वहनपत्र (बिल ऑफ लेडिंग) : वहनपत्र याचा अर्थ वहनासाठी म्हणजेच वाहतुकीसाठी मिळालेल्या मालाची पोचपावती आणि तो माल घेतल्या ठिकाणापासून इच्छित ठिकाणी पोचविण्याबद्दलचा करारनामा. वहनपत्रामध्ये असलेली वाहतूक ही अनेक देशांमधून झालेली अथवा होणारी, अशी अभिप्रेत असते. म्हणून वहनपत्र हे विदेश-व्यवहार अथवा व्यापार यांमध्ये फार उपयुक्त आहे, नव्हे ते अपरिहार्य आहे. 

वहनपत्राच्या व्यवहारामागे मालवाहतुकीचा व्यवहार आणि त्याचा पाया म्हणजे खरेदी-विक्रीचा व्यवहार हा आहे. त्यामुळे विक्रेत्याने खरेदीदारास मालाचा ताबा द्यावा लागतो आणि खरेदीदाराने विक्रेत्यास त्या मालाची किंमत द्यावी लागते. यात खरेदीदाराचे ठिकाण आणि विक्रेत्याचे ठिकाण, ही दोन्ही वेगवेगळ्या देशांत असतात. त्याकारणाने विक्रेत्यास विक्री करावयाचा माल, हा खरेदीदाराच्या ताब्यात देण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक ठरते. कारण खरेदीदारास माल पाठविला नाही, तर विक्रीची किंमत मिळणार नाही. त्यामुळे त्याचा व्यवहार मर्यादित राहील आणि नफाही कारण नफा हा विक्रीवर अवलंबून असतो. विक्रेते आधी पैसे मिळाल्याखेरीज माल पाठविणार नाहीत, असे खरेदीदारास सांगितले, तरी खरेदीदार हा आधी पैसे पाठविण्यास सर्वसाधारणपणे तयार नसतो. कारण पैसे पाठवून दिल्यावर माल मिळेलच, अशी त्यास खात्री नसते. त्यामुळे जसा खरेदीदार त्याच्या पैशावरील ताबा सोडण्यास तयार नसतो, त्याचप्रमाणे आणि त्याच कारणांसाठी विक्रेता हा आपल्या मालावरील ताबा सोडण्यासही तयार नसतो. दोघेही जर असे अडून बसतील अथवा आपल्याच अटींबाबत आग्रही असतील, तर हा व्यवहारच होणार नाही. खरेदी-विक्रीचा व्यवहार हा दोघांच्याही क्रय-विक्रय शक्तीवर (बार्गेनिंग पॉवर) अवलंबून असतो. ह्या मुख्य व्यवहारांतच त्याच्या संपूर्ण तपशिलाचाही समावेश झालेला असतो. उदा., किंमत आणि मालाचा ताबा, कसा व कधी द्यावयाचा या तपशिलासह उभयतांत एकवाक्यता होते आणि मगच त्या व्यवहाराच्या पालनाची सुरुवात होते.

विक्रेत्यास ह्या व्यवहारपालनासाठी म्हणून विक्रीचा माल खरेदीदाराच्या हातात मिळेल, अशी व्यवस्था करावयास पाहिजे. म्हणजेच या मालाचा ताबा त्याच्या ठिकाणापासून खरेदीदाराच्या ठिकाणी नेण्यासाठी म्हणून तो वाहतूक कंपनीकडे द्यावा लागतो. ह्या कंपनीचा व्यवसाय मालाची ठिकठिकाणी वाहतूक करणे, हा असून त्या मालवाहतुकीबद्दल ती कंपनी काही किंमत आकारते. विक्रेता ही किंमत आपल्या विक्रीच्या किंमतीमध्ये अंतर्भूत करतो, अथवा मालवाहतूक कंपनीस आपल्या वाहतुकीची किंमत ग्राहकाकडून वसूल करून घेण्यास सांगतो. म्हणजे येथेही पुन्हा एकदा निर्यातदार आणि मालवाहतूक कंपनी यांमध्ये खरेदी-विक्रीचाच व्यवहार होतो. फक्त खरेदी-विक्री होते ती सेवेची, केलेल्या अथवा घेतलेल्या श्रमांचा मोबदला या नात्याने.

मालवाहतूक झाल्यावर तो माल कोणाच्या ताब्यात द्यावयाचा, हा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा त्यावर उत्तम उत्तर मालवाहतूक कंपनीने असे काढले की, मालवाहतूक करण्यासाठी म्हणून आमच्या ताब्यात माल मिळाल्याची पावती आम्ही तुम्हांस (निर्यातदारांस) देतो, त्या पावतीबरहुकूम जो कोणी ती पावती घेऊन येईल, त्या इसमास तो माल आम्ही ताब्यात देऊ. या कारणाने वहनपत्रास थोडेसे परक्राम्य पत्राचे रूप आले. माल ताब्यात घेण्याची किल्ली म्हणजे वहनपत्र. हे वहनपत्र दुसऱ्याच्या ताब्यात पाठीमागे केवळ सही करून दिले की, त्यातील निर्दिष्ट मालाची जणू मालकीच बदलली. वहनपत्रांचे हेच वैशिष्ट्य त्यांस विदेश-व्यवहारांमध्ये असाधारण महत्त्व प्राप्त करून देते. मात्र परक्राम्य पत्रात जशी संपूर्ण मालकी ते घेणारास प्राप्त होते, तशी वहनपत्रात होत नाही. जेवढे अधिकार ती पावती धारण करणारांस असतील, तेवढेच अधिकार ती पावती घेणारास प्राप्त होतात. [⟶ परक्राम्य पत्रे].

निर्यातदाराने वहनपत्र मालवाहतूक कंपनीकडून घेतल्यावर तो ते त्याच्या ग्राहकाकडे एखाद्या मध्यस्थामार्फत-बॅंकेमार्फत पाठविण्याची व्यवस्था करतो. मात्र तो बॅंकेस कळवितो की, या वहनपत्राचा ताबा ग्राहकास त्याच्याकडून पैसे मिळाल्यावर अथवा हुंडीची स्वीकृती झाल्यावरच द्यावा. असे कळविल्याने निर्यातदार आपल्या मालाबद्दलच्या किंमतीविषयी साशंक राहत नाही आणि ग्राहक अथवा खरेदीदारही मालाच्या ताब्याविषयी खात्री बाळगतो. अशा रीतीने निर्यातदार व खरेदीदार यांची सांगड घालणारा महत्त्वाचा दुवा म्हणून वहनपत्रांचा उपयोग होतो त्यामुळे खरेदी-विक्रीचा व्यवहार अंतिमतः पूर्ण होऊ शकतो. 

करमरकर, वि. मो.