आर्थ्रोपोडा : (संधिपाद संघ).  ज्यांच्या पायांना सांधे असतात अशा अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांचा हा संघ असून प्राणिसृष्टीतील अपृष्ठवंशी प्राण्यांचा तो सगळ्यात मोठा संघ आहे.  या संघातील माहीत असलेल्या जातींची संख्या १५ लाखांपेक्षा जास्त आहे. यांपैकी काही जातींच्या प्राण्यांची संख्या विपुल आहे. शेवंडे, खेकडे, झिंगे, गोमा, विंचू, गोचिडी, किडी, उवा, कीटक इ. प्राण्यांचा या संघात समावेश होतो. यांच्या आकारात आणि आकारमानात पुष्कळच वैचित्र्य आढळते.  किडींसारखे काही प्राणी सूक्ष्म असतात तर जपानी खेकड्यासारखे (मॅक्रोकीइरा) काही प्रचंड असतात.  या संघातील प्राण्यांचे वेगवेगळ्या परिस्थितीत राहाण्याकरिता अनुकूलन झालेले असते.  यांचा विस्तार उत्तर ध्रुवप्रदेशापासून दक्षिण ध्रुवप्रदेशापर्यंत झालेला आहे.  कित्येक संधिपाद पर्वतांवर ६,१०० मी. पेक्षाही जास्त उंचीवर तर काही समुद्रात ५,५०० मी. पेक्षाही जास्त खोलीवर आढळतात.  काही भूचर आहेत तर काही जलचर असून गोड्या, मचूळ किंवा खाऱ्या पाण्यात राहाणारे आहेत.  कित्येक मातीत राहातात तर काही उडणारे आहेत.  काही जाती वनस्पती अथवा प्राणी यांवर उपजीविका करणाऱ्या म्हणजे परजीवी असतात.  काही संघचारी आहेत.  मुंग्या, वाळवी यांच्यासारख्या कीटकांच्या वसाहती असून त्यात श्रमविभाजनाच्या तत्त्वावर व्यवस्थित समाजरचना असलेली दिसून येते.

संधियुत (सांधे असलेले) पाद, सखंड (भाग असलेले) शरीर, आणि ðकायटिन  नावाच्या कठीण द्रव्याची बनलेली बाह्यत्वचा ही जरी या संघाची विशिष्ट लक्षणे असली तरी या संघाची म्हणून आणखीही काही लक्षणे देता येण्यासारखी आहेत.  शरीर द्विपार्श्वसममित असते [→ प्राणिसममिती] मुख आणि गुदद्वार शरीराच्या विरुद्ध टोकांना असतात आहारनाल (अन्ननलिका) पूर्ण असतो शीर्ष, वक्ष आणि उदर हे शरीराचे तीन भाग स्पष्टपणे वेगवेगळे किंवा निरनिराळ्या प्रकारे सायुज्यित (एकत्रित झालेले) असतात शीर्षाचे खंड नेहमीच एक झालेले असतात प्रत्येक प्रारूपिक (नमुनेदार) खंडावर उपांगांची (शरीराला जोडलेल्या भागांची अथवा इंद्रियांची) एक जोडी असते पायांचे किंवा उपांगांचे खंड पडलेले असून ते चल सांध्यांनी जोडलेले असतात कठीण बहिःकंकालाने (बाहेरच्या सांगाड्याने) शरीर झाकलेले असते, कंकालाचे ठराविक कालाने निर्मोचन (कात टाकण्यासारखी त्वचेचा बाह्य थर काढून टाकण्याची क्रिया) होते पक्ष्माभिका (हालचाल करणारे केसांसारखे बारीक तंतू) मुळीच नसतात सगळे स्नायू रेखित (ऐच्छिक) असतात देहगुहा (शरीरभित्ती आणि आतली इंद्रिये यांच्यामध्ये असणारी पोकळी) फारच लहान झालेली असते, तिच्या जागी रुधिर-गुहा (रक्त असलेली पोकळी) असून तिचे परिवहन तंत्राशी दळणवळण असते मुखाच्यावर असलेला मेंदू आणि त्याला जोडलेली गुच्छिकांची एक दुहेरी साखळी यांचे केंद्रीय तंत्रिका तंत्र (मज्जातंतूंचा व्यूह) बनलेले असते.

वर्गीकरण : आर्थ्रोपोडा संघामध्ये चार वर्ग आहेत : (१) क्रस्टेशिया (कवचधर वर्ग), (२) मीरिॲपोडा (अयुतपाद म्हणजे पायांच्या अनेक जोड्या असलेल्या प्राण्यांचा वर्ग), (३) इन्सेक्टा (कीटक वर्ग) आणि (४) अरॅक्निडा (अष्टपाद वर्ग).  काही प्राणिशास्त्रज्ञ ऑनिकोफोरा हा आर्थ्रोपोडा संघाचा पाचवा वर्ग मानतात, पण या समूहाची लक्षणे बरीच भिन्न असल्यामुळे काही शास्त्रज्ञांनी त्याला आर्थ्रोपोडातील उपसंघाचा दर्जा दिला आहे.  काही शास्त्रज्ञांना वर्गीकरणाच्या वरील दोन्ही पद्धती मान्य नसल्यामुळे त्यांनी ऑनिकोफोरा या प्राणिसमूहाला स्वतंत्र संघाचा दर्जा दिला आहे [→ ऑनिकोफोरा].

(१) क्रस्टेशिया : (कवचधर वर्ग).  या वर्गातील प्राणी मुख्यतः जलचर असून गोड्या त्याचप्रमामे खाऱ्या पाण्यात राहातात.  शीर्ष आणि वक्ष यांच्या वरच्या पृष्ठावर पृष्ठवर्म (चिलखत) असते. 

आ. १. काही कवचधारी (क्रस्टेशियन) प्राणी : (१) झिंगा, (२) शेवंढा, (३) खेकडा, (४) सायक्लॉप्स.

शरीराच्या पश्च (मागील) टोकावर पुच्छखंड (शेपटीचा भाग) असतो.  बहिःकंकाल कठीण, कायटिनमय असून कॅल्शियमच्या लवणांनी जास्त दृढ झालेला असतो.  शीर्ष पाच खंडांचे  बनलेले असून त्यावर शृंगिकांच्या (स्पर्शेद्रियांच्या) दोन जोड्या, जंभांची (भक्ष्य पकडण्याकरिता व त्याचे तुकडे करण्याकरिता आहारनालाच्या पुढच्या टोकाशी असणाऱ्या संरचनांची) एक जोडी आणि जंभिकांच्या (निरनिराळ्या कार्यांकरिता ज्याचे अनेक प्रकारे रूपांतर होते अशा जंभांच्या मागे असणाऱ्या उपांगांच्या) दोन जोड्या असतात.  प्रत्येक खंडावर उपांगांची एक जोडी असून काही उपांगे द्विशाखी असतात.  अन्न मिळविणे, चालणे, पोहणे, श्वसन आणि जनन या कार्यांकरिता उपांगांचे रूपांतर होते.  देहगुहेचा र्‍हास झालेला असून रुधिर-गुहिका असते.  लिंगे भिन्न असतात.  शेवंडे, झिंगे, खेकडे व बार्नेकल ही या वर्गाची काही उदाहरणे होत [→ क्रस्टेशिया].

(२) मीरिॲपोडा : (अयुतपाद वर्ग).  या वर्गातील प्राण्यांचे, काही महत्वाच्या लक्षणांतील फरकांमुळे दोन भिन्न गट पडतात.  या गटांना डिप्लोपोडा आणि कायलोपोडा ही नावे दिलेली आहेत.  अलीकडच्या वर्गीकरणात हे दोन स्वतंत्र वर्ग मानलेले असल्यामुळे मीरिअपोडा वर्गाच्याऐवजी डिप्लोपोडा आणि कायलोपोडा हे दोन वर्ग धरले जातात.  यामुळे आर्थ्रोपोडा संघात चारांच्याऐवजी पाच वर्ग आहेत असे समजले जाते [→ मीरिॲपोडा].

आ. २. काही अयुतपाद (मीरिॲपोड) प्राणी : (१) वाणी (सहस्रपाद), (२) गोम.

डिप्लोपोडा वर्ग : या वर्गातील प्राणी भूचर असून मातील राहाणारे आहेत.  शरीर नलिकाकार, लांब आणि खंडयुत असते प्रत्येक खंडावर (पहिले चार सोडून)  पायांच्या दोन जोड्या असतात डोक्यावर शृंगिका, जंभ आणि जंभिका यांची प्रत्येकी एक जोडी असते जननरंध्रे शरीराच्या अग्र टोकाकडे असतात.  या वर्गात मिलिपिडांचा (सहस्रपादांचा) समावेश होतो.

कायलोपोडा वर्ग : हे प्राणी भूचर आहेत.  शरीर लांब, चपटे आणि खंडयुत असते प्रत्येक खंडावर पायांची एक जोडी असते शीर्ष स्पष्ट असून त्यावर लांब शृंगिका, जंभ आणि जंभिका यांची एकेक जोडी असते शरीरावरील पायांच्या पहिल्या जोडीच्या टोकावर तीक्ष्ण नखर (नख्या) असून ते एका विषग्रंथीला जोडलेले असतात जननरंध्रे शरीराच्या मागच्या टोकावर असतात.  या वर्गात गोमांचा समावेश होतो.


(३) इन्सेक्टा: (कीटक वर्ग).  हा एक फार मोठा वर्ग आहे.  कीटकांच्या ५०–६० लक्ष जाती असाव्यात असा तर्क आहे. यांपैकी फक्त ७ लक्षच शास्त्रज्ञांना माहीत आहेत. कीटक प्रायः भूचर आहेत, पण कित्येक जाती गोड्या अथवा खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या आहेत. कित्येक उडणाऱ्या आहेत. प्रौढ कीटकाच्या शरीराचे शीर्ष, वक्ष आणि उदर असे स्पष्ट भाग पडलेले असतात.  शीर्षावर शृंगिका आणि जंभ यांची एकेक जोडी आणि जंभिकांच्या दोन जोड्या असतात. वक्षावर पायांच्या तीन जोड्या असतात.  काही कीटकांना पंख असतात.  उदरावर युग्मित जोड्या असलेली उपांगे नसतात. झुरळे, राळी (रातकिडे), टोळ, नाकतोडे, उवा, चतुर, माश्या, फुलपाखरे, मुद्‌गल (भुंगेरे), वाळवी इत्यादींचा या वर्गीत समावेश होतो [→ कीटक कीटकांचे वर्गीकरण].

(४) ॲरॅक्निडा : (अष्टपाद वर्ग).  या वर्गातील प्राणी मुख्यतः भूचर आहेत. शरीर खंडयुक्त असून सामान्यतः त्याचे शिरोवक्ष (डोके आणि छाती यांच्या एकीकरणाने बनलेला भाग)  आणि उदर असे दोन स्पष्ट भाग असतात.  पायांच्या चार जोड्या असतात.  शृंगिका आणि पंख नसतात.  विंचू, कोळी, गोचिडी इत्यादींचा या वर्गात समावेश होतो. ‘जिवंत जीवाश्म’ (अवशेष रूपानेच माहीत असलेल्या प्राचीन जातींपैकी सध्या जिवंत असलेल्या जाती) असा ज्याचा पुष्कळदा उल्लेख करतात तो लिम्युलस याच वर्गातला आहे [→ ॲरिक्निडा].

लक्षणे : संधिपादाचे अध्यावरण (त्वचा), अधस्त्वचा (उपत्वचा उत्पन्न करणारा आणि तिच्या खाली असणारा कोशिकामय म्हणजे शरीराच्या सूक्ष्म घटकांचा थर), तिच्या खाली असणारी आधारकला (आधार देणारा कोशिकांचा पातळ थर) आणि तिच्या बाहेर किंवा वर असणारी उपत्वचा (त्वचेचा संरक्षक बाह्य भाग) या तीन थरांचे बनलेले असते. अधस्त्वचेत कोशिकांची एकच ओळ असते व या कोशिका उपत्वचा उत्पन्न करतात. उपत्वचा कायटिन (नायट्रोजनयुक्त पॉलिसॅकॅराइड), स्क्लेरोटिन (प्रथिन) व क्युटिक्युलीन (प्रथिन) या पदार्थांची बनलेली असते. या तीन पदार्थांमुळेच संधिपादांच्या अध्यावरणात दृढता आणि प्रतिरोधशक्ती (प्रतिकार करण्याची शक्ती) येते. या कठीण उपत्वचेचाच कंकाल बनलेला असून त्याने सगळे शरीर (पाय आणि इतर उपांगांसहित) आच्छादिलेले असते.  बहिःकंकालामुळे शरीराचे रक्षण होते आणि त्यातील सगळ्या स्नायूंच्या आसंजनाच्या (चिकटविण्याच्या) कामीही त्याचा उपयोग होतो.

संधिपादांचे चलन ते ज्या परिस्थितीत राहतात तिच्यावर अवलंबून असते.  जलचर पोहतात व भूचर चालतात. या दोन्ही प्रकारच्या चलनाकरिता त्यांची कित्येक उपांगे अनुकूलित झालेली असतात. शेवंड्यासारखे काही प्राणी पोहू शकतात व शरीराच्या मध्यभागावर असलेल्या पायांनी समुद्रातील खडकांवर चालू शकतात. काही संधिपाद पोहत पुढे त्याचप्रमाणे मागेही जाऊ शकतात. खेकडा अतिशय जलद गतीने आडवा (बाजूला) चालत किंवा धावत जातो. समुद्रात किंवा गोड्या पाण्यात राहाणारे खेकडे पोहू शकतात.  बरेच कीटक पंख असल्यामुळे उडू शकतात.

आ. ३. काही कीटक : (१) झुरळ, (२) कसर, (३) खंडोबाचा घोडा, (४) फुलपाखरू.

आहारनाल शीर्षातील मुखापासून शरीराच्या अंतिम खंडावर असलेल्या गुदद्वारपर्यंत पसरलेला असतो.  तो नळीसारखा असून त्याचे मुखपथ (बाह्यस्तराचे अस्तर असलेला मुखगुहेचा भाग, अग्रांत्र), मध्यांत्र आणि गुदपथ (बाह्यस्तराचे अस्तर असलेला पचनमार्गाचा अखेरचा भाग, पश्चांत्र) असे तीन भाग असतात.  पहिला आणि तिसरा हे दोन्ही भाग बाह्यत्वचेपासून उत्पन्न झालेले असल्यामुळे त्यांना आतून उपत्वचेचे अस्तर असते.  मध्यांत्र अंतस्त्वचेपासून तयार झालेले असते.  अतिविकसित संधिपादांमध्ये  मुखपथाचे तीन अथवा चार विभाग पडलेले असतात.  मुखाच्या मागे ग्रसनी (घसा), तिच्या मागे ग्रसिका (घशापासून जठरापर्यंतचा आहारनालाचा नळीसारखा भाग)  आणि त्यानंतर अन्न साठविण्याकरिता एक कोष्ठ (अन्नपुटक) आणि ते दळण्याकरिता एक कोष्ठ (पेषणी) असतो [→ जठरपेषणी]. मध्यांत्र लांब किंवा आखूड असते.  कधीकधी याला पार्श्व (बाजूवर असणाऱ्या) अंधवर्धांच्या (एखाद्या पोकळीपासून निघालेल्या व बाहेरच्या टोकाशी बंद असलेल्या नळ्यांच्या किंवा पिशव्यांच्या) जोड्या जोडलेल्या असतात.  अष्टपाद वर्गात (ॲरॅक्निडा) हे अंधवर्ध फार मोठे असतात.  गुदपथाचे आंत्र आणि मलाशय असे दोन भाग असतात.  आंत्राच्या सुरुवातीला मालपीगी नलिका (उत्सर्जन करणाऱ्या नलिका) त्यात उघडतात.

पृष्ठवंशी प्राण्यांचे रक्त बंद रक्तवाहिन्यामधून वहात असल्यामुळे अशा प्रकारच्या परिवहन तंत्राला ‘संवृत’ (बंद) असे नाव दिलेले आहे. पण संधिपादांमध्ये रक्त केवळ बंद वाहिन्यांमधूनच वहात नसून उघड्या गर्तिका (लहान खळगे)  आणि गुहिका (लहान पोकळ्या) यांतूनही वहात असते म्हणून अशा प्रकारच्या परिवहन तंत्राला ‘विवृत’ (उघडे) असे म्हणतात.  रोहिण्या लहानमोठ्या कशाही असल्या तरी त्यात वहाणारे रक्त ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांमध्ये) असणाऱ्या कोशिकांमध्ये न जाता परिआंतरांग (आतील इंद्रियांच्या भोवती असणाऱ्या) गुहिकांमध्ये जाते, यांना कोटरे म्हणतात आणि त्यांत असणाऱ्या रक्ताने विविध अंगे आणि त्यांची ऊतके भिजतात.  या कोटरांमधून रक्त परिहृत (हृदयाभोवती असलेल्या) कोटरात गोळा होते.  हृदय लांब नळीसारखे व पृष्ठीय असते, त्याच्या स्पंदनाने त्याच्या अग्र टोकापासून निघणाऱ्या महारोहिणीमधून रक्त पुढे जाऊन अखेरीस कोटरांमध्ये जाते.  हृदयावर असलेल्या रंध्रांमधून परिह्रत कोटरातील रक्त हृदयात जाते.  पुष्कळ लहान संधिपादांमध्ये हृदय नसते पण पायांच्या किंवा उपांगांच्या व शरीराच्या हालचालींमुळे रक्ताचे परिवहन होते.


पुष्कळ संधिपादांचे रक्त श्वसनाचे कार्य करीत नसल्यामुळे त्यात श्वसनरंजक (श्वासोच्छ्‌वासाच्या क्रियेत ऑक्सिजनाशी संयोग झाल्यावर रंग उत्पन्न करणारे द्रव्य) नसतो.  काही जलीय कीटक आणि क्रस्टेशियन प्राणी यांत रक्त श्वसनाचे कार्य करते.  त्यामुळे त्यांच्या रक्तात हीमोग्लोबीन किंवा हीमोसायानिन हे विशिष्ट श्वसनरंजक आढळतात. ते खास रुधिरकोशिकांमध्ये नसून रक्तात विरघळलेले असतात.

आ. ४. काही अष्टपाद : (१) विंचू, (२) राजकर्कट (लिम्युलस), (३) कोळी (४) गोचिड.

संधिपाद ज्या परिस्थितीत राहात असतील तिला अनुसरून त्यांच्या श्वसनयंत्रणांचे परिवर्तन झालेले असते.  पाण्यात राहाणारे संधिपाद प्रायः त्यांच्या पश्च उपांगांवर असलेल्या कित्येक क्लोमांनी (कल्ल्यांनी) श्वासोच्छ्‌वास करतात पण अगदी लहान जलीय जातींत शरीरावरील अध्यावरणातून श्वसन होते. क्लोम बहुधा बाह्य प्रवर्धांच्या (वाढून पुढे आलेल्या भागाच्या)  स्वरूपाचे असून उपांगांच्या बुडांवर असतात.  या प्रवर्धांना शाखा असतात किंवा घड्या पडलेल्या असतात.  काही अष्टपादांमध्ये पुस्तक-फुप्फुसांनी [→ ॲरॅक्निडा] श्वसन होते. शरीराच्या अधर (खालच्या) पृष्ठावरील लहान गर्तिकांत ही पुस्तक-फुप्फुसे असतात.  तथापि, बहुतेक भूचर संधिपाद श्वासनालांनी श्वासोच्छ्‌वास करतात.  हे नलिकांसारखे असून देहभित्तीच्या अंतर्वलनाने (आत वळून) तयार झालेले असतात. श्वासनालांना शाखा व उपशाखा असून त्या शरीरात सगळीकडे पसरलेल्या असतात व त्यांतून ऊतकांना हवा पोहोचते. श्वासनालांना उपत्वचेचे अस्तर असून कुंडलित (मळसूत्रासारख्या गुंडाळलेल्या) स्थूलनाने (जाडीने) त्याला मजबुती आलेली असते. श्वासरंध्रांमधून (हवा आत घेण्याकरिता असणाऱ्या छिद्रांमधून) श्वासनालात हवा शिरते.

संधिपादांची उत्सर्जनांगे (निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकणारी इंद्रिये) विविध प्रकारची असतात.  वृक्कक (नळीसारखे एक उत्सर्जनांग) कधीही नसतात. पुष्कळ संधिपादांमध्ये  उत्सर्ग-पदार्थ शरीराबाहेर टाकण्याकरिता विशिष्ट अंगे नसतात.  निर्मोचनाच्या (कात टाकण्याच्या) क्रियेतच बऱ्याच प्रमाणात ते बाहेर टाकले जातात. विशिष्ट उत्सर्जनांगे सर्वसाधारणपणे दोन प्रकारची असतात : (१) शृंगिक ग्रंथी, जंभिका ग्रंथी आणि कक्ष ग्रंथी (पायाच्या पहिल्या भागातील ग्रंथी) यांच्यासारखी खंडयुत उत्सर्जनांगे आणि (२) मालपीगी नलिका.  पहिल्या प्रकारची उत्सर्जनांगे वाहिन्यांच्या द्वारे पायांवर, शृंगिकाच्या बुडाशी किंवा मुखांगाच्या जवळ बाहेर उघडतात. मालपीगी नलिका आंत्रात उघडतात.  या नलिका रुधिरगुहिकांतून नायट्रोजनयुक्त मल काढून आंत्रात सोडतात आणि तेथून तो शरीराबाहेर पडतो.  काही अष्टपाद आणि अल्प विकसित कीटक यांत या नलिका आखूड आणि थोड्या असतात. पण बहुतेक कीटकांत त्या दोऱ्यासारख्या बारीक, लांब आणि पुष्कळ असून रुधिरगुहिकेत पसरलेल्या असतात.

संधिपादांचे तंत्रिका तंत्र ॲनेलिडांच्या तंत्रिका तंत्राच्या नमुन्याचे असते. शीर्षातील पहिल्या तीन गुच्छिकांच्या सायुज्यनाने पृष्ठीय मेंदू बनलेला असतो.  मुखपथाच्या दोन्ही बाजूंची गेलेल्या संयोजकांनी तो अधर तंत्रिका-रज्जू या अग्र टोकाशी असलेल्या अधोग्रासिका-गुच्छिकेला (ग्रसिकेच्या खाली असलेल्या गुच्छिकेला) जोडलेला असतो.  अधर तंत्रिका-रज्जूवर सामान्यतः प्रत्येक खंडात एक याप्रमाणे  गुच्छिका असतात.  पुष्कळदा शरीराच्या कित्येक खंडांचे एकीकरण होऊन विशेष भाग (उदा., वक्ष) तयार होतात, अशावेळी त्या खंडांतील तंत्रिका-गुच्छिकांचे सायुज्यन होऊन एकच मोठी गुच्छिका तयार होते.

पुष्कळ संधिपादांची ज्ञानेंद्रिये विशिष्ट आणि सूक्ष्मग्राही (अगदी बारीक संवेदना ग्रहण करणारी) असून विविध प्रकारची असतात.  ज्ञानेंद्रियांची इतकी विविधता अपृष्ठवंशी प्राण्यांच्या इतर कोणत्याही समूहात दिसून येत नाही.  संयुक्त नेत्र, अक्षिका (अगदी लहान साधा डोळा), रसायनग्राही (रसायनांनी उद्दीपित होणारी) अंगे, संतुलनपुटी (तोल सांभाळण्यासाठी असलेली इंद्रिये), स्पर्शेंद्रिये, घ्राणेंद्रिये इ. विविध ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने संधिपाद आपल्या भोवती काय घडत आहे याविषयी फार जागरूक असतात.

संधिपादांमध्ये लिंगे भिन्न असतात आणि प्रजोप्तादन सामान्यतः लैंगिक रीतीने होते.  बहुसंख्या संधिपाद अंडज (घातलेल्या अंड्यांपासून जन्मणारे) आहेत. अगदी थोड्या जातींमध्ये निषेचित (शुक्राणूंशी संयोग झालेल्या) अंड्यांचा विकास शरीराच्या आत होतो.  सर्वसाधारणपणे अंड्यांत पीतक (जीवरहित पोषकद्रव्य) पुष्कळ असते.  त्यामुळे अंड्याचे विदलन [अंड्याचे बहुकोशिक भ्रूणात रूपांतर करणारी सूत्री विभाजनांची श्रेणी,→ अंडे] तलौपरिक (पृष्ठभागावर होणारे) असते.  भूचर प्राण्यांच्या अंड्यांचे बाह्य आवरण प्रतिरोधक असते.  पुष्कळ संधिपादांमध्ये अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांचे प्रौढाशी पुष्कळ बाबतीत निकट साम्य असते.  तथापि, काही समूहांमध्ये, विशेषतः कीटकांत, अंड्यातून डिंभ (अळी) बाहेर पडतो आणि त्याच्या रूपांतरणाने प्रौढ प्राणी तयार होतो.  कित्येक जातींत डिंभ आणि प्रौढ यांच्यामध्ये कित्येक अवस्था असतात.

प्रजोत्पादन लैंगिक पद्धतीने होत असले तरी याला बरेच अपवाद आहेत.  पुष्कळ संधिपांदामध्ये ðअनिषेकजनन नेहमी आढळते.  अनिषेकजननात अंड्याचा, निषेचन  न होताच, विकास होऊन नवीन प्राणी तयार होतात.  अनिषेकजननाचे विविध नमुने आढळतात,  त्यांपैकी चक्रीय अनिषेकजनन हा एक सामान्य प्रकार होय.  हा पुष्कळ कीटकांत आणि क्रस्टेशियन प्राण्यांत आढळतो.  या प्राण्यामध्ये लैंगिक जनन आणि अनिषेकजनन आलटूनपालटून कमीअधिक प्रमाणात नियमितपणे घडून येते.

आर्थिक व व्यावहारिक महत्व : संधिपादाचे आर्थिक आणि व्यावहारिक महत्त्व फार मोठे आहे. प्राणिसृष्टीतील इतर प्राण्यांशी येणारे त्यांचे संबंध उपकारक तसेच अपायकारकही आहेत. झिंगे, खेकडे, शेवंडे, कोळंब्या वगैरे प्राण्यांचा सगळ्या जगभर खाण्यासाठी उपयोग करतात. या प्राण्यांना पकडण्याचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर चालतो आणि मच्छीमारीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक संधिपाद अपायकारक आहेत. उदाहरणादाखल येथे दोनचार प्राण्यांचाच उल्लेख केला आहे.  अन्नधान्याचा आणि इतर अन्नपदार्थांचा कीटक दर वर्षी नाश करतात त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होते.  कीटक आणि इतर संधिपाद रोगांचे वाहक आहेत.  मलेरिया एका जातीच्या डासाद्वारे होतो.  सायक्लॉप्स या प्राण्याच्या शरीरात गिनी वर्मचे डिंभ पुष्कळदा असतात.  असा सायक्लॉप्स पिण्याच्या पाण्याबरोबर माणसाच्या पोटात गेला तर नारू होतो.  किडी (माइट) आणि गोचिडी माणसांच्या किंवा जनावरांच्या त्वचेवर बाह्यपरजीवी म्हणून राहातात व त्वचेचे रोग उत्पन्न करतात.  काही कोळी, विंचू आणि गोमा यांचा दंश विषारी असतो.  काही संधिपाद उपकारही असतात.  काही हिंस्र कीटक अपायकारक कीटकांना खातात त्यामुळे त्यांच्या उपद्रवाला आळा बसतो.  पुष्कळ कीटकांमुळे पर-परागसिंचन (एका फुलातील पराग कण दुसऱ्या फुलाकडे वाहून नेणे) घडून येते.  लाखेच्या कीटकांपासून लाख, रेशमाच्या पतंगाच्या डिंभापासून रेशीम आणि मधमाश्यांपासून मध आणि मेण मिळते.

मुठे, प्र. त्र्यं. 


आर्थ्रोपोडांचे जीवाश्म : आर्थ्रोपोडा हा अतिदीर्घ इतिहास असणाऱ्या प्राण्यांचा संघ आहे.  कँब्रियन कल्पातील सागरात या संघाचे  प्राणी विपुल असत व त्या कालातील प्राण्यांत ते अग्रेसर असत (निरनिराळ्या भूवैज्ञानिक कल्पांच्या माहितीकरिता भूविज्ञान ही नोंद पहावी).  कॅब्रियन कल्पाच्या आधीच या संघातील प्राणी सागरात अवतरले पाहिजेत.  कँब्रियनपासून तो आतापर्यंतच्या सर्वच संधिपादांचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्या आकारात, आकारमानात व राहाणीत कितीही भेद असले, तरी त्या सर्वांच्या शरीरावर कायटिनाचे किंवा कायटिनात कॅल्शियमी लवणाची कमीअधिक भर पडून कठीण झालेलेबाह्य आवरण असते.या संघाच्या बहुतेक सर्व वर्गातील प्राण्यांचे जीवाश्म (अवशेष) आढळतात व त्यांपैकी कित्येक जीवाश्म एकूण पृथ्वीच्या किंवा पृथ्वीवरील प्राण्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरलेले आहेत.

क्रस्टेशिया वर्ग-उपवर्ग ट्रायलोबिटा : पुराजीव महाकल्पात, विशेषतः त्या महा-कल्पाच्या पूर्वार्धात सागरात राहाणाऱ्या व त्या महाकल्पाच्या अखेरीस निर्वंश झालेल्या प्राण्यांचा उपवर्ग. कित्येक जण ट्रायलोबिटा हा स्वतंत्र वर्ग मानतात [→ ट्रायलोबाइट].

उपवर्ग ब्रॅकिओपोडा : मुख्यतः गोड्या पाण्यात व क्वचित खाऱ्या सरोवरात किंवा समुद्रात राहणाऱ्या या प्राण्यांच्या फारच थोड्या गोत्रांचे जीवाश्म सापडतात. या उपवर्गाच्या नोटोस्ट्रॅका या गणातील प्रोटोकॅरिस या सागरी गोत्राच्या पृष्ठवर्माचे जीवाश्म उत्तर अमेरिकेतील पूर्व-कॅंब्रियन कालीन खडकांत सापडलेले आहेत.  त्यांचे पृष्ठवर्म, आजच्या गोड्या पाण्यात राहाणाऱ्या ट्रायॉप्स (एपस) याच्या पृष्ठवर्मासारखे असे. आजच्या ट्रायॉप्सांच्या पूर्वजांचे जीवाश्म ऑक्लाहोमातील पर्मियन व आल्सेसातील ट्रायासिक कल्पातल्या खडकांत आढळलेले आहेत.

काँकोस्ट्रॅका गण : शिंपेसारखे द्विपुटी पृष्ठवर्म असणाऱ्या प्राण्यांच्या या गणातील महत्त्वाचे गोत्र म्हणजे सामान्यतः गोड्या पाण्यात राहाणारे सायझिकस (पूर्वीचे नाव एस्थेरिया) होय.  त्याचे पृष्ठवर्म काही थोडे मिमी. लांबीचे व शृंगमय (शिंग ज्याचे बनलेले असते अशा) पदार्थाचे असते. डेव्होनियन ते ट्रायासिक कल्पापर्यंतच्या काळात व क्रिटेशस कल्पात काँकोस्ट्रॅकांची बरीच वाढ झाली होती. ते आजही विपुल आहेत पण त्यांचे तृतीय कल्पातील जीवाश्म आढळलेले नाहीत.

ॲनोस्ट्रॅका गण : या गणाचे निःसंशय असे जीवाश्म मिळालेले नाहीत. ब्रिटिश कोलंबियातील मध्य कॅंब्रियन व ब्रिटनमधील डेव्होनियन (ओल्ड रेड सँडस्टोन) कालीन खडकांतील काही जीवाश्म या गणाचे असावेत.

उपवर्ग ऑस्ट्रॅकॉडा : सागरात किंवा गोड्या पाण्यात राहाणाऱ्या या प्राण्यांचे पृष्ठवर्म, शृंगमय किंवा कॅल्शियमी पदार्थाचे व बारीक किंवा सूक्ष्म व द्विपुटी असते, पण बिजागरी शिंपांच्या बिजागरीहून अगदी भिन्न असते.  ऑस्ट्रॅकॉडांचे पृष्ठवर्म तेवढेच जीवाश्मरूपाने टिकून राहाते. याला अपवाद म्हणजे फ्रान्समधील दगडी कोळसा असणाऱ्या कार्‌बॉनिफेरस कालीन थरांत आढळलेले पॅलिओसायप्रीस या गोत्राचे जीवाश्म. त्यांच्यात मूळच्या प्राण्याची उपांगेसुद्धा सुरक्षित राहिलेली आढळली. सिल्युरियन कल्पातील लेपरडिटिया हे ऑस्ट्रॅकॉडांपैकी राक्षस म्हटले पाहिजेत. त्यांची लांबी जवळजवळ २० मिमी. असे.

ऑस्ट्रॅकॉडांचा उदय ऑर्डोव्हिसियन कल्पाच्या सुरुवातीच्या काळात झाला. त्यांचा उत्कर्ष वेगाने होऊन लौकरच त्यांना महत्वाचे स्थान प्राप्त झाले व ते आतापर्यंत टिकून राहिलेले आहेत.  त्यांची कित्येक गोत्र व जाती अल्पायुषी होत्या व त्यांचा उपयोग गाळांच्या खडकांच्या गटांचे कालानुक्रमे लहान लहान विभाग करण्यासाठी व अलग अलग असलेल्या खडकांचे सहसंबंध ठरविण्यासाठी होतो. पुराजीव महाकल्पातील खडकांच्या अध्ययनात त्यांचा बराच उपयोग झालेला आहे.  खनिज तेल असलेले खडक व त्यांच्या थरांची संरचना ही शोधून काढण्यासाठी त्यांचा उपयोग होत असल्यामुळे अलीकडे त्यांचे अतिशय सविस्तर अध्ययन झालेले आहे.

उपवर्ग कोपेपोडा : नवजीव महाकल्पातील मायोसीन कालापूर्वीच्या कोपेपोडांचे निःसंशय असे जीवाश्म आढळलेले नाहीत व मायोसीन किंवा त्यानंतरचे जीवाश्मही विरळाच आढळतात.

उपवर्ग सिरिपेडिया : सिरिपेडियांचे सर्वांत जुने जीवाश्म म्हणजे रशियातील डोनेझ व कुस्नेत्स्क द्रोणीतील, मध्य कार्‌बॉनिफेरस कालातल्या खडकांत आढळलेल्या प्रीइलेपास गोत्राचे जीवाश्म होत. त्यानंतरच्या व मध्यजीव महाकल्पाच्या अखेरीपर्यंतच्या कालातील खडकांत सिरिपेडियांचे जीवाश्म तुरळक आढळतात. कार्‌बॉनिफेरस ते पूर्व क्रिटेशस कल्पापर्यंतच्या कालातील सिरिपेडियाच्या शरीराला देठ असे. उत्तर क्रिटेशस कल्पात देठहीन गोत्रे अवतरली. मध्यजीव महाकल्पानंतर त्यांची संख्या व गोत्रे वाढली. पण त्यांचे जीवाश्म फारसे महत्त्वाचे नाहीत.

उपवर्ग मॅलॅकोस्ट्रॅका : या उपवर्गात फायलोकॅरिडा (लेप्टोस्ट्रॅका), सिन्कॅरिडा, पेरॅकॅरिडा, यूकॅरिडा व हॉप्लाेकॅरिडा हे पाच गण आहेत.

(१) फायलोकॅरिडा गण : पुराजीव महाकल्पातील सागरात यांची बरीच गोत्रे असत, पण आजच्या सागरात त्यांची चारच गोत्रे आढळतात.  पुराजीव महाकल्पातील गोत्रांची शरीरे आजच्या गोत्रांच्या सारखीच पण अधिक मोठी असत. त्यांचे अनेक जीवाश्म आढळलेले आहेत पण एक हायमेनोकॅरिस हे गोत्र वगळले, तर इतर कोणत्याही गोत्रांच्या जीवाश्मात शरीराची उपांगे मिळालेली नाहीत. ब्रिटनमधील कँब्रियन कालीन लिंग्युला फ्लॅग्ज नावाच्या खडकात हायमेनोकॅरिसाचे जीवाश्म सापडलेले आहेत. त्यांचे पृष्ठवर्म अर्धलंब वर्तुलाकार असून त्याचे पृष्ठ गुळगुळीत असे. पृष्ठवर्म द्विपुटी नसे. त्याचे आठ कबंधखंड (धडाचे भाग) उघडे असत. कँब्रियन कालीन हायमेनोकॅरिस व डेव्होनियन कालीन एकिनोकॅरिस यांचे  बरेच जीवाश्म सापडतात. कँब्रियन ते ट्रायासिक कालापर्यंतच्या खडकांत यांचे जीवाश्म आढळलेले आहेत.  त्यानंतरच्या खडकांत आढळल्याची नोंद नाही.

(२) सिन्कॅरिडा गण: ‍‌मॅलॅकोस्ट्रॅकांपैकी आदिम प्राण्यांचा गण.  या गणातील चारच गोत्रे आता टॅस्मेनियातील, व्हिक्टोरियातील व यूरोपातील गोड्या पाण्यात आढळतात. त्यांपैकी परिचित म्हणजे ॲनॅस्पिडीस होय. आजच्या सिन्कॅरिडांशी बरेच साम्य असणाऱ्या गोत्रांचे काही जीवाश्म उत्तर पुराजीव महाकल्पातील खडकात आढळतात. उदा., कार्‌बॉनिफेरस कालातील पॅलिओकॅरिस (प्रीॲ‍‌‌‍‌‍‍‌‍‌‍‌‍‌‍‌नॅस्पिडीस) व पर्मियन काळातील यूरोनेक्टिस (गँप्सोनिक्स) ही गोत्रे.

(३) पेरॅकॅरिडा गण : या गणाचे (अ) मिसिडेशिया, (आ) क्यूमेशिया, (इ) टॅनेइडेशिया, (ई) आयसोपोडा व (उ) अँफिपोडा असे उपगण आहेत.  त्यांपैकी क्यूमेशिया व टॅनेइडेशिया यांचे जीवाश्म आढळलेले नाहीत.

(अ) मिसिडेशिया : यांच्या अनेक गोत्रांचे जीवाश्म कारबॉनिफेरस कालीन व विशेषतः स्कॉटलंडातील कार्‌बॉनिफेरस  कालीन खडकात आढळलेले आहेत पण त्या गोत्रांपैकी फक्त पायगोसेफॅलस या गोत्राच्या जीवाश्मात भ्रूणकोष्ठ (विकासावस्थेतील भ्रूण ज्यात ठेवलेले असतात अशी पिशवीसारखी पोकळी) मिळालेले आहेत. उत्तर डेव्होनियन, ट्रायासिक व जुरासिक कल्पांतील काही जीवाश्म मिसिडेशियाचे असावेत.  जुरासिक नंतरच्या खडकांत त्यांचे जीवाश्म आढळलेले नाहीत.

(ई) आयसोपोडा : पुराजीव महाकल्पातील काही जीवाश्म आयसोपोडांचे असण्याचा संभव आहे पण त्यांचे निःसंशय जीवाश्म प्रथम ट्रायासिक कालीन खडकांत आढळतात.  ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका या देशांतील गोड्या पाण्यात आज राहणाऱ्या फ्रीटोइकस या गोत्राचे जीवाश्म क्वीन्सलंडातील ट्रायासिक खडकांत सापडलेले आहेत.  जुरासिक, क्रिटेशस व तृतीय कल्पांतल्या खडकांत आयसोपोडांचे जीवाश्म आढळलेले आहेत, पण विरळाच.


(उ) अँफिपोडा : यांचे जीवाश्म अती विरळाच आढळतात.  अँफिपोडाचे निःसंशय जीवाश्म तृतीय कल्पातल्या खडकात आढळलेले आहेत व त्यांच्यापैकी बहुतेक आजच्या गोत्रांच्या प्राण्यांचे आहेत. उदा., मायोसीन कालीन गॅमॅरस.

(४) यूकॅरिडा गण : या गणाच्या डेकॅपोडा या उपगणाचेच जीवाश्म आढळतात.  त्यांची उदाहरणे पुढील होत.

विभाग नॅटँटिया: आजच्या पेनीयस व स्टेनोपस यांसारख्या प्राण्यांचा गट.  यांचा अवतार ट्रायासिक कल्पात व वाढ जुरासिक कल्पात झाली. पण त्यानंतरच्या कालातील नॅटँटियांचे मात्र फारच थोडे जीवाश्म मिळालेले आहेत.

विभाग रेप्टँटिया : यांचे (अ) पॅलिन्यूरा, (आ) ॲस्टॅक्यूरा, (इ) ॲनॉम्यूरा व (ई) ब्रॅकियूरा असे चार उपविभाग आहेत. 

(अ) पॅलिन्यूरा : ट्रायासिक ते क्रिटेशस कालापर्यंतच्या खडकांत त्यांचे जीवाश्म बरेच व त्यानंतरच्या खडकांत विरळाच सापडतात. जुरासिक कालीन झोलेनहोफेन चुनखडकात एरियॉन व मेकोकीरस या गोत्रांचे जीवाश्म सापडलेले आहेत.

(आ) ॲस्टॅक्यूरा : याच्यात खऱ्या लॉब्स्टरांचा (शेवंड्यांचा) समावेश होतो.  त्यांचा अवतार ट्रायासिक काली झाला व त्यानंतरच्या कालातील खडकांत त्यांचे जीवाश्म आढळतात.

(इ) ॲनॉम्यूरा : यांचे जीवाश्म विरळाच आढळतात.  त्यांच्यापैकी प्रमुख गोत्र म्हणजे कॅलियानॅस्सा.  त्याचा उदय उत्तर जुरासिक कल्पात झाला व ते आजच्या समुद्रातही आढळते.

(ई) ब्रॅकियूरा : खेकड्यांचा गट.  यांचा उदय जुरासिक कल्पाच्या प्रारंभी झाला.  त्या कल्पातील सर्व गोत्रे आद्य प्रकारची होती.  त्यांपैकी सर्वांत जुने म्हणजे इओकॅर्सिनस. क्रिटेशस कल्पांत त्यांची भरभराट झाली व आता त्यांचा परमोत्कर्ष झालेला आहे.

(५) हॉप्लोकॅरिडा गण : या गणाचा स्टोमॅटोपोडा हा एकच उपगण आहे. या गणातील परिचित गोत्र म्हणजे आजचे स्क्विला होय. स्टोमॅटोपोडांचे जीवाश्म अती विरळाच आढळतात. झोलेनहोफेनच्या चुनखडकातील स्कुल्डा हे गोत्र या गटातले आहे. कार्‌बॉनिफेरस काळात स्टोमॅटोपोडांची गोत्रे असावीत.

मीरिॲपोडा वर्ग : या वर्गातील प्राण्यांचे जीवाश्म विरळाच आढळतात पण सिल्युरियन कल्पाइतक्या प्राचीन कालातील प्राण्यांचे जीवाश्म आढळलेले आहेत.

पुराजीव महाकल्पात राहाणारी गोत्रे त्या महाकल्पाच्या अखेरीस निर्वंश झाली.  त्यांच्यापैकी सर्वांत जुने म्हणजे उत्तर सिल्युरियन कल्पातील आर्किडेस्मस होय.  डेव्होनियन (ओल्ड रेड सँडस्टोन) कल्पाच्या खडकांत आर्किडेस्मस व कॅंपेकॅरिस यांचे जीवाश्म  आढळलेले आहेत. कार्‌बॉनिफेरस कालीन दगडी कोळसा असलेल्या व काही पर्मियन कालीन थरांत झायलोबियस, अँथ्रॅकोडेस्मस व इतर कित्येक गोत्रांचे जीवाश्म सापडलेले आहेत.

कायलोपोडा : या गटातील सर्वांत जुने म्हणजे कार्‌बॉनिफेरस कालातील दगडी कोळसा असणाऱ्या थरांत सापडलेले जीवाश्म होत.  कायलोपोडांच्या आधुनिक कुलांतील प्राण्यांचे जीवाश्म ऑलिगोसीन कालीन खनिज अंबरात  व तृतीय कल्पातल्या इतर काही थरांत आढळलेले आहेत.

ॲरॅक्निडा वर्ग : याचे मेरोस्टोमॅटा आणि यूॲ‌‍‍‌‌रॅक्निडा असे दोन उपवर्ग आहेत. 

उपवर्ग मेरोस्टोमॅटा : या उपवर्गाचे झिफोसूरा व यूरिप्टेरिडा असे गण आहेत.  झिफोसूरांपैकी एकच गोत्र लिम्युलस (किंग क्रॅब) आता अस्तित्वात आहे. झिफोसूरांचे जीवाश्म विरळाच आढळतात, पण सिल्युरियन काळापासून त्यांचे जीवाश्म आढळलेले आहेत.  उत्तर जुरासिक कालीन झोलेनहोफेन चुनखडकात मात्र त्यांचे बरेच जीवाश्म सापडलेले आहेत. उत्तर अमेरिकेच्या कॅंब्रियन कालीन खडकांत झिफोसूरांशी बरेच साम्य असलेल्या ॲ‌‍‍‌‌ग्लॅस्पिस व बेक्वेथिया यांचे जीवाश्म आढळलेले आहेत.  सिल्युरियन कालीन हेमिअस्पिस, डेव्होनियन व कारबॉनिफेरस कालीन बेलिन्यूरस, पर्मियन कालीन पॅलिओलिम्युलस ही या गटातील काही गोत्रे होत. ट्रायासिक व त्यानंतरच्या कालात लिम्युलसाचे जीवाश्म आढळतात व लिम्युलस आताही विद्यमान आहे.  यूरिप्टेरिया हा फक्त पुराजीव महाकल्पात राहाणाऱ्या पण उत्‍तर पुराजीव महाकल्‍पात अत्यंत महत्त्व पावलेल्या प्राण्यांचा गण आहे [→ यूरिप्टेरिडा].

उपवर्ग यूॲ‌रॅक्निडा : याच्यात स्कॉर्पिओनिडा, पेडिपॅल्पी, ॲ‌रॅनेइडा, स्यूडोस्कॉर्पिओनिडा, फॅलँजिडा आणि अकॅरिना या गणांचा समावेश होतो.

स्कॉर्पिओनिडा गण : हा विंचवांचा गण होय. सिल्युरियन कल्पाइतक्या प्राचीन कालापासून हा गण अस्तित्वात आहे पण त्याचे जीवाश्म विरळाच सापडतात.  गॉटलंड व ब्रिटनमधील सिल्युरियन कालीन खडकांत पॅलिओफोनस व उत्तर अमेरिकेतील त्याच कल्पाच्या खडकांत इओस्कॉर्पियस व इतर दोन गोत्रांचे विंचू सापडलेले आहेत. पॅलिओफोनसाचे जीवाश्म सागरी प्राण्यांच्या जीवाश्मांबरोबर आढळतात व ते पाण्यात राहात असावेत पण इतर सर्व गोत्रे जमिनीवर राहात. पॅलिओफोनसाचे शरीरही नंतरच्या विंचवाच्या मानाने काही बाबतीत आद्य होते.  पॅलिओफोनस हा यूरिप्टेरिडा व स्कॉर्पिओनिडा यांना सांधणारा दुवा आहे, असे कित्येकांचे मत आहे. कार्‌बॉनिफेरस कल्पातील इओब्यूथस यासारखी काही गोत्रे आजच्या गोत्रांहून भिन्न होती, पण अँथ्रॅकोस्कॉर्पिओसारखी विशेषशी वेगळी नव्हती. विंचवांची आजची बहुतेक गोत्रे कार्‌बॉनिफेरस  कालातील एका गटापासून अवतरलेली आहेत.

पेडिपॅल्पी गण : दगडी कोळसा असणाऱ्या कार्‌बॉनिफेरस कालीन थरांत तीन गोत्रांचे व तृतीय कल्पाच्या थरांत एका गोत्राचे जीवाश्म आढळलेले आहेत.

ॲरॅनेइडा गण : कोळ्यांचा गण. दगडी कोळसा असलेल्या कार्‌बॉनिफेरस कालीन खडकांत काही गोत्रांचे जीवाश्म मिळालेले आहेत.  त्यानंतरच्या व इओसीन कालापर्यंतच्या थरांत ते अती विरळाच आढळतात.  बाल्टिक प्रदेशातील विशेषतः प्रशियातील खनिज अंबरात त्यांचे विपुल, दीडशेहून अधिक जातींचे, अवशेष आढळलेले आहेत. वायोमिंगच्या इओसीन कालीन थरांत व कोलोरॅडोतील फ्लोरोसेंट शेल नावाच्या खडकात कोळ्यांचे अनेक जीवाश्म आढळलेले आहेत.

स्यूडोस्कॉर्पिओनिडा (चेर्नेटिडिआ) गण : ऑलिगोसीन कालीन अंबरात चेलिफर, चेर्निस यांसारख्या विद्यमान गोत्रांचे जीवाश्म सापडतात. 

फॅलँजिडा (ऑपिलिओनिना) गण : यांच्या काही गोत्रांचे जीवाश्म ऑलिगोसीन अंबरात सापडतात.  कारबॉनिफेरस कालातील काही जीवाश्म या गणातले असावेत. 

ॲकॅरिना गण : र्‍हायनी चर्ट नावाच्या डेव्होनियन कालीन खडकांत प्रोटॅकॅरस या जातीच्या प्राण्याचे जीवाश्म सापडलेले आहेत. ऑलिगोसीन अंबरात व तृतीय कल्पातल्या इतर कित्येक थरांत कित्येक विद्यमान गोत्रांचे जीवाश्म आढळतात.

अँथ्रॅकोमार्टी गण : एक गतकालीन गण.  डेव्होनियन कालीन र्‍हायनी चर्टात व कार्‌बोनिफेरस कालातील काही खडकांत अँथ्रॅकोमार्टस, अँथ्रॅकोसिरो इ. काही गोत्रांचे जीवाश्म मिळालेले आहेत.  पेडिपॅल्पी व फॅलँजिडा यांच्याशी हा गण संबद्ध असावा.

केळकर, क. वा.

संदर्भ:    1. Beerbower,  J. R. Search for the Past: An Introduction to Paleontology, New Delhi, 1965. 

            2.  Borradaile,  L. A. Potts, F.A. The Invertebrata, Bombay, 1962. 

            3. Easton,  W. H.  Invertebrate Paleontology, New York, 1960. 

            4. Harmer,  S. F. Shipley, A.E.Eds.The Cambridge Natural History, Vols.IV, V and VI, Codicote, 1968.