हवाईदल :(एअर फोर्स ). लष्कराच्या तीन दलांपैकी, विशेषतः हवाई युद्धासाठी कार्यरत असलेले दल. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विमान हे लष्करी शक्तीचा मूलभूत भाग बनले आणि नौसेना व भूसेना यांच्या हालचालींना अत्यंत साहाय्यभूत ठरले. ॲटम-हॅड्रोजन बाँबच्या शोधानंतर त्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

ऐतिहासिक पार्श्वभूमी : हवाई जहाज हे हवेपेक्षा हलके असून त्याला सुकाणू या साधनाच्या साहाय्याने हवी तशी गती देता येते व ते वाटेल तसे फिरविता येते. म्हणून नेपोलियन बोनापार्टने अठराव्या शतकाच्या शेवटी इंग्लंडवर हवाई जहाजांच्या साहाय्याने हल्ला करण्याचा विचार केला होता पण त्याला मूर्त स्वरूप येऊ शकले नाही. अमेरिकेच्या यादवी युद्धात (१८६१–६५) वातयान संकेत विभाग (बलून सिग्नल सर्व्हिस) सांघिक सैन्यात स्थापन करण्यात आला. त्याच वर्षी जॉर्ज वाशिंग्टन नावाच्या युद्धनौकेवरून फुगेरी विमान सोडण्यात आले. विमानयुद्धनौकेची (एअर क्राफ्ट कॅरिअर) ही सुरुवात म्हणायला हरकत नाही. सुरुवातीच्या या प्रयत्नांचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे जर्मनांनी पॅरिसला १८७०-७१ च्या युद्धात घातलेला वेढा. या वेढ्यात डाक व शरणार्थी पॅरिसमधून हलविण्याकरिता ६०–७० फुगेरी विमाने वापरण्यात आली. या प्रकारच्या फ्रेंच व जर्मन विमानांची ३,००० मी. उंचीवर झटापट झाल्याची उदाहरणे आहेत पण यांच्यातून त्या वेळी तोफा वगैरे नेण्याची व्यवस्था झाली नव्हती. इतकेच नव्हे, तर शत्रूच्या हालचालींचे निरीक्षण करून त्याची बातमी तोफखान्याला किंवा सेनाधिपतीला पोहोचविण्याचे उपयुक्त तंत्र फार उशिरा – म्हणजे पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वेळी – अमलात आले.

 

ब्रिटिश विमान दल : इंग्लंडमधील ‘रॉयल एन्जिनिअर्स’ चा एक भाग म्हणून १८७८ मध्ये निरीक्षण विभाग हवाई जहाजाच्या मदतीने स्थापण्यात आला. तेथे विमाने बनविण्याचा (रॉयल एअरक्राफ्ट) पहिला कारखाना दक्षिण फार्नबरोमध्ये कर्नल टेंपलर या अधिकाऱ्याच्या हाताखाली स्थापन करण्यात आला. १८९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत बोअर युद्धात निरीक्षणाकरिता या विमानांचा उपयोग झाला.

 

हवेपेक्षा जड विमानांचा यशस्वी शोध १९०३–०८ दरम्यान लागलाव त्याची प्रात्यक्षिके फ्रेंच अभियंता लुई ब्लेरिओ व राइट बंधूंनी केली. ब्लेरिओने एकपंखी विमान (मोनोप्लेन) तयार करून त्याचे उड्डाण इंग्लिश खाडीवर करून डोव्हर येथे ते उतरविले (२५ जुलै १९०९) तथापि विमानांना युद्धक्षम बनविण्याकरिता इंग्लंडने फारसे प्रयत्न केले नाहीत. तसेच विमान युद्धाकरिता वापरण्याच्या सूचनांकडे नौसेना व भूसेनेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. विमानाच्या शोधाचा उपयोग जर्मनी, फ्रान्स व अमेरिका यांनी ग्रेट ब्रिटनपूर्वी करून घेतला होता. अर्थात पहिल्या महायुद्धात अमेरिका फार उशिरा उतरली (१९१७). जर्मनीची याबाबतची तयारी सर्व देशांच्या पुढे होती. महायुद्ध सुरू होईपर्यंत जर्मनीने मोठी हवाई जहाजे व विमाने मोठ्या प्रमाणावर तयार केली मात्र इंग्लंडजवळ लढाई सुरू होण्याच्या अगोदर (१९१२) फक्त १२-१३ विमाने होती. लढाई सुरू झाल्यावर विमानांकरिता इंग्लंडला फ्रान्सवर अवलंबून राहावे लागले. या युद्धात मित्र राष्ट्रांनी हवाई जहाजात फारसे लक्ष घातले नाही. जर्मनांनी फ्रान्स व इंग्लंडवर बाँबहल्ला करण्याकरिता या हवाई जहाजांचा (झेपेलिन्स) मोठ्या प्रमाणात उपयोग केला. हवेपेक्षा जड विमानांचा वेग जसा वाढत गेला, तसे जर्मनीला कळून आले की, लढाईच्या कामात झेपेलिन्स अगदी कमकुवत आहेत आणि पहिले महायुद्ध संपण्याच्या अगोदरच ह्या विमानांचा उपयोग आपाततः बंद झाला.

 

हवाई जहाजांचा पहिल्या महायुद्धातील उपयोग : १९ जानेवारी १९१५ रोजी जर्मनीने झेपेलिन्समधून इंग्लंडवर पहिल्या महायुद्धात अगदी प्रथम बाँबहल्ला केला. या हल्ल्याचा प्रतिकार करायला इंग्रज वैमानिकांना थोडा वेळ लागला कारण झेपेलिन्स इंग्रजांच्या विमानांच्या वर जाऊ शकत होती. त्यांचा वेगपण ताशी ९०–१२० किमी. म्हणजे विमानापेक्षा फारसा कमी नव्हता. त्यामुळे इंग्रज विमाने जोपर्यंत वेगाच्या व उंचीच्या बाबतीत अधिक कार्यक्षम झाली नव्हती, तोपर्यंत जर्मन झेपेलिन्सनी इंग्लंडमध्ये बराच धुमाकूळ घातला.

 

७ जून १९१५ रोजी इंग्लंडच्या विमानांनी जर्मनीच्या तीन झेपेलिन्सचा निःपात केला. कॅप्टन रॉबिन्सन, लेफ्टनंट बाल व कॅप्टन क्रो या तीन वैमानिकांनी हे शौर्याचे कृत्य करून झेपेलिन्सना युद्धकार्यात पूर्णपणे निरुपयोगी करण्यास सुरुवात केली. तरीसुद्धा जानेवारी १९१५-१६पर्यंत जर्मनीने केलेल्या २१ झेपेलिन्स हल्ल्यांत सु. १,९०० बाँब टाकून २७७ माणसे मारली व ६४५ जखमी केली. ऑगस्ट-सप्टेंबर १९१६ मध्ये लंडनवर परत मोठे हल्ले झाले. या हल्ल्यांत प्राणहानी झाली पण युद्धो-पयोगी मालमत्तेला फारसा उपद्रव झाला नाही. सप्टेंबर २–५ (१९१६) च्या हल्ल्यांत व त्यानंतर ऑक्टोबर १-२ (१९१६) च्या हल्ल्यांत सहभागी झालेल्या जर्मन झेपेलिन्सचे इंग्रज विमानांनी इतके नुकसान केले की, त्यानंतर जर्मनीने या प्रकारची विमाने लढाईतून जवळजवळ मागे घेतली. या काळात दोन्ही सैन्यांतून हवेपेक्षा जड हल्लेखोर विमानांची (फायटर एअरोप्लेन्स) एवढी प्रगती झाली की, या युद्धाच्या शेवटच्या दोन वर्षांत हवाई युद्ध या प्रकारच्या विमानांच्या साहाय्यानेच करण्यात आले.

 

इंग्लंडमध्ये भूसेनेला मदत करण्याच्या भूमिकेवर पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस भर होता. त्याच सुमारास नौसेनेच्या हवाई दलाचा जन्म झाला व लढाई सुरू झाली, त्या वेळी त्या दलाच्या विमानांना लढाऊ जहाजांच्या डेकवर उतरण्याची शक्यता निर्माण झाली. या पथकाचे आधिपत्य शेवट-पर्यंत नौसेनेकडेच राहिले. हळूहळू युद्धपरिस्थितीत स्वतंत्र कार्य करायला व हवाई डावपेचांच्या पद्धती अमलात येण्यास सुरुवात झाली. हवाई दल सुरुवातीस १,८४४ सैनिकांचे असून त्याबरोबर १५० युद्धक्षम विमाने होती. त्याची संख्या ३,००,००० सैनिक व २२,००० विमानांपर्यंत गेली. सात स्क्वॉड्रन्सची २०१ स्क्वॉड्रन्स झाली.

 

हवाई जहाजांचा दुसऱ्या महायुद्धातील उपयोग : दुसऱ्या महायुद्धात (१९३९–४५) इंग्लंडमध्ये शत्रूच्या सूर मारणाऱ्या विमानापासून (डाइव्ह बाँबर) संरक्षण करण्याकरिता लोखंडी तारेला बांधून उडवलेले वातयान जाळे इंग्लंडच्या किनाऱ्याजवळ व लंडनभोवती (व काही युद्धनौकांवरूनही) उभारण्यात आले होते. जपान युद्धात पडल्यावर (डिसेंबर १९४१) त्याने अमेरिकेविरुद्ध आग लावण्याच्या कामी काही काळ हवाई जहाजांचा उपयोग केला होता. ही उदाहरणे सोडली तरी हवाई जहाजे दुसऱ्या महायुद्धात अजिबात मागे पडली, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.


 

स्वतंत्र हवाई दलाची आवश्यकता : पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीसच युद्धात पडलेल्या राष्ट्रांना कळून चुकले की, भविष्यात हवाई युद्धाला फार महत्त्व येणार आहे आणि हवाई दलाचे स्वतंत्र खाते निर्माण करणे जरूर आहे. त्यामुळे या महायुद्धाच्या शेवटीच (१९१८) इंग्लंडने प्रथम या बाबतीत पाऊल टाकले व रॉयल फ्लाइंग कोअर आणि रॉयल नेव्हल एअर सर्व्हिस ही दोन पथके रॉयल एअर फोर्स (शाही हवाई दल) या नावाखाली एकत्र केली. त्यानंतर इटलीने १९२३ मध्ये, फ्रान्सने १९२८ मध्ये व जर्मनीने १९३५ मध्ये – व्हर्सायच्या तहाच्या अटी धुडकावून लावून – आपली स्वतंत्र वैमानिक दले स्थापन केली परंतु अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी दुसऱ्या महायुद्धानंतर हा टप्पा गाठला (१९४७). रशियाने मात्र हवाई दलास आपल्या लष्करात स्वतंत्र स्थान दिले नाही.

 

अणुबाँबच्या शोधामुळे व अलीकडच्या आयुधक्रांतीमुळे (I. C. B. M. A. B. M.) दाबबटण युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील महायुद्धात वैमानिक हल्ल्यांना गौणत्व येण्याची शक्यता असली, तरी भूसेनेला रणक्षेत्रात मदत करणे व हवाई वाहतूक यांकरिता हवाई दलाची आवश्यकता कायम राहील. म्हणूनच प्रत्येक राष्ट्र आपापल्या कुवतीप्रमाणे लढाऊ विमानपथक जय्यत तयार ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

दोन महायुद्धांतील संधिकाल : पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रांनी आपापली सैनिकी हवाई दले कमी केली. हिटलर सत्ताधीश झाल्यावर जर्मनीचे सैनिकी हवाई दल वाढविण्यात आले. दुसऱ्या महा-युद्धापूर्वी मित्र राष्ट्रांत थोडीशी जागरूकता आली. जपानही या बाबतीत पाठीमागे राहिले नाही व सुरुवातीला (डिसेंबर १९४१) या राष्ट्राने विमानांद्वारे अमेरिकेची जी जबर हानी केली, तीतून डोके वर काढायला अमेरिकेला बराच काळ लागला. [→ पर्ल हार्बर].

 

दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वसाधारण परिस्थिती : पहिल्या जागतिक महायुद्धानंतर फक्त ग्रेट ब्रिटननेच स्वतंत्र हवाई दल प्रस्थापित केले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर बहुतेक सर्व राष्ट्रांनी हवाई दल हे भूसेना व नौसेना यांपासून स्वतंत्र केले. सोव्हिएट रशियाने मात्र या दोन सेनांबरोबरची पूर्वीची सांगड कायम ठेवली पण सर्वोच्च आधिपत्याखाली स्वतंत्र युद्धक्षम हवाई दले ठेवली. जेट विमानांचा सगळ्याच राष्ट्रांनी उपयोग करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धाच्या धर्तीवरील हवाई युद्धाची पद्धती जवळजवळ तशीच राहिली. अमेरिका व सोव्हिएट रशिया यांत जी आयुधक्रांती झाली, तीमुळे विश्वव्यापी महायुद्धाची शक्यता वरचेवर कमी होत चालली व फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, चीन या राष्ट्रांनी जरी अणुबाँबची निर्मिती केली असली, तरी ती महायुद्धाला अधिक रोधकच झाली आहे. व्हिएटनामच्या युद्धातदेखील थोड्या प्रमाणातच मार्गदर्शित क्षेपणास्त्रे वापरण्यात आली व युद्धाचा बराचसा भरवसा आधुनिक हवाई दलाच्या – दुसऱ्या महायुद्धातील तंत्राची सुधारलेली आवृत्ती – प्रचलित युद्धनीतीवरच होता (१९६८).

 

प्रयोजनाच्या वा सेवायोजनेच्या दृष्टीने हवाई दलाचे दोन प्रमुख विभाग पडतात : (१) युद्धनीतिजन्य (स्ट्रॅटीजिक) व (२) व्यूहनीतिजन्य ( टॅक्टिकल ).

 

युद्धनीतिजन्य हवाई दलाचा उपयोग पुढीलप्रमाणे करण्यात येतो : (१) शत्रुमुलखात हवाई टेहळणी करून शत्रूचे संकेत, त्यांची मर्मस्थाने यांची माहिती हवाई छायाचित्रांद्वारा मिळविणे. (२) शत्रुसैन्य व आरमार यांच्या हालचालींवर नजर ठेवणे. (३) शत्रूच्या हवाई दलाचा जमिनीवर वा हवेतच धुव्वा उडवून स्वपक्षाचे हवाई दल, भूसेना वगैरेंच्या हालचाली अनिर्वेध करण्याचा प्रयत्न करणे. (४) शत्रू राष्ट्राच्या संग्रामक्षमतेचे निर्मूलन करण्याच्या हेतूने दूरवर पसरलेले विमानतळ, दळणवळणाची साधने, गोद्या, युद्धनौका इत्यादींवर हवाई हल्ले करणे.

 

संग्रामक्षमतेचे निर्मूलन केल्याचे प्रमुख उदाहरण म्हणजे ७ डिसेंबर १९४१ रोजी जपानी आरमार व हवाई दल यांनी अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर केलेला घातक हल्ला होय. ह्या युद्धात अमेरिकेची १९ जहाजे, चार युद्धनौका आणि विनाशिका यांना जलसमाधी मिळाली व १७४ विमाने नष्ट झाली. या हल्ल्यामध्ये जपानच्या ३५३ विमानांनी भाग घेतला होता. या हल्ल्यामुळेच प्रायः अमेरिकन राष्ट्र पूर्ण जागे झाले आणि दुसऱ्या महायुद्धात सहभागी होण्यास राजी झाले.

 

व्यूहनीतिजन्य हवाई दलाचा उपयोग पुढीलप्रमाणे करण्यात येतो : (१) टेहळणीद्वारे स्वपक्षाच्या सैन्याला शत्रू सैन्याच्या हालचालींची व सामर्थ्याची माहिती मिळवून देणे. (२) शत्रू सैन्याची आघाडीवरील दळणवळणाची साधने व वाहतूक, रसद पुरवठा वगैरेंवर हवाई हल्ले करून त्यांना कुमक मिळणे अशक्य करणे. (३) स्वसैन्याला प्रत्यक्ष लढाईमध्ये मदत देणे. तसेच बाँब, रॉकेट, मशिनगनद्वारा अग्निवर्षाव करून शत्रू सैन्यास बेजार करणे. आधुनिक लढाईमध्ये हवाई दलाचा उपयोग ही एक आवश्यक बाब झाली आहे. वरील प्रयोजन लक्षात घेऊन विमानांची बांधणी केली जाते. त्यामध्ये विमानांची परिणाम-श्रेणी (साइज), आयुधांचा वापर, वेग वगैरेंमध्ये फरक करावा लागतो. अशा फरकांमुळे विमानांचे चार प्रकार होतात.

 

बाँबवाहू : (बाँबर). यामध्ये जास्त वजनाचे व जास्तीत जास्त बाँब दूर अंतरावर वाहून नेण्याची क्षमता असलेली विमाने. उदा., कॅनबेरा, मिग वगैरे.

 

लढाऊ : (फायटर). आकाराने अगदी लहान पण अती वेगवान व विमानविध्वंसक आयुधांनी सज्ज (एअर टू एअर मिसाइल्स) अशी विमाने. उदा., एच्टी-२४, नॅट, व्हॅम्पायर, मिग इत्यादी.

 

वाहतुकी : जास्तीत जास्त माल वाहून नेण्याची क्षमता असलेली विमाने. उदा., डकोटा, पॅकेट इत्यादी.

 

संचारवाही : अधिकाऱ्यांची ने-आण वगैरे करणारी विमाने.

 

हेलिकॉप्टर्स : ही सरळ उंच भरारी मारत असल्याने यांना धावपट्टीची फारशी जरूरी नसते व पहाडी मुलखात यांचा चांगला उपयोग होतो.

 

आधुनिक युद्धामध्ये हवाई दलाला फारच महत्त्व आलेले आहे कारण मुलकी सैन्य व आरमार यांच्या हालचालींपेक्षा हवाई दलाची हालचाल द्रुतगतीने करता येते. विमानांचा वेग जास्त असतो. तसेच विमानांची अंतर्वेधी शक्ती शत्रू राष्ट्राच्या अगदी पिछाडीपर्यंत पोहोचू शकते. हवाई वाहतुकीमुळे सैन्याची ने-आण इष्टस्थळी लवकर व झटपट करता येेते आणि त्याला हवाई मार्गाने रसद पुरवठा दीर्घकालपर्यंत करणे शक्य होते.

 

यापुढील हवाई दलाच्या वाढीचा टप्पा म्हणजे स्वमार्गदर्शक क्षेपणास्त्रांचा शोध व अवकाशयानांचा युद्धामध्ये संभाव्य उपयोग, हा होय. या संदर्भात आधुनिक संशोधनानुसार प्रगती झाली असून अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सेनेला रसद पुरविण्यासाठी चालकविरहित ‘के-मॅक्स’ हेलिकॉप्टरचा वापर केला गेला.

 

पहा : हवाई दल, भारतीय हवाई युद्ध.

 

संदर्भ : 1. Kirby, Stephen Robson, Gordon, Ed. The Militarisation of Space, New Jersey, 1987.

          2. Richardson, Doug, Stealth Warplane, Norwalk, 1989.

         3. Shaw, Robert L. Fighter Combat, Mary Land, 1988.

टिपणीस, य. रा.