मोनीझ,(आंतॉन्यू काअतान द अब्रेउ फ्रईर) इगास : (२९ नोव्हेंबर १८७४–१३ डिसेंबर १९५५). पोर्तुगीज तंत्रिका-शल्यक्रियाविज्ञ. मेंदूवरील खंड विच्छेदन शस्त्रक्रियेचे मानसिक विकृतीवरील उपचारीतील महत्त्व शोधून काढल्याबद्दल त्यांना १९४९ चे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक ⇨ वॉल्टर रुडोल्फ हेस यांच्यासमोर विभागून मिळाले. हेस यांचे संशोधन मेंदूच्या विशिष्ट क्षेत्रांच्या कार्यासंबंधी होते. दोन्ही शोध तंत्रिका तंत्र विज्ञानासंबंधी (मज्जा संस्था विज्ञानासंबंधी) होते.

मोनीझ यांचा जन्म पोर्तुगालमधील आव्हॅका येथे झाला. कोईंब्रा विद्यापिठात शिक्षण घेऊन १८९९ मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी मिळावली. काही काळ बॉर्दो व पॅरिस येथे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर १९०२ मध्ये ते कोईंब्रा येथे प्राध्यापक झाले. १९११ मध्ये लिस्बन विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या तंत्रिका तंत्र विज्ञान अध्यासनावर त्यांची बदली झाली व मृत्यूपावेतो त्यांनी तेथेच काम केले.

मोनीझ यांच्या शोधाचे श्रेय शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघाती घटनेला अप्रत्यक्षपणे द्यावे लागते. १८४८ मध्ये अमेरिकेत एका रस्ता-बांधणी कामगाराच्या डाव्या गालात एक लोखंडी सळई घुसून डोक्याच्या पुढच्या भागातून आरपार गेली. २·५ सेंमी. व्यासाची ती सळई तशीच ठेवून तासाभरात तो चालत जवळच्या एका शस्त्रक्रियाविशारदाकडे गेला व तेथे ती काढून टाकण्यात आली. पुढे जखम बरी होऊन तो कामगार बारा वर्षे जिवंत होता. त्याच्या स्मृतीवर व कोणत्याही दैनंदिन शरीरक्रियांवर दुष्परिणाम झालेला आढळला नव्हता परंतु त्याची बौद्धिक क्षमता कमी झाली होती आणि व्यक्तिमत्त्वात बदल झाला होता. नेहमी शांत व विचारी असा हा कामगार अस्वस्थ, हट्टी, आळशी, धर्मलंड व इतरांच्या भावनांची पर्वा न करणारा बनला होता. या कामगाराबद्दलचे निरीक्षण, मेंदूतील अर्बुदे (नवीन कोशिकांच्या-पेशींच्या-अत्याधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठी) व इतर आघातजन्य विकृतींच्या निरीक्षणावरून मेंदूचा ललाट-खंडीय भाग जीवनावश्यक क्रियांशी संबंधित नसल्याचे समजले होते. तसेच ललाट-खंडीय विकृती व्यक्तिमत्व बदलास कारणीभूत असल्याचेही लक्षात आले होते.

इ. स. १९३० च्या सुमारास अमेरिकन शरीरक्रियावैज्ञानिकांनी मेंदूच्या मानसिक व शरीरक्रियासंबंधीच्या क्षेत्राबद्दलच्या संशोधनास सुरुवात केली होती. चिंपँझीच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून काही निरिक्षणे करण्यात आली होती. १९३५ मध्ये कार्लाइल जेकबसन या अमेरिकेन शास्त्राज्ञांनी लंडनमधील आंतरराष्ट्रीय तंत्रिका तंत्र विज्ञान परिषदेत माकडाच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया प्रयोगांचे निष्कर्ष मांडले होते. मोनीझ यांना मानवी मेंदूवर तसे प्रयोग करण्याची कल्पना तेथे सुचली.

लिस्बनमध्ये वीस मानसिक रुग्णांवर त्यांनी शस्त्रक्रियेने ललाट-खंडातील काही भाग पांढरा भाग काढून टाकला त्यामुळे तेथील बाह्यकाचा व अंतःस्थ भागांचा संबंध तुटला. या शस्त्रक्रियेच्या परिणामांच्या अभ्यासानंतर सात रुग्ण पूर्ण बरे झाल्याचे, आठांमध्ये सुधारणा झाल्याचे आणि पाचांमध्ये काहीच परिणाम न झाल्याचे आढळले. मोनीझ यांची शस्त्रक्रिया ‘पूर्वललाट-खंड विच्छेदन’ म्हणून मानता पावली. या पुरोगामी कार्याचा उपसिद्धांत म्हणून पुढे अनिवार वेदना शमविण्याकरिता या शस्त्रक्रियेचा उपयोग करण्यात येऊ लागला.

वरील कार्याशिवाय मोनीझ यांनी तंत्रिका तंत्र विज्ञानात ‘मस्तिष्क वाहिनीदर्शन’ या निदानोपयुक्त तंत्राचा शोध लावला. यामध्ये क्ष-किरण अपारदर्शक रंजकद्रव्य रोहिणीतून अंतःक्षेपित करून ते रक्ताभिसरणातून जात असताना क्ष-किरण चित्रण केल्यास मेंदूतील रोहिण्या (अगदी ०·१ मिमी.व्यासाच्या सुद्धा) स्पष्ट दिसतात. मेंदूच्या रोहिणी-विस्फार, अर्बुद इ. विकृतींच्या निदानास हे वाहिनीदर्शक उपयुक्त असते. अलीकडील संगणकीय छेदात्मक क्ष-किरण क्रमवीक्षण (काँप्युटराइज्ड टोमोग्राफी अथवा सी टी स्कॅन) तंत्रामुळे [→ क्ष-किरण वैद्यक] वाहिनीदर्शनाचे महत्त्व कमी झाले आहे.

वैद्यकीय कार्याशिवाय मोनीझ यांना राजकारणातही रस होता. १९०३–१७ या काळात ते पोर्तुगीज पार्लमेंटमध्ये सभासद होते. १९१७ मध्ये त्यांची स्पेनमध्ये राजदूत म्हणून नेमणूक झाली व त्याच वर्षी ते परराष्ट्रीय मंत्री झाले. १९१८ मध्ये ते पॅरिस येथील शांतता परिषदेला पोर्तुगालच्या प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष म्हणून गेले होते.

इ. स. १९०० पासून त्यांनी शास्त्रीय व इतर विषयांवर विपुल लेखन केले. त्यांपैकी प्रीफ्राँटल युकॉटमी-सर्जिकल ट्रीटमेंट ऑफ सर्टन सायकोसिस (१९३७) आणि सेरेब्रल अँजिओग्राफी अँड फ्लेबोग्राफी (१९४०) हे ग्रंथ त्यांच्या महत्त्वाच्या कार्यासंबंधी होते. पोर्तुगालशिवाय स्पेन, फ्रान्स, इटली, ब्राझील, अमेरिका इ. देशांनी त्यांना मानसन्मान दिले होते. बॉर्दो व लीआँ या विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट दिली होती. ॲकॅडेमी ऑफ मेडिसीन (पॅरिस),ॲकॅडेमी ऑफ मेडिसीन (माद्रिद), ब्रिटीश न्युरॉलॉजिकल सर्जन्स सोसायटी, अमेरिकन सोसायटी ऑफ न्युरॉलॉजी वगैरे मान्यवर संस्थांचे ते सभासद दोते. ते लिस्बन येथे मरण पावले.

भालेराव, य. त्र्यं.