हिंदु कला : हिंदू कलानिर्मितीच्या स्रोतांच्या मुळाशी धर्म हे उगमस्थान आहे. हिंदूंचे तसेच भारतीयांचे धार्मिक सौंदर्याचे विश्व दोन प्रकारचे आहे : दैवतकेंद्रित व सिद्धकेंद्रित. सनातनी हिंदूंचा आदर्शवादी कलेचा दृष्टिकोन निर्मितीत प्रकट झाला आहे. वास्तवाला त्यांनी दिव्य आदर्शाचे रूप दिले आणि मानव्याला आधिभौतिक देवत्व दिले. शिव, विष्णू, दुर्गा, सरस्वती, काली, ब्रह्मा, राम, कृष्ण इत्यादींच्या मानव्याला दिव्यत्व आणले. सनातनी धार्मिक हिंदूंच्या कलाकृती म्हणजे दैवतकेंद्रित विश्व होय. ‘सिद्ध’ हा पूर्णत्वास पोहोचलेला ज्ञानी मानव होय. सनातनी हिंदू हा मंदिराच्या आवारात प्रवेश करतो. तेव्हा तो देवाकडे-ईश्वराकडे पोहोचण्याकरिता पावले टाकीत जातो. बौद्ध किंवा जैन हा बौद्ध विहाराच्या (स्तूपाच्या) किंवा बस्तीच्या आवारात गेल्यानंतर सिद्धाच्या दर्शनार्थ पादक्रमणा करीत असतो. हिंदूंचे आणि जैन-बौद्धांचे शिल्पशास्त्र वा कला मूलतः एकच आहे. सनातनी हिंदूंची कला ईश्वराच्या संपूर्ण विश्वाचे सूचन करते, तर जैन-बौद्धांची कला मानवी विश्वाचे सिद्धकेंद्रित दर्शन देते. 

 

विश्व हे देवकृती आहे, अशी हिंदू समाजाची धारणा आहे. म्हणून विश्वाच्या उत्पत्तिस्थितिलयाचे ईश्वरकेंद्रित उद्भूत दर्शन घडविणे, हा हिंदूंच्या धार्मिक कलेचा उद्देश आहे. विष्णूचे ⇨ दशावतार किंवा नटेश्वराचे (शिवाचे) तांडव नृत्य हे विश्वाच्या उत्पत्तिस्थितिलयाचा आविष्कार व भक्ताला अभय देण्याचा आविर्भाव होय. भारतीय ⇨ प्रतिमाविद्ये त उपदेशपर आशयाची किंवा त्या त्या धर्मोपदेशकाचे चरित्रकथन करणारी, तद्वतच पुराणे, रामायण-महाभारत, हरिविजय, हरिवंश इत्यादींतील घटना- प्रसंगांचे कथात्मक चित्रण करणारी शिल्पे आढळतात. विशिष्ट काळात ज्या धर्माचे प्रभुत्व असेल, तेव्हा त्या धर्माशी संबंधित कलेला अधिक प्राधान्य मिळाले आणि इतर कलाप्रवाहांबरोबर हिंदू कला प्रकर्षाने फोफावली. त्यामुळे निरनिराळ्या कलाकृतींची निर्मिती व कलासंप्रदायांचा विकास हा काही विशिष्ट हेतूंना अनुसरूनच झालेला दिसतो. कलाकाराला केवळ नवनिर्मितीचा आनंद लाभत असला, तरी तो आनंद मिळावा, म्हणून किंवा पाहणाऱ्याला दृष्टिसुख लाभावे, म्हणून तो आपली प्रतिभा आणि शरीर झिजवत होता, असे म्हणणे अवास्तव व भ्रममूलक ठरेल. भारतीय कलाकारांच्या पिढ्यान्पिढ्या वास्तुशिल्पशास्त्रावरील ग्रंथांतील नियम व तालमानपद्धतीनुसार तत्कालीन परंपरा सांभाळून मूर्ती घडवीत होत्या. शिल्पज्ञ किंवा मूर्तिकार जे काही मर्यादित स्वातंत्र्य घेई, ते फक्त स्वतंत्र मूर्तीच्या जडणघडणीत किंवा अंगप्रत्यंगांच्या आविष्कारात. थोडक्यात, हिंदू कलाकाराच्या कौशल्याची, प्रतिभेची वाढ धर्माच्या आश्रयाने होत होती. ती त्याची मूळ प्रेरकशक्ती होती आणि धर्म व कला यांची तारक-शक्ती म्हणजे राज्यशासन होते. या दोन क्षेत्रांत जे अंतःप्रवाह वाहत होते, त्यांतून ही कलात्मक वेल वृद्धिगंत पावली. 

 

भारतीय किंवा हिंदू कलेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती अलंकरणप्रधान किंवा सुशोभनात्मक कला आहे. याचे दाखले विशेषतः शिल्पशास्त्रावरील ग्रंथांतून तसेच काही शिलालेखांतून मिळतात. ग्रीक अथवा रोमन कलाकारांप्रमाणे निसर्गाचे हुबेहुब प्रतिरूप वास्तव अनुकरण तिला मान्य नाही. धार्मिक समजुतीमुळे व सौंदर्यविषयक गरजांनुसारयेथील कलावंतांनी आवश्यकतेप्रमाणे निसर्गालाच अभिनव रूप देऊन नवे अलंकार निर्माण केले. असे करत असताना त्यांनी प्राचीन संकेत व प्राप्त परिस्थिती यांचा मेळ घालण्यात यश मिळविले. मानवाच्या शारीरिक अवयवांचीसुद्धा एक रमणीयता त्यांनी सांभाळली आहे. लतावेली, कमलपुष्प, पशुपक्षी, स्त्री-पुरुष यांची मनोहर कलात्मक गुंफण त्यांनी आपल्या शिल्पांत सर्वत्र केलेली आढळते. काव्यामधील वर्णनांप्रमाणे कोमलांगी स्त्रीची सर्व वैशिष्ट्ये, स्त्री-सौंदर्याचे काही परंपरागत संकेत पाळूनच, प्रकट करून स्त्रियांच्या प्रतिमा खोदण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष व्यवहारात सिंहकटी, नितंबिनी, घटस्तनी, दीर्घ मत्स्यलोचना स्त्री पाहिली, तर तिची गणना सुंदर स्त्रियांतच होते. ही परंपरा सांभाळून भारतीय शिल्पांतील अप्सरा, सुरसुंदरी, शालभंजिका, वृक्षिका इत्यादींची शिल्पे खोदली गेली आहेत. प्रत्येक स्त्री-प्रतिमा यौवनाने ठासून भरलेली असून चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. या संदर्भात स्टेला क्रॅमरिश या पाश्चात्त्य कलासमीक्षक विदुषीने अतिशय चपखल शब्दांत हिंदू कलेची मीमांसा केली आहे. ती म्हणते, “भारतीय कलेची वास्तवता दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक, दृश्य रूपात प्रकट होणारी लयबद्धता आणि दोन, कलावंताच्या अंतर्मनात दडलेल्या कल्पना. कल्पनेच्या जीवनाशी असणाऱ्या संबंधांतून ही वास्तवता निर्माण होते. ही लयबद्धता हिंदू कलानिर्मितीत सर्वत्र कार्यरत असलेली दृष्टोत्पत्तीस येते. निर्सगात आढळणाऱ्या बाकदार आकारांतून वनस्पतींचा जीवनरस प्रवाहित होऊन पानांपासून फुलापर्यंतच्या विविध रूपांत तो अभिव्यक्त होतो. ही अभिव्यक्ती ‘सहज’ असते ङ्घ. हिंदू कलेतील प्रत्येक कलाकृतीला ही सहजता लाभलेली असून तिला कलानिर्मितीत अर्थ आणि आशय प्राप्त झाला आहे. हिंदू कलेतील कुंभ, कमळ, नाग, वृषभ, स्वस्तिक इ. सांस्कृतिक प्रतीके किंवा मकर, कीर्तिमुख, कासव, शरभ, व्याल इ. धार्मिक प्रतीके यांना त्यामुळे भारतीय सांस्कृतिक जीवनात महत्त्व प्राप्त झाले आहे. 

 

धर्मश्रद्धा हे प्राचीन भारतीय जीवनाचे प्रमुख अंग असले आणि कलेच्याक्षेत्रात ही भावना प्रभावी ठरली असली, तरीसुद्धा हिंदू कलेत वास्तववादी, धर्मनिरपेक्ष (लौकिक) व आदर्शवादी अशा तिन्ही प्रकारच्या कलाकृती आढळतात. याचे कारण असे की, या कलेत धर्मप्रेरणा आणि सौंदर्यप्रेरणा यांचा संगम झालेला आहे. ज्या कलाकृतींत सौंदर्यप्रेरणा धर्मप्रेरणेला आत्मसात करून प्रकर्षाला पोहोचते, त्या कलाकृती आदर्शवादीकलाकृती होत. या आदर्शवादी कलाकृती वास्तवाशी निकटचे साहचर्य दर्शवितात, हे प्राचीन भारतीय वाङ्मयात डोकावले असता प्रत्ययास येते. प्राचीन भारतीय लोक हे तत्त्वचिंतन आणि धार्मिक कर्मकांड यांतगुंतलेले असले, तरी लौकिक व ऐहिक जीवनाकडे त्यांनी पाठ फिरविलेली नव्हती. ते सुद्धा जगातील इतर समाजांप्रमाणे ऐहिक सुख-समाधानासाठी आसुसलेले व जागरूक होते. प्राचीन भारतीयांनी मानवी जीवनातील जीवनमूल्यांचा अभ्यास करून धर्म, अर्थ, काम या संकल्पना प्रथमनिर्माण केल्या आणि चौथ्या मोक्ष या संकल्पनेची त्यात नंतर भर घातली. या चार मूळ संकल्पनांचा सौंदर्यात्मक किंवा कलात्मक आविष्कारम्हणजे कलेची सिद्धी होय, असे त्यांनी मानले. ह्या चारही संकल्पनामानवी जीवनाची प्रयोजने होत. या प्रयोजनांचा सुंदर आविष्कार म्हणजेच हिंदू कला होय. या संकल्पनांना त्यांनी ‘पुरुषार्थ’ ही संज्ञा दिली. महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, वात्स्यायनाचे कामसूत्र, मनुस्मृती, पुराणे आदीप्राचीन ग्रंथांत याची संयुक्तिक चर्चा केलेली असून, विवाहविधीप्रसंगी जीवनातील कर्तव्ये म्हणून या पुरुषार्थांचे पालन करण्याची आज्ञावजा सूचना ऋत्विज नवदांपत्यास अग्नीच्या साक्षीने करतो. त्यावेळी धर्म व मोक्ष या पुरुषार्थांइतकेच अर्थ व काम या दोन पुरुषार्थांना नैसर्गिक गरज म्हणूनमहत्त्व दिलेले आहे. किंबहुना त्यांची आवश्यकता ऐहिक जीवनातीलसुख आणि समाधान यांकरिता प्रतिपादिली आहे. केवळ मोक्ष अथवाधर्म हे साध्य होऊ शकत नाहीत अर्थ आणि काम यांचाही आधारत्यांना लागतोच. याचे प्रतिबिंब तत्कालीन वास्तववादी हिंदू कलेत – विशेषतः मूर्तिशिल्पांत – पडलेले आढळते. सनातनी हिंदूंच्या कामतत्त्व-मूलक कलेचा वारसा किंचित परिवर्तन करून कलाकारांनी तसाच कायम ठेवला आहे. स्त्री-पुरुषांची सुंदर युग्मे प्रणयभावनेचा विविधांगी आविष्कार घडविण्यासाठी खोदलेली आहेत किंवा ही प्रणयभावनात्मक रूपे राधा-कृष्णांच्या चित्रशैलीतून दृग्गोचर होतात. शिवाय आलिंगन-चुंबनापासून संभोगापर्यंतची अनेक संभ्रम-विभ्रम अवस्थांतील शिल्पे मंदिरावरखोदलेली आहेत. कामशिल्पांचे वैविध्यपूर्ण आविष्कार-प्रकार दर्शविणारी ही धर्मातीत शिल्पे जगातील इतर कोणत्याही संस्कृतीत किंवा भूप्रदेशात आढळत नाहीत. हिंदू कलेतील कामशिल्पे ही वैश्विक आश्चर्याची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणता येईल. यांशिवाय काही गणिकांची शिल्पे आहेत. तद्वतच दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग, पशुपक्षी, प्राणी, विविध वनस्पती, फुले-फळे-झाडे, लतावेली, क्रीडाप्रकार, युद्धप्रसंग, शिकारीची दृश्ये इ. वास्तव कलाप्रकार मंदिरे व स्तूपांवर आढळतात. त्याचप्रमाणे वेशभूषा, केशभूषा, वस्त्रे, अलंकार, वाद्ये, शस्त्रे इत्यादींचे अलंकरणही शिल्पांतून दिसते.

 

पहा : जैन कला बौद्ध कला भारतीय कला भारतीय वास्तुकला मंदिर- -वास्तुकला. 

 

संदर्भ : १. देशपांडे, सु. र. भारतीय कामशिल्प (दुसरी आवृत्ती), पुणे, २०१४.

           २. देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव : प्राचीन-मध्ययुगीन( दुसरी आवृत्ती), पुणे, २०१३.

           ३. माटे, म. श्री. प्राचीन भारतीय कला (दुसरी आवृत्ती), पुणे, २००४

 

देशपांडे, सु. र.