रॉय, बिधनचंद्र : (१ जुलै १८२२−१ जुलै १९६२). आधुनिक पश्चिम बंगालचे शिल्पकार, आंतरराष्ट्रीय कीर्तींचे निष्णात डॉक्टर व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते. त्यांचा जन्म पाटणा येथे सुविद्य कुटुंबात झाला. वडील प्रकाशचंद्र ब्राह्मो समाजाचे अनुयायी असून जिल्हाधिकारी होते, तर आई−अधोरेकामीनी−समाज कार्यकर्ती होती. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पाटण्यात होऊन नंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून एल्. एम्. एस्. (१९०६) व एम्. डी. (१९०८) या वैद्यकातील उच्च पदव्या मिळविल्या आणि इंग्लंडमध्ये राहून एल्. आर्. सी. पी. (१९०९) व एफ्. आर्. सी. एस्. (१९११) या उच्च पदव्या संपादन केल्या. भारतात परतल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांची साहाय्यक शल्यचिकित्सक म्हणून कलकत्त्यातील कॅम्बेल वैद्यक महाविद्यालयात नियुक्ती केली पण तेथील यूरोपीयांच्या उद्धट वर्तनामुळे त्यांनी ती सोडून कामिकल वैद्यक महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी धरली. शिवाय खाजगी वैद्यक व्यवसायामुळे त्यांची अर्थप्राप्ती वाढली व नावलौकिक झाला. १९२३ मध्ये देशबंधू दासांच्या स्वराज्य पक्षातर्फे ते सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा पराभव करून बंगालच्या कायदेमंडळावर निवडून आले. चित्तरंजन दासांच्या मृत्यूनंतर ते त्या पक्षाचे उपनेते झाले. पुढे ते काँग्रेसच्या राजकारणाकडे आकृष्ट झाले (१९२८) आणि कार्यकारिणीचे सदस्य व कलकत्ता अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. यावेळी म. गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू इ. ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचा वैद्यकीय सल्लागार या नात्याने परिचय वाढला. असहकार चळवळीच्या वेळी त्यांनी कायदेमंडळाचा राजीनामा दिला. त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्याचवेळी कलकत्ता महानगरपालिकेचे ते महापौर म्हणून निवडून आले (१९३१-३२) व पुढे प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षही झाले (१९३४). म. गांधीच्या येरवड्यातील उपोषणाच्या वेळी त्यांनीच त्यांच्या प्रकृतीची काळजी वाहिली. सक्रिय राजकारणातून ते आपल्या व्यवसायासाठी बाहेर पडले आणि त्यांनी रुग्णसेवेवर लक्ष केंद्रित केले. त्यात त्यांनी रॉयल सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसन अँड हायजीन (१९३६) अमेरिकन सोसायटी ऑफ चेस्ट फिजिशियन्स (१९४०) इत्यादींची छात्रवृत्ती मिळविली. अमेरिका-यूरोपचे दौर केले. पुढे इंडियन मेडिकल कौन्सिलचे ते अध्यक्षही झाले, परंतु पुन्हा महात्मा गांधींच्या आग्रहास्तव ते काँग्रेच्या कार्यकारिणीवर आले (१९३९). १९४२ ते १९४४ या काळात ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगूरू होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना संयुक्त प्रांताचे राज्यपालपद देऊ करण्यात आले, पण ते त्यांनी नाकारले. तेव्हा त्यांना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री करण्यात आले. १९५२, १९५७ व १९६२ अशा तिन्ही सार्वत्रिक निवडणुकांत ते निवडून आले. या पदावर ते अखेरपर्यंत होते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत प. बंगाल राज्यात अनेक मौलिक सुधारणा केल्याः विस्थापित निर्वासितांचा प्रश्न, अन्नधान्य तुटवडा, दुष्काळ, बेकारी इ. महत्त्वाच्या प्रश्नांत लक्ष घालून विधायक योजना कार्यान्वित केल्या व राबविल्या आणि जमीनदारी नष्ट करून जमिनीची कमाल मर्यादा निश्चित केली आणि जलसिंचन योजना, उर्वरके, बी-बियाणे इ. कृषीविषयक बाबींत सुधारणा केल्या. उद्योगधंद्यांना उत्तेजन दिले. दुर्गापूरच्या औद्योगिकीकरणाचे श्रेय बिधनचंद्र यांच्याकडे जाते. त्यामुळेच त्यांना पश्चिम बंगालचे आधुनिक शिल्पकार मानतात.

किरकोळ आजारांतर मुख्यमंत्री असतानाच त्यांचे कलकत्त्यात निधन झाले. अखेरपर्यंत ते अविवाहित राहिले. राष्ट्राची व गोरगरीब रुग्णांची सेवा हा त्यांचा कायमचा ध्यास होता. त्यांनी आपली संपत्ती व राहते घर वैद्यकीय न्यायास अर्पण केले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले तसेच कलकत्ता आदी विद्यापीठांनी सन्मान डी. लिट. पदवी दिली. भारत सरकारने त्यांच्या सेवेचा बहुमान भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन केला (१९५८).

संदर्भ : 1. Roy, P. K. Dr. B. C. Roy and Our Times, Calcutta, 1955.

2. Thomas, K. P. Dr. B. C. Roy, Calcutta, 1955.

देशपांडे, सु. र.