अपघात : स्वत:ची कुठलीही चूक नसताना ज्या घटनांमुळे मनुष्याला इजा किंवा हानी पोहोचते, क्वचित मृत्यूही येतो, अशा आकस्मिक व अकल्पित घटनांना ‘अपघात’ असे म्हणतात. घर, शेत, वाहतूक व्यवसाय इत्यादींमध्ये संबंध येणाऱ्‍या वस्तूंत अथवा उपकरणांत बिघाड झाल्याने व्यक्तिगत अपघात होतात. भूकंप, पूर, वादळ यांसारख्या नैसर्गिक दुर्घटनांमुळे सामुदायिक अपघात होऊ शकतात. सर्पदंश, सुरुंगामुळे उडालेल्या दगडाने इजा होणे, पाण्यात पाय घसरून पडणे ही  यदृच्छा घडणाऱ्‍या व्यक्तिगत अपघातांची उदाहरणे म्हणता येतील.

कारणे : (१) घर : यात होणारे अपघात विशेषेकरून लहान मुलांना होतात. छोटी नाणी, हरभरे, पावटे यांसारखे पदार्थ गिळणे किंवा नाकात घालणे व अडकून बसणे विजेच्या उपकरणांना मुलांनी ओढणे किंवा विद्युत् प्रवाहाशी प्रत्यक्ष संबंध येईल अशा प्रकारे ती हाताळणे उघड्यावर पडलेल्या औषधाच्या गोळ्या अथवा वड्या खाणे किंवा आयोडीन वा विषारी कीटक- नाशके पिणे चाकू, कात्री, दाढीची पाती इ. वस्तू, तसेच टोकदार खेळणी ही मुलांच्या हाती पडून त्यांनी त्यांच्याशी खेळणे ही मुलांना होणाऱ्‍या अपघातांची मुख्य कारणे होत.

चूल, विजेची उपकरणी, जळणाचे वायू, नावाचे लेबल नसल्याने किंवा न वाचल्याने घेतली गेलेली औषधे यांमुळे घरामध्ये प्रौढ व्यक्तींनाही अपघात होतात. सतरंज्या, जाजमे, चटया यांत अडकून पडणे, तसेच सिगरेटच्या जळक्या थोटकांनी, किंवा नादुरुस्त विजेच्या उपकरणांनी वा खटक्यांनी विद्युत् मंडल-संक्षेप (शॉर्ट सर्किट) होऊन आग लागणे असे अपघात निष्काळजीपणातूनही होतात.

(२) शेत : शेतामध्ये काम करणाऱ्‍यांना सर्पदंशाप्रमाणेच शेतीसाठी  वापरण्यात येणारी जनावरे सुटून त्यांनी शिंगांनी भोसकल्यामुळे किंवा शेतीतील अवजारांनीही अपघात होतात.

(३) वाहतूक : बैलगाडीपासून विमानापर्यंत वाहतुकीची जी साधने मनुष्य वापरतो त्यांनी होणाऱ्‍या अपघातांत वाहतुकीच्या मूलभूत नियमांचे पालन न करणे हेच प्रमुख कारण असते. मोठमोठ्या शहरांतून सायकली, रिक्शा, सर्व प्रकारची मोटारवाहने यांनी होणारे अपघात, ही वाहने चालविणारे लोक अथवा पादचारी यांनी योग्य नियमांचे पालन न केल्याने होतात. त्यातच मादक पदार्थ पिऊन वाहने चालविणे किंवा अतिवेगाने चालविणे याची भर पडते. विमानांच्या बाबतीत तांत्रिक बिघाड, मंद दृश्यमानता व चुकीचे संदेश यांसारखी कारणे असतात.

(४) व्यवसाय : मुख्यत: उंच ठिकाणी काम करणे आवश्यक असणे, काळजी न घेतल्यास ज्यांत शरीर अथवा एखादा अवयव सापडेल अशा यंत्रावर काम करावे लागणे, स्फोटक व ज्वालाग्राही किंवा उच्च विद्युत् वर्चस् उपयोगात येते अशा ठिकाणी काम करावे लागणे, विषारी पदार्थ तयार करणे, अशा सर्व व्यवसायांत अपघात होणे शक्य असते.

या चार व तसेच इतर प्रकारच्या अपघातांना त्या त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन किंवा योग्य त्या नियमांचे पालन करून प्रतिबंध करता येणे शक्य आहे.

पहा : औद्योगिक धोके प्रथमोपचार.

कापडी, रा. सी.