अर्लिक, पॉल : (१४ मार्च १८५४ – २७ ऑगस्ट १९१५ ). जर्मन रसायनशास्त्रज्ञ, जंतुशास्त्रज्ञ व विकृतिशास्त्रज्ञ. १९०८ सालच्या वैद्यकाच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. रसायनशास्त्राच्या जीवविज्ञान व वैद्यक या विषयांतील उपयोगासंबंधी त्यांनीं महत्त्वाचे कार्य केले. जर्मनीतील सायलीशिया प्रांतातील स्ट्रेलेन गावी त्यांचा जन्म झाला. ब्रेस्लॉ येथे वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर १८७८-८९ या काळात ते रुग्णचिकित्सा-साहाय्यक होते. १८९० मध्ये बर्लिन येथे प्राध्यापकपदावर व नंतर कॉख इन्स्टिट्यूटमध्ये साहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली. रक्तपरीक्षणात उपयुक्त असलेले त्रि-अम्‍ल-रंजकद्रव्य हा त्यांचा पहिला महत्त्वाचा शोध होय. प्रतिविषांचे (विषांवरील उताऱ्यांचे) प्रमाणीकरण करण्याचे काम त्यांनी कॉख इन्स्टिट्यूटमध्ये केले. त्या कामाच्या महत्त्वामुळे त्यांना फ्रँकफुर्ट-आम-मेन येथील रासायनी चिकित्सा (कृमी, सूक्ष्मजंतू, व्हायरस इ. दुसऱ्यांवर उपजीविका करणाऱ्‍या जीवांच्या संसर्गावर विशिष्ट औषधांचा उपचार करण्याची एक पद्धती,  → रासायनी चिकित्सा) संस्थेत संचालक म्हणून १९०६ मध्ये नेमण्यात आले. त्यांनी अनेक रोगांवर, विशेषतः उपदंशावर, उपयुक्त असणारे ‘साल्व्हरसान’ नावाचे प्रभावी औषध अनेक वेळा प्रयोग करून शोधून काढले. हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा शोध असून त्यामुळे त्यांना रासायनी चिकित्सेचे जनक मानले जाते. या औषधाच्या संशोधनामध्ये त्यांना हाटा या जपानी वैद्यांचे सहकार्य लाभले. १९०८ मधील वैद्यकाचे नोबेल पारितोषिक अर्लिक यांना म्येच्‌न्यिकॉव्ह यांच्याबरोबर विभागून देण्यात आले.

 

काचेवर रक्ताचा पातळ थर पसरून त्यावर विशिष्ट रंजकद्रव्याची क्रिया केल्यास रक्तपरीक्षण सुलभ होते. त्यासाठी अर्लिक यांनी त्रि-अम्‍ल-रंजकद्रव्यांचा उपयोग प्रथम सुरू केला. त्या रंजकद्रव्यांत फुक्सीन, ऑरेंजजी व मिथिल ग्रीन या तीन द्रव्यांचा समावेश असून त्यांच्या उपयोगाने तीन प्रकारच्या श्वेतकोशिकांचे (पांढऱ्‍या पेशींचे) त्यांनी वर्णन केले. लसचिकित्सा व घटसर्पाचे प्रतिविष यांसंबंधीही त्यांनी संशोधन केले. रोगप्रतिकारशक्ती कशी उत्पन्न होते, याबद्दल त्यांनी मांडलेला पार्श्वशृंखलावाद थोडी भर घालून आजही मानला जातो. लंडनच्या रॉयल सोसायटीचे ते सदस्य होते. ते हँबर्ग येथे मृत्यू पावले.

 कानिटकर,वा. मो.