लामालामा : या समखुरी प्राण्याचा कॅमलिडी (उंट) कुलात समावेश होतो. लामा ग्लामा हे याचे शास्त्रीय नाव आहे. याचा प्रसार दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण व पश्चिम भागांत समुद्रसपाटीपासून ५,००० मी. उंचीवरील प्रदेशात आहे. याच्या शरीराची व डोक्याची लांबी १.२ मी. व शेपटी १५ सेंमी. लांब असते. याची खांद्याजवळ उंची सु. १•२ मी. असते व वजन ७०-१४० किग्रॅ. असते. शरीरावर बऱ्याच लांब, दाट व सुंदर लोकरीचे आच्छादन असते व शरीराच्या इतर अवयवांपेक्षा डोके, मान व पाय यांवरील केस आखूड असतात. रंग तपकिरी ते काळा किंवा पांढरासुद्धा असतो व त्यावर वरील रंगांचे ठिपके असतात.

लामाचे कमाल आयुर्मान सु. २० वर्षांचे असते. ११ महिन्यांच्या गर्भावधीनंतर एक पिलू जन्माला येते. उंट कुलातील इतर प्राण्यांप्रमाणे लामा शाकाहारी आहे. याला ३६ दात असतात. याला पित्ताशय नसते. दक्षिण अमेरिकेत निरनिराळ्या अस्सल जातींशी संयोग होऊन याचे कुतूहलजनक पुष्कळ संकर तयार झाले आहेत. उदा., लामा नर व अल्पाका मादी यांच्या संकराला मिस्टी वा माचुर्गा असे म्हणतात.लामा 

 एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपूर्वीपासून लामा माणसाळविला गेला असून त्याचा उपयोग मुख्यतः अवजड मालाच्या वाहतुकीसाठी केला जातो. समुद्रसपाटीपासून ५,००० मी. उंचीवरील उंचसखल पर्वतांवर इतर प्राणी मालवाहतुकीच्या कामी निरुपयोगी ठरतात. अशा ठिकाणी लामा ९६ किग्रॅ. ओझे दिवसाला २५-३० किमी. नेऊ शकतो. या कामी तीन वर्षांवरील नरांचा उपयोग केला जातो. पैदाशीसाठी व लोकरीसाठी माद्यांचा उपयोग करतात. पाण्याशिवाय बराच काळ राहण्याची क्षमता, सोशिकपणा व विविध प्रकारच्या चाऱ्यांवर उदरनिर्वाह करण्याची क्षमता यांची त्याला अँडीज पर्वताची उघडीबोडकी पठारे पार करण्याच्या कामी अधिक मदत होते. इमानीपणा व प्रेमळपणा या दोन्ही गोष्टी त्याच्या ठायी असतात. तथापि त्याच्यावर भरमसाठ ओझे लादले किंवा तो अतिशय थकलेला असेल, तर तो जमिनीवर लोळतो, फुसकारतो, तोंडातून लाळ बाहेर टाकतो, लाथा मारतो व ओझे कमी केल्याखेरीज किंवा भरपूर विश्रांती दिल्याखेरीज पाऊल उचलीत नाही.

तेथील लोकांना (इंडियन) याचा फार उपयोग होतो. याच्या लहान केसापासून ते लिदीपर्यंत सर्व बाबींचा जवळजवळ १०० टक्के उपयोग होतो. याचे मांस खाण्यासाठी, लोकरीचा उबदार कपड्यासाठी, चामड्याच्या पादत्राणासाठी, टॅलोचा (चरबीचा) मेणबत्त्या तयार करण्यासाठी, लांब केस वळून दोरासाठी व वाळलेली लीद जाळून थंडीच्या कडाक्यापासून संरक्षणासाठी अशा हरप्रकारे उपयोग होतो.

लामा लीद टाकण्यासाठी ठराविकच जागा निवडतो असे दिसून आले आहे. २.४ मी. व्यासाचे आणि सु. ३१ सेंमी. खोल खड्ड्यातील ढिगांत वाळलेल्या लिदीच्या लहान गोवऱ्या (खांडे, शेण्या) आढळल्या आहेत. इतर प्राण्यांच्या उलट याच्या रक्तातील हिमोग्लोबिनामध्ये ऑक्सिजनाची बरीच जास्ती आसक्ती असल्याचे दिसून येते व रक्तात तांबड्या पेशींचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उत्तुंग ठिकाणी जगणे त्याला काही अंशी शक्य होत असावे.

अर्जेंटिनामधील प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळातील निक्षेपांमधील जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) असे दिसून येते की, लामाची एक वेगळी जाती आहे. नंतरच्या हिमनद-पश्च-काळात ती नाहीशी होण्याच्या मार्गावर होती पण ती आदिवासींनी माणसाळविल्यामुळे निर्वंश (लुप्त) झाली नाही.

पहा : अल्पाका. 

 जमदाडे. ज. वि.