बॅथर्स्ट–१ : ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्यातील शहर. लोकसंख्या १७,१६९ (१९७१). हे ब्‍लू मौंटनच्या पश्चिमेस सिडनीपासून २२५ किमी. वर माक्कारी नदीच्या दक्षिण तीरावर १८१५ मध्ये वसविण्यात आले. ब्रिटिश युद्ध व वसाहतमंत्री तिसरा अर्ल हेन्‍री बॅथर्स्ट (१७६२–१८३४) याच्या स्मरणार्थ शहराला हे नाव देण्यात आले. ब्‍लू मौंटनच्या पश्चिमेकडील ही पहिलीच वसाहत होय. बॅथर्स्टच्या आसमंतात सोन्याचा शोध लागल्यापासूनच (१८५१) त्याची भरभराट झाली. १८५२, १८६२ व १८८५ मध्ये बॅथर्स्टला अनुक्रमे गाव, नगर आणि शहर यांचा दर्जा मिळाला. शहरात पीठगिरण्यांशिवाय शेतमाल-प्रक्रिया, फळे डबाबंद करणे, व तसेच रेल्वेसामग्री, सूक्ष्म उपकरणे, कापड, फर्निचर, मृत्तिकाशिल्प, सिमेंटनळ इ. निर्मितिउद्योग चालतात. आसमंतातील खाणींमधून सोने आणि इतर खनिजे सापडतात. मिशेल, मिड आणि ग्रेट वेस्टर्न या महामार्गांच्या संगमावरील तसेच सिडनीला जाणाऱ्या प्रमुख लोहमार्गावरील शहर म्हणून बॅथर्स्टला महत्त्व आहे. ऑस्ट्रेलिया कामगार चळवळीचा एक नेता व पंतप्रधान जोसेफ बेनेडिक्ट चिफ्ली (१८८५–१९५१) याचे बॅथर्स्ट हे जन्मग्राम.

शहरात रुंद रस्ते, रम्य बागा आणि चांगल्या व प्रशस्त इमारती असून रोमन कॅथलिक व अँग्‍लिकन चर्चवास्तू, युद्धस्मारक म्हणून बांधलेला ३० मी. उंचीचा मनोरा (घंटाघर) तसेच शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. ऑक्टोबर महिन्यात वेल्श लोकांचा गीतकला महोत्सव येथे साजरा केला जातो. माक्कारी नदीतील ट्राउट माशांच्या उपलब्धतेमुळे मासेमारीचे केंद्र, तसेच प्रसन्न आणि आल्हाददायक हवामानामुळे पर्यटन केंद्र म्हणून बॅथर्स्ट प्रसिद्ध आहे.

गद्रे, वि. रा.