नैसर्गिक साधनसंपत्ति : आदिमानव गुहेत राहत असे, वनातील फळे व मांस खात असे आणि प्राण्यांची कातडी वा झाडांच्या साली कपडे म्हणून वापरीत असे. अशा प्रकारे त्याचे जीवन निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूंवर सर्वस्वी अवलंबून होते. आधुनिक मानव त्यापेक्षा अधिक सुखसोयीची साधने असलेले व सुरक्षित जीवन जगत असला, तरी त्याचेही जीवन आदिमानवाच्या इतकेच निसर्गावर अवलंबून आहे. मात्र आधुनिक मानव आदिमानवाच्या मानाने पुष्कळ जास्त व विविध प्रकारच्या वस्तू (वनसंपत्ती, विविध धातू, मूलद्रव्ये इ.) वापरू लागला आहे काही पदार्थांवर (उदा., अग्नी, पाणी) नियंत्रण घालण्यास तो शिकला आहे, काही पदार्थांचे नवनवीन उपयोग त्याने शोधून काढले आहेत आणि नैसर्गिक पदार्थांपासून कृत्रिम पदार्थ (उदा., रंग, प्लॅस्टिक, धागे, वस्त्रे, औषधे इ.) बनविण्याचे कसबही त्याच्या अंगी आले आहे.

मानवाला उपयुक्त अशा निसर्गातील द्रव्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणतात. जमीन, महासागर व वातावरण यांतील कोणतेही द्रव्य आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होऊ शकते व परिणामी ते साधनसंपत्ती होते. एखादे द्रव्य साधनसंपत्ती होण्याच्या दृष्टीने पुरेसे उपयुक्त असावे लागतेच शिवाय त्यासाठी पुढील तीन बाबींची अनुकूलता असावी लागते. (१) द्रव्यात बदल न करता त्याद्वारे मानवी गरज भागविता आली पाहिजे किंवा मानवी गरजेच्या दृष्टीने ते सहज बदलता आले पाहिजे. (२) उपलब्ध द्रव्याचा वापर करून घेण्याइतपत मानवी कौशल्य विकसित झाले असले पाहिजे. (३) ऊर्जा वा इतर साधनसंपत्ती रास्तपणे खर्चून हे द्रव्य सहज मिळविता आले पाहिजे. अशा प्रकारे एके काळी आर्थिक दृष्ट्या निरुपयोगी असलेले एखादे द्रव्य तंत्रविद्येचा विकास झाल्यावर मौल्यवान साधनसंपत्ती होऊ शकते.

साधनसंपत्ती ही मानवी आणि भौतिक प्रकारची असते. श्रमिक मानव ही साधनसंपत्तीच आहे. भौतिक साधनसंपत्तीचे नैसर्गिक व उत्पादित असे आणखी प्रकार होऊ शकतात. सामान्यपणे नैसर्गिक साधनसंपत्तीचे वनस्पतिज, प्राणिज व खनिज असे प्रकार पडतात शिवाय त्यांमध्ये सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, वातावरण, मृदा वा जमीन आणि पाणी यांचाही समावेश करता येईल. नैसर्गिक साधनसंपत्तीचे पुनःपुन्हा उत्पन्न होऊ शकणारी (उदा., वनस्पती, पाणी, वायू) आणि पुन्हा उत्पन्न न होऊ शकणारी (उदा., खनिजे) असेही प्रकार होऊ शकतात. पुन्हा उत्पन्न न होणारी साधनसंपत्ती ही संचयित असून ती वापराने संपून जाते. उदा., दगडी कोळसा, खनिज तेल इत्यादी. पुष्कळ धातू अशा तऱ्हेने पूर्णपणे संपून जात नाहीत. कारण त्या वापरलेल्या वस्तूंपासून वेगवेगळ्या प्रमाणात परत मिळवून पुन्हा वापरता येतात. पुन्हा उत्पन्न होऊ शकणाऱ्या साधनसंपत्तीला प्रवाही वा अक्षय म्हणता येईल कारण काळजीपूर्वक वापरल्यास ती कायमची राहू शकते. उदा., वनांची योग्य ती काळजी घेतल्यास मूळ साधनसंपत्तीत घट न होता वनातील उत्पादने (उदा., लाकूड, औषधी द्रव्ये, टॅनीन, डिंक, मध इ.) वर्षानुवर्षे उत्पन्न होत राहतील. सूर्यापासून मिळणारी ऊर्जाही अशीच अक्षय आहे परंतु अणुऊर्जा मात्र अमर्याद असली तरी संपू शकेल.

वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पृथ्वीवरील साधनसंपत्ती पुरेशी आहे की नाही, हा वादाचा मुद्दा आहे. वाढत्या मानवी गरजा (उदा., कच्च्या मालाची वाढती मागणी) तंत्रविद्येच्या साहाय्याने भागविता येतील, असे आशावादी माणसाला वाटते. उदा., तंत्रविद्येच्या विकासामुळे विरळपणे आढळणाऱ्या साधनसंपत्तीऐवजी विपुल आढळणाऱ्या साधनसंपत्तीचा वापर करता येऊ शकेल मानवी श्रमाऐवजी इतर नैसर्गिक ऊर्जा वापरता येतील पाण्याचा साठा करण्यासाठी मोठी धरणे बांधता येतील तसेच खते, वनस्पतींच्या सुधारित जाती, सिंचाई, यांत्रिक अवजारे इ. वापरून पिकांचे उत्पन्न वाढविता येऊ शकेल भूभौतिक पद्धतींनी खनिजांचे नवीन साठे शोधता येतील. शिवाय खनिज मिळविण्याच्या व त्यांच्या शुद्धीकरणाच्या नवीन सुधारलेल्या पद्धती आणि प्रक्रिया वापरून अधिक प्रमाणात खनिजे मिळविता येतील, असेही आशावादी तज्ञाला वाटते. उलट निराशावाद्यांचे लक्ष युद्धाची विनाशकता, विपुल साधनसंपत्तीचा अ़नुत्पादक वापर, जमिनी नापीक होण्याची क्रिया, जमिनीची वाढती झीज, महापुरांची विनाशकता, संचयित साधनसंपत्तीचा जलदपणे होणारा वाढता वापर इ. गोष्टींकडे जाते.

नैसर्गिक साधनसंपत्तीच्या प्रमुख प्रकारांची माहिती थोडक्यात पुढे दिली आहे.

जमीन : (मृदा). ही एक सर्वांत मूलभूत अशी साधनसंपत्ती आहे. बहुतेक वनस्पती जमिनीतच येतात. मानवाचे बहुतेक अन्न तिच्यापासून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मिळते. जमिनीची उत्पादनक्षमता दीर्घकालपर्यंत टिकविता येऊ शकते यामुळे ती प्रवाही साधनसंपत्ती मानता येऊ शकेल.

जगातील जमिनी विविध परिस्थितींमध्ये आणि त्यांच्यातील मूळच्या द्रव्यावर अनेक भौतिक व रासायनिक प्रक्रिया होऊन तयार झाल्या आहेत. जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान), जमिनीचा उतार, जलविकासाची स्थिती व जमिनीच्या विकासाचा टप्पा या बाबींचा काहीसा परिणाम जमिनीच्या गुणधर्मांवर झालेला दिसून येतो. मात्र मूळच्या द्रव्यामुळे आलेले जमिनीचे गुणधर्म नंतर इतर घटकांमुळे नष्ट होऊ शकत नाहीत वा मोठ्या प्रमाणावर बदलू शकत नाहीत.

जमिनीच्या निर्मितीत वनस्पती व प्राणी विशेषतः सूक्ष्मजीव यांनीही भाग घेतलेला असतो आणि त्यांच्यामुळे जमिनीत ह्यूमस हे द्रव्य येते. ह्यूमसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो व तिची उत्पादकता वाढते.

उष्ण कटिबंधातील विपुल पाऊस असलेल्या भागांतील जमिनींमध्ये वनस्पतींना पोषक असलेली द्रव्ये कमी प्रमाणात असतात कारण मोठ्या प्रमाणात ती पाण्याद्वारे झिरपून निघून गेलेली असतात. या जमिनींत लोखंड व ॲल्युमिनियम यांची ऑक्साइडे जास्त प्रमाणात असतात व त्यांचा रंग विटेसारखा तांबडा असतो. या जमिनी लवकर नापीक होतात. अमेरिकेचा उष्ण कटिबंधीय भाग, मध्य आफ्रिका, इंडोनेशिया, दक्षिण आशिया इ. भागांत अशा जमिनी आहेत.

स्टेप (तृणसंघात) व सॅव्हाना (रुक्षवन) या गवताळ प्रदेशांत कमी प्रमाणात पाणी झिरपते व पाऊस नसताना पोषक द्रव्ये झिरपून जाण्याचे थांबते. शिवाय आतील पोषक द्रव्ये गवतांमार्फत वर आणली जातात. परिणामी या जमिनीची उत्पादनक्षमता टिकून राहते. मोठ्या प्रमाणात ही जमीन लागवडीखाली आणता येण्यासारखी असल्याने ती एक प्रमुख साधनसंपत्ती मानली जाते.

आर्द्र उपोष्ण कटिबंधातील (उत्तर अमेरिकेचा आग्नेय भाग, दक्षिण चीन, दक्षिण ब्राझील, आग्नेय आशिया इ.) जमिनी वनांखाली तयार झाल्या असून त्या तांबड्या वा पिवळ्या रंगाच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी यांच्यातील पोषक द्रव्ये निक्षालनाने (झिरपून गेल्याने) कमी झाली आहेत. काळजीपूर्वक मशागत करून व खते वापरून त्यांच्यात चांगले उत्पन्न काढता येते मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले, तर त्या धुपून नष्ट होतील.


तैगा (मध्य कॅनडा, यूरेशिया) प्रदेशातील जमिनी पॉडझॉल प्रकारच्या असून लोहाची ऑक्साइडे निघून गेल्याने त्या किंचित करड्या रंगाच्या वा राखी रंगाच्या झाल्या आहेत. त्या लागवडीयोग्य नाहीत. कदाचित काहींत वने वाढवून त्यांपासून लाकूड व इतर उत्पादने मिळविता येतील. काहींमध्ये ह्यूमस जास्त असून त्यांची उत्पादनक्षमता टिकविण्याची काळजी घ्यावी लागते.

मध्यम अक्षांशांच्या पट्ट्यातील गवताळ भागांत जमिनी कायमच्या समृद्ध अशा आहेत. तेथे पाऊस थोडा वा बेताचा पडतो. या जमिनी खोल व सुपीक असून त्यांत चुना (लाइम, कॅल्शियम ऑक्साइड) तेवढा कमी असतो. तो पुरवावा लागतो.

कमी पावसाच्या गवताळ जमिनीत चुना टिकून राहतो. अशा जमिनींना चेर्नोसेम म्हणतात. त्या अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, रशिया, मँचुरिया, भारत, अर्जेंटिना, यूरग्वाय व पूर्व ऑस्ट्रेलिया येथे आहेत. या जवळजवळ सपाट असल्याने पाण्याने त्यांची थोडीच झीज होते परंतु वाऱ्याने धूप होऊ नये म्हणून वाऱ्यापासून त्यांचे रक्षण करावे लागते. या जमिनी लागवडीला योग्य आहेत. या जमिनींच्या कोरड्या सीमांकडे स्टेप जमिनी असून त्यांच्यात चेर्नोसेमपेक्षा जैव द्रव्य कमी असते. स्टेप जमिनी गडद रंगाच्या असून त्या चराऊ कुरणांसाठी व काही भाग लागवडीसाठी उपयुक्त आहेत.

जगातील वाळवंटामधील सुपीक अशी लहान क्षेत्रे पाण्याचा पुरवठा करून लागवडीखाली आणता येऊ शकतात. तेथे पोषक द्रव्ये विपुल असून जैव पदार्थ अल्पच असतात. पुरेसा पाणीपुरवठा झाल्यास ती सुपीक होऊ शकतील [→ गवताळ प्रदेश].

लागवडीयोग्य जमिनी मर्यादित आहेत. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या अन्न, वस्त्र व इतर औद्योगिक कच्चा माल यांसंबंधीच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने जमिनीचा पुरेपर वापर करण्यांसाठी पुढील गोष्टी कराव्या लागतील. लागवडीखाली नसलेल्या जमिनी साफसूफ करणे व समपातळीत आणणे, दलदलीच्या जमिनीतील पाण्याचा निचरा करणे, अर्धशुष्क व वाळवंटी प्रदेशांत अधिक विस्तृत क्षेत्राला पाणीपुरवठा करणे, खते वापरणे, अधिक उत्पादक वनस्पतींचा विकास करणे इत्यादी. शिवाय जमिनींची उत्पादनक्षमता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी त्यांचे झीज आणि धूप यांपासून रक्षण केले पाहिजे [→ मृदा खते जमीन सुधारणा]. तसेच पिकांची फेरपालट, सुधारित बी-बियाणे, किडी व रोग यांचे नियंत्रण इ. उपायांनीही जमिनींची उत्पादनक्षमता वाढविता येणे शक्य आहे.

वनश्री : जमिनीच्या बऱ्याच मोठ्या भागावर वनस्पती आहेत. सागरांतही थोड्या वनस्पती आहेत. जमिनीवरील वनस्पती या निसर्गतः उगवलेल्या वा मानवाने लावलेल्या असतात. नैसर्गिक वनश्रीचे पुढील प्रकार पाडले जातात.

गवताळ प्रदेश : जमिनीचा २४% भाग अशा जमिनीने व्यापला आहे. यांपैकी सॅव्हाना गवताळ भाग मुख्यत्वे उष्ण कटिबंधात असून तेथे ७५० ते २,००० मिमी. पाऊस पडतो. हंगामी पावसामुळे येथे गवत चांगले वाढते. या भागात मुख्यत्वे गुरे चारली जातात व काही मर्यादित भागांत पिके घेतली जातात. गरज भासल्यास भावी काळात या प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर पिके घेता येऊ शकतील.

प्रेअरी (प्रशाद्वल) गवताळ भागांपैकी मध्यम अक्षांशांमधील प्रदेश कुरणे म्हणून वापरले जात असून सुपीकता व सुयोग्य पर्जन्यमान यांच्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लागवडही होऊ लागली आहे. हे प्रदेश जगाचे धान्याचे कोठार असून तेथे गुरे पाळण्याचा व्यवसायही चालतो.

स्टेप आणि वाळवंटातील गवते व झुडपे : या व डोंगरी गवताळ भागांनी ३२% जमीन व्यापली आहे. वाळवंटांच्या सीमाभागांत बुटकी गवते विरळपणे आलेली व त्यांत अधूनमधून झुडपे आढळतात. अधिक सुपीक व १८० मिमी.पेक्षा जास्त पावसाच्या भागात कोरडवाहू शेती केली जाते. यांशिवाय इतरही थोडे गवताळ प्रदेश असून तेथे गुरे पाळण्याचा व्यवसाय चालतो.

ने : सुमारे ४२% जमिनीवर जंगले आहेत. उष्ण कटिबंधातील वर्षावने ही १,५०० ते ५,००० मिमी. पर्जन्यमान व कायम उच्च तापमान असलेल्या भागांत आहेत. उदा., दक्षिण अमेरिका, आफ्रिका, इंडोनेशिया इत्यादींतील विषुववृत्तीय प्रदेश. या वनांमधून मॅहॉगनी, लॉरेल, मिर्ट्‌ल रबर, कुंती (सॅटिनवुड), अंजीर इ. वृक्ष आढळतात. उपोष्ण कटिबंधापासून उष्ण कटिबंधापर्यंतच्या भागांत तापमान व पाऊस कमी (१,००० ते २,००० मिमी.) असून तेथील वनांत सूचिपर्णी व पानझडी वृक्ष आढळतात. आग्नेय अमेरिका, आग्नेय आशिया, ब्राझील, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांचा पूर्व भाग येथे अशी वने आहेत. ओक, बीच, मॅपल, ॲश, हिकरी, भूर्ज इ. पानझडी वृक्षांची वने पूर्व अमेरिका, पश्चिम व मध्य यूरोप, पूर्व चीन इ. भागांत आहेत. पाइन, फर, स्प्रूस इ. सूचिपर्णी वृक्षांची वने मध्यम व उच्च अक्षांशांच्या पट्ट्यात (यूरोप व आशिया) आढळतात. यांच्या उत्तरेस टंड्रा प्रदेश असून तेथील वनांतून इमारती लाकूड व कागदाचा लगदा यांसाठी लागणारे लाकूड मोठ्या प्रमाणात मिळते.

शुष्कवने द. आशिया, ऑस्ट्रेलिया, द. अमेरिका आणि आफ्रिका येथे आढळतात. शुष्क व मर्यादित पावसाच्या (सु. २५० ते ५०० मिमी.) भागांत काटेरी झाडांची वने आहेत. शेतीच्या दृष्टीने हे भाग उपयुक्त नाहीत मात्र कोठे कोठे डिंक, फळे, कातडी कमाविण्यास उपयुक्त साली इ. त्यांपासून मिळतात. चिवट पानांची झुडपे व बुटके वृक्ष यांचे प्रदेश भूमध्यसागराच्या किनारी भागांत आहेत. तेथील पर्जन्यमान ५०० ते ७५० मिमी. असून तेथे लिंबू वर्गीय फळे, ऑलिव्ह, भाज्या व काही धान्ये (गहू, बार्ली) पिकतात. अशी वने द. आफ्रिका, द. कॅलिफोर्निया, मध्य चिली इ. भागांतही आहेत.

उपयोग : वाढत्या गरजांमुळे प्रेअरी प्रदेशांचा पुष्कळ भाग लागवडीखाली आणला आहे (उदा., चीन, यूरोप, अमेरिका). वनांखालच्या जमिनी चेर्नोसेम जमिनींइतक्या सुपीक नसल्या, तरी योग्य ती काळजीघेऊन व्यवस्थित ठेवल्यास त्यांची उत्पादनक्षमता टिकवून ठेवता येते. लाकडाकरिता वने मोठ्या प्रमाणात तोडली जात असून काही ठिकाणी ती संपून गेली आहेत [→वन लाकूड]. कापूस, हेंप, ताग इ. नैसर्गिक धागे हे वस्त्र व इतर मानवी गरजा भागविण्यासाठी कच्च्या माल म्हणून अजूनही महत्त्वाचे आहेत. लाकडांशिवाय वनांतून टर्पेटाइन, ⇨ चीक, डिंक इ. असंख्य उपयुक्त पदार्थ मिळतात. या कच्चा मालापासून शेकडो वस्तू (उदा., रबर, लाकडी सामान इ.) बनविता येतात. करवंदे, जांभळे, रासबेरी यांसारखी काही फळेही वनांतून मिळतात व त्यांचा अन्नपदार्थ म्हणून उपयोग होतो.

प्राणिसृष्टी : प्राणी ही एक प्रमुख जीववैज्ञानिक साधनसंपत्ती आहे. पृथ्वीवर माणूस अवतरण्यापूर्वी परिस्थिती व स्पर्धा यांनुसार प्राण्यांची वाटणी झालेली होती. मानवाने बरेच प्राणी नष्ट केले, परंतु त्याच वेळी शास्त्रीय ज्ञानाच्या बळावर काही प्राणी टिकवून ठेवले. तथापि मांसभक्षक प्राणी, कीटक व सूक्ष्मजीव यांच्यावर माणसाला अवश्य तितका ताबा मिळविता आलेला नाही. प्राण्यांना हवा व पुरेसे अन्नपाणी आवश्यक असून तापमान सुसह्य लागते. नैसर्गिक तत्त्वानुसार जे प्राणी परिस्थितीशी यशस्वी टक्कर देऊ शकतात, ते टिकून राहतात.


माणूस प्राणी पाळू लागला, त्यांचा अन्न म्हणून उपयोग करू लागला व त्यांचे प्रजननही करू लागला. यांमुळे प्राण्याची उत्क्रांती, प्रसार व सापेक्ष विपुलता यांवर परिणाम होऊ लागला. तसेच याचा आर्थिक विकासावरही परिणाम झाला. कारण प्राण्यांपासून खाद्यपदार्थ बनविण्याचे उद्योग उभारले गेले व मासेमारीत आधुनिकता येऊन त्या उद्योगाचीही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. माणूस मुख्यतः कोंबड्या, डुकरे, गाई, म्हशी, घोडे, मेंढ्या, शेळ्या, उंट, याक, कुत्रे, रेनडियर, हत्ती व लामा हे प्राणी आणि मधमाश्या, रेशमाचे व लाखेचे कीटक पाळतो. दूध, मांस, लोकर, अंडी, कातडी, फर, रेशीम, मध, लाख इत्यादींसाठी तसेच ओझी वाहण्यासाठी, सहवास, शिकार इत्यादींकरिताही प्राणी पाळले जातात. शेतीच्या कामांसाठी बैल, रेडे, घोडे, उंट इ. प्राणी वापरले जात असून हळूहळू त्यांची जागा यंत्रे घेत आहेत. डुकरे व कोबंड्या हे प्राणी खाद्यपदार्थ मिळविण्याच्या दृष्टीने सोयीचे आहेत कारण त्यांचे अन्न वाया जाणाऱ्या पदार्थांपासून बनते. तसेच त्यांचे पुनरुत्पादन व वाढ ही जलद होतात. अशा प्रकारे इतर जनावरांपेक्षा कोंबड्या व डुकरे ही जास्त उपयुक्त ठरली आहेत. प्राण्यांना वनस्पतिज पदार्थ देऊन आणि प्राण्यांची मलद्रव्ये जमिनीद्वारे परत वनस्पतींना देऊन जैव साधनसंपत्ती पुन्हा निर्माण होऊ शकते व योग्य व्यवस्था ठेवल्यास ती जवळजवळ न संपणारी अशी साधनसंपत्ती ठरू शकते.

सागरी जीव हजारो वर्षांपासून अन्न म्हणून वापरले जात आहेत. त्यातूनच मासेमारीचा व्यवसाय भरभराटीला आला असून सध्या उत्तर गोलार्धात ४० ते ६० अक्षांशांच्या पट्ट्यात तो विशेष जोरात चालतो.

जगामध्ये १९७० च्या सुमारास १·१५३ कोटी जनावरे, सु. १ अब्ज मेंढ्या व ५० कोटी डुकरे होती. त्यांचा मुख्यत्वे मांस व दुधदुभते यांसाठी वापर होतो. जगात सर्वांत जास्त जनावरे भारतामध्ये असून अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, यूरग्वाय, चिली, यूरोप व रशिया या भागांत पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.

खनिजे : बहुतेक मौल्यवान नैसर्गिक साधनसंपत्ती ही खनिजरूपात असून तीपासून मानवी सुखसोयींमध्ये भर घालणाऱ्या (खिळे, पत्रे, अवजारे, यंत्रे, बांधकामाचे घटक व नित्योपयोगी साधने) इत्यादींसारख्या असंख्य वस्तू बनविता येतात. खनिज संपत्तीचे सामान्यपणे पुढीलप्रमाणे गट पडतात.

खनिज इंधने : वाहतूक, उष्णता व प्रकाशनिर्मिती इ. पुष्कळ गोष्टींसाठी तसेच अनेक औद्योगिक प्रक्रियांसाठी ऊर्जा पुरविणारी नैसर्गिक साधनसंपत्ती आवश्यक असते आणि अशी ऊर्जा मुखत्वे खनिज इंधनांपासून मिळविली जाते. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारी) खनिजे ही मुख्य खनिज इंधने आहेत.

दगडी कोळसा हे एक आवश्यक इंधन असून त्यावर देशाची औद्योगिक प्रगती अवलंबून असते. दगडी कोळसा वनस्पतिज द्रव्यांपासून बनलेला असतो. तो किती खोलीवर आढळतो आणि त्याच्या थराची जाडी किती आहे, यांवर तो फायदेशीरपणे काढता येईल की नाही हे ठरते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, ग्रेट ब्रिटन, पोलंड, चीन व भारत हे दगडी कोळशाचे प्रमुख उत्पादक देश आहेत.

खनिज तेलही जैव उत्पत्तीचे असावे. हे द्रवरूप असल्याने वाहतुकीस सोयीचे असून बाजारपेठेच्या ठिकाणी नेऊनही त्याचे शुद्धीकरण करता येते. यापासून निरनिराळ्या प्रकारची इंधने बनवितात तसेच याच्यापासून बनणारी इतर द्रव्ये कच्चा माल म्हणून विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांमध्ये (उदा., प्लॅस्टिके, प्रक्षालके, कृत्रिम रबर, खते, स्फोटके, रंगद्रव्ये इ.) उपयुक्त आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, व्हेनेझुएला, सौदी अरेबिया, कुवेत, इराण, इराक, लिबिया, कॅनडा, मेक्सिको, रूमानिया व इंडोनेशिया हे खनिज तेलाचे प्रमुख उत्पादक देश आहेत.

खनिज तेलाच्या बहुतेक क्षेत्रांत नैसर्गिक वायू आढळतो. त्याचाही इंधन व कच्चा माल म्हणून उद्योगधंद्यांत वापर होतो. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, कॅनडा, मेक्सिको, व्हेनेझुएला, इटली आणि रूमानिया हे नैसर्गिक वायूचे प्रमुख उत्पादक देश आहेत.

अणुऊर्जा मुख्यत्वे युरेनियमापासून मिळवितात. थोरियम, प्लुटोनियम यांपासूनही ती मिळविता येते. युरेनियम विस्तृत क्षेत्रात आढळत असले, तरी त्याचे काढता येण्याइतपत मोठे साठे थोड्याच ठिकाणी आढळतात. सध्या विद्युत् निर्मितीसाठी व पाणबुड्या चालविण्यासाठी अणुऊर्जा वापरली जात असून तिचा वापर वाढत आहे. किरणोत्सर्गी द्रव्ये कर्करोग चिकित्सेत व विविध उद्योगधंद्यांतही वापरली जातात. काँगो प्रजासत्ताक, कॅनडा, चेकोस्लोव्हाकिया येथे पिचब्लेंड (युरेनियम व रेडियम यांचे प्रमुख धातुक म्हणजे कच्ची धातू) आढळते. ऑस्ट्रेलिया व पोर्तुगालमध्येही युरेनियमाचे साठे आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, फ्रान्स व द. आफ्रिका प्रजासत्ताक हे युरेनियमाचे उत्पादन करणारे प्रमुख देश आहेत [→ अणुऊर्जा इंधन कोळसा, दगडी खनिज तेल नैसर्गिक वायु].

लोखंड व त्याच्या मिश्रधातू : भूकवचात ॲल्युमिनियमाखालोखाल लोखंड आढळते. मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, लिमोनाइट व सिडेराइट ही लोखंडाची प्रमुख धातुके असून धातुक फायदेशीर ठरण्यासाठी त्यात २५% पेक्षा जास्त लोखंड असावे लागते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, व्हेनेझुएला, ब्राझील, चिली, कॅनडा, पेरू, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, स्वीडन, रशिया, चीन, भारत व उ. कोरिया हे लोखंडाच्या धातुकांचे प्रमुख उत्पादक देश आहेत.

लोखंडाच्या मिश्रधातू (विशेषतः विविध प्रकारची पोलादे) आधुनिक उद्योगधंद्यांमध्ये आवश्यक ठरल्या आहेत. खास प्रकारच्या पोलादांसाठी मँगॅनीज, क्रोमियम, निकेल, टंगस्टन, व्हॅनेडियम, मॉलिब्डेनम व कोबाल्ट या धातू अल्प प्रमाणात आवश्यक असतात. या बाबतीत बहुतेक देश थोडेफार परावलंबी आहेत. मँगॅनीज ऑक्सिडीकारक [→ ऑक्सिडीभवन] म्हणून आणि मिश्रधातूंमध्ये वापरली जाते. ती रशिया, भारत, चीन, ब्राझील, द. आफ्रिका प्रजासत्ताक व गाबाँ येथे आढळते. क्रोमियम व निकेल या धातू स्टेनलेस पोलादात व मुलाम्यासाठी वापरल्या जातात. क्रोमियम धातुक फिलिपीन्स, द. आफ्रिका प्रजासत्ताक, तुर्कस्तान, ऱ्होडेशिया व रशिया येथे आणि निकेल धातुक कॅनडा, पोर्तुगाल व कोरिया येथे सापडते. मॉलिब्डेनम ही मिश्रधातूंत वापरतात आणि तिचे धातुक मुख्यत्वे कॅलिफोर्निया (अमेरिकेची संयुक्त संस्थाने) येथे आढळते. व्हॅनेडियम धातू पोलादात वापरतात व तिचे धातुक प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, नैर्ऋत्य व दक्षिण आफ्रिका आणि फिनलंड या भागांत सापडते.

लोहेतर धातू : यांमध्ये तांबे, ॲल्युमिनियम, शिसे, जस्त, कथिल, पारा, मॅग्नेशियम व आधुनिक उद्योगधंद्यांच्या दृष्टीने आवश्यक अशा इतर कित्येक धातू येतात. तांबे व कथिल यांपासून कासे (ब्राँझ) बनते. पितळेतही तांबे वापरतात. तांबे चांगले विद्युत् संवाहक म्हणून व भांड्यांसाठी वापरतात. मिश्रधातूंतील एक घटक म्हणून तांबे लोहेतर धातूंमधील सर्वांत महत्त्वाचे आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, चिली, पेरू व ऑस्ट्रेलिया हे तांब्याचे प्रमुख उत्पादक देश आहेत. चांगली संवाहक, हलकी व गंजरोधक या गुणधर्मांमुळे ॲल्युमिनियम धातू विद्युत् उपकरणे, वाहतुकीची साधने व इतर विविध वस्तूंसाठी वापरतात. बॉक्साइट हे ॲल्युमिनियमाचे प्रमुख धातुक असून ते जमेका, सुरिनाम, गियाना, फ्रान्स, गिनी, रशिया व भारत येथे आढळते. मात्र अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, रशिया, जपान, प. जर्मनी व नॉर्वे हे ॲल्युमिनियम धातूचे प्रमुख उत्पादक देश आहेत. कारण या देशांमध्ये ॲल्युमिनियमाच्या उत्पादनास लागणारी वीज स्वस्त आहे. जस्त व शिसे या धातू आधुनिक उद्योगधंद्यांमध्ये नेहमी लागतात. जस्तलेपन, पितळ, विक्रियाकारक इत्यादींमध्ये त्या वापरतात. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, मेक्सिको, रशिया, पोलंड, इटली, पेरू, ऑस्ट्रेलिया, स्पेन, प. जर्मनी व जपान हे जस्त व शिसे यांचे प्रमुख उत्पादक देश आहेत. जस्ताचे उत्पादन शिशापेक्षा जास्त आहे. कथिल मिश्रधातूंमध्ये व मुलाम्यांसाठी वापरतात. मुख्यत्वे मलेशिया, चीन, रशिया, इंडोनेशिया, बोलिव्हिया व थायलंड या देशांत त्याचे उत्पादन होते. मॅग्नेशियम, अँटिमनी, पारा व इतर कित्येक लोहेतर धातू आधुनिक उद्योगधंद्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असून त्यांचाही वापर वाढत आहे.


मौल्यवान धातू : सोने आंतरराष्ट्रीय किंमतीचा आधार म्हणून व दागिने आणि शोभिवंत वस्तू यांत वापरले जाते. सोन्याचा साठा वाढत आहे. द. आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे सोन्याचे प्रमुख उत्पादक देश आहेत. स्थानिक व आंतरराष्ट्रीय देवघेवीसाठी चांदीचा वापर होतो. शिवाय भांडी, दागिने, कटलरी, छायाचित्रण फिल्म इत्यादींसाठी चांदी वापरतात. मेक्सिको, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, पेरू, रशिया, ऑस्ट्रेलिया, जपान व बोलिव्हिया हे चांदीचे प्रमुख उत्पादक देश आहेत. तांबे, निकेल, शिसे व जस्त या धातू मिळवितानाही चांदी उपउत्पादन म्हणून मिळते.

प्लॅटिनम, ऑस्मियम, इरिडियम, ऱ्होडियम, रुबिडियम व पॅलॅडियम या प्लॅटिनम गटातील धातू विद्युत् व रासायनिक उद्योगांत उत्प्रेरक (विक्रियेच्या अखेरीस तसाच राहणारा आणि ती घडविण्यास मदत करणारा पदार्थ) म्हणून वापरतात. तसेच दागिने, दंतचिकित्सा, औषधे इत्यादींमध्येही या धातू वापरल्या जातात. द. आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कोलंबिया हे त्या धातूंचे प्रमुख उत्पादक देश आहेत.

अधातवीय खनिजे : खडक, वाळू, गोटे, मृत्तिका, गाळवट माती इ. पदार्थ सर्वत्र आढळतात. सामान्यपणे ही कमी मूल्यवान साधनसंपत्ती आहे. चिनी माती, शोभिवंत कामांसाठी वापरले जाणारे खडक इ. मात्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविणे फायदेशीर ठरू शकते. गंधक, क्वार्ट्‌झ, अभ्रक, ॲस्बेस्टस, लवण (मीठ), खतास उपयुक्त अशी  खनिजे इ. कित्येक पदार्थही आधुनिक उद्योगधंद्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.

गंधक सुटे वा सल्फाइडी खनिजांच्या रूपात आढळते. रबर, खते, स्फोटके इ. विविध उद्योगांत ते वापरले जाते. लुइझिॲना, टेक्सास व मेक्सिको या भागांत लवणी घुमटांमध्ये सुटे गंधक आढळते. हा जगातील सर्वांत मोठा गंधकाचा उत्पादक भाग आहे. याशिवाय पोलंड, इटली, जपान व चीन येथेही सुटे गंधक आणि स्पेन, कॅनडा, फ्रान्स, अमेरिका, रशिया, नॉर्वे व दोन्ही जर्मनी येथे ते सल्फाइडांच्या रूपात आढळते [→ गंधक].

क्वार्ट्‌झ हे सिलिका द्रव्य सर्वत्र विपुलपणे आढळते आणि काचनिर्मितीपासून ते वालुकाक्षेपणापर्यंत (धातवीय पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी अतिशय उच्च वेगाने वाळूच्या कणांचा भडिमार करण्याच्या पद्धतीपर्यंत) त्याचे अनेक उपयोग आहेत. अतिशय शुद्ध व मोठे क्वार्ट्‌झ स्फटिक मुख्यत्वे ब्राझीलमध्ये आढळतात व ते इलेक्ट्रॉनीय उद्योगांत वापरले जातात.

अभ्रकाचे तुकडेताकडे अग्निज व सुभाज खडकांत व पत्र्यासारखे मोठे स्फटिक पेग्मटाइटांच्या भित्तींत आढळतात. तुकडेताकडे सर्वत्र आढळतात व त्यांचा रबर, छपराचे सामान, रंगलेप, अपघर्षक (घासून व खरवडून पृष्ठभाग गुळगुळीत करणारे पदार्थ) इत्यादींच्या उद्योगांत वापर होतो. मोठे स्फटिक मुख्यत्वे भारतात तसेच मॅलॅगॅसी, नॉर्वे व ब्राझील येथे आढळतात आणि विशेषतः त्यांचा विद्युत् उपकरणांत उपयोग करतात [→ अभ्रक-गट].

ॲस्बेस्टस न जळणारे व उष्णतानिरोधक असल्याने त्याचा उष्णतानिरोधनाच्या कामात वापर करतात. इतर द्रव्यांबरोबर ते छपराचे सामान व पत्रे बनविण्यास वापरतात. कॅनडा, रशिया, द. आफ्रिका प्रजासत्ताक, ऱ्होडेशिया, चीन व इटली या देशांत ते मुख्यत्वे आढळते [→ ॲस्बेस्टस].

खतांमध्ये वापरावयाची खनिजे कार्बोनेट, फॉस्फेट व नायट्रेट या वर्गांची असतात. त्यांच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चिलीत नायट्रेट तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मोरोक्को, ट्युनिशिया, रशिया येथे फॉस्फेट खनिजे आढळतात. पोटॅशियमयुक्त खनिजांच्या बाबतीत दोन्ही जर्मनी अग्रेसर असून रशिया. फ्रान्स, कॅनडा, स्पेन व इझ्राएल येथेही ती आढळतात [→ खनिजविज्ञान].

पाणी : भूपृष्ठाचा सु. ७०% भाग पाण्याने व्यापला आहे. महासागरांचे आकारमान व वाटणी विषम असून त्यांचे मानवी जीवनावर विविध प्रकारचे परिणाम होतात, कारण महासागरांचा हवामानावर व हवामानाचा जमिनीची वैशिष्ट्ये, वनश्री, शेती व व्यापार यांवर परिणाम होतो. महासागरांत खनिजे विपुल असून सध्या त्यांपैकी थोडीच काढण्यात येतात. जमिनीवरील बहुतेक पाणी व भूमिजल गोडे असून जमिनीवरील गोडे पाणी नैसर्गिक जलचक्राद्वारे तर भूमिजल झऱ्यांवाटे वा विहिरींद्वारे उपलब्ध होते.

पाण्याचे उपयोग विविध असून ते समुद्रापर्यंत जाताना अनेक कार्ये करते. पाणी हे सर्व जीवांना आवश्यक असून वनस्पतीची वाढ होण्यासाठी, उद्योगातील घटक वा कच्चा माल म्हणून अनेक प्रक्रिया, ऊर्जानिर्मिती, शीतलीकरण, वाहितमलाची विल्हेवाट, वाहतूक इत्यादींसाठी पाण्याचा उपयोग होतो. पर्जन्यमान व पाणी यांचाही संबंध असतो. पिण्याकरिता व विविध उद्योगधंद्यांत वापरावयाचे पाणी शुद्ध करून घ्यावे लागते. तसेच त्याचे ⇨ प्रदूषण होऊ नये म्हणूनही काळजी घ्यावी लागते. जमिनीवरील व जमिनीखालील खारे पाणीही उपयुक्त ठरले आहे. ⇨ भूमिजल हा पाण्याचा राखीव साठा असून ते तसेच वा योग्य ते संस्कार करून वापरता येते. पावसाळ्यात पाणी साठवून ते उन्हाळ्यात वापरता येते. वाहते पाणी हा ऊर्जेचा साठाच असून इटली, नॉर्वे, स्वीडन, जपान इ. देश बऱ्याच प्रमाणावर अशा जलशक्तीवर अवलंबून आहेत. मात्र खनिज इंधने वा अणुऊर्जा यांच्या मानाने जलशक्तीचा वापर अल्पच आहे. पाण्यातून होणारी वाहतूक आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. पाण्यातील वनस्पती व प्राणी यांपासून काही अन्नपदार्थ व इतर काही उपयुक्त पदार्थही मिळतात. उदा., आगर-आगर, स्पंज, मोती, प्रवाळ, कॉड, शार्क व व्हेल मासे, वॉलरस इ. प्राणी, उदी अंबर हा सुगंधी पदार्थ इत्यादी.

जसजशी पाण्याची मागणी वाढत जाईल तसतसे उपलब्ध पाणी अधिकाधिक काळजीपूर्वक वापरावे लागेल. त्यासाठी समुद्राकडे जाणाऱ्या पाण्यावर योग्य ते संस्कार करून ते पुनःपुन्हा वापरता येऊ शकेल तसेच अधिक प्रमाणात खारे पाणी गोडे करून वापरता येऊ शकेल.


सौरऊर्जा : हवामान आणि जीवसृष्टी यांच्या दृष्टीने सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. जीवांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली ऊब व इतर ऊर्जा त्यापासून मिळतात. हवामान सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. सूर्यप्रकाशातच हिरव्या वनस्पती आपले अन्न व इतर उपयुक्त वनस्पतिज पदार्थ निर्माण करू शकतात. विविध उपयोगांसाठी लागणारी ऊर्जा ही सूर्यापासून मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत [→ सौरऊर्जा].

वातावरण : वातावरण ही एक महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. यातील ऑक्सिजन जीवांना व हिरव्या वनस्पतींना आवश्यक असून वातावरणामुळे काही प्रारणांपासून (तरंगरूपी ऊर्जेपासून) पृथ्वीचे संरक्षणही होते. वातावरणातून निऑन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन हे औद्योगिक महत्त्वाचे वायू मिळविता येतात. उदा., अमोनिया, यूरिया आणि नायट्रोजनयुक्त इतर पदार्थ बनविण्यासाठी वातावरणातील नायट्रोजन वापरला जातो. वातावरण आपोआप शुद्ध होत असते व परिणामी हवा चांगली राहते. तथापि काही ठिकाणी हा समतोल ढळलेला आढळतो. उदा., औद्योगिक दृष्ट्या विकसित वा दाट वस्तीचे भाग. विविध इंधनांच्या ज्वलनाद्वारे उत्पन्न होणारे, तसेच धातू गाळण्याच्या भट्ट्या व इतर संयंत्रांतून बाहेर पडणारे वायू वातावरणात जाऊन प्रदूषण होत असते आणि ते मानवी आरोग्याला घातकही ठरू शकते. वातावरणाचे प्रदूषण होऊ नये म्हणून प्रयत्न चालू आहेत [→ प्रदूषण]. वातावरणाचा विशेषतः त्यातील जलबाष्पाचा (आर्द्रतेचा) हवामान व जलवायुमान यांच्यावर परिणाम होत असतो. तापमान व पर्जन्यमान यांच्यानुसार पृथ्वीचे पुढील जलवायुमानीय विभाग पाडले जातात : (१) आर्द्र उष्ण कटिबंधीय, (२) शुष्क, (३) मध्यम अक्षांशांतील आर्द्र व (४) ध्रुवीय [→ जलवायुविज्ञान वातावरणविज्ञान].

लोकसंख्या व साधनसंपत्ती : मानवी जीवनाच्या दृष्टीने नैसर्गिक साधनसंपत्ती इतकी महत्त्वाची आहे की, तिचा जागतिक लोकसंख्येच्या वाटणीवर परिणाम झालेला दिसून येतो. वाळवंटात व नापीक प्रदेशांत लोकवस्ती जवळजवळ नाहीच कारण तेथे जीवनावश्यक साधनसंपत्ती नाही उलट नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल असलेले प्रदेश सामान्यतः दाट वस्तीचे आहेत (उदा., बिहार, बांगला देश). नैसर्गिक साधनसंपत्तीवरच उद्योगधंद्यांची मोठी केंद्रे उभी राहणे अवलंबून असते. उदा., मोठाले पोलादाचे कारखाने.

मोक्याची साधनसंपत्ती : राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने वा युद्धासाठी अथवा उद्योगधंद्यांकरिता अत्यावश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या साधनसंपत्तीला मोक्याची साधनसंपत्ती म्हणतात. अशा साधनसंपत्तीचा पुरेसा साठा असल्याशिवाय किंवा ती निर्मिण्याची अथवा व्यापाराद्वारे मिळविण्याची क्षमता असल्याशिवाय एखादा देश दीर्घकालीन युद्धात उडी घेऊ शकत नाही. विशिष्ट साधनसंपत्ती विपुल असली, तरी ती जर सरंक्षणाच्या वा लष्करी कार्याच्या दृष्टीने आवश्यक असेल, तर ती मोक्याची ठरू शकते. उदा., पोलाद, कापूस. तंत्रविद्येचा विकास झाल्याने मोक्याच्या द्रव्यांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे अशी द्रव्ये मिळविणे व राखून ठेवणे गुंतागुंतीचे झाले आहे.

टंचाई असलेल्या विविध वस्तू, धातुके व जैव द्रव्ये यांचे साठे करावे लागतात तसेच आणीबाणीच्या परिस्थितीत हे साठे युद्धाच्या कालावधीनुसार पुरेसे असावे लागतात. रबर, धागे, लाकूड, कातडी, मसाल्याचे पदार्थ इत्यादींसारखे जैव पदार्थ साठविल्यास खराब वा नष्ट होतात. त्यामुळे ते टिकवून ठेवण्याचीही काळजी घ्यावी लागते आणि ते योग्य प्रमाणात टिकून राहिले आहेत की नाहीत, याचीही वेळोवेळी तपासणी करावी लागते.

पर्यायी पदार्थ शोधून त्यांचे साठे करावे लागतात वा त्यांचे उत्पादन चालू असावे लागते. एका पदार्थाऐवजी दुसरा पर्यायी पदार्थ वापरताना राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. अखंड संशोधन व तंत्रविद्येतील प्रगती यांच्याद्वारे गरजेनुसार विविध पर्यायी पदार्थ मिळू शकतील.

काही वेळा मोक्याच्या साधनसंपत्तीच्या उत्पादनामध्ये आर्थिक अडचणी येतात. अशा वेळी हा उद्योग आर्थिक दृष्ट्या स्थिर व प्रगत होण्यासाठी त्याला शासनातर्फे पुरेशी आर्थिक मदत होणे आवश्यक असते. यासाठी अशा उद्योगांना जकातविषयक व इतर सवलती आणि इतर प्रकारच्या राजकीय-आर्थिक उपाययोजना शासनाला कराव्या लागतात.

साधनसंपत्तीचे संरक्षण : आधुनिक मानवाने विविध सुखसोयी निर्माण करून आपले जीवन अधिक सुखी केले आहे. त्याकरिता त्याने अनेक प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती शोधून तिचा विकास केला आहे परंतु ही साधनसंपत्ती मर्यादित असल्याने ती तारतम्याने व काळजीपूर्वक वापरायला हवी. औद्योगिक देशांच्या उभारणीमुळे खनिज तेल, लाकूड, कथिल इ. वस्तूंची मागणी वाढली आहे. अशा वापराने काही नैसर्गिक साधनसंपत्ती झपाट्याने कमी होत आहे व त्यामुळेच तिच्या संरक्षणाचे काम निकडीचे झाले आहे. साधनसंपत्तीची उधळपट्टी आणि विशेषतः पुनश्च उत्पन्न न होणाऱ्या साधनसंपत्तीचे संरक्षण यांचा एकत्र विचार करावा लागतो. अशा संरक्षणात आर्थिक हेतुव्यतिरिक्त उदात्त व ऐतिहासिक दृष्टिकोनही असू शकतो (उदा., वन्यपशूंचे संरक्षण). वाया जाणारी नैसर्गिक साधनसंपत्ती काळजीपूर्वक योजना करून वाचविली पाहिजेच मात्र वस्तू मर्यादित आणि गरजा अमर्याद असल्याने केवळ याद्वारे त्यांची टंचाई टाळता येणार नाही. त्यासाठी तंत्रविद्येच्या साहाय्याने नवीन व अधिक विपुल अशा पर्यायी वस्तू शोधून काढणे आवश्यक आहे. उदा., नैसर्गिक धाग्यांऐवजी कृत्रिम धागे लाकूड वा धातूऐवजी प्लॅस्टिक.

नैसर्गिक साधनसंपत्तीची वाटणी विषम आहे. उदा., हिरे, खनिज तेल, युरेनियम, अँटिमनी, बॉक्साइट, अभ्रक इ. द्रव्ये काही मर्यादित क्षेत्रांतच आढळतात. अशा तऱ्हेने काही भागांत अधिक विविध प्रकारची, तर इतरत्र थोड्याच प्रकारची साधनसंपत्ती आढळते. सध्या वापरात असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंसाठी लागणारी सर्व प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती कोणत्याही एकाच देशात आढळत नाही. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात सर्वांत जास्त विविध प्रकारची साधनसंपत्ती आढळत असली, तरी कथिल, निकेल यांसारख्या धातूंसाठी या देशाला परदेशांवर अवलंबून राहवे लागते.

अशा तऱ्हेने एका देशातील साधनसंपत्तीने दुसऱ्या देशाची गरज भागविली जाते. हेच आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक मूलभूत कारण आहे. अशा व्यापारामुळे एखाद्या देशात नसलेली वा तेथे जिची टंचाई आहे, अशी नैसर्गिक साधनसंपत्ती वा तिच्यापासून बनविलेल्या वस्तू दुसऱ्या देशातून मिळविता येतात. मात्र काही नैसर्गिक संपत्ती मूल्यवान असली, तरी केवळ स्थानिक महत्त्वाचीच आहे असे वरवर विचार केला असता वाटते. उदा., एखाद्या देशाचे हवामान कितीही सुखकर असले किंवा तेथील वनश्री, सरोवरे, धबधबे इ. कितीही प्रेक्षणीय असली, तरी त्यांची निर्यात करता येत नाही परंतु इतर देशांतील लोकांना त्यांचा सुखास्वाद त्या देशाला भेट देऊन व ती ती स्थळे पाहून घेता येणे शक्य असते. आधुनिक काळात प्रवासाची सोयीस्कर व सुखकारक साधने उपलब्ध झालेली आहेत, तसेच त्या त्या देशाच्या पर्यटनविषयक योजनाही आखलेल्या असतात. यामुळे इतर देशांतील लोकांना आकर्षित करून याही नैसर्गिक साधनसंपत्तीचा आर्थिक लाभ करून घेता येऊ शकतो. याद्वारे केवळ आर्थिक लाभच होतो असे नाही, तर देशादेशांतील सांस्कृतिक संबंध दृढ होण्यासही याची मदत होत असते.

ठाकूर, अ. ना.


आर्थिक-राजकीय बाजू : आंतरराष्ट्रीय व्यापार हा भौगोलिक श्रमविभाणीच्या तत्त्वांवर आधारलेला आहे. ऑस्ट्रेलियात सुपीक जमीन विपुल प्रमाणात आहे परंतु मजूर व भांडवल या उत्पादक घटकांची कमतरता आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेने ग्रेट ब्रिटनमध्ये मजूर व भांडवल मुबलक आहे, पण सुपीक जमिनीची कमतरता आहे. परिणामी ऑस्ट्रेलिया शेतमालाच्या बदल्यात ग्रेट ब्रिटनकडून कापड, यंत्रसामग्री आयात करतो. उद्योगधंद्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थानीयीकरण नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विषम वाटणीवर आधारलेले आहे.

देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीवरच त्याचे अर्थकारण अवलंबून असते. द. अमेरिकेतील चिली, पेरू इ. देशांची अर्थव्यवस्था मुख्यत्वे तेथील तांब्याच्या धातुकांच्या साठ्यांवर अवलंबून आहे. खनिज तेलाचा प्रंचड साठा असल्यामुळे सौदी अरेबिया, इराण, इराक यांसारखे मध्यपूर्वेतील देश आर्थिक दृष्ट्या बलवान झाले आहेत. औद्योगिकीकरण व वाहतूक यांसाठी तेलाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील देशांनी तेलाच्या किंमती वाढविल्या, तर जागतिक अर्थकारणावर त्याचा दूरगामी परिणाम होतो. याचा अनुभव भारतासारख्या देशांना नुकताच आला आहे.

ज्या देशांमध्ये मुबलक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे व तिचा वापर करण्याची क्षमताही आहे, त्या देशांतील औद्योगिक विकास झपाट्याने घडून येण्याची शक्यता असते. लोहखनिज, दगडी कोळसा आणि चुनखडी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यामुळे ग्रेट ब्रिटन, जर्मनी आणि अमेरिका या देशांची औद्योगिक क्षेत्रात भरभराट झाली. देशाचा आर्थिक विकास मूलतः नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. समृद्ध साधनसंपत्तीमुळे शेती, उद्योगधंदे, व्यापारउदीम यांची भरभराट होते आणि आर्थिक प्रगतीस चालना मिळते. स्वित्झर्लंड, डेन्मार्क, जपान या देशांत विपुलता व विविधता या दृष्टींनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव आहे पण भांडवल, पारंगत मजूर आणि तंत्रज्ञान या उत्पादक घटकांच्या बाबतीत अनुकूलता असल्यामुळे त्या देशांना आपली प्रगती करून घेता आली. नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल असती, तर तेथे प्रगती अधिक वेगाने झाली असती, असे म्हणता येईल. विकसनशील देशांना एकतर आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची शोध व उत्पादन करण्यास आर्थिक आणि वैज्ञानिक तांत्रिक साधने दुष्प्राप्य असतात. परिणामतः त्यांना आयात केलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून राहावे लागते व त्यामुळे आर्थिक विकासात चमत्कारिक कोंडी निर्माण होते. वाढती लोकसंख्या आणि लोकसंख्येचे उत्पन्नाशी असलेले व्यस्त प्रमाण यांमुळे अशा देशांना नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर उपयोग करून घेणे भाग असते. लागवडीस योग्य अशा जमिनीचे मनुष्यबळाशी प्रमाण कोरियामध्ये दर हेक्टरी तेरा व टांझानियामध्ये दर हेक्टरी एक असे आहे. दोन्ही देशांतील अन्य उत्पादक घटकांची उपलब्धता समान आहे असे गृहीत धरले, तर प्रगतिपथावर वाटचाल करणे टांझानियाला अधिक सुकर होईल, यात संशय नाही.

औद्योगिकीकरणापूर्वी जेव्हा शेती हे उपजीविकेचे व अर्थकारणाचे प्रमुख साधन होते, तेव्हा सुपीक प्रदेशात आर्थिक प्रगती झपाट्याने झाल्याचे दिसते. जेव्हा मलेशियात कथिलाचा, मध्यपूर्वेत तेलाचा व ब्रिटनमध्ये दगडी कोळशाचा शोध लागला, तेव्हा त्या त्या देशांच्या अर्थकारणांत जवळजवळ क्रांतीच घडून आली.

पुष्कळदा विशिष्ट हवामानाचा आर्थिक विकासावर अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होतो, असे आढळून आले आहे. समशीतोष्ण कटिबंधातील हवामानात औद्योगिकरणाला जोराची चालना मिळते. जपान, रशिया या देशांची या संदर्भात उदाहरणे देता येतील. चीनमध्ये उत्तरेकडील भागात औद्योगिकीकरणाने त्वरित मूळ धरल्याचे दिसते. जगातील बहुतेक अविकसित व अर्धविकसित देश उष्ण कटिबंधात मोडतात. द. आशियातील अनेक देश उष्ण व दमट हवामानाचे आहेत. सामान्यतः अशा हवामानाचा जमिनीच्या सुपीकतेवर व मनुष्याच्या श्रमशक्तीवर प्रतिकूल परिणाम होतो. पाश्चिमात्य देशांतील हवामान कृषिविकासाला अनुकूल आहे. त्या देशांत आर्थिक प्रगतीच्या प्रारंभी कृषिक्षेत्रात क्रांती झाली आणि मगच तेथे औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रतिकूल हवामानामुळे द. आशियातील बहुतेक देशांना शेती उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करून घेता आली नाही. त्यामुळे आर्थिक विकासाच्या मार्गात सुरुवातीसच अडचणी उद्‌भवल्या. विषम हवामानामुळे भूमी व मनुष्यबळ यांच्यावर हे जे विपरीत परिणाम होतात, ते टाळता येणे शक्य आहे पण त्यासाठी प्रचंड भांडवली गुंतवणुकीची गरज आहे. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या देशांत भांडवलाची व तंत्रज्ञानाची चणचण असल्याने अशी गुंतवणूक त्या देशांना पेलणारी नाही. यासाठी आर्थिक नियोजनाचा पुरस्कार करून टप्प्याटप्प्यांनी शेती व उद्योग यांचा समतोल विकास साधण्याचे प्रयत्न होत आहेत.

सोने, चांदी, तांबे यांसारख्या मौल्यवान आणि उपयुक्त धातूंचे साठे असलेल्या प्रदेशांत त्याचप्रमाणे जंगले, लागवडयोग्य जमिनी, पिण्याच्या पाण्याचे साठे, नद्या-सरोवरे इत्यादींची अनुकूलता पाहूनच जगातील प्राचीन संस्कृतींचा त्या त्या परिसरात उदय व विकास झाल्याचे दिसून येते. नाईलच्या खोऱ्यातील प्राचीन ईजिप्शियन संस्कृती हे त्याचे एक सर्वांत जुने असे ठळक उदाहरण आहे. सामाजिक विकासाबरोबर त्या त्या समाजात शासनसंस्थाही उदयास आल्या. त्यांचा इतिहास पाहिला, तर सत्तेचा विस्तार करण्यामागे किंवा होण्यामागे महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा कबजा मिळविण्याची एक प्रेरणा दिसून येते. मध्ययुगानंतर उदयास आलेला वसाहतवाद किंवा साम्राज्यवाद म्हणजे सोन्यासारख्या मौल्यवान धातूंचा परिसर किंवा मसाल्याचे पदार्थ पिकविणारे प्रदेश यांची मालकी मिळविण्याचाच एक संघटित व साहसी उपक्रम होता. अमेरिकेच्या इतिहासात तर ‘गोल्ड रश’ –सोन्यासाठी झुंबड ― ही सार्वत्रिक अशी प्रवृत्तीच पुढे आली. आफ्रो-आशियाई देशांतील यूरोपीय वसाहतवादाचे मूळ केवळ राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यापुरतेच मर्यादित नव्हते, त्यामागे समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्या स्वामित्वाखाली आणण्याची धडपडही महत्त्वाची होती. आधुनिक राज्यशास्त्रात अभ्यसनीय ठरलेली ⇨ भूराजनीती हीदेखील निसर्गाच्या संरक्षणव्यवस्थेपुरतीच मर्यादित नसून तिच्यात नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अनुकूलतेचाही विचार महत्त्वाचा असतो. १९६० नंतर अरब–इझ्राएल वादाची तीव्रता वाढत गेली व परिणामतः आंतरराष्ट्रीय अर्थकारणच केवळ नव्हे, तर राजकारणही अनेक प्रकारे बदलून गेले. अरब राष्ट्रांनी संघटित होऊन तेलसाठ्यांवरील आपल्या मक्तेदारीचा राजकीय दबावाचे एक प्रभावी साधन म्हणून उपयोग करून घेतला. प्रगत यूरोपीय राष्ट्रांपुढे त्यामुळे इंधन-समस्या उभी राहिली आणि त्यांना तेलासकट इतरही नैसर्गिक इंधनस्रोतांचा शोध घेण्यासाठी आपली आर्थिक ताकद पणाला लावावी लागली. उत्तर समुद्रात १९७० मध्ये तेलसाठे असल्याचा शोध लागला व तेल उत्पादनास १९७५ मध्ये प्रारंभ झाला. १९७९ च्या सुमारास ग्रेट ब्रिटन हे ऊर्जेच्या बाबतीत स्वंयपूर्ण बनू शकेल, अशा विश्वास व्यक्त करण्यात आला. १९६९ पासून किनारापार तेलउत्पादनासाठी जपानने संशोधन सुरू केले असून ते कोरियन सामुद्रधुनी, जपानी समुद्र व होक्काइडो बेट या क्षेत्रांशी निगडित आहे. रशियाच्या सायबीरियन क्षेत्रात तेलसाठ्यांचा शोध लावण्याच्या कामी जपान रशियाला सहकार्य देत आहे.

अशा प्रकारे नैसर्गिक साधनसंपत्तीचा संस्कृतीच्या विविधांगांवर सतत प्रभाव पडत असल्याचे दिसते. संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थेनेही या संदर्भात एक आंतरराष्ट्रीय सहकार्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेषतः ⇨ प्रदूषणाची समस्या ही एक जागतिक समस्या झालेली असून तिच्या मुळाशी निसर्गाचा बिघडलेला तोल असून त्याचेही कारण म्हणजे नैसर्गिक साधसंपत्तीचा अतिवापर आणि गैरवापर हे आहे.

भेण्डे, सुभाष जाधव, रा. ग. गद्रे, वि. रा.

संदर्भ : 1. Dagli, Vadilel, Ed. Energy in Indian Economy, Commerce  Annual, 1977, Bombay, January 1978.

  2. Thapar, Romesh, Ed. Seminar : Needs and Resources, New Delhi, May 1964.

  3. Thapar, Romesh, Ed. Seminar : The Energy Crisis, New Delhi, October 1974.