रूडाल्फ, पॉल : (२३ ऑक्टोबर १९१८− ). अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ. जन्म एल्टन, केंटकी येथे. ‘अँलाबॅमा पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट’ मध्ये त्याने वास्तुकलाविषयक पदवी घेतली (१९४०). ‘हार्व्हर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाइन’मध्ये त्याने एम्.ए. ही पदवी घेतली (१९४७). तिथे श्रेष्ठ वास्तुशिल्पज्ञ ⇨वॉल्टर ग्रोपिअस यांच्या मार्गदर्शनाचा त्याला लाभ झाला.

रूडॅाल्फने १९४० च्या सुमारास वास्तुव्यवसायास प्रारंभ केला. सॅरासोटा येथे त्याने अनेक गृहरचना केल्या, त्यांची छतरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यासाठी लोह आणि प्लॅस्टिक या वास्तुसाधनांचा त्याने उपयोग केला. तेथील अवकाशरचना अत्यंत साधी, आयताकृती खोल्यांची असूनही सुबक व कार्यानुकूल अशी आहे. नंतर त्याने फ्लॉरिडात ‘वॉकर गेस्ट हाऊस’, ‘अम्ब्रेल हाऊस’ या गृहरचना केल्या. वास्तुसाहित्याचा अचूक उपयोग, रचनेतील साधेपणा आणि त्यातही साधलेले वास्तुकलात्मक सौंर्द्य, तसेच अत्याधुनिक वास्तुसाहित्याचा वापर ही या काळात रूडाल्फच्या शैलीची गुणवैशिष्ट्ये मानावी लागतील. कनेक्टिकट येथील येल विद्यापीठाच्या वास्तुकलाविभागाचा प्रमुख म्हणून रूडाल्फची नेमणूक झाली (१९५८). तेव्हापासून त्याची कला बहरत गेलेली आढळते. मॅसॅचूसेट्स येथील ‘वेलस्ली कॉलेज’चे वास्तुसंकुल (१९५५−५९) म्हणजे जुन्या गॉथिक शैलीच्या पार्श्वभूमीवर बांधलेली नव-गॉथिक वास्तुरचना मानली जाते. तेथील ‘आर्ट सेंटर’ची वास्तू ही ॲल्युमिनियम, लोखंड या साहित्याचा कार्यानुकूल उपयोग शैलीदार पद्धतीने करून उभारलेली उत्कृष्ट व अत्याधुनिक वास्तू मानली जाते. न्यू हेवन येथे १९६० मध्ये सलोह काँक्रीट रचनेद्वारे बांधलेली, मोटारींच्या वाहनतळासाठी खास निर्मिलेली ‘स्ट्रीट पार्किंग’ ही वास्तूही तिच्या आकारसौंर्द्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. रूडाल्फने नेहमीच अद्ययावत वास्तुसाहित्याचा वापर करून आपल्या खास शैलीत सातत्याने नावीन्यपूर्ण आकारनिर्मिती केली. अमेरिकेतील अनेक शहरांतून उभारलेले रुडॉल्फचे अत्याधुनिक वास्तुप्रकल्प त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संयोजनामुळे लक्षवेधी ठरले आहेत. रंग, आकार, वास्तुसाहित्य व पोत या गोष्टींना रूडाल्फ-शैलीत महत्त्वाचे स्थान आहे.

रूडॅाल्फचे वास्तुशास्त्रीय तत्त्वज्ञान सहा घटकांनी बनलेले आहे: वास्तूचा आकार, वास्तू आणि परिसर-सहसंबंध, कार्यकारणभाव, स्थानिक शैलीचे वेगळेपण, वास्तुसाहित्य, मानसिक गरजा आणि वास्तूचे कालानुरूप स्वरुप हे ते सहा घटक होत. या तत्त्वांनी रूडाल्फने आपली शैली विकसित केली. रूडाल्फने कनेक्टिकट येथे बांधलेली ‘आर्ट अँड आर्किटेक्चर बिल्डिंग’ (१९५८-६४) ही येल विद्यापीठातील वास्तू म्हणजे प्रख्यात वास्तुशिल्पज्ञ ⇨फ्रँक लॉइड राइटच्या शैलीची अवकाशरचना आणि ⇨ल कॉर्ब्यूझ्येच्या शैलीची आकाररचना यांचा साधलेला सुरेख समन्वय, असे म्हणता येईल. ही वास्तुरचना त्याच्या शैलीचा उत्कृष्ट आविष्कार मानली जाते. न्यूयॉर्क येथे बांधलेली ‘एन्डो लॅबोरेटरी बिल्डिंग’ (१९६०−६४) तिच्या सधन आविष्कारामुळे कलापूर्ण वाटते. तदनंतरच्या ‘वॉस्टन गव्हर्नमेंट सेंटर’ बॉस्टन येथील कार्यालयीन प्रकल्प कनेक्टिकमधील ‘मॅरिड स्टुडंटस हॉस्टेल’ प्रकल्प तसेच न्यूयॉर्कचे ‘ग्राफिक आर्ट सेंटर’ व ‘वॉटरसाइड अपार्टमेंट’ प्रकल्प व्हर्जिनिया येथील हॉस्टेलचा प्रकल्प, इ. कलात्मक वास्तू रूडॉल्फने अमेरकेत उभारल्या. अशा सर्व प्रकारच्या वास्तुनिर्मितीत रूडॉल्फने आपली सहा तत्त्वे प्रमुख मानली व वास्तुकलेच्या क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान सिद्ध केले. (चित्रपत्र ४३).

दीक्षित, विजय

'आर्ट अँड आर्किटेक्चर बिल्डिंग' (१९५८ - ६४), येल विद्यापीठ - रूडॉल्फ.'हाउस ऑन सिएस्टा की' (१९५२), सॅरासोटा रूडॉल्फ.