रानकोंबडी : फॅजिॲनिडी या पक्षिकुलात रानकोंबड्यांचा समावेश होतो. भारतात रानकोंबड्यांच्या दोन जाती आढळतात : एक लाल रानकोंबडी आणि दुसरी भुरकट रानकोंबडी. लाल रानकोंबडीचे शास्त्रीय नाव गॅलस गॅलस आणि भुरकट रानकोंबडीचे गॅ. सोनेरेटाय असे आहे.

लाल रानकोंबडी : हा पक्षी भारत, ब्रह्मदेश, थायलंड, मलाया द्वीपकल्प, सुमात्रा वगैरे प्रदेशांत आढळतो. खुद्द भारतात हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांपासून पूर्वेस आसाम, बंगाल, ओरिसापर्यंत आणि दक्षिणेस गोदावरी नदीपर्यंत तो आढळतो. हिमालयात १,५२५ मी. उंचीपर्यंत तो दिसून येतो. भारताच्या ज्या भागात साल वृक्ष आणि बारशिंगा यांचा प्रसार झालेला आहे, त्या सर्व भागांत हा पक्षी आढळतो, ही नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. हा मुख्यतः अरण्यात राहणारा पक्षी असला, तरी दाट झुडपे असणाऱ्या जंगलातही आढळतो. टेकड्यांच्या पायथ्याच्या प्रदेशात आणि शेतीभातीच्या आसपास राहणे याला विशेष आवडते, असे दिसते.

पाळीव कोंबडीएवढा हा असतो. नर आणि मादी यांच्या रंग व्यवस्थेत फरक असतो. नर : डोक्यावरचा तुरा आणि मानेवरची विखुरलेली पिसे नारिंगी-तांबडी किंवा सोनेरी-पिवळी पाठीकडचा रंग तकतकीत काळसर ताबंडा शेपटी आणि तिला झाकणारी पिसे हिरवी आणि जांभळी छटा असलेल्या काळ्या रंगाची पोटाकडचा भाग काळा. मादी : रंग साधा तपकिरी आणि त्यावर रेषा शरीराचा खालचा भाग तांबूस तपकिरी शेपटीची पिसे गडद तपकिरी तुरा शेंदरी असतो.

तीनचार माद्या आणि एक नर यांचे टोळके असते. पहाटे आणि तिसऱ्या प्रहरी शेतातून किंवा जंगलाच्या कडेला हे भक्ष्य टिपीत असतात दुपारी विश्रांती घेतात. धान्य, बी, वनस्पतीचे कोंब, किडे, सरडे हे यांचे भक्ष्य होय. रात्री झाडांवर किंवा बांबूच्या बेटात हे झोपतात. यांचा आवाज पाळीव कोंबड्यांसारखाच पण जास्त कर्कश असतो. पाळीव कोंबड्यांप्रमाणेच सकाळी आरवण्याची यांची सवय आहे.

मार्चपासून मे पर्यंत यांचा विणीचा हंगाम असतो. दाट झुडपांच्या तळाशी उथळ खळगा करून त्यात वाळलेली पाने घालून घरटे तयार केलेले असते. मादी ५-६ अंडी घालते. ती पाळीव कोंबड्यांच्या अंड्यासारखीच असतात.

भुरकट रानकोंबडी : ही जाती फक्त भारतात आढळणारी असून पश्चिम आणि दक्षिण भारतातील रानात आणि डोंगराळ प्रदेशात राहते. रानकोंबडी अतिशय भित्री असून दिवसा लपून बसते व पहाटे आणि संध्याकाळी भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडते. हे एकएकटे किंवा जोडप्याने असतात. धान्य, बी, किडे, लहान फळे आणि कोंब हे यांचे भक्ष्य होय. यांचा प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून मेपर्यंत असतो. यांच्या एकंदर सवयी लाल रानकोंबड्यांच्या सवयीसारख्याच असतात.

आज अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाळीव कोंबड्यांचा पूर्वज लाल रानकोंबडी हाच पक्षी होय, असे पुराव्यांवरून समजले जाते. लाल रानकोंबडी हा पक्षी फार प्राचीन काळी भारतात माणसाळविला गेला असावा, असा समज आहे.

पहा : कुक्कुटपालन.

कर्वे, ज. नी.