रविशंकर : (७ एप्रिल १९२० –). प्रसिद्ध भारतीय सतारवादक. जन्म वाराणसीस. मूळचे जेसोर पंडित रवि शंकर(बांगला देश) येथील जमीनदारी कुटुंब. त्यांचे वडील शाम शंकर हे संस्कृत विद्याविद् असून, ते कॅलिफोर्निया येथील विद्यापीठात तत्त्वज्ञान शिकवीत. प्रख्यात नर्तक ⇨उदय शंकर हे रवि शंकरांचे ज्येष्ठ बंधू होत. १९३० च्या सुमारास उदय शंकरांच्या नृत्यमंडळीत ते दाखल झाले. त्या योगे परदेशी भ्रमण आणि नृत्याचे शिक्षण त्यांना लाभले. सेनिया घराण्याचे उस्ताद ⇨अल्लाउद्दिनखाँ आणि रवि शंकर यांची भेट १९३४ मध्ये झाली. त्यांची तालीम त्यांनी १९३८ ते १९४४ या कालावधीत घेतली. १९४१ मध्ये खाँसाहेबांची कन्या अन्नपूर्णाशी त्यांचा विवाह झाला. ते ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) या संस्थेत दाखल झाले (१९४५-४६). त्यांनी नृत्यनाटिकांसाठी संगीतरचना केल्या. पुढे राजकीय मतांच्या दडपणाच्या विरोधात ‘इंडियन रेनेसान्स आर्टिस्ट्स’ ही स्वतःची संस्था त्यांनी स्थापली (१९४७). डिस्कव्हरी ऑफ इंडिया (१९४८) यांसारख्या नृत्यनाट्यांची संगीतयोजना त्यांनी केली. ते दिल्लीच्या अखिल भारतीय आकाशवाणी वाद्यवृंदाचे संचालक होते (१९४९–५५). भारतीय संगीताचे पाश्चात्त्य देशांत प्रचार साधणारे दौरे १९५८ पासून त्यांनी केले. १९६६ मध्ये प्रख्यात अमेरिकन व्हायोलिन वादक ⇨ येहूदी मेन्युइन यांच्या बरोबर त्यांनी बाथ येथील संगीत महोत्सवात संयुक्त्त कार्यक्रम सादर केला. ‘बीटल्स’ या प्रसिद्ध जनसंगीत (पॉप म्यूझिक) समूहाचा अध्वर्यू जॉर्ज हॅरिसन हा त्यांच्या प्रभावाने १९६६ मध्ये सतारभक्त्त झाला. मुंबईस ‘किन्नर’ ही संगीतशिक्षणसंस्था त्यांनी स्थापन केली (१९६२) आणि तिची शाखा लॉस अँजेल्समध्ये मे १९६७ मध्ये काढली. मेन्युइन यांच्या सहकार्याने त्यांनी भारतीय व पाश्चात्त्य संगीतपद्धतींना एकत्र आणण्याचा यत्न केला. त्यांच्या प्रयत्नामुळे भारतीय शास्त्रीय संगीताकडे बघण्याची पाश्चात्त्यांची दृष्टी बदलली आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा देशाबाहेर प्रसार झाला.

त्यांनी संगीतरचनाकार म्हणून केलेली कामगिरीही भरीव आहे. पथेर पांचाली (१९५५), अपराजितो (१९५९), मीरा (१९७८) यांसारख्या चित्रपटांचे संगीत असो वा ‘सितार काँचेर्तो’ वगैरे प्रयत्न असोत, त्यांवर पंडित रवि शंकरांच्या खास शैलीचा ठसा सहज जाणवतो. भारतीय ताल वा रागरागिण्या, तसेच स्वरसंहतितत्त्व वगैरेंना प्रसंगी मुरड घालूनही आपले संगीत भारतीय ठेवण्यात त्यांनी बऱ्याच प्रमाणात यश मिळविले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान-सन्मान लाभले : बर्लिनच्या ‘सिल्व्हर बेअर अवॉर्ड’ या स्पृहणीय पारितोषिकाचे विजेते व्हेनिस महोत्सवात पारितोषिक संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक (१९६२) पद्मभूषण ही पदवी (१९६७) तसेच दोनदा राष्ट्रपती पुरस्कार (१९६२ व १९८०) ‘इंटरनॅशनल म्यूझिक कौन्सिल’चा यूनेस्को पुरस्कार (१९७५) मध्य प्रदेश सरकारतर्फे ‘कालिदास सन्मान’ (१९८७-८८) तद्वतच अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’ (१९६८) आणि भारतातील ‘इंदिरा कलासंगीत विश्वविद्यालय’, ‘रवींद्र भारती’ (१९७३), ‘विश्वभारती’ (देशिकोत्तम ही पदवी), ‘बनारस हिंदू विश्वविद्यालय’ यांनी सन्माननीय डॉक्टरेट पदव्या देऊन त्यांचा गौरव केला. माय म्यूझिक, माय लाइफ (१९६८), राग-अनुराग (बंगाली) ही त्यांची आत्मचरित्रपर पुस्तकेही गाजली आहेत.

रानडे, अशोक दा.