मानव-यंत्र अभियांत्रिकी : मानव व यंत्र यांनी बनणाऱ्या प्रणालीतील या दोन्ही घटकांचा परस्पर सुसंवाद साधून प्रणालीचे उद्दिष्ट प्रभावीपणे साध्य करण्याच्या तंत्राला मानव-यंत्र अभियांत्रिकी म्हणतात. पूर्णपणे स्वयंचलित म्हणजे मानवविरहित अशी प्रणाली अस्तित्वात नाही म्हणून मानव व यंत्र यांच्या परस्परसंबंधाविषयी अभ्यास करणे आवश्यक आहे. मानवाचे प्रणालीतील कार्य त्याचे नैसर्गिक गुण व उणिवा लक्षात घेऊन निश्चित करावे लागते. कार्य करत असताना स्वतःची उन्नती करण्याचे व प्रणालीच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याचे समाधान त्यास मिळावयास पाहिजे. त्याच्या कर्तृत्वास वाव नसेल, तर मानवास कंटाळा येतो व त्याच्या हातून चुका घडतात, असे दिसून आले आहे. कार्य करण्याची जागा व भोवतालचे पर्यावरण कार्य करण्यास पूरक असावे लागतात. तसेच तंत्रज्ञानाच्या विकासामुळे यंत्रांची कार्यक्षमता खूपच वाढलेली असल्याने दोन्ही घटकांच्या विशिष्ट गुणांचा जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने उपयोग प्रणालीची कार्यक्षमता वाढविण्याकरिता करणे जरूर आहे. त्याकरिता मानव व यंत्र यांचे विशेष गुणधर्म व उणिवा यांचे विश्लेषण, त्यानुसार निश्चित रीत्या कार्यवाटप करण्याची पद्धत विकसित करणे, मानव-यंत्र व यंत्र-मानव यांमधील माहिती प्रेषण पद्धत, मानवावर होणारे शारीरिक व मानसिक परिणाम, कार्याची जागा व पर्यावरण यांचे कार्यक्षमतेवर होणारे परिणाम, मानवाला घ्यावे लागणारे प्रशिक्षण अशा सर्व अंगांचे विश्लेषण व अध्ययन मानव-यंत्र अभियांत्रिकीमध्ये केले जाते. याकरिता औद्योगिक व्यवस्थापनात एक नवा कार्यनिष्ठ विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागाच्या कार्यपद्धतीने मानव-यंत्र प्रणालींची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढली असून उत्पादन खर्च कमी झालेला दिसून येतो. तसेच कामगाराचे मानसिक समाधान राखण्यात यश मिळाले आहे.
मानव-यंत्र अभियांत्रिकी ही अनुप्रयुक्त मानसशास्त्राची महत्त्वाची शाखा असून तिला मानव अभियांत्रिकी, जैव तंत्रविद्या, अभियांत्रिकी मानसशास्त्र, अनुप्रयुक्त प्रायोगिक मानसशास्त्र इ. नावांनीही संबोधिले जाते. मानव-यंत्र अभियांत्रिकीत विविध वैज्ञानिक शाखांतील (उदा., मानसशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान, मानवशास्त्र, अभियांत्रिकी) तत्वांचा आधार घ्यावा लागतो.
इतिहास : अनादि काळापासून मानवाने हत्यारे व इतर साधने यांची सुधारणा करण्यात यश मिळविले आहे. वापरात असलेल्या साधनांमधील उणिवा दूर करून मानवास जास्त सोयीच्या साधनांची पुढील पिढी तयार करीत असते. ह्या ठिकाणी पूर्वानुभवावरून क्रमाक्रमाने साधनांची उत्क्रांती होत गेली. यूरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर नाना तऱ्हांची यंत्रे निर्माण केली गेली व उत्पादकांच्या पूर्वानुभवाप्रमाणे मानवाच्या सोयीच्या दृष्टीने या यंत्रांची उत्क्रांती होत गेली परंतु त्या वेळी मानव-यंत्र प्रणालीतील मानवाच्या विशिष्ट स्थानाची संकल्पना नव्हती. १८२९ मध्ये फ्रांस्या द्यूपँ या फ्रेंच अभियंत्यांच्या असे लक्षात आले की, उत्पादकता वाढवायची असल्यास मानव व यंत्र यांचे परस्परसंबंध विचारात घेतले पाहिजेत. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी एफ्. डब्ल्यू. टेलर या अमेरिकन अभियंत्यांनी कार्याची जागा, मानवाची क्षमता व कार्य करण्याचा क्रम यांचे विश्लेषण करून उत्पादन वाढीचे तंत्र अमलात आणले. उदा., फावडी व त्यांची क्षमता यांचा अभ्यास करून वाळू, कोळसा, धातुके (कच्च्या रुपातील धातू) इ. पदार्थ एका वेळी माणूस जास्तीत जास्त किती पेलू शकेल हे ठरवून त्याप्रमाणे फावड्याचा आकार निश्चित केला. तसेच एका दिवसात मजूराने किती काम करावयाचे हे ठरवून दिले. जास्त काम केल्यास रोख बक्षीस देण्यात त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर फ्रँक बंकर गिलब्रेथ व त्यांची पत्नी लिलिअन गिलब्रेथ या अमेरिकन अभियंत्यांनी कामगारांच्या काम करताना होणाऱ्या हातांच्या हालचालीसंबंधी पद्धतशीर विश्लेषण केले. त्याचा उपयोग कारखान्यात उत्पादन प्रक्रियेची मांडणी करण्यासाठी प्रमाणभूत हालचाल-व-काल विश्लेषण तंत्र अजूनही करतात. या पद्धतीस त्यांच्या नावावरून थर्ब्लिग (therbling) असे नाव देण्यात आले आहे. महोत्पादनाच्या (मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या) पद्धतीत जुळणी विभागात प्रत्येक कामाचे छोटे छोटे विभाग करून प्रत्येक काम सोपे करण्यात आले. त्यामुळे अकुशल कामगारांचा उपयोग करता येऊ लागला परंतु पुढे असे दिसून आले की, या पद्धतीत माणसाला कोणतेही आव्हान रहात नाही आणि मानसिक सामाधान न मिळाल्यामुळे उत्पादन विशिष्ट पातळीच्या वर जाऊ शकत नाही, तसेच चुका होतात. ह्या पद्धतीत नंतर योग्य ते बदल करून माणसाला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.
दुसऱ्या महायुद्धात विविध कामे करण्याकरिता माणसाची निवड करताना मानसशास्त्रावर आधारलेल्या चाचण्यांचा उपयोग केला गेला. तसेच प्रशिक्षणाची पद्धत मानसशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार आखली गेली. त्यामुळे अशी निवडलेली माणसे थोड्या अवधीच्या प्रशिक्षणानंतर विविध जटिल (गुंतागुंतीची) शस्त्रास्त्रे व यंत्रे चालवू शकली. एका नियंत्रण केंद्रात प्रशिक्षित चालक असूनसुद्धा मोठ्या प्रमाणात अक्षम्य चुका होत होत्या, असे दिसून आले. असे होण्याचे कारण शोधल्यावर असे दिसून आले की, त्या केंद्रातील चालकांचे आपसातील सहकार्य तसेच मनोधैर्य कमी होते. एकतर त्यांचे तेथील कार्य वाजवीपेक्षा जास्त सोपे होते, तसेच कामाच्या विविक्षित जागामुळे त्यांचा एकमेकांशी संपर्क नव्हता. हे दोष काढून टाकल्यावर केंद्राची कार्यक्षमता वाढली.
सऱ्या महायुद्धानंतर वैज्ञानिक व तंत्रिक ज्ञानामध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळे मानवाने खूपच जटिल अभियांत्रिकी प्रणालींचे उत्पादन हाती घेतले (उदा., क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे, अवकाशयाने, कृत्रिम उपग्रह, स्वयंचलित उत्पादन प्रणाली इत्यादी). अशा प्रणाली अस्तित्वातच नसल्यामुळे पूर्वानुभव उपलब्ध नव्हता व क्रमाक्रमाने विकास करणे शक्य नव्हते. तसेच प्रणालींचा उत्पादन खर्च खूपच असल्यामुळे एकदा उत्पादन पूर्ण झाल्यावर प्रणालीतील विविध घटकांमध्ये बदल करणे शक्य नव्हते. त्यामुळे मानव-यंत्र संबंधाविषयी प्रथम अवस्थेपासूनच विचार करणे आवश्यक होते. प्रत्यक्ष प्रणालींच्या कार्यावरून मानव व यंत्र यांची सुसंगतता साधण्यात यश मिळाले आहे, असे दिसते. १९६० नंतर झालेल्या प्रगतीमुळे यंत्रांची विविध कार्ये करण्याची क्षमता वाढली आहे. परिणामी प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्रातील माणसांची संख्या कमी होत असली, तरी त्यांच्या कार्याचे स्वरूप बदलून त्यांच्यावरील जबाबदारी वाढत आहे. स्वयंचलित यंत्रे व प्रक्रिया प्रचारात आणल्यामुळे मानवाचे कार्य बोध घेणे, संधारण करणे (सुस्थितीत ठेवणे किंवा निगा राखणे), नियंत्रण ठेवणे, योजना तयार करणे अशा तऱ्हेचे झाले आहे. काही परिस्थितीत मानवाची विश्वासार्हता यंत्रापेक्षा जास्त असते. विविध परिस्थितींचे आकलन करून निर्णय घेणे, परिस्थितीशी जुळवून घेणे इ. गुणधर्मांमुळे मानव-यंत्र प्रणालीमध्ये मानवाचे स्थान अटळ आहे. परिणामी मानव व यंत्र यांचे परस्परसंबंध व सुसंगतता साधण्याकरिता लागणाऱ्या उपाययोजना यांवर गेल्या काही वर्षांत पद्धतशीर संशोधन व विश्लेषण केले गेले आहे. ह्या विषयाच्या सर्व अंगोपांगांवर माहिती उपलब्ध आहे व होत आहे. तसेच मोठ्या औद्योगिक व्यवस्थापनात मानव-यंत्र संबंधाविषयी सातत्याने काम करण्याकरिता निराळे कार्यनिष्ठ विभाग निर्माण करण्यात आले असून त्याचे फायदेही दिसून येत आहेत.
दुसऱ्या महायुद्धानंतर वैज्ञानिक व तंत्रिक ज्ञानामध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळे मानवाने खूपच जटिल अभियांत्रिकी प्रणालींचे उत्पादन हाती घेतले (उदा., क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे, अवकाशयाने, कृत्रिम उपग्रह, स्वयंचलित उत्पादन प्रणाली इत्यादी). अशा प्रणाली अस्तित्वातच नसल्यामुळे पूर्वानुभव उपलब्ध नव्हता व क्रमाक्रमाने विकास करणे शक्य नव्हते. तसेच प्रणालींचा उत्पादन खर्च खूपच असल्यामुळे एकदा उत्पादन पूर्ण झाल्यावर प्रणालीतील विविध घटकांमध्ये बदल करणे शक्य नव्हते. त्यामुळे मानव-यंत्र संबंधाविषयी प्रथम अवस्थेपासूनच विचार करणे आवश्यक होते. प्रत्यक्ष प्रणालींच्या कार्यावरून मानव व यंत्र यांची सुसंगतता साधण्यात यश मिळाले आहे, असे दिसते. १९६० नंतर झालेल्या प्रगतीमुळे यंत्रांची विविध कार्ये करण्याची क्षमता वाढली आहे. परिणामी प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्रातील माणसांची संख्या कमी होत असली, तरी त्यांच्या कार्याचे स्वरूप बदलून त्यांच्यावरील जबाबदारी वाढत आहे. स्वयंचलित यंत्रे व प्रक्रिया प्रचारात आणल्यामुळे मानवाचे कार्य बोध घेणे, संधारण करणे (सुस्थितीत ठेवणे किंवा निगा राखणे), नियंत्रण ठेवणे, योजना तयार करणे अशा तऱ्हेचे झाले आहे. काही परिस्थितीत मानवाची विश्वासार्हता यंत्रापेक्षा जास्त असते. विविध परिस्थितींचे आकलन करून निर्णय घेणे, परिस्थितीशी जुळवून घेणे इ. गुणधर्मांमुळे मानव-यंत्र प्रणालीमध्ये मानवाचे स्थान अटळ आहे. परिणामी मानव व यंत्र यांचे परस्परसंबंध व सुसंगतता साधण्याकरिता लागणाऱ्या उपाययोजना यांवर गेल्या काही वर्षांत पद्धतशीर संशोधन व विश्लेषण केले गेले आहे. ह्या विषयाच्या सर्व अंगोपांगांवर माहिती उपलब्ध आहे व होत आहे. तसेच मोठ्या औद्योगिक व्यवस्थापनात मानव-यंत्र संबंधाविषयी सातत्याने काम करण्याकरिता निराळे कार्यनिष्ठ विभाग निर्माण करण्यात आले असून त्याचे फायदेही दिसून येत आहेत.
मानव-यंत्र प्रणालीची मूलभूत तत्त्वे : प्रथमतः मानव-यंत्र प्रणालीचा विकास यंत्रनिष्ठ होता. त्यात यंत्र तयार झाल्यावर त्याच्या कार्याला अनुरूप बनविण्याकरिता मानवाची निवड पद्धत व शिक्षण पद्धत ठरविली जात असे. यंत्रातील सर्व उणिवा काढून टाकण्यात येत नसत व त्यामुळे यंत्र-मानव कार्यक्षमता कमी असे. त्यानंतर मानवनिष्ठ प्रणालीचा विकास केला गेला. ह्या पद्धतीत मानवाला सुसंगत असे यंत्र बनविण्याची पद्धत उपयोगात आणली गेली परंतु असे उद्दिष्ट साध्य करणे सर्व परिस्थितींमध्ये शक्य नसते. हल्ली मानव व यंत्र ह्या दोन्ही घटकांचा जास्तीत जास्त कार्यक्षम उपयोग केला जातो परंतु नियंत्रणाची जबाबदारी मानवी घटकावर असते.
संकल्पित मानव-यंत्र प्रणालीचे ध्येय, तसेच कार्यक्षमतेच्या कसोट्या प्रथमतः ठरवितात, उदा., क्षेपणास्त्राचे ध्येय – बाँबफेकी विमानाला मार्गात अडविणे आणि कार्यक्षमतेची कसोटी – ६ ते १२ किमी. उंचीवरून जाणाऱ्या व ३०० किमी. त्रिज्येतील क्षेत्रात येणाऱ्या मानवसहित बाँबफेकी विमान मार्गातच नष्ट करणे. त्यानंतर प्रणालीचे ध्येय साध्य होण्याकरिता लागणाऱ्या अभियांत्रिकीय प्रणालीची व तिच्यातील उपप्रणालींची निवड करतात निवड केलेल्या प्रणालीमुळे ध्येयात व कार्यक्षमतेच्या कसोट्यांत बदल करणे आवश्यक असल्यास तसा बदल करतात. मावन-यंत्र प्रणालींचे प्रातिनिधिक चित्र आकृतीमध्ये दाखविले आहे.
मानव-यंत्र प्रणाली निश्चित झाल्यावर कार्य कसे करावयाचे हे ठरविताना मानव व यंत्र यांच्यामध्ये विविध कार्यांची वाटणी केली जाते. ही वाटणी करताना मानव व यंत्र यांचे गुण व अवगुण लक्षात घेतले जातात. साधारणतः नियंत्रण व संधारण ही कामे मानवाने करणे श्रेयस्कर असते. अवकाशयानात संधारण करणारा कर्मचारी असल्यास त्याची विश्वासार्हता मानवरहित अवकाशयानापेक्षा जास्त असते, असे दिसून आले आहे. प्रणालीतील ज्या कार्यात अनिश्चितता जास्त असते किंवा अनपेक्षित प्रसंग निर्माण होण्याचा संभव असतो किंवा विशिष्ट परिस्थितीत निर्णय घेणे आवश्यक असते ती कार्ये मानवाकडे सोपविणे श्रेयस्कर असते. विशिष्ट कार्य करण्याकरिता लागणाऱ्या प्रेरणा मानवाच्या शक्तीबाहेरच्या असतील किंवा दीर्घकाळ लावाव्या लागत असतील, अथवा वारंवार तेच तेच काम करावे लागत असेल, तर अशी कामे यंत्रांनी करणे श्रेयस्कर असते. नाना तऱ्हेच्या गोष्टी विचारात घेऊन पर्याप्त (इष्टतम) निर्णय घ्यावयाचा असल्यास [ उदा., नियंत्रण पद्धतीत इशाऱ्यांची संख्या व नियंत्रक साधनांची संख्या (बटणे, चाके, तरफा इ.) जास्त असल्यास] यंत्राने ते काम करणे श्रेयस्कर असते. मानवाला विविध पुराव्यांची छाननी व तुलना करून पर्याप्त निर्णय घेणे अवघड असते, तसेच एखादा विशिष्ट निर्णय देण्यास तो राजी नसतो. अशा ठिकाणी संगणक (गणक यंत्र) वापरल्यास जास्त चांगला निर्णय मिळण्याची शक्यता असते. बोध घेण्याचे कार्य यंत्र मानवापेक्षा जास्त चांगले करते. मानव-यंत्र कार्य विभागणी करताना लवचिकपणा ठेवावा लागतो.
नियंत्रण व संदर्शन : आकृतीमध्ये मानव व यंत्र आयतांनी दाखविले आहेत. त्यांमधील आंतरपृष्ठ मध्यभागी दाखविले आहे. कोणतेही उपकरण किंवा यंत्र वापरणाऱ्या व्यक्तीस डोळे, कान व स्पर्शेंद्रिये यांमुळे ज्ञान होते म्हणजे ज्ञानेंद्रिये मानवाचे संवेदक म्हणून कार्य करतात. संवेदकाकडून मिळालेल्या संकेताचे मानव आकलन करतो व त्यावरून निर्णय घेतो. अशा प्रकारे मानवाच्या मेंदूमध्ये संकेतावर प्रक्रिया होते. निर्णय झाल्यावर नियंत्रणाची कृती करण्याकरिता मानव शब्दांनी किंवा हात व पाय यांनी यंत्राला संकेत देईल (उदा., एखादा स्विच उघडेल किंवा बंद करेल, चाक फिरवेल वगैरे). त्या संकेताप्रमाणे यंत्रामध्ये प्रक्रिया होईल (उदा., मोटारगाडीचे सुकाणू चाक डाव्या बाजूला फिरविल्यास मोटारगाडी डाव्या बाजूला वळेल). यंत्रे उपप्रणालीत होणारे बदल विविध साधनांनी (दृश्य व श्राव्य) संदर्शित केला जातो. मानवाला नियंत्रण पुरेसे होते किंवा नाही हे कळते, तसेच विविध साधनांनी प्रणालीच्या कार्याचे संदर्शन मानवाला संवेदकांच्या तर्फे मिळते. मानव-यंत्र या आयतांच्या बाहेरील जागा प्रर्यावरण दर्शविते. प्रर्यावरणाचा प्रणालीवर होणारा परिणाम बाणांनी दर्शविला आहे.
यंत्र-मानव व मानव-यंत्र (या आंतरपृष्ठावर) यांमधील माहितीचा विनिमय (देवाण-घेवाण) अचूक होण्याच्या दृष्टीने प्रयोगशाळेत बरेच प्रयोग केले गेले आहेत, तसेच प्रत्यक्ष अनुभवही उपलब्ध आहे. मानव दृश्य किंवा श्राव्य किंवा दोन्ही प्रकारे संवेदना ग्रहण करतो. माहितीच्या अनेक संदेशांची क्रमाक्रमाने किंवा एकाच वेळी किंवा द्रुत गतीने तुलना करावयाची असल्यास दृश्य संदर्शन जास्त परिणामकारक असते, असे दिसून आले आहे. हालचाल किंवा प्रवेग यांची माहिती दृश्य संदेशांनी देणे श्रेयस्कर असते. त्रिमितीय संबंध दर्शविण्यास दृश्य संदेश वापरतात. ज्या ठिकाणी प्रणालीबाहेरील गोंगाटामुळे किंवा इतर कारणानी श्राव्य संदेश उपयोगी पडत नाहीत, त्या ठिकाणी दृश्य संदेश वापरतात. आणीबाणी व इशारा देणारे संदेश, तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक असलेले संदेश श्राव्य असावेत म्हणजे मानवाला चटकन कळतात. अपुऱ्या प्रकाशाच्या परिस्थितीत श्राव्य संदेश पद्धत वापरावी लागते. मानवाची दृश्य व श्राव्य संदेश ग्रहण करण्याची क्षमता संपूर्णपणे वापरली जात असल्यास अधिक संदेश ग्रहण करण्याकरिता स्पर्शज्ञानाचा उपयोग केला जातो, तसेच अचूक कार्यवाही आवश्यक असल्यास दृश्य व श्राव्य संदेशांशिवाय स्पर्शीय पद्धत अतिरिक्त म्हणून वापरतात.
मानवाला संवेदकांपासून मिळालेल्या संदेशावर मेंदूमध्ये प्रक्रिया होते. पूर्वानुभव व प्रशिक्षण यांमधून मिळालेली माहिती व संदेशातून मिळालेली माहिती यांची तुलना करून मानव नियंत्रणाची कार्यवाही करण्यासंबंधी निर्णय घेतो. मानवाला निर्णय घेण्यास पुरेसा वेळ दिला पाहिजे. काम करण्याचा वेग यंत्राने न ठरविता मानवाने स्वतः ठरविण्याची मुभा असली पाहिजे. विशिष्ट कार्यवाही करण्याच्या वेळेच्या पुरेशी आधी माहिती मिळेल अशी व्यवस्था करावी लागते. मानवाला फार वेळ रिकामे ठेवता कामा नये. माहिती जरूर असेल तेवढीच द्यावी. अनावश्यक माहिती पुरविल्यास गोंधळ होण्याचा संभव असतो. शक्य असल्यास क्वचित लागणारी माहिती जरूर असेल त्या वेळी मिळण्याची व्यवस्था असावी. नियंत्रक साधनांची मांडणी करताना जास्त वेळा वापरली जाणारी साधने मानवाच्या जवळ असावीत, तसेच संदर्शक साधन व त्यावरून नियंत्रण करण्याचे साधन त्यांच्यामध्ये सुसंगता असावी म्हणजे चूक होण्याची शक्यता कमी होते.
निर्णय घेतल्यानंतर करण्याकरिता दूरध्वनीवरून किंवा हाताने व पायाने नियंत्रक कार्यान्वित केला जातो. उदा., मोटारगाडीचे सुकाणू फिरविल्यावर त्यानुसार सुकाणू यंत्रणा कार्यान्वित होऊन मोटारगाडीची चाके डाव्या अथावा उजव्या बाजूला फिरतात. मानवाने यंत्राला दिलेल्या संदेशामुळे नियंत्रणाची प्रक्रिया सुरू होते.
प्रणालीतील माहिती संदर्शक साधने व नियंत्रक साधने यांची मांडणी, तसेच साधनांचे आकार व आकारमान यांविषयी संशोधन झालेले आहे. त्यामुळे अचूक माहिती मिळून योग्य ते नियंत्रण होऊ शकते. विविध रंगांचे दिवे, मापन यंत्रे संगणकाने कार्यान्वित केलेली दृश्य संदेश प्रणाली, ऋण किरण दोलनदर्शक [⟶ इलेक्ट्रॉनीय मापन], दूरचित्रवाणी अशा तऱ्हेची माहिती संदर्शक साधने वापरल्यामुळे नियंत्रण करणे परिणामकारक झाले आहे. आधुनिक साधनांत माहिती साठवून ठेवण्याची सोय असल्यामुळे यंत्राचा चालक पाहिजे तेव्हा माहिती घेऊ शकतो परंतु बहुसंख्य प्रणालींत मापके, विविध रंगांचे दिवे, नियंत्रक म्हणून स्विच, चाके इ. वापरतात. या संदर्शक व नियंत्रक साधनांची मांडणी करताना एकच व सारखे कार्य करणाऱ्या साधनांचा एकत्रित समूह तयार करतात. तसेच संदर्शक साधन व नियंत्रक साधन जवळजवळ ठेवतात. साधने विशिष्ट क्रमाने (उदा., खालून-वरती किंवा डावीकडून उजवीकडे) बसवितात व त्यामुळे ती सापडण्यास सोपे जाते. चटकन ध्यानात यावीत म्हणून विविध साधनांचा आकार व आकरमान निरनिराळे ठेवतात. नियंत्रकामुळे एखाद्या राशीमध्ये वाढ करणे वा कमी करणे ही कृती प्रमाणीकृत हालचालीने केली जाते. उदा., नियंत्रक डावीकडून उजवीकडून हलविल्यास राशीमध्ये वाढ होते.
मानवमितिशास्त्र : (मानवाच्या शारीरिक पारिमाणांशी संबंधित असलेले शास्त्र). यंत्र चालकाचे आसन, नियंत्रक व संदर्शक साधने बसविलेले नियंत्रण टेबल, मानवाने वापरावयाची साधने (उदा., कपडे, बूट, शिरस्त्राण) यांचे आकार व आकारमान, मानवास सोयीचे असावे लागते. मानवमितिशास्त्रावरून मानवाच्या अवयवांचे आकारमान, विविध हालचाली करण्याची कक्षा, प्रेरणा लावण्याची शक्ती तसेच तापमान, गोंगाट, कंपन व इतर बाह्य परिस्थितीत काम करण्याची क्षमता यांविषयी माहिती मिळू शकते. अभिकल्प (आराखडा) करताना सरासरी मानवाची मापे न घेता दिलेल्या मानव-नमुन्यातील जास्तीत जास्त माणसांना सोयीची अशी मापे विचारात घेतात. काही ठिकाणी मापे कमीजास्त करण्याची सोय करावी लागते.
पर्यावरणाचा परिणाम : पर्यावरणातील परिस्थितीचा मानवाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. उष्णता, आर्द्रता, प्रकाश, आवाज, कंपन, ऑक्सिजनाचा अभाव, दूषित वायूंचा संसर्ग, आयनीकारक प्रारण (विद्युत् भारित अणूत वा रेणूत रूपांतर करणारी तरंगरूपी ऊर्जा), शून्य गुरुत्वाकर्षण स्थिती, आकस्मिक प्रवेगाची परिस्थिती, विसंपीडन स्थिती (दाब नाहीसा झाल्याने उद्भवणारी स्थिती) इ. विविध परिस्थितींत मानवाला काम करावे लागते. विशिष्ट परिस्थितीत मानवावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याकरिता कृत्रिम रीत्या ती परिस्थिती निर्माण करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत [⟶ सदृशीकरण]. एक तर प्रणालीतील मानवासभोवतील जागा बंदिस्त करून पर्यावरणाचे नियंत्रण करण्याची पद्धत उपयोगात आहे (उदा., वातानुकूलित विमान) किंवा मानवाला विशिष्ट पोषाख वापरावयास देण्याची पद्धत (उदा., पाणबुड्याचा पोषाख, अंतराळवीराचा पोषाख), तसेच विशिष्ट पर्यावरणात मानवाच्या काम करण्याच्या कालावर मर्यादा घालून सुद्धा उद्देश साधता येतो. विमानाच्या गतीमुळे विशिष्ट परिस्थितीत मानवाची दिशाबोधक्षमता कमी होते म्हणजे जमीन किंवा विमान यांच्या सापेक्ष त्याचा दिशाबोध चुकीची होतो. अशा वेळी विमान चालकाला यांत्रिक साधनावर अवलंबून रहावे लागते. अवकाशयानात आणि विमानात पृथ्वीपासून खूप दूर गेल्यावर एक प्रकारचे विलगीकरणाचे दडपण येते. दीर्घकाळ विलगीकरण मानवाला सहन होत नाही परंतु वारंवार नियंत्रण किंवा संपर्क साधण्याची कामे करून मनाची ही अवस्था कमी करता येते.
यंत्र-मानव प्रणालीतील मानवांची निवड पद्धती, प्रशिक्षण पद्धती, प्रचालन कार्यपद्धती व प्रशिक्षण साधने यांसंबंधीचे कार्य मानव-यंत्र अभियांत्रिकी विभागाकडे असते.
यंत्र-मानव प्रणालीच्या विकासाच्या सर्व अवस्थांत (अभिकल्प ते उत्पादन) मानव-यंत्र अभियांत्रिकीच्या दृष्टीकोनातून मूल्यांकन करावे लागते. काही मूळ नमुने तयार झाल्यावर मूल्यांकन करून मानव-यंत्र अनुरूपता साध्य झाली आहे किंवा नाही, हे ठरविली जाते. मानवाला दिलेली कामे त्याला सहजपणे, अचूकपणे व चालनास योग्य अशा गतीने करता आली पाहिजेत. ह्या अवस्थेत काही उणिवा दिसून आल्यास सुधारणा केली जाते.
पहा : उद्योग अभियांत्रिकी.
संदर्भ : 1. Chapanis, A. R. E. Man-Machine Engineering, Belmont, 1965.
2. Chapanis, A. R. E. Research Techniques in Human Engineering, Baltimore, 1965.
3. McCormick, E. J. Human Factors Engineering, New York, 1964.
4. McCormick, E. J. Human Factors in Engineering and Design, New York, 1975.
शाह, मो. गु. ओगले, कृ. ह. सप्रे, गो. वि.
“