मोस (मॉज), फ्रीड्रिख: (२९ जानेवारी १७७३–२९ सप्टेंबर १८३९). जर्मन खनिजवैज्ञानिक. त्यांनी खनिजांच्या कठिनतेचा मापक्रम तयार केला. त्यांचा जन्म मेर्नरोड आन्‌हाल्ट-बेर्न बूर्क(जर्मनी) येथे झाला. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण घरी व नंतरचे स्कूल ऑफ मायनिंग (फ्रायबर्ग) व हाल विद्यापीठ येथे झाले. १८०२ साली ते ग्रेट ब्रिटनला गेले आणि त्यांनी आयर्लंड व स्कॉटलंडमधील खडकांचा अभ्यास केला. १८१२ साली ग्रात्स विद्यापीठात खनिजविज्ञानेचे प्राध्यापक झाल्यावर त्यांनी खनिजांचे वर्गीकरण कसे करावे याबद्दल संशोधन केले. त्यांचे हे वर्गीकरण मुख्यतः स्फटिकाचा आकार, कठिनता व वि. गु. या भौतिकीय गुणधर्मांवर आधारलेले होते. अशा वर्गीकरणाच्या दृष्टीने १८१२ साली त्यांनी वाढत्या कठिनतेनुसार १ ते १० असे कठिनता अंक दर्शविणाऱ्या दहा खनिजांचा एक मापक्रम सुचविला होता. त्या वेळी याच्याकडे दुर्लक्ष झाले मात्र १८२०–३० दरम्यान त्यांचे संशोधन कार्य इंग्रजीतून प्रसिद्ध झाल्यावर या मापक्रमाचा वापर होऊ लागला आणि अजूनही खनिजे ओळखण्यासाठी याचा सर्वत्र उपयोग केला जातो. त्यांच्यासन्मानार्थ या मापक्रमाला ‘मोस कठिनता मापक्रम’ म्हणतात. [→ कठिनता].

मोस १८१७ साली फ्रायबर्ग व १८२८ साली व्हिएन्ना विद्यापीठात खनिजविज्ञानाचे प्राध्यापक झाले. १८२६ साली ते शाही मंत्रिमंडळाचे पर्यवेक्षक आणि १८३५ साली खाणकाम व चलन या बाबींसंबंधीच्या प्रभारी राज्य कोषपालाचे शाही सल्लागार झाले. खनिजविज्ञानाशी संबंधित अशी कित्येक पाठ्यपुस्तके व लेख त्यांनी लिहिले असून Grunel-Riss der mineralogie (१८२२–२४) हे दोन खंडांत लिहिलेले त्यांचे पुस्तक महत्त्वाचे आहे. यातील पहिल्या खंडात त्यांनी आपल्या स्फटिकविज्ञानाविषयीच्या कल्पना स्पष्ट केल्या असून दुसऱ्या खंडात खनिजांचे पद्धतशीर वर्णन केले आहे.

दक्षिण इटलीमधील ज्वालामुखी क्षेत्राची पाहणी करण्यासाठी गेले असताना ते आगॉर्डा बेल्लूनॉ (टिरोल, इटली) येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.