तलवार मासा : झिफिइडी या मत्स्यकुलातील मॅकेरेल माशांसारखा दिसणारा एक मासा. याचे शास्त्रीय नाव झिफिअस ग्लेडियस  असे असून या कुलात ही एकच जाती आहे. ही उत्तर अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र यांत राहणारी असली, तरी पॅसिफिंक व हिंदी महासागर यांतही आढळते.

तलवार मासा (झिफिअस ग्लेडियस)सर्वसाधारणपणे या माशाची लांबी १·८—३·१ मी. आणि वजन ४५·४–९१·०० किग्रॅ. असते पण ६·१ मी. लांबीचे आणि ५·८ क्विंटल वजनाचे मासेही आढळलेले आहेत. याचे शरीर जाड व दोन्ही बाजूंनी साधारणपणे दबलेले असते. स्नायू अतिशय मजबूत असतात. त्वचा उघडी आणि खरखरीत असते. मांसाचा रंग तांबडा असतो.वरचा जबडा पुढे आलेला, बराच लांब, टोकदार व दोन्ही बाजूंनी तलवारीच्या पात्यासारखा चपटा झालेला असतो. यामुळे या माशाला तलवार मासा हे नाव मिळालेले आहे. दात लहान पण तीक्ष्ण असतात. डोळे बाजूला असतात.

हा एक अतिशय ताकदवान आणि जलद पोहणारा मासा आहे. पोहताना चंद्रकोरीच्या आकाराच्या आपल्या पुच्छपक्षाचे (पक्ष म्हणजे त्वचेची स्नायुमय घडी) जोरजोराने फटकारे मारून तो जलद गतीने सरळ पोहत जातो. हे मासे लुटारू वृत्तीचे असून लहान माशांच्या थव्यांवर जोराचा हल्ला चढवून त्यांना खातात. हे मॅकेरेल माशांप्रमाणे दिसत असल्यामुळे त्यांच्यात सहज मिसळतात व त्यांनाच खाऊन टाकतात. माशांखेरीज हा स्क्विडदेखील खातो. पुष्कळदा हा जहाजांच्या व होड्यांच्या लाकडात तलवार जोराने खुपसून त्यांना भोके पाडतो.

यांचे मांस स्वादिष्ट असल्यामुळे खाद्यमत्स्य म्हणून या माशाला बरेच महत्त्व आहे. भूमध्य समुद्र आणि इतर समुद्रांत हे मासे मोठ्या प्रमाणावर पकडण्यात येतात.

यार्दी, ह. व्यं.