बटलर, सॅम्युएल टॉमस : (४ डिसेंबर १८३५–१८ जून १९०२). इंग्रज कादंबरीकार आणि निबंधकार. जन्म लँगर, नॉटिंगॅमशर येथे. आरंभीचे शिक्षण श्रूझ्बेरी येथे घेतल्यानंतर त्याने केंब्रिजच्या सेंट जॉन कॉलेजात प्रवेश घेतला. १८५८ मध्ये तो पदवीधर झाला. सॅम्युएलचे वडिल टॉमस बटलर हे रेव्हरंड होते. सॅम्युएल धर्मोपदेशक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. तथापि धर्माकडे सॅम्युएलचा कल नव्हता. तो अत्यंत स्वतंत्र विचारांचा होता. तसेच चित्रकला आणि संगीत ह्यांचे त्याला आकर्षण होते. वडिलांशी ह्या प्रश्नावर मतभेद झाल्यामुळे १८६० मध्ये बटलर न्यूझीलंडला गेला. वडिलांकडून त्याला काही आर्थिक साहाय्य मिळाले होते. त्याच्या आधारे न्यूझीलंडमध्ये त्याने चराऊ जमीन विकत घेतली आणि ती मेंढपाळांना वापरावयास देण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे ही जमीन भरपूर फायद्यात विकून १८६४ मध्ये तो लंडनला परतला. तेथील ‘क्लिफर्डस इन’ मध्ये तो राहू लागला. आपले उर्वरित आयुष्य त्याने तेथेच घालविले . तो अविवाहित होता.

लंडनमध्ये आल्यानंतर लेखन, चित्रकला आणि संगीत ह्यांत तो रस घेऊ लागला. त्याची काही चित्रे लंडनच्या ‘रॉयल अकॅडमी’ मध्ये लावली गेली तथापि चित्रकाराची अस्सल प्रतिभा आपल्या ठायी नाही, ह्याची जाणीव त्याला यथावकाश झाली संगीतकार होण्याची कल्पनाही त्याने सोडून दिली तो लेखनातच रमला.

न्यूझीलंडमध्ये असताना डार्विनचा ऑरिजिन ऑफ द स्पीशीझ हा युगप्रवर्तक ग्रंथ त्याच्या वाचण्यात आला होता आणि त्यातील विचारांनी तो अत्यंत प्रभावित झाला होता. डार्विनच्या उत्क्रांतिवादावर त्याने अनेक लेख लिहिले. ह्या लेखांपैकी ‘डार्विन अमंग द मशिन्स’ (१८६३) आणि ‘ल्यूक्यूब्रेशियो एब्रिआ’ (१८६५) ह्या दोन लेखांतील विचारांचा विस्तार एरेव्हॉन (१८७२) मध्ये करण्यात आला आहे.

एरेव्हॉन ह्या काल्पनिक देशाचे वर्णन करण्याच्या निमित्ताने बटलरने प्रस्थापित मूल्यांवर उपरोधप्रचुर टीका केली. एरेव्हॉन या ग्रंथात समाज, कर्तव्य, नीती, धर्म इत्यादीबाबत व्हिक्टोरियन कालखंडातील इंग्रज समाजाच्या कल्पानांवर त्याने हल्ला चढविला. ह्या ग्रंथाचाच पुढील भाग-एरेव्हॉन रिव्हिजिटेड १९०१ मध्ये प्रसिध्द झाला. त्यात धर्म हे त्याच्या उपरोधाचे प्रमुख लक्ष्य होते आणि त्यातील उपरोधही अधिक बोचरा होता. ‘चर्च ऑफ इंग्लंड’चा उपहास बटलरने ह्या पुस्तकात केलेला असल्यामुळे १८८३ मध्येच त्या पुस्तकाचे लेखन पूर्ण होऊनही त्याला प्रकाशक मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. द वे ऑफ ऑल फ्लेश हे बटलरच्या निधनांनंतर प्रसिध्द झालेले (१९०३) त्याचे पुस्तक काहीसे आत्मचरित्रात्मक आहे. व्हिक्टोरियन कुटुंबव्यवस्थेतील जुलूम, धार्मिक क्षेत्रातील दांभिकता आणि क्रौर्य, आणि शिक्षणव्यवस्थेतील अपुरेपणा त्याने ह्या पुस्तकातून निदर्शनास आणला. विसाव्या शतकाच्या आरंभी व्हिक्टोरियन जीवनमूल्यांविरूध्द जे बंड उभे राहिले, त्यामागील एक महत्त्वाची प्रेरक शक्ती म्हणून बटलरच्या ह्या पुस्तकाचा उल्लेख करण्यात येतो.  

बटलर हा आरंभी डार्विनचा एक प्रखर पुरस्कर्ता असला, तरी पुढे त्याला डार्विनचा उत्क्रांतिवाद अत्यंत यांत्रिक वाटू लागला. लाइफ अँड हॅबिट (१८७७), एव्हलूशन ओल्ड अँड न्यू (१८७९), अन्काँन्शस मेमरी (१८८०) हे त्याचे ग्रंथ ह्या संदर्भात उल्लेखनीय आहेत.

द फेअर हेव्हन (१८७३) हा बटलरचा आणखी एक उल्लेखणीय ग्रंथ. त्यात ख्रिस्ती धर्माचे समर्थन करण्याचा आव आणून त्याच्यावर टीकाच केलेली आहे. बटलरच्या लेखनातून त्याचातील मूर्तिभंजक स्पष्टपणे दिसून येतो. इलिअड आणि ओडिसी ह्या ग्रीक महाकाव्यासंबंधीही त्याने धक्कादायक वाटतील अशी मते व्यक्त केली होती. इलिअड हे एका ट्रोजनाने रचले आणि ओडिसी ही एका स्त्रीने निर्मिलेली साहित्यकृती होय, असे त्याचे  प्रतिपादन होते. लंडन येथे तो निधन पावला.

संदर्भ :  1. Furbank, Phillip, Samuel Butler, New York, 1958.

            2. Henderson, Philip, Samuel Butler, The Incarnate Bachelor London, 1953.

           3. Muggeridge, Malcolm, The Earnest Atheist, London, 1936. 

कुलकर्णी, अ. र.