बी (नारायण मरलीधर गुप्ते)

‘बी’ (नारायण मुरलीधर गुप्ते): (१ जून १८७२ – ३० ऑगस्ट १९४७). श्रेष्ठ मराठी कवी. जन्म मलकापूरचा (जि. बुलढाणा). यवतमाळ व अमरावती येथे शालेय शिक्षण परिस्थितीमुळे त्यात खंड पडला मॅट्रिकही होऊ शकले नाहीत. नंतर सरकारी नोकरी धरली. बहुतेक काळ अकोला येथे गेला. छिंदवाडा येथे ते निवर्तले.

‘प्रणयपत्रिका’ ही ‘बीं’ची पहिली कविता १८९१ची पण १९११ मध्ये लिहिलेल्या ‘वेडगाणे’ या कवितेपासून त्यांनी ‘बी’ हे टोपणनाव घेतले रसिकांचे लक्ष वेधून  घेणारी त्यांची पहिली कविता तीच.

‘बी’ हे केशवसुतांचे समकालीन आणि वृत्ती व विचार यांबाबत तत्कालीन कवींत केशवसुतांना सर्वांत जवळचे. तसेच खऱ्या अर्थाने आधुनिक असलेल्या कवींतील श्रेष्ठांपैकी एक परंतु ते त्यांच्या हयातीत एकंदरीने उपेक्षितच राहिले. त्यांचे अल्प लेखन (एकुण कविता ४९) व प्रसिद्धीबाबतची उदासीनता यामागे ‘उणीव रसिकांचीच खरी, आज भासते परोपरी’ ही त्यांची भावनाच असावी. त्यांच्या कित्येक कवितांतील विचार जटिल आहे आणि त्याला अध्यात्माचे अंग आहे. त्यांची लेखनसरणी काहीशी वेगळी, अल्पाक्षरी आणि दुर्बोध आहे ती दुर्बोधता अध्यात्माच्या परिभाषेचा स्पर्श झाल्यामुळे, तर कित्येकदा क्लिष्ट शब्दयोजनेमुळेही, आलेली आहे. ‘बीं’ची बहुतेक कविता ज्या काळात लिहिली गेली, (१९११ ते १९२३) तो काळ गोविंदाग्रजांच्या आणि काहीसा बालकवींच्या झळाळीचा, म्हणून ‘बी’ निष्प्रभ ठरले असावेत. नंतरच्या काही वर्षांतील अभिरुचीशीही त्यांचा सुर जमणे कठीण होते. फुलांची ओंजळ या ‘बीं’च्या अडतीस कवितांच्या पहिल्या संग्रहाला (१९३४) प्र. के. अत्रे यांच्या दीर्घ प्रस्तावनेने उठाव दिला आणि जाणकारांपर्यंत ती पोहोचली. दुसरी आवृत्ती १९४७ साली प्रसिद्ध झाली. ह्या आवृत्तीत नंतरच्या अकरा कवितांचा ‘पिकले पान’ या शीर्षकाखाली समावेश केला गेला. त्यानंतर आणखी पाच आवृत्त्या निघाल्या. दीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या या कवितेला असे थोडे साफल्य लाभले पण हा सामान्य वाचकाच्या सहज पचनी पडणारा कवी नव्हेच.

केशवसुतांचा ‘बीं’ वरील प्रभाव विविध तऱ्हांनी जाणवतो. एक तऱ्हा म्हणजे ‘डंका’, ‘आम्ही’, ‘भगवा झेंडा’ इ. कवितांतील जुने नष्ट करण्याची चेतना देणाऱ्या बंडखोर विचाराची दुसरी ‘वेडगाणे,’‘पिंगा’, ‘चाफा’ यांसारख्या अलौकिकाचा ध्यास व्यक्त करणाऱ्या गूढ कवितांची तिसरी, ज्यांत ‘आनंदाला म्‍लानपणा नच सौदर्याला क्षय’ अशा पूर्णाकडे जग जाणार असल्याचा निर्भर आशावाद उच्चारणाऱ्या‘फुलांची ओंजळ’ सारख्या कवितांची. सौंदर्यानंदाची तीच आस आणि ‘सान्त अनन्ताची मिळणी’ झाल्याचा उत्फुल्ल क्षणी होणारा साक्षात्कार, ‘बीं’चे बालकवींशी साधर्म्य दाखवतो.‘आठवण’-मधील निसर्गचित्रण काहीसे बालकवींच्या ढंगाचे आहे. ‘विचार-तरंगां’मध्ये वारंवार बालकवींच्या ‘फुलराणी’चा भास होतो.‘कमळा’ ही कथन-कविता गोविंदाग्रजांच्या इतिहासविषयक स्वच्छंदतावादी वृत्तीची आणि मधूनमधून त्यांच्या शाहिरी थाटाच्या शब्दकळेची आठवण जागी करते. पण ही साधर्म्ये कमीअधिक वरवरची. काही प्रमाणात ती एकाच युगातील समानधर्मी कवींची प्रस्फुरणे. पण ‘बीं’च्या स्वतंत्र काव्यव्यक्तित्वाला त्यांनी ढळ पोचत नाही.

‘बीं’ नी काव्यासंबंधीची आपली मते ‘कविवंदन’, ‘विचारतरंग,’ यांसारख्या कवितांत ठामपणे व्यक्त केली आहेत. छन्द – व्याकरण – रसादींची जुनी मापेकोष्टके लावून आधुनिक कवितेवर रोष धरणाऱ्या विद्वद्वर्यांचा (ते ‘विशाळ मणिगोटे’) ‘बी’ धिक्कार करतात. ‘संस्कृत-भाषानियमांची का तुजवरि बळजोरी’ असे मराठी भाषेला विचारतात पण त्यांची स्वतःची भाषा बरीच संस्कृतप्रचुर आहे. ‘कमळा’ या कवितेत ते ‘निळ्या सारणीमध्ये वाहते मोत्याचे पाणी’ अशी नायिकेविषयी सहजसुंदर, चित्रमय, लावणी बाजाची ओळ लिहून जातात पण तिच्यावर ‘विकासोन्मुखलावण्य-शुद्धशालीन्यसुगुणशाली,’‘तमालदल-सन्निभाभिरामा’ यांसारखी जडजंबाल विशेषणेही लादतात. संस्कृत आणि पंडिती कवितेप्रमाणे शाहिरी कविताही ‘बीं’ नी आत्मसात केली होती पण त्या निरनिराळ्या शैलींच्या विसंवादी मिश्रणांमुळे ‘बीं’ची शब्दकळा गंगाजमनी झाली त्याच्या तात्त्विक विचाराशी विसंगत झाली. बहिरंग हे गौण अंतरंगातच सौंदर्य असते, ही त्यांची धारणा एका परीने खरी असली, तरी ती हा दोष पुरा झाकू शकत नाही.

असे एखादे गालबोट सोडले, तर विषयाच्या अंतरंगाचा एकाग्रतेने खोलवर शोध घेणारी, भावना आणि विचार यांना एकजीव करणारी निर्भर संवेदनेची अशी कविता विरळ.

                                राजाध्यक्ष, विजया