मुकुंदराम चक्रवर्ती : (सोळावे शतक). सोळाव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेले श्रेष्ठ बंगाली कवी. पश्चिम बंगालच्या बरद्वान जिल्ह्यातील दामुन्या ह्या गावी त्यांचा एका ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. पिता हृदय मिश्र. पठाण सुभेदाराच्या पिळणुकीमुळे त्यांचे कुटुंब दामुन्यावरून मिदनापूर जिल्ह्यातील आड्डा ब्रह्मभूमी येथील राजा बांकुरा राय याच्या आश्रयास आले. तेथे बांकुरा राय याचा पुत्र रघुनाथ याचे शिक्षक म्हणून मुकुंदराम काम करू लागले. दामुन्यावरून आड्डा ब्रह्मभूमी येथे येत असताना वाटेत त्यांना स्वप्नात चंडी देवतेचे दर्शन होऊन तिचा आशिर्वाद लाभला व चंडीवर काव्य रचण्याचे तिने त्यांना सांगितले, अशी आख्यायिका त्यांनी आपल्या काव्यात दिली आहे. आड्डा येथे असताना त्यांनी चंडीमंगल हे प्रख्यात काव्य रचले. सदरहू राजाने मुंकुदरामांना ‘कविकंकण’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. बंगाली साहित्यात ‘कविकंकण मुकुंदराम चक्रवर्ती’ म्हणून ते प्रख्यात आहेत. चंडीमंगल हे त्यांचे काव्य प्राचीन बंगाली साहित्यातील सर्वश्रेष्ठ रचना समजली जाते. प्राचीन बंगाली कवींपैकी मुकुंदराज यांनीच सर्वप्रथम आपल्या काव्यरचनेच्या निमित्ताने स्वतःचा परिचय (चरित्रपर माहिती) करून दिली आहे त्यांच्या ह्या काव्याचे खरे नाव अन्नदामंगल असे होते. त्यांनी आपल्या ह्या काव्याचा ‘नौतुनमंगल’ अर्थात ‘नवे पांचाली काव्य’ असा वरचेवर उल्लेख केला आहे. या काव्याचे ‘देवखंड’ वा ‘शिवदेवता खंड’, ‘आखेटिक खंड’ आणि ‘वाणिकखंड’ असे तीन भाग असून त्यातील एक ओळींची संख्या पंचवीस हजारावर भरते. ई. बी. कौएल यांनी या काव्याचा बराच भाग इंग्रजी पद्यात रूपांतरितही केला आहे. मुकुंदरामांनी हे काव्य बांकुरा राय याचा पुत्र रघुनाथ राय (कार. १५७३–१६०३) हा गादीवर असताना १५८९ च्या सुमारास लिहून पूर्ण केले, असे अभ्यासक मानतात.

मुकुंदराम संस्कृतचे प्रकांड पंडित होते. त्यांच्या काव्यात त्यांच्या ह्या पांडित्याचा प्रत्यय येतो. पश्चिम बंगालचे तत्कालीन आचार विचार, कर्मकांड, स्त्रियांचे जीवन, अनुष्ठाने, व्रतवैकल्ये, गृहकृत्यांचे रीतिरिवाज इ. अनेक विषयांसंबंधीचे जिवंत व वास्तव चित्रण त्यात आलेले आहे. त्या काळचा बंगाल आणि बंगाली समाजाचे असे संपूर्ण व वास्तव चित्रण आधीच्या बंगाली साहित्यात अन्यत्र आढळत नाही. सतराव्या-अठराव्या शतकातील उल्लेखनीय अशा इतर कवींच्या मंगल-काव्यांवर मुकुंदरामांच्या ह्या काव्याचा कमीअधिक प्रभाव पडलेला दिसून येतो.

चंडीमंगल काव्याचा विषय मुळात पुराणकथात्मक, गूढवादी, अलौकिक असा असून त्याची प्रेरणा धार्मिक आहे. असे असले, तरी त्यात बंगालमधील तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थिती व वातावरणाचे वास्तव प्रतिबिंब पडलेले दिसते. तत्कालीन माणूस व समाज यांचे वास्तव भान ह्या काव्यात प्रथमच व्यक्त झाले असून ते मुकुंदरामांचे वैशिष्ट्य आहे. कवीचे अवलोकन सूक्ष्म व मार्मिक असून त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा अत्यंत ठळक व जिवंत आहेत. ह्या व्यक्तिरेखांना विशिष्टतेबरोबरच वैश्विक परिमाणही प्राप्त झाले आहे. धनपती, मुरारी सिल, कालकेतू, फुल्लर, दुर्बला, खुल्लना, लहना इ. व्यक्तिरेखा या दृष्टीने उल्लेखनीय होत. या काव्यातील विनोदाच्या सूक्ष्म पदरामुळे हे प्रदीर्घ काव्य एकसूरी व कंटाळवाणे न होता रंजक झाले आहे. कवीची भाषा विशुद्ध व शब्द भांडार अत्यंत समृद्ध आहे. हे काव्य मुख्यत्वे गाऊन म्हणण्यासाठी रचले असल्याने त्यातील गेयता व पठणसुलभताही लक्षणीय आहे सोळाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवी व काव्यग्रंथ म्हणून अनुक्रमे मुंकुंदराम व चंडीमंगल यांचे बंगाली साहित्यातील स्थान विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.

कमतनूरकर, सरोजिनी