मार्चेल्लो मालपीगीमालपीगी (माल्पीघी), मार्चेल्लो : (१० मार्च १६२८–३० नोव्हेंबर १६९४). इटालियन जीववैज्ञानिक व वैद्य. प्राणी व वनस्पती यांच्या सूक्ष्म संरचनांच्या अध्ययनासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करणारे आद्य प्रवर्तक. पूर्वी कधीही न पाहिलेल्या संरचनांच्या चिकाटीने व पद्धतशीरपणे केलेल्या निरीक्षणांच्या आधारे त्यांनी सजीवांच्या संघटनासंबंधीच्या (जडणघडणीविषयीच्या) जुन्या संकल्पनांचा फेरविचार केला. त्यांच्या नंतरच्या काळात शरीरक्रियाविज्ञान, भ्रूणविज्ञान व व्यावहारिक वैद्यक या विषयांच्या विकासासाठी शारीरविषयक सूक्ष्मदर्शकीय अभ्यास ही एक आवश्यक बाब ठरली.

मालपीगी यांचा जन्म इटलीतील बोलोन्याजवळ क्रेव्हाल्कॉरे येथे झाला. त्यांच्या शिक्षणाची सुरूवात व्याकरणाच्या अभ्यासाने झाली व १६४६ मध्ये त्यांना बोलोन्या विद्यापीठात प्रवेश मिळाला. १६५३ मध्ये वैद्यक व तत्त्वज्ञान या दोन्ही विषयांची डॉक्टरेट पदवी त्यांना मिळाली व त्यांची अध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी शारीर व वैद्यक या विषयांच्या पुढील अध्ययनास वाहून घेतले. १६५६ मध्ये तस्कनीच्या द्वितीय फेर्दिनांद यांनी मालपीगी यांना पीसा विद्यापीठातील सैद्धांतिक वैद्यकाच्या प्राध्यापक पदाकरिता निमंत्रित केले. तेथे मालपीगी यांची गणितवेत्ते आणि निसर्गवेत्ते जोव्हांनी बोरेल्ली यांच्याशी गाढ मैत्री केली. पीसा येथे मालपीगी यांनी वैद्यकाच्या प्रचलित अध्यापन पद्धतीविषयी वादाचे मुद्दे उपस्थित केले रक्तातील रंग बदलावर प्रयोग केले, तसेच त्या काळच्या शारीर, शरीरक्रिया-वैज्ञानिक व वैद्यकीय समस्यांची फेरमांडणी करण्याचा प्रयत्न केला. १६५९ मध्ये ते बोलोन्याला परतले व तेथे त्यांनी अध्यापनाचे व सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने संशोधन करण्याचे काम चालूच ठेवले. सूक्ष्म  रोहिण्या व नीला  एकमेकींच्या जोडल्या जाऊन तयार झालेले फुप्फुसांतील जाळे आणि केशिकांचे (केसासारख्या रक्तवाहिन्यांचे) जाळे त्यांनी ओळखून काढले व त्यांचे वर्णन त्यांनी केले (१६६१). हे त्यांचे कार्य म्हणजे विज्ञानेतिहासातील एक अगदी महत्त्वाचा शोध होय.

इ.स. १६६२ मध्ये त्यांनी सिसिलीमधील मेसीना विद्यापीठात वैद्यकाचे प्राध्यापकपद स्वीकारले. तेथे त्यांना बोरेल्ली व व्हिस्काउंट फ्रांग्काव्हील्ला या शास्त्रज्ञांची मदत झाली. वैद्यकाचे अध्यापन व व्यवसाय सांभाळून मालपीगी यांनी सूक्ष्मदर्शकीय संशोधनाचा पाठपुरावा केला. त्यांनी रूचिकलिका ओळखून काढल्या व त्यांच्या मते ती तंत्रिका अग्रे (मज्जातंतूंची टोके) होती. मेंदूच्या सूक्ष्म संरचनेचे, तसेच दृक्‌ तंत्रिका आणि मेदाशय यांचे वर्णन केले. १६६६ मध्ये रक्तगटातील तांबड्या पेशी त्यांनीच सर्वप्रथम पाहिल्या व त्यांच्यामुळेच रक्ताला रंग येतो, असे त्यांनी प्रतिपादन केले.

मालपीगी १६६७ मध्ये बोलोन्याला परतले. तेथे त्यांनी वैद्यकीय व्यवसायाबरोबरच यकृत, मेंदू, प्लीहा (पानथरी), वृक्क (मूत्रपिंड), अस्थी व त्वचेचे खालचे स्तर यांसारख्या विशिष्ट अवयवांच्या उपविभागांचे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अध्ययन केले. त्वचेचे खालचे स्तर आता मालपीगी यांच्या नावाने ओळखले जातात. सूक्ष्मदर्शकाने निरिक्षण केलेल्या सूक्ष्म संरचनांनी ते प्रभावित झाले व त्यांनी असे अनुमान काढले की, बहुतेक सर्व सजीव द्रव्ये ग्रंथिल संघटनांची असतात. इतकेच काय पण सर्वांत मोठे अवयवही सूक्ष्म ग्रंथींचे बनलेले असतात.

इ.स. १६६८ नंतर रॉयल सोसायटीच्या फिलॉसॉफिकल टॅन्झॅक्शन्समध्ये पत्ररूपाने मालपीगी यांच्या संशोधन कार्याला नियमितपणे प्रसिद्धी मिळू लागली. १६६९ मध्ये त्यांना या सोसायटीचे सन्माननीय सदस्य करण्यात आले. हा सन्मान प्रथमच इटालियन माणसाला मिळाला. त्यांचे पुढील सर्व संशोधन लंडन येथे प्रसिद्ध केले जात होते. बोलोन्या येथील त्यांचा हा काळ त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू होता. ह्या काळात त्यांनी सूक्ष्मदर्शकाच्या उपयोगाचे क्षेत्र किती विस्तीर्ण आहे हे दाखविले. त्यांनी किटकांच्या अळ्यांवरही विपुल संशोधन केले. विशेषतः रेशमाच्या किड्याची संरचना व विकास यांवरील १६६९ मधील त्यांचे अनुसंधान फार महत्त्वाचे आहे. १६७३ मधील कोंबडीच्या भ्रूणविज्ञानावरील ऐतिहासिक कार्यात महारोहिणी चाप, तंत्रिका वल्या व भ्रूणमध्यस्तर खंड यांचा शोध त्यांनी लावला. त्यांच्या विकासाबाबतचा त्यांचा दृष्टिकोन सामान्यतः विल्यम हार्वी यांच्यासारखा होता. निषेचनानंतर (फलनानंतर) अंड्यामध्ये भ्रूण तयार होतो. असे अनुमान मालपीगी यांनीच काढले असावे. १६७५–७९ या काळात त्यांनी सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने विविध भिन्न वनस्पतींच्या शारीराचे विस्तृत व तुलनात्मक अध्ययन केले आणि वनस्पती व प्राणी संघटनांमध्ये त्यांना सारखेपणा दिसून आला.

आयुष्याच्या शेवटच्या दशकात मालपीगी यांना वैयक्तिक शोकांतिका, ढासळणारी प्रकृती, शिगेस पोहोचलेला विरोध या सर्वांनी चहुबाजूंनी घेरले होते. १६८४ मध्ये त्यांचे घर जाळण्यात आले. त्यांची उपकरणे व सूक्ष्मदर्शक यांची मोडतोड करण्यात आली आणि त्यांचे संशोधनपर लेख, पुस्तके, हस्तलिखिते देखील नष्ट करण्यात आली. त्यांच्या विचारसरणीला होणारा विरोध शिगेस पोहोचला असताना १६९१ मध्ये बारावे पोप इनोसंट यांनी त्यांना रोमला येण्याचे निमंत्रण दिले व आपले व्यक्तिगत वैद्य म्हणून नेमणूक करून त्यांचा फार मोठा सन्मान केला. काउंट, कॉलेज ऑफ डॉक्टर्स ऑफ मेडिसिनवर निवड, रोमन पॅट्रिसिएट रोलमध्ये नाव दाखल होणे इ. सन्मान पुढे त्यांना रोममध्ये मिळाले.

मालपीगी यांना पहिले ऊतकविज्ञानवेत्ते म्हणून संबोधण्यात येते. जवळजवळ ४० वर्षे त्यांनी वनस्पती व प्राणी संरचनांच्या प्रमुख प्रकारांचे वर्णन करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा उपयोग केला व त्यांनी भावी जीववैज्ञानिकांना वनस्पतिविज्ञान, भ्रूणविज्ञान, मानवी शारीर व विकृतीविज्ञान या विषयांतील संशोधनाचे विस्तृत क्षेत्र दाखवून दिले. ज्याप्रमाणे गॅलेलिओ यांनी प्रकाशीय भिंगाच्या नव्याने उपलब्ध झालेल्या तंत्राचा उपयोग पृथ्वीच्या पलीकडील विश्व पहाण्यासाठी केला त्याप्रमाणे मालपीगी यांनी तोपर्यंत नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या जीवसृष्टीच्या पलीकडे असलेल्या कल्पनेबाहेरील सजीवांच्या जटिल संघटना समजण्यासाठी त्याचा उपयोग केला. त्या काळी शरीरक्रियांसंबंधी ज्या संकल्पना अस्तित्वात होत्या त्यांना मालपीगीच्या संशोधनाने धक्का बसला. उदा., रक्ताचे शरीर परिसरात मांसात रूपांतर होते. अशी कल्पना होती पण मालपीगींनी दाखवून दिले की, रक्त केशिकांमधून वाहते आणि या बाबतीत हार्वी यांचे विधान सत्य होते. पण जुन्या कल्पना व नवीन शोध ह्यांचा संघर्ष सतराव्या शतकात चालू राहिला. म्हणून नंतरच्या काळातच त्यांच्या वृक्कीय केशिकागुच्छ, मूत्रजनन नलिका, त्वचा अंकुर, रूचिकलिका व यकृताचे ग्रंथिल घटक यांसारख्या अनेक शोधांमुळे वैद्यक व्यवसायात सुधारणा होणे शक्य झाले. ते रोम येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.