बद्देना : (सु. १२३० – सु. १२८०). प्राचीन तेलुगू कवी. भद्रभूपती ह्या नावानेही तो ओळखला जातो. काकतीय सम्राज्ञी रुद्रम्मादेवी वा ⇨रुद्रांबा (१२५९-९५) हिच्या राज्यात कृष्णा जिल्ह्यातील एका लहानशा प्रदेशाचा बद्देना हा सामंत होता.

सुमतिशतक नीतिशास्त्रमुक्ताषलि ह्या दोन तेलुगू ग्रंथांसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याच्या सुमतिशतकातील नीतिबोधपर पद्ये आंध्र प्रदेशातील बालके पिढ्यान-पिढ्या शिकत आली आहेत. सोमनाथ आणि अन्नमय्य यथावाक्कुल यांची ‘शतके’ धार्मिक मूल्यासाठी, तर बद्देनाचे सुमतिशतक नीतिबोधासाठी प्रसिद्ध आहे. सुमतिशतकात त्याने लोकनीती सुबोधपणे वर्णिली असून प्रत्येक श्लोकाच्या शेवटी ‘मुद्रिका’ म्हणून ‘सुमति’ असा शब्द येतो.

नीतिशास्त्रमुक्तावलि हा  १५० पद्ये असलेला बद्देनाचा ग्रंथ प्रतापरूद्र वा पहिला रुद्रदेव (सु. ११५०-सु.९५) याच्या नीतिसार ह्या मूळ संस्कृत ग्रंथाचा तेलुगू अनुवाद असावा, असे काही अभ्यासक मानतात पण अलीकडच्या विद्वानांना हे मत मान्य नाही. प्रतापरुद्राचा नीतिसार हा संस्कृत ग्रंथ आज तरी उपलब्ध नाही. बद्देनाने आपल्या ग्रंथात राजनीतीचे विवेचन केले आहे. बद्देनानंतरच्या कवींनीही बद्देनाचा व त्याच्या ह्या ग्रंथाचा मोठा आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. या ग्रंथातील राजनीतीचे विवरण पंधरा रीतींत (प्रकरणांत) असून प्रत्येक रीतीत दहा पद्ये आहेत. प्रगल्भ विचार व सुबोध शैली ही वैशिष्टये त्याच्या या दोन्ही ग्रंथात विशेषत्वाने आढळतात.

टिळक, व्यं. द.