीचे, रुग्णाचे स्वतःचे किंवा कृत्रिम ऊतक किंवा इंद्रिय बसविणे. उदा., त्वचा वृक्क, हृदयाची झडप, रक्तवाहिनी, सांधा हृदयासाठी विजेरी गतिकारक (पेस मेकर) वगैरे.

शस्त्रक्रिया : (शल्यकर्म सर्जिकल ऑपरेशन). विकाराचे निदान व त्यावरील उपचारांनी दिशा निश्चित झाली, म्हणजे रुग्ण व त्याचे नातेवाईक यांना त्यासंबंधी पूर्ण महिती दिली जाते. या माहितीचा विचार करून आणि कौटुंबिक व आर्थिक गोष्टी लक्षात घेऊन शस्त्रक्रियेसंबंधी निर्णयाला रुग्णाची संमती मिळणे आवश्यक असते. पर्यायी उपचारांची शक्यता व शस्त्रक्रियेची निकड यांनुसार शस्त्रक्रियेचा दिवस निश्चित करण्यात येतो.

मोठ्या व लहान शस्त्रक्रिया : हे वर्गीकरण काहीसे संदिग्धपणे केले जाते. विशेष उपकरणांचा उपयोग न करता, शुद्धिहरणाऐवजी स्थानिक संवेदनाहरणाच्या मदतीने, काही मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकणाऱ्या आणि रुग्णाला त्याच दिवशी घरी पाठविता येणाऱ्या शस्त्रक्रियांना लहान किंवा ‘गौण’ असे समजले जाते. वेदनाहरण, सूक्ष्मजंतुनाशन किंवा संक्रामण प्रतिबंध यांच्या दृष्टीने या शस्त्रक्रियांमध्ये मोठ्या शस्त्रक्रियेइतकीच काळजी घेतली जाते परंतु ऊतकांची हाताळणी मर्यादित प्रमाणावर असल्याने नंतर गुंतागुंत होण्याची शक्यता कमी असते. उदा., फार खोल नसलेल्या जखमा, मुख्यतः त्वचा व अधस्त्वचीय ऊतकांची दुरुस्ती, त्वचेवरील वसार्बुद किंवा त्वचाभ द्रवार्बुद काढून टाकणे, द्रवार्बुद आणि विद्रधी यांचे छेदन, उदरपोकळीतील द्रव काढणे, जैवऊतक तपासणीसाठी नमुना घेणे, कुटुंबनियोजनासाठी नसबंदी, अंतर्दर्शकाच्या मदतीने करावयाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया, अस्थिभंगासाठी प्लॅस्टर किंवा पट्टी बसविणे इत्यादी.

शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला निवासी स्वरूपात दाखल करून घ्यायचे की, बाह्यरुग्ण म्हणून बोलावून त्याच दिवशी परत पाठवायचे, हा निर्णय मोठी वा लहान शस्त्रक्रिया यावर अवलंबून असतो. तसेच पूर्वतयारी म्हणून करावयाच्या विविध गोष्टींनुसार तो बदलू शकतो. उदा., आयत्या वेळी शुद्धिहरणाची गरज भासल्यास पूर्वतयारी म्हणून निराहार ठेवणे, बस्ती देणे, शायक औषधांचा उपयोग, रक्तदाब किंवा मधुमेहाचे सुनियंत्रण करणे इत्यादींसाठी कधीकधी लहान शस्त्रक्रियेचा रुग्ण निवासी म्हणून दाखल करून घेणे सोयीचे असते. शस्त्रक्रियेआधी किंवा नंतर रक्त पोषक द्रव्ये, द्रव पदार्थ, औषधे इ. शिरेतून देणे आवश्यक वाटल्यास त्यासाठीही रुग्णाला रुग्णालयात प्रविष्ट करून घेतले जाते.

पूर्व तयारी : शस्त्रक्रियेपूर्वी विविध प्रकारच्या उपचारांची व उपाययोजनांची पूर्तता करावी लागते. त्यांमधील काही सर्वसाधारण उपाय असे आहेत.

(अ) संपूर्ण शारीरिक व विशेषतः शस्त्रक्रियेच्या क्षेत्राची स्थानिक स्वच्छता. रुग्णाला साबण लावून सर्व केस धुतात आणि ते उघडे राहू नयेत याची काळजी घेतात. गंभीर आजार वा जखमांमुळे ते अशक्य असल्यास त्याचे सर्वांग वारंवार पुसून काढले जाते. स्थानिक स्वच्छतेसाठी आदल्या दिवशी त्या भागावरील केस वस्तऱ्याने काढून, त्वचेवर जंतुरोधक द्रव लावून नंतर आच्छादन बांधून ठेवले जाते. त्वचेच्या पृष्ठभागावर, रंध्रांमध्ये, केसांच्या मुळांशी, भेगा व घड्यांमध्ये निरोगी व्यक्तीतही सूक्ष्मजंतू वास्तव्य करतात. त्यांची संख्या कमी करून त्यांना शस्त्रक्रियेच्या जखमेतून आत प्रवेश करण्याची संधी मिळू नये यासाठी ही सावधगिरी घ्यावी लागते.

(आ) रुग्णाच्या चाचण्यांमधून लक्षात आलेले त्याचे अन्य विकार नियंत्रित करून ते स्थिर स्थितीस आणून ठेवले जातात. उदा., हृदयविकार, उच्च रक्तदाब, अल्परक्तता, मधुमेह, श्वसनाची अकार्यक्षमता, दमा इत्यादी. शस्त्रक्रियेच्या तणावामुळे या विकारांची तीव्रता वाढू नये आणि त्यांच्या उपस्थितीमुळे शुद्धिहरणात किंवा जखमा बऱ्या होण्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत, असा दुहेरी उद्देश यामागे असतो.

(इ) शस्त्रक्रियेनंतर रचनात्मक व कार्यात्मक पुनःस्थापन लवकर होण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी जीवनसत्त्वे (विशेषतः ब व क जीवनसत्त्वे), प्रथिने, लवणे इ. पोषक द्रव्यांचा उपयोग केला जातो. आवश्यकतेनुसार शिरेतून लवणद्रावण, पोषण, रक्ताधान यांचा अवलंब करावा लागतो. रुग्णाचा रक्तगट तपासून त्या गटाचे रक्त उपलब्ध करून ठेवणे मोठ्या शस्त्रक्रियेसाठी अत्यावश्यक असते. दुर्मिळ रक्तगटांच्या बाबतीत आप्तेष्टांना सांगून रक्तदानासाठी तयार असणाऱ्या व्यक्तींची नावपत्त्यासहित यादी तयार करून ठेवली जाते.

(ई) शुद्धिहरणाच्या दृष्टीने तयारी शुद्धिहरणतज्ञाच्या सूचनेनुसार केली जाते. उदा., आदल्या दिवशी हलका आहार, रात्री व दुसऱ्या दिवशी द्रव आहार, शायक-शामक औषधे, चिंताहारक द्रव्ये, स्रावरोधी ॲट्रोपिनासारखी औषधे इत्यादी. [→ शुद्धिहरण].

(उ) पचनमार्ग, विशेषतः बृहदांत्र किंवा मलाशय यांची हाताळणी शस्त्रक्रियेत होणार असेल किंवा इतरत्र संक्रामणग्रस्त अवयवांचे विच्छेदन करावयाचे असेल, तर प्रतिबंधक उपाय म्हणून प्रतिजैविकांच्या मात्रा देण्यास आधीच सुरुवात करावी लागते.

(ऊ) रुग्णाला विश्वासात घेऊन शस्त्रक्रियेबद्दल थोडक्यात महिती दिली जाते. त्याच्या शंकांचे निरसन केले जाते. उदर किंवा छाती यावरील शस्त्रक्रियांमुळे श्वसनाची हालचाल वेदनादायक होऊ शकते. ती टाळण्यासाठी दुसऱ्या पद्धतीच्या श्वसनाच्या (उरुश्वसन किंवा उदरश्वसन) सराव रुग्णाला आधीपासून करावा लागतो.

शस्त्रक्रियागाराची रचना व कार्यपद्धती : रुग्णालयाच्या इमारतीचा शस्त्रक्रियेसाठी वापरला जाणारा भाग (शस्त्रक्रियागार ऑपरेशन थिएटर) सुसज्ज करताना काही मूलभूत उद्दिष्टे समोर असतात ती खालीलप्रमाणे :

(१) ज्या खोल्यांमध्ये प्रत्यक्ष शस्त्रक्रियेचे काम करायचे, त्या संपूर्णपणे निर्जंतुक करणे व तशा राखणे शक्य व्हावे यासाठी जमीन, भिंती, छत, बंद खिडक्या आणि पूर्णपणे मिटली जाणारी दारे या सर्व ठिकाणी कमीतकमी फटी वा भेगा असतात. सर्व पृष्ठभाग पाण्याने आणि निर्वातक यंत्राने सहज स्वच्छ होतील असे असतात. आतील हवा धूळविरहित, निर्जंतुक ठेवण्यासाठी कृत्रिम वायुवीजन आणि जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरणांचे पडदे यांचाही उपयोग कधीकधी केला जातो. आसपासच्या खोल्या आणि व्हरांडे यांची रचना अशी असते की, शस्त्रक्रियेतून बाहेर येणारे दूषित पदार्थ व उपकरणे आणि आत जाणारे स्वच्छ सामान व व्यक्ती यांचा परस्परांशी संपर्क येणार नाही.

(२) शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सर्व सामग्री शस्त्रक्रियागारातच पण स्वतंत्रपणे ठेवता यावी व तिचा रुग्णालयातील इतर विभागांशी संबंध येऊ नये. सामान साठविण्यासाठी व ते त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी शस्त्रक्रियागाराच्या संकुलात काही खोल्या राखून ठेवल्यास ही गोष्ट सहजसाध्य असते.

(३) पूर्वतयारी करून आणलेल्या रुग्णांना शुद्धिहरणाची सुरुवात वा प्रवर्तन करून नंतर प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या ठिकाणी नेल्यास बराच वेळ वाचतो व प्रदूषण टाळता येते. यासाठी संकुलात शुद्धिहरणासाठी स्वतंत्र खोली ठेवतात. तसेच शस्त्रक्रिया संपविल्यावर रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत त्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र स्वास्थ्यलाभ कक्ष असतो.

(४) शल्यचिकित्सक, त्यांचे साहाय्यक व परिचारिका यांना घासून हात धुण्यासाठी, निर्जुंतुक परिवेष धारण करण्यासाठी आणि प्रवेशनिषिद्ध अशा वस्तू ठषवण्यासाठी (उदा., पादत्राणे, बाहेर वापरलेले कपडे, पिशव्या, पर्सेस इ.) आणि विश्रांतीसाठी स्वतंत्र जागा असाव्यात. यांसाठी प्रक्षालन पात्रे बसविलेली खोली शस्त्रक्रियागाराला जोडूनच असते. सामानाची वैयक्तिक कपाटे ठेवलेली खोली त्याच्या अलीकडे असते.

(५) रुग्णाच्या नातेवाईकांना प्रतीक्षेसाठी जवळच स्वतंत्र जागा असावी.

या मूलभूत उद्दिष्टांखेरीज आधुनिक अद्ययावत रुग्णालयात रुग्ण, विद्यार्थी व शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रियेचे, विशेषतः अंतर्दर्शकीय प्रतिमांचे, दर्शन स्पष्टपणे घडविणारे व्हिडिओ कॅमेरे व पडदे, चित्रणाची सोय, जीवोतकाचे नमुने त्वरित तपासणारी प्रयोगशाळा, वातानुकूलन, सर्व प्रकारचे वायू व निर्वातन नळांनी पुरवणारी केंद्रीय यंत्रणा, शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शक लहान क्ष-किरण यंत्रे यांसाख्या अनेक सुविधा उपलब्ध असतात.

उपकरणे व सामग्री : शस्त्रक्रियागारात विविध प्रकारची साधने व पुनःपुन्हा वापरण्यासारखी किंवा एकदाच वापरून टाकून देण्याची पुढील सामग्री वापरली जाते.

(अ) निर्जंतुक करता येण्यासारखे (विद्राव किंवा वायूच्या मदतीने) लोखंडी, अगंज (स्टेनलेस) पोलादाचे किंवा क्रोमियम विलेपित भाग वापरलेले फर्निचर. उदा., रुग्णांसाठी हातगाड्या, शुद्धिहरणाची सामग्री ठेवण्यासाठी गाडी, निर्जंतुक उपकरणे आणि कापडी घड्या वगैरेंसाठी स्वतंत्र ढकलगाडी (ट्रॉली), उंची कमी-जास्त करता येणारी स्टुले, रुग्णाला झोपविण्याचे मुख्य टेबल इत्यादी. टेबलाची उंची कमी-जास्त करण्यासाठी पायाने दाबायची कळ असते. तसेच पृष्ठभागाचा उतार हवा तसा बदलण्याची सोयही असते. थंड प्रदेशात अशा टेबलांना खालून उष्णता देण्याची सुविधाही असू शकते. विशिष्ट शारीरिक स्थितीत रुग्णाला हातपाय न हलविता जखडून ठेवण्यासाठी आवश्यक साधने या टेबलाला जोडता येतात. शस्त्रक्रियेच्या क्षेत्रावर सावली न पडू देता भरपूर थंड प्रकाश देणारा दिवा, रक्त किंवा शिरेतून देण्याच्या इतर द्रव्यांच्या बाटल्या/पिशव्या अडकविण्याचे स्टॅंड, वापरून दूषित झालेले सामान टाकून देण्यासाठी पायाने झाकण उघडायच्या बादल्या इत्यादी.

(आ) कापडी वस्तू : निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक अशा उच्च तापमानात व वाफेत टिकाव धरणे, समाधानकारक शोषणक्षमता आणि घर्षणजन्य वीज निर्माण होऊन स्फोटक ठिणगी पडण्याचा धोका नसणे, या गुणांमुळे कापसापासून केलेल्या (सुती) कापडाचा वापर शस्त्रक्रियागारात शक्यतो केला जातो. अशा सुती वस्तू पुढील होत : इतरत्र वापरलेले कपडे काढून ठेवून त्याऐवजी घालावयाच्या अर्ध्या बाह्यांचे व पाठीमागच्या बाजूस नाड्या बांधावयाचे अंगरखे, केस पूर्ण झाकणाऱ्या टोप्या, नाकतोंड झाकणारे पट्टीसारखे मुखवटे, निर्जंतुक वस्तू गाडीवर मांडून ठेवण्यासाठी अंथरावयाच्या चादरी, रुग्णाच्या अंगाखाली व अंगावर घालावयाची आच्छादने (ही बहुधा हिरव्या रंगाची किंवा वेगळ्या दिसून येणाऱ्या रंगाची असतात). शस्त्रक्रियेसाठी त्वचेचा छेद घेतल्यावर जखमेलगत अडकवून जखम इतर सर्व भागांपासून वेगळी ठेवणारी आच्छादने इत्यादी. यांशिवाय हातरुमालासारख्या विशिष्ट मापांच्या आणि क्ष-किरणांनी दिसू शकणारे काही धागे किंवा नाड्या असलेल्या अनेक कापडी शोषकांची व बोळ्यांची आवश्यकता प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी असते. जाळीदार कापड किंवा फ्लॅनेल वा लिंट (रुई) वापरून ते तयार करतात.

(इ) विच्छेदनाची साधने : रुग्णाच्या ऊतकांशी प्रत्यक्ष संबंध येत असल्यामुळे ही साधने वाफेने अथवा पाण्यात उकळून निर्जंतुक करावी लागतात. त्यात टिकाव धरण्याच्या दृष्टीने उच्च प्रतीचे अगंज पोलाद किंवा क्रोमविलेपित लोखंडाच्याच वस्तू शस्त्रक्रियेत वापरतात. विविध आकारांच्या व मापांच्या या साधनांमध्ये कातऱ्या, साधे चिमटे, रक्तस्राव थांबविण्याचे रोहिणी-चिमटे, ऊतक पकडण्याचे चिमटे, शोषक धरण्याचे चिमटे, जखमेच्या कडा मागे ओढून धरण्याचे प्रतिकर्षक, पाते बदलता येणाऱ्या, सुऱ्या, हाडांच्या किंवा कूर्चेच्या छेदनासाठी करवती, छिन्नी, हातोडा, गिरमीट किंवा त्यासाठी वापरायच्या विजेरी यंत्रांची पाती इत्यादींचा समावेश होतो. यांशिवाय चूषण यंत्रास जोडावयाची धातूची नळी, विजेवर चालणाऱ्या उष्णशलाका यंत्राचे पाते ही निर्जंतुक स्वरूपात तयार ठेवली जातात.

(ई)  जखमा शिवण्याची साधने : विविध इंद्रिये व ऊतके यांची स्थाने आणि त्यांचा पोत यांनुसार त्यांच्या शिवणासाठी निरनिराळ्या आकारांच्या व जाडीच्या सुया आणि योग्य त्या पदार्थांपासून तयार केलेले धागे उपलब्ध असतात. दाभणासारख्या सरळ, परंतु टोकाचा भाग तीक्ष्ण त्रिधारी असलेली छेदक सुई वापरून त्वचा, व्रणयुक्त राठ पृष्ठभाग, मुखपट्ट इ. जाड व चिवट ऊतके शिवावी लागतात. आतड्यासारख्या नाजूक भागाला मात्र कमीतकमी आकारमानाचे व लवकर भरून येणारे छिद्र पडावे म्हणून तीक्ष्ण अग्राची पण बाकीचा भाग गुळगुळीत असलेली अर्धवर्तुळाकार सुई सोयीस्कर असते. निरनिराळी जाडी व लांबी असलेल्या अशा गोल सुया (वक्राकार) धरण्यासाठी विशिष्ट प्रकारचे चिमटे वापरतात. कमी जाडीच्या सुयांमध्ये धागा ओवणे कठीण असल्याचे धागा जोडलेल्या एकदाच वापरण्याच्या सुयाही मिळू शकतात.

टाके घालणे व रक्तवाहिन्या बांधणे यांसाठी निर्जंतुक नळ्यांमध्ये ठेवलेले धागे अनेक प्रकारांत उपलब्ध आहेत. नैसर्गिक तात, क्रोमिक अम्लयुक्त तात, कृत्रिम धागा (उदा., पॉलिग्लायकॉलिक अम्ल किंवा पॉलिग्लॅक्टिन-९१०) यांसारखे पदार्थ शरीरातील एंझाइमांच्या क्रियेमुळे हळूहळू विरघळून शोषले जातात. ही प्रक्रिया दोन आठवडे ते चार महिने चालू शकते. त्या मुदतीत त्यांचे ताणबल हळूहळू कमी होत जाते परंतु जखम बरी होईपर्यंत तिच्या कडा एकमेकींशी सुव्यस्थित जुळवून धरण्याचे या धाग्यांचे मुख्य कार्य तोपर्यंत पार पडलेले असते. अशोषणीय धाग्यांमध्ये साधे कपाशीचे सूत, रेशीम, नायलॉन, पॉलिप्रॉपिलीन, पॉलिएस्टर व पॉलिएथिलिनाचा समावेश होतो. अगंज पोलादाची तारही वापरली जाते. एकपेडी किंवा बहुपदरी स्वरूपातील हे धागे दीर्घकाळ जखमेला अंतर्गत ताणापासून वाचवितात. त्यांच्याभोवती तंतुमय ऊतकांचा कोश तयार होत असतो. काही प्रमाणात शोथकारक गुण व नंतर राहणाऱ्या खुणा यांच्यावर उपाय म्हणून विविध प्रक्रिया केलेले नवीन धागे तयार केले जात आहेत.

सर्व प्रकारच्या धाग्यांची जाडी ७/० (अतितलम), ६/०, ५/०, ……… १/०, १, २, ३ (जाड) अशा शब्दांत सांगितली जाते. सर्वसाधारणपणे २/० ते २ या मापांचे धागे नेहमी वापरले जातात. शिवलेल्या जखमेवर कापडी घड्या व पट्ट्या किंवा चिकटपट्ट्या लावल्या जातात.

(ऊ) इतर उपकरणे : शुद्धिहरण यंत्र, चूषण यंत्र, रुग्णाची हृदयक्रिया, रक्तदाब इत्यादींचा सतत आलेख दाखविणारे बोधक पडदे, रक्तस्रावरोधक आणि छेदक कार्य करणारे विद्युत प्रवाहदायक ऊतकतापन यंत्र, लहान क्ष-किरण यंत्र, निर्जंतुक पाणी सतत गरम करून रक्तस्राव प्रतिरोधासाठी उपलब्ध करून देणारे पाणी उकळण्याचे साधन इत्यादी. विशेष प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी इतर आवश्यक उपकरणे काही निवडक रुग्णालयांतच असतात.

शस्त्रक्रियागाराचा नित्यक्रम : येथे दररोज अनेक शस्त्रक्रिया होत असतात. त्या सर्वांसाठी आवश्यक सामग्री निर्जंतुक स्थितीत तयार ठेवणे, एकापाठोपाठ एक रुग्ण आत घेणे व एकाच वेली संकुलात चालू असलेल्या अनेक शस्त्रक्रियांसाठी परिचारिका व शुद्धिहरणतज्ज्ञांची सेवा मिळवून देणे या सर्व गोष्टी साधण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन आवश्यक असते.

मोठ्या रुग्णालयांत अनेक शल्यचिकित्सकांची पथके काम करत असतात. त्यामुळे या पथकांमध्ये आठवड्यातील कामाच्या दिवसांची विभागणी केलेली असते. प्रत्येक दिवशी कोणत्या लहान व मोठ्या शस्त्रक्रिया करावयाच्या याची निश्चित यादी पथकाचे निवासी प्रमुख संकुलाच्या प्रमुख परिचारिकेस आदल्या दिवशी देऊन त्यांचा क्रमही ठरवितात. निर्जंतुकतेच्या दृष्टीने गंभीर जंतुग्रस्तता असलेले रुग्ण सर्वांत शेवटी घेणे इष्ट असते. शस्त्रक्रियांच्या संख्येनुसार, आवश्यक सामग्री विशिष्ट पद्धतीने, हवाबंद होऊ शकणाऱ्या निर्जंतुकीकरण-डब्यांमध्ये भरली जाते. हे डबे वाफेने निर्जंतुक करून आणले जातात. शस्त्रक्रियेपूर्वी थोडा वेळ आधी शस्त्रक्रियागारातील परिचारिका त्यांतील आवश्यक तेवढे सामान मोजून आपल्या उपकरण-गाडीवर विशिष्ट पद्धतीने लावून ठेवतात. तीक्ष्ण टोके किंवा धार असलेली उपकरणे वाफेने खराब होऊ नयेत म्हणून शस्त्रक्रियागारातच उकळून किंवा उष्ण हवेच्या भट्टीत ठेवून निर्जंतुक करतात. दिवसाच्या सुरुवातीस शस्त्रक्रियेची खोली व आतील जड सामान जंतुनाशकाने पुसून घेतात. प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर दूषित झालेला भाग किंवा वस्तू पुन्हा त्याच पद्धतीने स्वच्छ करतात. प्रदूषण नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने शस्त्रक्रियागारातील कर्मचाऱ्यांची अनावश्यक ये-जा आणि संभाषण व बाहेरील व्यक्तींचा प्रवेश यांबद्दल शिस्त बाळगावी लागते.

रुग्णाला संकुलात आणल्यावर त्याच्या सोबतच्या कागदपत्रांच्या व चाचणी-अहवालांच्या मदतीने त्याची ओळख पटवून व कोणत्या भागावर किंवा बाजूवर (डावी/उजवी) शस्त्रक्रिया करावयाची आहे, त्याची पुन्हा निश्चिती करून त्याला शुद्धिहरणासाठी नेले जाते. शुद्धिहरण-प्रवर्तन पूर्ण झाल्यावर शस्त्रक्रियेला प्रारंभ करतात. रुग्णास ज्या टेबलावर झोपवलेले असते त्याच्या एका बाजूस (बहुधा रुग्णाच्या उजवीकडे) मुख शल्यचिकित्सक, त्यांच्या उजव्या हातास सामग्री देणारी परिचारिका व तिची उपकरण-गाडी, डाव्या हातास दुय्यम साहाय्यक आणि समोर दुसऱ्या बाजूस प्रथम साहाय्यक अशी उभे राहण्याची पद्धती सोयीस्कर असते. या चौघांनीही हात घासून धुतलेले असतात पूर्णपणे निर्जंतुक अंगरखे, टोप्या, मुखवटे व रबरी हातमोजे घातलेले असतात.

शस्त्रक्रियेसाठी छेद घेण्यापुरते क्षेत्र सोडून रुग्णाच्या शरीराचा इतर भाग कापडाने आच्छादला जातो. छेदाची जागा व जवळपासचे क्षेत्र जंतुरोधक द्रवाने स्वच्छ करून प्रथम त्वचा व नंतर अधस्त्वचीय ऊतकांचे स्तर यांचे सुरीने छेदन करणे, ही शस्त्रक्रियेची पहिली पायरी असते. त्वचेच्या कापलेल्या कडांना चिमट्यांच्या मदतीने कापडी आवरणे अडकवून शस्त्रक्रियेचे क्षेत्र पूर्णपणे बंदिस्त केले जाते. प्रत्येक छेदनाबरोबर निर्माण होणारी रक्तस्रावाची स्थाने कापडी शोषकाच्या घडीने टिपून जखम स्वच्छ ठेवण्याचे काम साहाय्यक करीत असतात. अधिक प्रमाणातील रक्तस्राव थांबविण्यासाठी रक्तवाहिन्या रोहिणी-चापांनी पकडाव्या लागतात. आवश्यक तर अशी रक्तवाहिनी धाग्याने बांधून बंद केली जाते. विजेने तापणारी शलाका वापरून किंवा चिमट्यातून विजेचा प्रवाह रक्तवाहिनीत सोडणारे ऊतकतापन उपकरण वापरून रक्तवाहिनीतील प्रवाह गोठविता येतो. जखमेत खोलवर होणारा रक्तस्राव दाब देऊन बंद करण्यासाठी आणि केशवाहिन्यांतून द्रवाचे झिरपणे थांबविण्यासाठी गरम पाण्यातून काढलेल्या कापडी बोळ्यांचा (ठासण्यांचा) उपयोगही केला जातो. शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट साधण्याचे जखमेतील मुख्य क्षेत्र स्पष्ट दिसण्यासाठी जखमेच्या कडा मागे ओढून धरण्याचे (प्रतिकर्षणाचे) कामही साहाय्यक करतात. शस्त्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णाच्या स्थितिबद्दल (विशेषतः रक्तदाब, श्वसन, हृदयक्रिया यांबद्दल) माहिती शुद्धिहरणतज्ज्ञ शल्यचिकित्सकांना देत असतात.

शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट असलेली दुरुस्ती पूर्ण झाल्यावर जखम बंद करण्यासाठी एकएक स्तर शिवण्यास सुरुवात होते. ही अखेरची पायरी सुरू करण्यापूर्वी जखमेच्या आत कोणतीही वस्तू राहिलेली नाही, याची खात्री होण्यासाठी परिचारिका सर्व उपकरणे, शोषक कापडी रुमाल, बोळे इत्यादींची मोजदाद करून घेते. जखम शिवण्याची क्रिया पूर्ण होत आल्यावर शुद्धिहरण द्रव्य देणे बंद करून आवश्यकतेनुसार नुसता ऑक्सिजन चालू ठेवला जातो. वेदनाहारक औषधाची एक मात्रा दिली जाते. जखम बंद करून वर पट्टी बांधल्यानंतर शेजारच्या निरिक्षण कक्षात रुग्णाला हलविले जाते. त्याच्या कागदपत्रात शस्त्रक्रियेचा संक्षिप्त अहवाल शस्त्रक्रियेस साहाय्य करणारे निवासी लिहून ठेवतात. शुद्धीवर येऊ लागलेल्या रुग्णास त्याच्या बिछान्याकडे पाठविण्याची व्यवस्था होते. रुग्णासाठी वापरलेली शस्त्रगारातील सर्व सामग्री बाहेर नेऊन धुण्यासाठी स्वतंत्र भागात नेली जाते.   दूषित भाग स्वच्छ केल्यावर पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी दुसऱ्या रुग्णाला आत  आणले जाते. दिवसअखेर संपूर्ण शस्त्रक्रियागार स्वच्छ केले जाते.

सुमारे आठदहा दिवसांनंतर, जखम बरी झाल्यानंतर रुग्णाचे अशोषणीय टाके निर्जंतुक उपकरणे वापरून काढले जातात. टाक्यांची छिद्रे भरून येईपर्यंत जंतुनाशक औषधे वापरून मलमपट्टी केली जाते.

शस्त्रक्रियेतील गुंतागुंती अथवा उपद्रव : यशस्वी शस्त्रक्रिया व शीघ्र पुनःस्थापन याला अनुकूल असे घटक पुढीलप्रमाणे आहेत : तरुण वय, पोषणाची सुस्थिती, हृदय व रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता, श्वसनतंत्र व रक्तातील हिमोग्लोबिन यांच्या समाधानकारक कार्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यातील निर्दोषता, निर्व्यसनी व्यक्तिमत्त्व आणि माहितीपूर्ण मानसिक तयारीतून निर्माण होणारी निर्भयता. याउलट, प्रतिकूल घटकांमध्ये पुढील गोष्टी येतात : अतिवार्धक्य, धूम्रपान, अनियंत्रित किंवा अस्थिर मधुमेह, उच्च रक्तदाब, अवटु-आधिक्य यांसारखे दीर्घकालिक विकार, प्रथिन कुपोषण व जीवनसत्त्वांची कमतरता, कर्करोग व त्यावरील औषधोपचार किंवा प्रारणचिकित्सा, अकार्यक्षम श्वसनतंत्र अथवा रक्ताभिसरणतंत्र, स्टेरॉइड द्रव्यांचा उपयोग, स्थूलपणा, जखमेत सूज, निःस्राव संचय, मृत ऊतकाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती किंवा बाह्य वस्तू चुकून राहणे संक्रामणामुळे निर्माण होणारा पू अथवा वायू द्रवाचा निचरा होण्यासाठी घालून ठेवलेली नळी निघून येणे मानसिक गोंधळामुळे रुग्णाची धडपड आणि भावनिक तणाव.

शस्त्रक्रिया चालू असताना निर्माण होणारे उपद्रव शुद्धिहरणातून निर्माण होऊ शकतात. उदा., रक्तदाब कमी होणे, हृदयाचे अनियमित स्पंदन, श्वसनाची खोली कमी होऊन ऑक्सिजनची न्यूनता इत्यादी. योग्य अशा शुद्धिहारक मिश्रणाने व कृत्रिम श्वसन यंत्राने ते उपद्रव त्वरित मिटविता येतात. इतर उपद्रव शस्त्रक्रियेच्या कार्यात इंद्रिये व ऊतकांची हाताळणी किंवा त्यांना होणारी इजा यांतून उद्‌भवतात. उदा., मोठ्या रक्तवाहिनीतून जखमेत खोलवर रक्तस्राव होणे, एका अंतस्त्यावर शस्त्रक्रिया करताना शेजारील अन्य इंद्रियाला इजा होऊन त्यातील ऊतक किंवा द्रव जखमेत सांडणे, इंद्रियांवर ताण पडल्यामुळे स्वायत्त तंत्रिका तंत्रातून प्रतिक्षेपी क्रिया घडून हृदयस्पंदन थांबणे अथवा रक्तदाब कमी होणे इत्यादी. अशा उपद्रवांची काळजी घेण्यासाठी जे उपाय योजावे लागतात, त्यांमुळे शस्त्रक्रियेचा एकूण कालावधी वाढून तितका अधिक काळ शुद्धिहरणात जात असल्याने नंतर होणारे उपद्रव वाढू शकतात.

शस्त्रक्रियेनंतर आढळणाऱ्या गुंतागुंतींमध्ये पुढील घटना दिसतात : दीर्घकाळ एकाच स्थितीत राहिल्यामुळे आणि रक्ताभिसरण मंदावल्यामुळे नीलांमध्ये क्लथन होणे (रक्त गोठणे) क्लथनातील काही भाग निघून येऊन तो इतरत्र अडकून बसल्यामुळे ⇨अंतर्कीलन, विशेषतः हृदय वा फुफ्फुस यांसारख्या ठिकाणी, होण्याचा धोका मूत्राशय व मलाशय यांचे कार्य दीर्घकाळ बंद होऊन लघवी साठून राहणे व मलावरोध कठीण भागांची त्वचा ताणली जाऊन तेथील रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे अंथरुणास टेकलेल्या भागांवर शय्याव्रण निर्माण होणे तोंडाच्या आतील भागाची स्वच्छता कमी होऊन आणि निर्जलीभवनामुळे तोंडात व्रण होणे किंवा लाळेच्या ग्रंथींमध्ये सूज येणे शरीराच्या कोणत्याही भागात (उदा., बृहदांत्र, श्वसनतंत्र, मूत्रमार्ग) प्रतिजैविकांना अवरोध करणारी जंतुजन्य संक्रामणे निर्माण होऊन त्यामुळे ताप येणे यांखेरीज शस्त्रक्रियेमुळे ऊतकांना होणारी इजा आणि शुद्धिहरणाची प्रक्रिया यांना प्रतिक्रिया म्हणूनही सुरुवातीच्या एक-दोन दिवसांत रुग्णाला थोडा ताप येऊ शकतो.

शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात निर्माण होणारे उपद्रवही कधीकधी त्रासदायक ठरतात उदा., त्वचेवरील जखम भरून न येणे त्या ठिकाणी संक्रामणजन्य सूज व पूयुक्त द्रव आढळणे खोलवर दुरुस्तीसाठी घातलेले टाके संक्रामणग्रस्त होणे, तेथे निर्माण होणारा विद्रधी (अवशिष्ट विद्रधी) आतल्या आत पसरणे त्याला त्वचेपाशी किंवा आत कुठे तरी तोंड फुटणे त्वचेवरील टाके फार घट्ट असल्यामुळे आतील दाबामुळे जखम फुटणे अशा प्रकारच्या उपद्रवांमुळे परत एखादी शस्त्रक्रिया करणे भाग पडते.

यांखेरीज रुग्णाच्या मानसिक स्थितीत बदल होऊन विनाकारण चिंता, विषण्णता, एकलकोंडेपणा किंवा उन्माद यांसारखे उपद्रवही कधीकधी उद्‌भवतात.

शस्त्रक्रियेनंतर करावयाचे उपचार व रुग्णासाठी सल्ला : शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर वर उल्लेख केलेले उपद्रव टाळण्यासाठी काही उपाय योजले जातात. ज्या कारणासाठी शस्त्रक्रिया केली ते कारण पुन्हा उद्‌भवू नये म्हणून रुग्णाला त्याच्या सवयी आणि जीवनपद्धतींबद्दल सल्ला देणेही आवश्यक असते.

सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांमध्ये वेदनाहारक औषधे, तीव्र अस्वस्थपणासाठी शायक-शामक द्रव्यांची झोपतेवेळी द्यावयाची मात्रा, संक्रामणाची शक्यता असल्यास प्रतिजैविके आणि ब व क जीवनसत्त्वांच्या दैनंदिन मात्रा यांचा उपयोग बहुतेक सर्व शस्त्रक्रियांच्या बाबतीत केला जातो. याशिवाय जरूर पडल्यास नळी घालून मूत्राशय रिकामा करणे, मलविसर्जन सोपे करण्यासाठी बस्ती किंवा मलाचा कठीणपणा कमी करणारी सौम्य रेचके, हलका आहार, भरपूर द्रव पदार्थ आणि रक्तस्राव अधिक झालेला असल्यास शिरेतून ग्लुकोज व लवणद्राव हे उपचारही केले जातात. खोलवरच्या नीलांमधील क्लथन टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर रुग्णाला हालचाल करण्यास प्रोत्साहन दिले जाते. दीर्घकाळ बिछान्यावर पडून राहणे अपरिहार्य असल्यास वरचेवर कूस बदलणे, पाठ स्पिरिटने पुसून व पावडर लावून कोरडी ठेवणे, पाणी भरलेल्या गादीचा वापर इ. उपाय शय्याव्रण टाळण्याच्या दृष्टीने केले जातात. खोल श्वसनाच्या उपचाराने फुफ्फुसांच्या तळाशी रक्तसंचय व संक्रामणाचा उपद्रव टाळता येतो.

जखम सुरक्षित ठेवण्यासाठी त्या क्षेत्राची अचानक होणारी हालचाल, ताण किंवा दाब निर्माण करणाऱ्या घटना (उदा., खोकला, जिना चढणे, पोटात वायू होणे, जड वस्तू उचलणे इ.) टाळाव्या लागतात. तसेच शस्त्रक्रियेनंतर बांधलेली पट्टी कोरडी व निर्जंतुक स्थितीत राहण्यासाठी तिची हाताळणी कमीत कमी आणि योग्य त्या व्यक्तीकडून होईल याची काळजी घ्यावी लागते. रुग्णाचे कपडे स्वच्छ असणे, ते दररोज बदलणे आणि बाहेर रस्त्यावर किंवा इतरत्र जाताना घातलेल्या कपड्यांचा किंवा वस्तूंचा जखमेशी संपर्क टाळणे यांबद्दल कटाक्षाने खबरदारी घेणे आवश्यक असते.

शस्त्रक्रियेची बाह्य जखम व आतील मुख्य शल्यकर्माने सुधारलेला भाग यांमधील ऊतकांचे प्रतिष्ठापन समाधानकारकपणे प्रगती करू लागल्यावर रुग्णावरील औषधोपचार व बाह्यरुग्ण विभागातील त्याची देखभाल यांची आवश्यकता संपते. त्यानंतर काही ठराविक अवधीनंतर (दर महिन्यास किंवा दर तीन महिन्यांनी) किंवा काही लक्षणे उद्‌भवल्यास शल्यचिकित्सक त्याची तपासणी करतात. रुग्णाला घरी पाठविताना त्याला दिलेल्या उपचारोत्तर पत्रिकेमध्ये त्याच्यावर केलेल्या शस्त्रक्रियेचा संक्षिप्त उल्लेख व नंतरचे उपचार किंवा घ्यावयाची काळजी यांबद्दल मार्गदर्शन असते. याखेरीज शल्यचिकित्सक, परिचारिका किंवा वैद्यकीय समाजसेविका रुग्णाच्या सर्व शंकांचे निरसन करून त्याला अनेक गोष्टींबद्दल सल्ला देतात. उदा., जखमेच्या क्षेत्राची सुरक्षितता, योग्य आणि वर्ज्य व्यायाम, आहार, छंद, दैनंदिन कामावरील मर्यादा, वाहन चालविण्यावरील निर्बंध, औषधोपचाराची आवश्यकता इत्यादी. कमीत कमी बंधने घालून व सकारात्मक मार्गदर्शन करून रुग्णाची जीवनशैली शक्य तेवढी पूर्ववत आणि सुखदायक ठेवण्याचा उद्देश यातून साधता येतो.

शल्यचिकित्सेबद्दल साधारण स्वरूपाच्या या माहितीनंतर काही विशेष क्षेत्रांचा थोडक्यात विचार यापुढील भागात केलेला आहे.

जठरांत्र शल्यचिकित्सा : अन्ननलिकेपासून गुदद्वारापर्यंत संपूर्ण अन्नमार्ग आणि त्याला जोडलेली यकृत, पित्ताशय, अग्निपिंड, आंत्रपुच्छ यांसारखी इंद्रिये यांच्या विकारांसाठी या शाखेत उपचार केले जातात. दीर्घकालिक विकारांमुळे अनेकदा रुग्णाची पोषणाची स्थिती खालावलेली असते. त्यामुळे शस्त्रक्रिया आवश्यक आहे, असे वाटल्यास पूरक आहारद्रव्ये मुखावाटे, नळीने किंवा नीलामार्गे देऊन शरीरातील कुपोषण व निर्जलीकरण दूर करावे लागते. अन्नमार्गात सूक्ष्मजंतूंचे वास्तव स्वाभाविकपणे अपेक्षित असते. जठर व लहान आतड्यातील अन्नमिश्रित द्रवाची अम्लता/अल्कता शरीरातील ऊतकद्रवांपेक्षा भिन्न असते. त्यामुळे असे द्रव उदरपोकळीत सांडल्यास तीव्र पर्युदरशोथ (आतड्यांच्या व इतर अंतस्त्यांच्या बाह्य आवरणाचा दाह) आणि जंतुसंक्रामण होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी योग्य ती शस्त्रक्रिया वेळीच करणे आणि शस्त्रक्रियेच्या वेळी अशा द्रव्याचा उदरपोकळीच्या पटलांशी संपर्क येऊ न देणे आवश्यक असते. सुदैवाने जठरांत्र विकारांवर आता प्रभावी औषधे निघाली आहेत. शस्त्रक्रियेनंतर अन्नमार्गाच्या आत किंवा बाहेर साठलेल्या द्रवांचा निचरा होण्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्यास संक्रामण, सूत्रल ऊतकांच्या निर्मितीमुळे इंद्रिये एकमेकांना चिकटणे, पोट फुगणे, उलट्या, जुलाब यांसारखे त्रासदायक उपद्रव टळू शकतात.

अन्ननलिकेच्या खालच्या टोकाचा कर्क, जठराचा पचनज व्रण व कर्क, मोठ्या आतड्यातील दीर्घकालिक शोथविकार (उदा., क्रोन विकार), व्रणयुक्त शोथ व कर्क, आंत्रपुच्छाचा वारंवार उद्‌भवणारा संक्रामणजन्य शोथ, पित्ताशयातील खडे, पित्तमार्गातील अडथळे, अग्निपिंडाचा तीव्र शोथ आणि कर्क, अंतर्गळामुळे आतड्याचे जांघेतून खाली स्थलभ्रष्ट होणे आणि वारंवार उद्‌भवणारी मूळव्याध यांवरील उपचार म्हणून केलेल्या शस्त्रक्रिया जठरांत्रशाखेत प्रामुख्याने दिसतात. लहान आतड्याचा एखादा पाश (वेटोळे) आतल्या आत अस्वाभाविक अशा तंतुमय ऊतकाच्या पट्ट्याभोवती आवळून फिरल्यामुळे किंवा त्याच्या स्वतःच्या आंत्रबंधाच्या मुळाशी पिळला गेल्यामुळे त्याचे कार्य बंद पडते व अन्नप्रवाहात अडथळा निर्माण होतो. अशा वेळी तो भाग शस्त्रक्रियेने मोकळा करतात किंवा कापून काढतात. आतड्यांच्या जोरदार हालचालींमुळे एक भाग दुसऱ्या भागात दुर्बिणीच्या नळीप्रमाणे घुसून बसतो. अशा ⇨ आंत्रांत्रनिवेशासाठी देखील शस्त्रक्रिया करावी लागते.

लहान मुलांमधील शस्त्रक्रियांमध्ये जठराच्या आतड्याशी जोडलेल्या निर्गमद्वाराचे उपजत संकोचन, मलाशयाच्या टोकाशी अविकसित गुदमार्गामुळे गुदद्वाराचा अभाव आणि चुकून गिळलेल्या हानिकारक वस्तू ही कारणे प्रामुख्याने दिसतात.

अन्नमार्गावरील शस्त्रक्रियेत विकारग्रस्त भाग काढून टाकून उरलेल्या निरोगी भागांची टोके एकमेकांना जोडण्याचे कौशल्यपूर्ण काम करावे लागते. कर्करोगाच्या विस्तृत वाढीमुळे कधीकधी ही जोडणी शक्य नसते. अशा वेळी पचनमार्गाच्या (जठर किंवा मोठे आतडे) निरोगी भागाचे टोक त्वचेपर्यंत वर आणून त्याला कृत्रिम द्वार केले जाते. त्यातून पातळ अन्न जठरात सोडणे किंवा बृहदांत्रातील मळाचा निचरा करणे, ही कामे करता येतात. ही द्वारनिर्मिती कायमस्वरूपी किंवा पुढील शस्त्रक्रियेपर्यंत तात्पुरती असू शकते. आसपासच्या त्वचेवर तिचा विपरीत परिणाम घडू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते.

यकृताचे दीर्घकालिक विकार आणि यकृतप्रवेशिका नीलांमधील उच्च रक्तदाब यांमुळे कधीकधी अन्ननलिकेच्या खालच्या टोकामधील नीला फुगून तीमधून रक्तस्राव होतो. गुदमार्गातही अशाच प्रकारच्या अपस्फीत नीला मूळव्याधीच्या विकारात आढळतात. वरचेवर रक्तस्राव झाल्यास या अपस्फीत नीला कापून काढाव्या लागतात. जठरातील पचनज व्रणासाठी डावीकडील प्राणेशा तंत्रिकेची जठराकडे जाणारी शाखा कापण्याची शस्त्रक्रिया करतात. या सर्व शस्त्रक्रिया वर उल्लेख केलेल्या शस्त्रक्रियांच्या मानाने कमी गंभीर असतात. याउलट आतड्यांवरील शस्त्रक्रियांपेक्षाही अधिक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये अग्निपिंडाच्या कर्करोगावरील आणि यकृतावरील शस्त्रक्रिया मोडतात. अनेक लसीका ग्रंथी, रक्तवाहिन्या, आतड्याचा काही भाग, पित्तमार्गाचा भाग इत्यादींचे उच्छेदन त्यात होत असल्यामुळे नंतरच्या उपद्रवांचे प्रमाणही अधिक असते. रक्तस्राव आणि वाहिनीक्लथन असे दोन्ही धोके त्यात संभवतात. या सर्व अडचणींवर मात करून जठरांत्र शल्यचिकित्सेत संपूर्ण यकृत काढून त्याऐवजी प्रत्यारोपण करणे, यांसारख्या अवघड शस्त्रक्रियाही आता शक्य होत आहेत. [→ जठरांत्र मार्ग].

मूत्रोत्सर्जन आणि जननेंद्रिय शल्यचिकित्सा : संपूर्ण मूत्रमार्ग आणि प्रामुख्याने पुरुष जननेंद्रिय यांमधील अवरोध, संक्रामणे व इतर विकार यांच्यावरील उपचार या शाखेत केले जातात. क्ष-किरण अपारगम्य द्रव्ये शिरेत देऊन त्यांचे उत्सर्जनचित्रण करण्याच्या तंत्रामुळे निदानाच्या दृष्टीने या विकारांमध्ये फारशी संदिग्धता आढळत नाही. याशिवाय मूत्रमार्गातून मूत्राशयापर्यंत वर सरकविता येणारे अंतर्दर्शक अश्मरी किंवा अर्बुद यांच्या निदानास उपयोगी असतात.

बहुतेक सर्व संक्रामणजन्य विकार औषधोपचारांनी आटोक्यात आणता येतात परंतु त्यांच्यामुळे उद्‌भवणारे मूत्रमार्गातील अडथळे शस्त्रक्रिया करूनच दूर करावे लागतात. इतकेच नव्हे, तर अडथळे निर्माण करणारे उपजत दोष किंवा नंतर उद्‌भवणारे विकार यांमुळे मूत्राच्या प्रवाहात वरचेवर अंशतः घट होत असेल, तर जंतुसंक्रामणास त्यामुळे मदत होते. हेही लक्षात घ्यावे लागते. असे अडथळे दूर करण्यासाठी मूत्रमार्गाच्या विस्फारणाची (विस्तारण्याची) शस्त्रक्रिया, अश्मरी काढणे, अष्ठीला ग्रंथी वाढल्यास तिचे उच्छेदन, शिश्नमणिच्छद कापून काढणे (सुंता करणे), मूत्राशयातील अंकुरार्बुद काढणे यांसारख्या पद्धती अवलंबाव्या लागतात. या शाखेतील इतर शस्त्रक्रियांमध्ये भ्रमणशील वृक्क एका जागी स्थिरबद्ध करणे, लहान मुलांमध्ये उदरीय पोकळीतच राहिलेले वृषण खाली आणून मुष्कात बद्ध करणे, वृक्काचे आरोपण, कर्करोगग्रस्त अष्ठीला ग्रंथीचे किंवा वृषणाचे उच्छेदन आणि वृषणातून निघणाऱ्या वीर्यवाहिन्यांचे छेदन (पुरुष नसबंदी) यांचा समावेश होतो.

अंतर्दर्शक व अश्मरीभंजक उपकरणांच्या मदतीने बहुसंख्य शस्त्रक्रिया मूत्रमार्गे केल्या जातता. ते शक्य नसल्यास ओटीपोटावर छेद घेऊन मूत्राशयापर्यंत पोहोचता येते. वृक्कावरील शस्त्रक्रिया पाठीच्या बाजूने छेद घेऊन करता. [→ जनन तंत्र मुतखडा मूत्रोत्सर्जक तंत्र].

हृदय आणि वक्षीय शल्यचिकित्सा : फुफ्फुसे, परिफुफ्फुसीय अवकाश (परिफुफ्फुस गुहा), अन्ननलिकेच्या मधला भाग, परिहृद् अवकाश, हृदय आणि महावाहिन्या यांच्या विकारांचा यात समावेश होतो. हे सर्व भाग बरगड्या व उरोस्थीच्या पिंजऱ्यात सुरक्षित असल्यामुळे शस्त्रक्रिया करावयाची असल्यास एक किंवा अधिक बरगड्यांचे छेदन करून आणि विशेष प्रकारच्या प्रत्याकर्षक साधनांनी बरगड्या एकमेकींपासून मागे ओढून धरून आतील भागांची हातळणी करावी लागते.

छातीच्या पिंजऱ्याला मुका मार लागून अथवा जोराचा दाब पडल्यामुळे बरगडीचा अस्थिभंग होऊन तिचे टोक आत घुसल्याने फुफ्फुसाला इजा होऊ शकते. रक्तस्राव होऊन परिफुफ्फुसीय अवकाशात रक्त पोकळी स्वाभाविक अवस्थेत फक्त द्रवाच्या एका पातळ थराने व्यापलेली असते. तिचे कार्य फुफ्फुस फुगलेल्या अवस्थेत ठेवण्याचे असते. या कार्यात बाहेरून रक्तद्रवाचा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा दाब आल्यास बाधा येते व फुफ्फुस दाबले जाते. त्यामुळे छातीवरील शस्त्रक्रियांमध्ये ही पोकळी निचरा करून सतत रिकामी ठेवण्यास फार महत्त्व असते. भेदक जखम झाल्यास आत घुसलेल्या तीक्ष्ण वस्तूच्या टोकामुळे केवळ फुफ्फुस नव्हे, तर रक्तवाहिन्यांदेखील फुटून परिफुफ्फुसीय आणि परिहृद्‌ पोकळीतही रक्त साठून श्वसन व हृदयाचे आकुंचन या दोन्ही क्रियांना बाधा येते. म्हणून या सर्व प्रकारच्या दुखापतींमध्ये शक्य तेवढ्या लवकर साठलेल्या द्रवाचा निचरा करणे व त्याच वेळी कृत्रिम श्वसन व ऑक्सिजन यांचा वापर करणे आवश्यक असते. मोठ्या प्रमाणात शिरेतून द्रव आणि रक्त पुरविण्याची व्यवस्थाही करावी लागते.

फुफ्फुसांवरील इतर शस्त्रक्रियांमध्ये उल्लेखनीय प्रकार पुढील प्रमाणे आहेत : दीर्घकालिक व औषधोपचारांनी कमी न होणारा विद्रधी काढणे प्रदीर्घ संक्रामणामुळे श्वासनलिका विस्फार झाला असल्यास विस्फारक्रिया अधिक असलेला भाग काढून टाकणे क्षयरोगावरील औषधांना प्रतिरोधक अशा जंतूंमुळे फुफ्फुसात कोशयुक्त विवरे झालेली काढून सूक्ष्मजंतूंच्या प्रसाराची केंद्रे नष्ट करणे कर्कग्रस्त भागाचे उच्छेदन करणे.

वाढत्या साधनसुविधांमुळे हृदयावरील शस्त्रक्रियांचे प्रमाण आता अधिकाधिक होत आहे. यासाठी उपलब्ध तंत्रांचे ‘बंद’ आणि ‘उघडे’ असे दोन मुख्य प्रकार आहेत. ‘बंद हृदय’ (कार्यरत हृदय) तंत्रामध्ये हृदयाचे रक्तक्षेपणाचे कार्य अबाधित ठेवल्यामुळे शरीरास नैसर्गिकरीत्या रक्तपुरवठा चालू असतो व तशाच परिस्थितीत शक्य असेल तेवढी हृदयाची हाताळणी केली जाते. ‘उघडे हृदय’ (स्वस्थ हृदय)  पद्धतीमध्ये हृदय आणि फुफ्फुसे यांचे कार्य पूर्णपणे यंत्राकडे सोपविण्यासाठी हृदय-फुफ्फुस उपमार्ग प्रथम कार्यान्वित केला जातो. हे यंत्र नीलांमधील रक्त ग्रहण करून त्याचे ऑक्सिजनीकरण करून ते परत शरीरास पुरवीत असताना सुमारे १-२ तासांच्या कालावधीत हृदयाचे स्नायू, झडपा किंवा रक्तवाहिन्या यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण केली जाते. या काळात आवश्यक वाटल्यास स्नायूंचे स्पंदन काही मिनिटे पूर्णपणे थांबविण्यासाठी अतिशय थंड (४०से.) असा पोटॅशियम क्लोराइडयुक्त विद्राव (हृदयघाती विद्राव) परिहृद्‌ रोहिण्यांमध्ये सोडला जातो. उपमार्गयंत्राचा उपयोग न करता `स्वस्थ हृदय’ शस्त्रक्रियेची दुसरी पद्धती अवतापनाची आहे. शरीराची चयापचयी कार्यशीलता कमी करून रक्ताची गरज कमी करण्यासाठी संपूर्ण शरीराचे तापमान सुमारे १५० ते ३०० से.पर्यंत खाली आणून त्या स्थितीत ८-१० मिनिटे रक्ताभिसरण पूर्णपणे बंद ठेवले जाते. या काळात हृदयावरील लहानसे शल्यकर्म पूर्ण होऊ शकते. प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये असे शीतन शरीराच्या लहान आकारमानामुळे सोपे असते. [→ छाती हृदय].

वाहिनी शल्यचिकित्सा : वाहिनीअर्बुदाशिवाय रक्तवाहिन्यांच्या इतर विकारांवरसुद्धा शस्त्रक्रियेने उपचार केले जातात. वाहिनीकाठिण्य, वाहिनीक्लथन, वाहिनीशोथ, अपस्फीत नीला आणि विविध प्रकारच्या जखमांमध्ये वाहिनीचे कमीअधिक प्रमाणात होत असलेले छेदन यासाठी शस्त्रक्रिया कराव्या लागतात. एखाद्या भागाचा रक्तपुरवठा कमी झाल्याने घडून येणारा ऊतकमृत्यू (उदा., मधुमेहामध्ये पायाच्या बोटांचा किंवा कधीकधी संपूर्ण पावलाचा नाश होणे.) टाळण्यासाठी वेळीच शस्त्रक्रिया करणे इष्ट ठरते. मेंदूच्या वाहिन्यांमधील किंवा पाठीच्या मणक्यांजवळील रोहिणींमधील कार्यक्षमतेच्या अभावाचे लवकर निदान झाल्यास पक्षाघाताचा विकार टाळण्यासाठी रोहिण्यांना उपमार्ग निर्माण करणे शक्य असते. अपस्फीत नीला काढून टाकल्यास पायांवर होणारे व्रण आणि सूज यांचा धोका नाहीसा होतो.

वाहिनींवरील शल्यकर्मात निरूपयोगी झालेला भाग काढून टाकणे अतितलम धाग्याने वाहिनींमधील जखमा शिवणे दोन वाहिन्या एकमेकींना जोडणे, उपमार्गांची निर्मिती, डेक्रॉनासारख्या कृत्रिम पदार्थांचा वापर करून कृत्रिम वाहिनी तयार करणे आणि शरीरातील अन्यत्र असलेल्या वाहिनीचा वापर करून स्वयंप्रतिरोपण करणे यांचा समावेश होतो. सूक्ष्मशस्त्रक्रियेसाठी सुमारे सहा ते चाळीसपट वर्धनक्षमता असणारे शस्त्रक्रियोपयोगी सूक्ष्मदर्शक वापरले जातात. क्लथनरोधी हिपॅरीन, डॉप्लर प्रवाहमापक, दुहेरी क्रमवीक्षण, वाहिनीचित्रण यांसारख्या साधनसामग्रींमुळे वाहिनींवरील शस्त्रक्रियांमध्ये अधिकाधिक यश मिळत आहे. अपरिहार्य अशा अवयवच्छेदनाच्या शस्त्रक्रियांमध्येसुद्धा वाहिन्यांची योग्य हाताळणी झाल्यामुळे नंतर होणारे उपद्रव टळून रुग्णाला लवकरच कृत्रिम अवयवांचा उपयोग करता येतो. कृत्रिम नलिकांच्या उपयोगाने प्रदीर्घ असे उपमार्ग निर्माण करून ते दीर्घकाळ कार्यशील ठेवण्यात यश मिळाले आहे. उदा., काखेतील रोहिणीपासून मांडीपर्यंत, एका मांडीपासून दुसऱ्या मांडीपर्यंत, महारोहिणीपासून उरुरोहिणीपर्यंत इत्यादी.

वर दिलेली तंत्रे वापरून हृदयाची कार्यक्षमता सुधारणारी शस्त्रक्रिया करता येते. प्रामुख्याने परिहृद्‌ रोहिणीमधील अंतर्‌रोध दूर करण्यासाठीच बहुसंख्य शस्त्रक्रिया नियोजिलेल्या असतात. क्ष-किरणाने दृश्यमान होणारी साधने वापरून परिहृद्‌ रोहिणीपर्यंत पोचणारी नळी घालून तेथील अडथळे दूर करण्यासाठी आतल्या आत फुगवता येण्यासारखा फुगा किंवा रोहिणी खुली ठेवणारा अंतर्गत आधार यांचा वापर प्रथम केला जातो. तो अयशस्वी ठरल्यास किंवा रोहिणीचा फार मोठा भाग विकारग्रस्त असल्यास प्रतिरोपणाची किंवा उपमार्गाची शस्त्रक्रिया करतात. छातीच्या आतील बाजूची डावी स्तनरोहिणी किंवा पायातील उरुउपरिस्थ नीला अथवा दोन्ही वाहिनींचा वापर करून हे प्रतिरोपण केले जाते. शस्त्रक्रियेमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका टळून रुग्णाची शारीरिक क्षमता बरीच वाढते.

हृदयाच्या झडपांचे काठिण्य वाढल्याने किंवा त्या एकमेकींस चिकटल्यामुळे अथवा स्थानभ्रष्ट झाल्यामुळे रक्तप्रवाहात जे दोष निर्माण होतात, त्यांच्या उपचारासाठी ‘उघड हृदय’ तंत्राने शस्त्रक्रिया करतात. दोषग्रस्त द्विदल झडप किंवा महारोहिणीची झडप यावर प्रामुख्याने केल्या जाणाऱ्या या शस्त्रक्रियांमध्ये जागच्या जागी केलेली दुरुस्ती किंवा प्रतिरोपण असे दोन पर्याय असतात. प्रतिरोपरासाठी यांत्रिक झडपा किंवा प्राणिजन्य ऊतकांपासून केलेल्या जैव झडपा वापरतात. शस्त्रक्रियेनंतर दीर्घकाळपर्यंत रक्तक्लथनरोधक औषधे घ्यावी लागतात.

उरोहृदय शाखेतील आणखी एक शस्त्रक्रिया प्रकार महावाहिन्यांशी संबंधित असतो. वाहिनीमधील संयोजी ऊतकांची आधारदायक शक्ती कमी झाल्यामुळे किंवा काठिण्यप्रक्रियेत अंतःस्तराची अखंडता भंगल्यामुळे एका ठिकाणी फुगवटा निर्माण होऊन त्याचे रूपांतर वाहिनीअर्बुदात होते. ते फुटून रक्तस्राव होण्याचा धोका असतो. ही आपत्ती टाळण्यासाठी त्याची दुरुस्ती केली जाते. वाहिनीक्लथनाचा संभवही अशा अर्बुदांमुळे वाढतो. फार मोठा भाग काढून टाकण्याची आवश्यकता भासल्यास जैव किंवा कृत्रिम सामग्री वापरून प्रतिरोपण करावे लागते.  [→ रक्ताभिसरण तंत्र].

तंत्रिका शल्यचिकित्सा : डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापती, मेंदूमधील रक्तवाहिन्यांचे क्लथन किंवा रक्तस्राव, पाठीच्या कण्याला होणारे विकार व त्यांतून उद्‌भवणारे मेरुरज्जूचे दोष इत्यादींचे व्यवस्थापन या शाखेत केले जाते. शायके, ज्वरशामके,  झटके कमी करणारी औषधे आणि रक्तदाब व श्वसनक्रिया सुस्थितीत ठेवण्याचे उपाय इ. काही मोजक्या औषधोपचारांशिवाय इतर काहीही फारसे प्रभावकारक उपचार उपलब्ध नसल्याने दीर्घकाळ परिचर्या करावी लागते. गेल्या काही दशकांमध्ये विद्युत्‌ मस्तिष्कालेखन (ईईजी), सी.टी.स्कॅन, चुंबकीय अनुस्पंदनी प्रतिमादर्शन (एमआरआय) यांसारख्या साधनांनी [→ वैद्यकीय प्रतिमादर्शन] दोषांचे स्थान निश्चित करणे सोपे असले, तरी दोषनिर्मूलन फार अवघड असते. शस्त्रक्रियेने मेंदू व मेरुरज्जूच्या पृष्ठभागाजवळचे, आवरणांच्या क्षेत्रातील दोष दूर करता येतात.

डोक्याच्या कोणत्याही भागावर जोरदार आघात होऊन कवटीच्या हाडाचा भंग झाल्यास शस्त्रक्रिया करून त्याखालील मेंदूच्या आवरणात झालेला रक्तसंचय काढून टाकला जातो. अन्यथा मेंदूवर दाब पडून त्याची लक्षणे दिसू लागतात. आघात एखाद्या विशिष्ट भागावर न होता सर्वव्यापी असल्यास (उदा., स्फोटक पदार्थाच्या सान्निध्यात असल्यामुळे) हाडाला इजा न होता मेंदूच्या सर्व भागांवर त्याचा दुष्परिणाम होऊन बेशुद्धावस्था निर्माण होते. अशा वेळी मेंदूला आलेली सूज ओसरण्यासाठी शिरेतून ‘मॅनिटॉल’ विद्रावासारखे उच्च ⇨ तर्षण  दाब निर्माण करणारे पदार्थ दिले जातात. दाब कमी करण्यासाठी कवटीला छिद्रे पाडून आणि करवतीने छेद घेऊन एखादा भाग तात्पुरता उघडा केला जातो. अशाच प्रकारची शस्त्रक्रिया आत घुसलेला बाह्य पदार्थ काढून टाकण्यासाठी केली जाते.

मेंदूत किंवा मेरुरज्जूच्या क्षेत्रात निर्माण झालेले अर्बुद, त्याभोवती कोश किंवा पटलाचा आधार असल्यामुळे मर्यादित झाले असल्यास शस्त्रक्रियेने काढता येते. विशिष्ट भागांच्या अकार्यक्षमतेमुळे होणारे विकास (उदा., पार्किनसन कंपवात) केंद्रस्थ अपस्मार औषधोपचाराने नियंत्रित होत नसल्यास शस्त्रक्रियेने मेंदूतील काही ऊतकांचा नाश करतात. उपकरणांच्या मार्गदर्शनासाठी त्रिमितीय अनुचलन वापरून अशा शस्त्रक्रियांची यशस्विता वाढत आहे. [→ तंत्रिका तंत्र मेंदू मेरुरज्जु].

पुनर्रचनात्मक शल्यचिकित्सा : उपजत दोष, विकारजन्य ऊतकनाश, अपघातामुळे निर्माण झालेली त्वचेची रूपहीनता यांच्या निवारणासाठी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केल्या जातात. कधीकधी त्यांचा उद्देश केवळ सौंदर्यवर्धन एवढाच असतो. वयोवर्धनामुळे ओघळणारे चेहऱ्याचे ऊतक वर उचलणे, नाकाचा आकार बदलणे, कृत्रिम नाकपुड्या तयार करणे, डोळ्यांच्या फटी रुंदावणे, कर्करोगासाठी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर स्तनाचा आकार सुधारणे यांसारख्या अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया विकसित झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. कुष्ठरोगी आणि भाजल्यामुळे त्वचा विवर्ण झालेल्या व्यक्तींना पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेमुळे विशेष दिलासा मिळतो.

पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेसाठी रुग्णाच्या स्वतःच्या निरोगी भागातील त्वचा व अधस्त्वचीय ऊतकाचे प्रतिरोपण, कृत्रिम (प्लॅस्टिक) पदार्थांचे ऊतक बसविणे आणि अतिरिक्त ऊतकाचे उच्छेदन (उदा., चरबी काढून टाकणे.)  यांचा अवलंब केला जातो. रक्तवाहिन्यांवरील सूक्ष्म शस्त्रक्रिया तंत्रे विकसित झाल्यामुळे एका ठिकाणची त्वचा रक्तवाहिनीसकट काढून दुसऱ्या ठिकाणी बसविणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या टप्प्याटप्प्याने करावयाच्या देठप्रतिरोपण पद्धतीऐवजी एकाच वेळी सर्व प्रतिरोपण पूर्ण होऊ शकते. खूण न ठेवणारे कृत्रिम धागे आणि सहज स्वीकारले जाणारे कृत्रिम ऊतक-पर्यायी पदार्थ यांमुळे पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया अधिकाधिक फलदायी होत आहे.

कर्करोग शल्यचिकित्सा : कर्करोगावरील उपचारांमध्ये विकिरण, कर्करोधी औषधे, हॉर्मोने आणि शस्त्रक्रिया यांसारख्या विविध उपायांचा आधार घ्यावा लागतो. या सर्वांच्या उपयोगाच्या मर्यादा प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्रपणे ठरवून घ्यावा लागतात. त्यामुळे शस्त्रक्रियेचे नियोजनही इतर उपचारांच्या संदर्भानुसार केले जाते. उदा., प्राथमिक उपचारासाठी एखाद्या अर्बुदावर शस्त्रक्रिया करून त्याचा अधिकतर भाग काढून टाकला, तर नंतरच्या दुय्यम उपचारात लसीका ग्रंथीत व इतरत्र पसरलेल्या कोशिकांमधील रोगाचे निर्मूलन करण्यासाठी विकिरण किंवा औषधांची मात्रा कमी करता येते.

स्तनाचा कर्क, मृदू ऊतकांमधील मांसकर्क, यकृतार्बुद, वृषणस्थ आणि त्वचेवरील अर्बुदे यांचे उच्छेदन अनेकदा प्राथमिक उपचार म्हणून केले जाते. प्रक्षेपित (स्थलांतरित) कर्कवृद्धीवरील शस्त्रक्रिया त्यामानाने लक्षणानुसार व मोजक्या प्रमाणात करता येतात. उदा., यकृत, अस्थी, फुफ्फुसे, किंवा मेंदूमध्ये असलेली वाढ औषधाने कमी होत नसेल व तीव्र लक्षणे निर्माण करीत असेल, तरच काढली जाते. कर्कप्रक्षेपणामुळे उदर पोकळी, परिहृदयाची पटले, परिफुफ्फुसीय अवकाश या ठिकाणी पाणी साठत असेल (अभिस्यंदन होत असेल), तर ते कमी करण्यासाठीही शस्त्रक्रिया करावी लागते. इतरत्र इंद्रियांवरील, तंत्रिकांवरील अथवा वाहिन्यांवरील दाबामुळे निर्माण होणारे उपद्रव कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करतात.

कर्करोधी औषधे कोशिकांवर घातक परिणाम करीत असल्यामुळे त्यांची मात्रा शरीराचे, पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि रोगाच्या कोशिकांची अंदाजे संख्या यांनुसार कमीत कमी प्रमाणात दिली जाते.  अशा मात्रा कर्कार्बुदास रक्तपुरवठा करणाऱ्या नजिकच्या रोहिणीमध्ये मंद गतीने सोडण्यासाठी रोहिणीविच्छेदनाची शस्त्रक्रिया करता येते अन्यथा नीलांमधून किंवा मुखावाटेही औषधे वापरता येतात.

एकंदरीत पाहता, कर्करोगासाठी होणाऱ्या व्यापक उच्छेदनाच्या शस्त्रक्रियांवरील भर आता कमी झाला असून जास्तीत जास्त निरोगी ऊतक टिकवून ठेवणाऱ्या, शरीरविद्रूपता टाळणाऱ्या इतर उपायांचा अवलंब केला जातो. [→ अर्बुदविज्ञान कर्करोग].

बालरोग शल्यचिकित्सा : इंद्रियांचे लहान आकारमान, ऊतकांची मृदूता, शुद्धिहरणातील अडचणी, शरीराच्या तापमानाचा आणि ऊतकांच्या जलीभवनाचा नाजूक समतोल यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे बालकांमध्ये शस्त्रक्रिया करताना विशेष काळजी घ्यावी लागते. याउलट रक्तदाब, मधुमेह, अतिरेकी चिंता, व्यसनाधीनता, हाडांचा ठिसूळपणा यांसारख्या उपद्रवकारी घटकांच्या अभावामुळे जखमा लवकर बऱ्या होऊन मूल लवकरच आपले नित्यक्रम अनुसरण्यास तयार होते.

गर्भावस्थेत रक्ताचे ऑक्सिजनीकरण, ऊतकांना पुष्ट करणाऱ्या अन्नघटकांचा पुरवठा, चयापचय आणि उत्सर्जन या कार्यांसाठी मातेच्या शरीरावर अवलंबून असल्यामुळे भ्रूणाच्या शरीरामध्ये प्रौढाच्या शरीरात नसलेली अनेक वैशिष्ट्ये आढळतात. या विशिष्ट रचना जन्मापूर्वी आणि जन्मानंतर काही काळात लोपून त्यांचे केवळ अवशेषच बाल्यावस्थेच्या अखेरीस शिल्लक राहतात.  त्या टिकून राहिल्यास शस्त्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. याची काही उदाहरणे : नाभि-अंतर्गळ वंक्षण अंतर्गळ लहान आतड्यापासून निघणारा मेकेल अंधवर्ध मूत्राशयापासून नाभीपर्यंत जाणारी वाहिनी किंवा तिचे अंशत: रज्जूमध्ये रूपांतर, जठरनिर्गमी संकोचन, अशाच प्रकारचे पचन मार्गातील इतरत्र संकोचन उदरस्थित वृषण हृदयाच्या उजव्या व डाव्या भागांतील रक्ताचे परस्परांशी मिश्रण होऊ देणारी आंतरअलिंद किंवा आंतरनिलय रंध्रे अशा छिद्रांबरोबरच फुफ्फुस रोहिणीचे संकोचन झाल्यामुळे होणारी नील-अर्भक स्थिती, महारोहिणीच्या प्रारंभाशी संकोचन, महारोहिणी व फुफ्फुस रोहिणी यांना जोडणारी आदिसंयोजी वाहिनी खुली (विवृत्त) असणे. या प्रत्येक दोषामुळे नवजातामध्ये त्वरित लक्षणे निर्माण होतातच असे नाही परंतु ती जेव्हा निर्माण होतील तेव्हा किंवा त्यांचे निदान झाल्यावर पुढील उपद्रवांची संभाव्यता ठरवून शस्त्रक्रिया केली जाते.

प्रसूतीची प्रक्रिया दीर्घ काळ लांबल्यामुळे किंवा अर्भकाचे शरीर व मातेचा जननमार्ग यांतील प्रमाणात विसंगती असल्याने काही दुखापती नवजातामध्ये आढळतात. उदा., डोक्यावरील अधस्त्त्वचीय ऊतकात रक्तस्राव होऊन तेथे रक्तार्बुद निर्माण होणे हात, पाय, कवटी किंवा जत्रू (गळपट्टी हाड) यांचा अस्थिभंग, मेंदूच्या आवरणात रक्तस्राव, मानेच्या स्नायूंना इजा, यकृतावर दाब पडून त्यातून रक्तस्राव इत्यादी. अशा प्रकारच्या दुखापतींवर त्वरित शस्त्रक्रिया करून किंवा योग्य प्रकारे विश्रांत स्थितीत पट्टीबंद करून उपचार केले जातात.

यांखेरीज बालरोग शल्यचिकित्सेत उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांत विविध प्रकारच्या अपघाती जखमा, प्राण्यांनी चावल्यामुळे होणाऱ्या जखमा, भाजल्यामुळे झालेल्या दुखापती, खेळताना गिळलेल्या वस्तू, बालपक्षाघातासारख्या विकारांमुळे निर्माण होणारी व्यंगे किंवा असमर्थता, खंडतालू, खंडौष्ठ, दृष्टिदोष, श्रवणदोष इत्यादींचा समावेश होतो. ( नवजात अर्भक बालरोगविज्ञान).

स्त्रीरोग शल्यचिकित्सा : प्रसूतीशी संबंधित शल्यचिकित्सेचा विचार ⇨ प्रसूतिविज्ञानात केलेलाच आहे. स्त्री जननेंद्रियाच्या इतर वैद्यकीय उपचारामध्ये वंध्यत्व, ऋतुस्रावाशी संबंधित दोष, अर्बुदे, गर्भधारणेस प्रतिबंध आणि उतारवयातील विस्थापने यांची प्रामुख्याने दखल घेतली जाते. यांतील अनेक तक्रारींचे निवारण लिंग हॉर्मोने व त्यांची नियंत्रक इतर हॉर्मोने यांच्या मदतीने होऊ शकते. या उपचारांशी यश न आल्यास शस्त्रक्रिया कराव्या लागतात.

योनिच्छद, योनिमार्ग, गर्भाशयग्रीवा, गर्भाशयाचा मुख्य भाग, अंडवाहिन्या आणि त्यांची अंडाशयांशी उघडणारी द्वारे असा जननेंद्रियाचा पोकळ मार्ग असतो. त्यात एका दिशेने अंडमोचनामुळे बाहेर पडलेले स्त्रीबीज, फलन झालेले बीज किंवा फलनाच्या अभावामुळे बाहेर टाकून द्यावयाचे (ऋतुस्रावाचे) गर्भाशय अंतस्तर यांचा प्रवास होत असतो. त्याच्या विरुद्ध दिशेने पुरुषबीजे असलेल्या रेताची मार्गक्रमणा असते. या संपूर्ण मार्गातील संकोचन, तंतुमय ऊतकाची निर्मिती किंवा उपजत दोष दूर करणाऱ्या शस्त्रक्रिया स्त्रीरोगचिकित्सेसाठी शक्य असतात. उदा., योनिच्छदाचे छेदन, योनिमार्गाच्या शेवटच्या भागात असलेल्या ग्रीवेचे विस्फारण, गर्भाशयातील संकोचनकारी ऊतकांचे छेदन, अंतःस्तर खरवडून काढणे, हवेच्या दाबाने अंडवाहिन्या उघडणे (मोकळ्या करणे.), अंडवाहिन्यांची तोंडे छेदन करून उघडणे. केवळ वंध्यत्वावर उपचार म्हणून नव्हे, तर ऋतुस्रावाची अल्पता, वेदनाजनकात यांसाठीही ग्रीवाविस्फारण व खर्वन या संयुक्त पद्धतीचा अनेकदा अवलंब केला जातो.

दुसऱ्या प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये आधारदायक बंध सैल झाल्यामुळे गर्भाशयाचा मुख्य भाग पुढे किंवा मागे झुकणे, त्याचे अंतर्वलन होणे किंवा संपूर्ण गर्भाशय योनिमार्गात सरकणे (स्खलन) यांच्या पुनःस्थापनेच्या शल्यकर्मांचा समावेश होतो. योनिमार्ग आणि गर्भाशयाच्या दुर्बलतेमुळे मूत्राशय किंवा मलाशय यांचा दाब जननमार्गावर पडत असल्यामुळे अथवा मूत्राशयावरील नियंत्रण कमी होऊन असंयत अवस्था झाल्यामुळे अशाच प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. ग्रीवेची अक्षमता दूर करण्यासाठी ⇨विठ्ठल नागेश शिरोडकर  यांनी सुचविलेली शस्त्रक्रिया याच वर्गात मोडते.

जननमार्गाच्या अंशतः अवच्छेदनाच्या शस्त्रक्रिया विविध प्रकारच्या असतात. अंतःस्तराच्या अतिरेकी वाढीमुळे होणारा दुर्दम्य रक्तस्राव, अत्यार्तव, स्नायुअर्बुदे, तंत्वार्बुदे, ग्रीवा, किंवा मुख्य भागाचा कर्करोग, अंडाशयातील द्रवार्बुदे, स्खलन यांसारख्या विकारांसाठी अशा शस्त्रक्रिया कराव्या लागतात. योनिमार्ग आणि अंडाशय यांचा जास्तीत जास्त भाग सुरक्षित ठेवून विकृत ऊतक काढून टाकले जाते. मर्यादित स्वरूपाचे अवच्छेदन योनिमार्गे करता येते. अधिक व्यापक, विशेषतः कर्करोगाच्या आक्रमणाची शंका असल्यास करावयाच्या शस्त्रक्रिया आणि मारक नसलेल्या, परंतु आकारमानाने प्रचंड अशा अर्बुदांच्या उच्छेदनासाठी पोटावर छेद घेतला जातो.

गर्भनिरोधासाठी गर्भाशयात साधने बसविणे (उदा., तांबी) आणि अंडवाहिन्या बांधून टाकणे, तसेच वैद्यकीय गर्भपात या शस्त्रक्रिया लवकर होणाऱ्या व कमी उपद्रवकारक असल्याने फार मोठ्या प्रमाणावर केल्या जातात परंतु इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे स्त्रीरोग शल्यचिकित्सेतही संक्रामण, रक्तस्राव यांसारखे धोके टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. [→ स्त्रीरोगविज्ञान].

आघात, अपघात आणि अतिदक्ष शल्यचिकित्सा : औद्योगिकीकरण, दैनंदिन जीवनातील गतिमानता आणि हिंसाचार, तसेच वाढती लष्करी सुसज्जता यांमुळे आधुनिक काळात वैद्यकीय सेवेला आणखी एका प्रकारची तयारी ठेवावी लागते. वेगवान वाहनांना होणारे अपघात, कारखाने व रासायनिक प्रयोगशाळांमधील दुर्घटना, सुरुंगाचे स्फोट, व्यापक संहार करणाऱ्या शस्त्रास्त्रांचा उपयोग, महापूर व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती यांसारख्या घटनांमुळे एकाचवेळी अनेक व्यक्ती गंभीरपणे जखमी होतात. त्यांच्यावरील उपचारांचे आव्हान पेलण्यासाठी रुग्णालयांना स्वतंत्र व्यवस्था अल्पावधीत उभी करावी लागते. तांत्रिकदृष्ट्या या क्षेत्रातील औषधोपचार व शस्त्रक्रिया इतर रुग्णांवरील उपचारांपेक्षा निराळे नसले, तरी त्यांचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करावे लागते. [→ अपघात].

आघात [→ अभिघात] शल्यचिकित्सेसाठी केवळ मोठ्या प्रमाणात साधनसामग्री आवश्यक असते, असे नाही. ती विविध प्रकारांची असावी लागते. नजीकच्या परिसरात कोणत्या प्रकारच्या आपत्तींची शक्यता आहे, याचा अंदाज घेऊन रुग्णालये आपली सज्जता ठेवतात. विशिष्ट रसायनांच्या संपर्कासाठी त्यांचा घातक परिणाम टाळणारे उतारे तयार ठेवतात. उदा., कृषिक्षेत्रात कीटकनाशकांवर उतारे उपलब्ध असावे लागतात. अतिदक्षता देखभाल आणि शस्त्रक्रियेनंतरची परिचर्या यांसाठी रुग्णालयातील उपलब्ध खाटांची संख्या कमी पडल्यास तात्पुरते रुग्णकक्ष निर्माण करण्यासाठी जागेची तरतूदही आवश्यक असते. [→ रुग्णालय].

कान-नाक-घसा यांची शल्यचिकित्सा : मराठी विश्वकोशात या इंद्रियाबद्दल माहिती इतरत्र आली आहे. [→ कान ग्रसनी नाक]. या क्षेत्रांतील महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पुढील आहेत: लहान मुलांमध्ये अडकलेले बाह्य पदार्थ काढणे, नाकातील मांसवृद्धी काढणे, नासाकोटरांचे वेधन नाकपुडीतील पडदा सरळ नसल्यास त्याचे हाड काढणे, मध्यकर्णातील संक्रामणासाठी निचरा करून देणे गिलायू काढणे इत्यादी. स्वरयंत्राच्या कर्करोगांमुळे ते पूर्णपणे काढून श्वसनासाठी कृत्रिम द्वार बसविण्याची शस्त्रक्रिया जिभेच्या कर्करोगासाठी अंशतः जिभेचे उच्छेदन आणि कर्णबधिरतेसाठी अंतर्कर्णात गवाक्षन या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही आता मोठ्या प्रमाणात यशस्वी रीत्या केल्या जातात.

विकलांग चिकित्सा, नैत्रवैद्यक, मोतीबिंदू, दंतवैद्यक आणि अंतस्त्यप्रतिरोपण यांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत.

पहा : अंतस्त्य – प्रतिरोपण ऊतकतापन चिकित्सा तापाधिक्य व तापन्यूनता दंतवैद्यक निर्बीजीकरण नीच तापमान भौतिकी नेत्रवैद्यक भौतिकी चिकित्सा मोतीबिंदू रोग विकलांग चिकित्सा वैद्यकीय उपकरणे वैद्यकीय प्रतिमादर्शन शल्यतंत्र व शालाक्यतंत्र हृदय क्ष-किरण वैद्यक.

संदर्भ :  1.Bynum, W.F. Porter, R., Eds., A Companion Encyclopedia of History of Medicine, Vols. 1 and 2, London, 1993.

2. Greaves, I. Ryan, J.M. Porter, K. M., Eds., Trauma, London, 1998.

3. Kaczmarowski, N. Patient Care in the Operating Room, Endinburgh, 1989.

4. Kyle, J. Smith, J. A. R. Johnstion, D.H., Eds., Pye’s Surgical Handicraft, Oxford, 1992.

5. Simpson, P. M. Introduction to Surgical Nursing, London, 1998.

6. Walton, J. Barondess, J. A. Lock, S., Eds., Oxford Medical Companion, Oxford, 1994.

7. Williamson, R. C. N. Waxman, B. P., Eds., Peter R. Scott’s An Aid to Clinical Surgery, Edinoburgh, 1994.

श्रोत्री, दि. शं.