ध्रुव – १ : एक पौराणिक राजा. उत्तानपाद राजाचा पुत्र. अढळ निश्चयाने ध्रुवपद मिळविणारा राजर्षी. ‘औत्तानपादी’ व ‘ग्राहधार’ या नावांनीही तो ओळखला जातो.

उत्तानपाद राजास सुरुची आणि सुनीती अशा दोन राण्या होत्या. सुरुची ही राजाची आवडती होती. तिला उत्तम नावाचा मुलगा होता. ध्रुव हा सुनीती या नावडत्या राणीचा मुलगा होता. लहान असताना ध्रुवाचा अपमान झाल्यामुळे त्याने गृहत्याग केला. कठोर तप करण्यापासून त्याला परावृत्त करण्याचा नारदाने प्रयत्न केला पण ध्रुवाने आपला अढळ निश्चय बदलला नाही. नारदाने दिलेल्या मंत्राच्या साहय्याने ध्रुवाने यमुनेच्या काठी मधुवनात तप सुरू केले. फलाहार, उदकपान, वायुभक्षण इ. कठोर उपायांनी ध्रुवाने तपश्चर्या केली. महाविष्णूने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले. ध्रुवाने नक्षत्रमंडलात अढळ स्थान मागितले. ध्रुवाला सप्तर्षींच्या जवळ अढळ स्थान मिळाले. त्या ताऱ्यालाच ‘ध्रवतारा’ म्हणतात. (भागवत, ४·८–१२, विष्णुपुराण, १·११–१२).

विष्णूची कृपा झाल्यानंतर ध्रुव परत आला. उत्तानपादानंतर ध्रुवाने छत्तीस हजार वर्षे राज्य केले, असे पुराणांत म्हटले आहे. ध्रुवाला भ्रमीपासून कल्प आणि वत्सर असे दोन पुत्र झाले आणि इलेपासून उत्कल नावाचा पुत्र झाला. शेवटी वत्सराला राज्यावर बसवून ध्रुव बदरिकाश्रमात गेला व तेथून तो सदेह स्वर्गास गेला.

भिडे, वि. वि.