खाज : (कंडू). त्वचेमध्ये क्षोभ झाल्यामुळे तेथे घासण्याची अथवा खरडण्याची इच्छा झाल्यास ‘खाज सुटली’ असे म्हणतात.

त्वचेच्या स‌र्वांत बाहेरच्या थराला इजा झाली, तर तेथील तंत्रिकाग्रांत (मज्जातंतूंच्या टोकांत) उत्पन्न होणारी संवेदना आवरणरहित अतिसूक्ष्म अशा त्वक्-तंत्रिकेच्या (त्वचेच्या वरच्या भागातील मज्जातंतूच्या) मार्गाने मस्तिष्कापर्यंत (मेंदूपर्यंत) जाते तेथून प्रतिक्षेपी क्रिया (शरीराच्या एका भागात उत्पन्न झालेल्या संवेदनेमुळे इतरत्र झालेली प्रतिक्रिया) होऊन त्वचा खाजवावी असे वाटू लागते. इजा जर जास्त प्रमाणात असेल, तर स्पर्श आणि वेदना यांची संवेदना त्याच तंत्रिकाग्रांत उत्पन्न होते.

हिस्टामीन आणि इतर प्रथिनजन्य पदार्थ त्वचेत उत्पन्न झाले अथवा रक्तातून तेथे पोहोचले तरी खाज सुटते.

कारणे : (१) अगदी सामान्य कारण म्हणजे त्वचा कोरडी पडणे. वृद्धावस्थेत त्वचा साहजिकच कोरडी होते. तसेच साबण, गरम पाणी अधिक प्रमाणात वापरल्यासही त्वचा कोरडी पडून खाज सुटते.

(२) फार घाम येणे, उन्हाळ्यातील घामोळे, कीटकदंश, उवा, खरूज, गजकर्ण वगैरे त्वचेचे रोग बाह्यक्षोभक पदार्थांचा त्वचेशी संबंध येणे (उदा., घुल्याचे केस, खाजकुइली) वगैरे स्थानिक कारणांनीही खाज सुटते. काही औषधिपदार्थ व इतर अधिहर्षताजनक (एखाद्या पदार्थाच्या पूर्वसंबंधामुळे दुसऱ्या संबंधाच्या वेळी विकृत प्रतिक्रिया करणारे, ॲलर्जी निर्माण करणारे) पदार्थ रक्तामार्गे त्वचेपर्यंत पोहोचले तरी खाज सुटून पित्त उठते.

(३) मधुमेह, गर्भिणी-अवस्था, वृक्क (मूत्रपिंड) यकृत आणि ⇨ अवटू ग्रंथींच्या विकारात तसेच आतड्यातील कृमी वगैरे कारणांमुळेही खाज सुटते.

(४) मानसिक व्याधी आणि स्वायत्त तंत्रिका तंत्राच्या (ज्यांची हालचाल इच्छेवर अवलंबून नसते असे स्नायू व ग्रंथी यांचे नियंत्रण करणाऱ्या मज्जासंस्थेच्या भागाच्या) विकारांतही खाज सुटते.

चिकित्सा : (१) मूळ कारण शोधून काढून ते नाहीसे करणे. कित्येक वेळा असे मूळ कारण सापडणे कठीण असते. (२) साबण, गरम पाणी, दाहक अथवा कडक पदार्थांचा वापर करणे टाळावे. (३) त्वचेवर झिंक ऑक्साइड, कॅलॅमीन, कापूर मेंथॉल वगैरे पदार्थांची मलमे अथवा लेप लावले असता त्वचेवर त्यांचा शामक परिणाम होऊन खाज सुटणे बंद होते. (४) हिस्टामीन-विरोधी अनेक औषधे आणि कॉर्टिसॉनच्या जातीच्या औषधांचा चांगला उपयोग होतो.

ढमढेरे, वा.रा.

आयुर्वेदीय चिकित्सा : खाज हे लक्षण त्वचेमध्ये आलेले दोष बाहेर काढण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्याची इंद्रियांना केलेली आज्ञा आहे. खाजवले असताना घर्षण होऊन त्वचेतील दोष बाहेर जातात. त्वचेमध्ये खाजेच्या वेळी पुरळ, चकंदळे इ. त्वचेचे विकार बहुधा असतात. परंतु वरीलप्रमाणे त्वचेमध्ये पुरळ वगैरे न दिसतानाही खाज येत असते. अंगावर पित्त उठते तेव्हा खाज अगोदर आणि नंतर त्वचेवर चकंदळे येतात.

खाजवल्यानंतर कित्येक वेळा बरे वाटते तर कित्येक वेळा आग होते. जेव्हा बरे वाटते तेव्हा कफदोषामुळेच ती खाज असते व खाजविल्यानंतर जेव्हा आग होते तेव्हा कफाला स‌हकारी पित्तदोषही असतो. कफदोष असतो तेव्हा शेकावे, पित्ताचा संबंध असेल तेव्हा सौम्य वाफारा द्यावा.

राईचे तेल लावावे. चरकाचार्यांनी सांगितलेला चंदन कंडुघ्न वनस्पतींचा लेप लावावा आणि पोटातही त्यांचा काढा घ्यावा. कंडू स‌र्वत्र व फार असेल, तर ओकारीचे औषध देऊन ओकारी करवावी आणि स्थानिक असेल, तर जळवांनी रक्त काढावे शिवाय खोरासनी ओव्याचे वस्त्रगाळ चूर्ण पाण्यामधून द्यावे व लावावे.

पित्ताचा संबंध असेल तेव्हा कंडुघ्न औषधांपैकी चंदन, निंब इ. कफनाशक व पित्तहारक अशी द्रव्ये लावावी व पोटात द्यावी.

एखाद्या रोगाचे पूर्वरूप किंवा चिन्ह असेल, तेव्हा त्या रोगाची चिकित्सा करावी. स‌मुद्रफेस किंवा विटेच्या चूर्णाने घासावे.

पटवर्धन, शुभदा अ.