वाघ :  भारताचा राष्ट्रीय प्राणी. फेलिडी या मार्जार कुलातील हा सर्वांत मोठा प्राणी असून याचे शास्त्रीय नाव पँथेरा टायग्रिस असे आहे. सिंह, चित्ता आदी वन्य प्राण्यांप्रमाणे हा गर्जना करणारा आहे. शौर्य, क्रौर्य व शक्ती यांबाबतीत याची फक्त सिंहाशीच तुलना होऊ शकते.  

प्राचीन हिंदू वाङ्‌मयांत वाघाचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदात फक्त सिंहाचा उल्लेख आहे, तर अथर्ववेदात सिंहाचा व वाघाचा (व्याघ्र) उल्लेख आढळतो. हडप्पा व मोहें-जो-दडो येथील उत्खननांत वाघाचे ठसे आढळले असून त्यांवरून सिंधू नदीकाठच्या लोकांना इ. स. पू. २५०० वर्षे ऋग्वेदपूर्व काळाच्याही आधी वाघाची माहिती असावी, असे दिसते. गुप्तकाळातील (इ. स. ४००–५००) नाण्यांच्या मागील बाजूवर वाघाचे चित्र आहे. उत्तर यूरेशिया हे याचे उगमस्थान मानतात. पुढे वाघ दक्षिणेकडे सरकला असावा. त्याचा प्रसार तुर्कस्तानच्या पूर्व भागापासून रशिया, चीन, भारत व आग्नेय आशिया असा सु. ९६०० किमी.पर्यंत आहे. याचा अर्थ याचे लवकर अनुकूलन होते (परिस्थितीशी जुळवून घेतो) असा आहे. प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळातील वक्र खड्‌गाकार दातांच्या वाघाचे अवशेष सापडले असून तो आधुनिक वाघाचा पूर्वज असावा, असे मानले जाते. इतर वाघांचे अवशेष सेचवान (चीन), उत्तर कोरिया, जावा, भारत येथे सापडलेले असून त्यांचा काळ पूर्व प्लाइस्टोसीन (सु. दहा लाख वर्षांपूर्वी ) असावा. परिस्थितीविज्ञानाचा विचार करता थंड प्रदेशातून त्याचे स्थलांतर झाले असावे. जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) तो पूर्व प्लाइस्टोसीन काळात होता.  

तिबेटमध्ये वाघ बिलकूल आढळत नाही. उत्तर व ईशान्य भागांतील त्याच्या आढळावरून तो भारतात पूर्वेकडून म्यानमार (ब्रह्मदेश) व आसाममार्गे आला असावा. नंतर त्याचे भारताच्या पश्चिमेकडे व द्वीपकल्पात स्थलांतर झाले असावे.  

वाघाच्या सर्वमान्य अशा ७ ते ८ प्रजाती आढळतात. त्यांपैकी बाली वाघ, व कॅस्पियन वाघ हे निर्वंश झाले आहेत. जावा, सुमात्रा, सायबिरियन व भारतीय उपजाती नष्ट होण्याच्या वाटेवर आहेत.  

भारतात बहुतकरून सर्वत्र वाघ आढळतो तथापि पंजाब, तसेच राजस्थानच्या उत्तर आणि वायव्येकडील वाळवंटी भागात व कच्छ येथे तो आढळत नाही. यमुना व तिच्या उत्तरेकडचा भाग, हरयाणा, हिमालयाचा उपभाग, ईशान्य भारतातील पाणथळ भाग व सुंदरबन येथे वाघ आढळतो. मध्य प्रदेशात खडकाळ भागात, राजस्थानात कोरड्या व उघड्या जंगलांत, हिमालयात १,८००–२,१०० मी. उंचीवर व प्रसंगी सिक्कीमसारख्या ठिकाणी ३,३००–३,६०० मी. उंचीवरही तो राहतो. मात्र तो सर्वसाधारणपणे ६०० मी. उंचीपर्यंतच्या भागांत आढळतो. घनदाट जंगलात राहणे त्याला फार आवडते. वाघाला वस्ती करण्यासाठी भरपूर खाद्य, विश्रांतीसाठी दाट छाया, तसेच पिण्यासाठी व डुंबण्यासाठी भरपूर पाणी या गोष्टींची आवश्यकता असते.  

शरीरवर्णन :  शक्तीने वाघ सिंहासारखाच आहे पण धूर्तपणात व क्रौर्यात तो सिंहाला मागे टाकतो. तो रात्रिंचर आहे. वाघाला आयाळ नसते पण वृद्ध वाघाला कानसूलावर लांब पसरलेले केस असतात. नर मादीपेक्षा मोठा असतो. त्याची खांद्याजवळची उंची १ मी., शरीराची लांबी २.२ मी. व शेपूट १ मी. लांब असते. वजन १६०– २३० किग्रॅ. व जास्तीत जास्त २९० किग्रॅ.पर्यंत असते. वाघापेक्षा वाघिणेचे डोके चापट, वजनाला हलके-अरुंद असते. तिचे वजन वाघापेक्षा सु. ४६ किग्रॅ. कमी असते. नरमादीच्या पावलांच्या ठशांत फरक असतो. वाघाच्या पायाचे बोट खूप गोल असते, तर वाघिणीचे खूप दुर्बल व नाजूक असते. वाघाची डरकाळी (आवाज) ३ किमी. पर्यंत ऐकू येते.  

वाघाच्या केसांना पिवळसर ते नारिंगी लाल अशा विविध रंगांच्या छटा असून शरीरावर काळे पट्टे असतात पट्टे विविध लांबीरुंदी व व्यापाचे असतात. गळा, पोट व पायाच्या आतील फर पांढरी असते. अनेक वाघांच्या डोक्याभोवती केसांचे वलय असते. शरीरावरील आडवे पट्टे व विविध रंगी केस यांमुळे वाघ सिंहापासून वेगळा दिसतो. शरीराची ठेवण, गुणवैशिष्ट्ये, रंग व आडवे पट्टे यांबाबतीत स्थानिक स्थिती व प्रजातीप्रमाणे फरक आढळतात. दक्षिणेकडील वाघ लहान, तुकतुकीत तर उत्तरेकडील तुलनेने मोठे असतात. बंगाली वाघ लालसर छटेचे, अतिशय काळ्याकुट्ट आडव्या पट्ट्यांचे असतात. डोळ्यांवर पांढरा स्वच्छ ठिपका असतो. उत्तर चीन व रशिया येथील अतिशय मोठ्या, दुर्मिळ अशा सायबीरियन वाघाची फर मऊ व फिकट असते. 

पांढरा वाघ : पांढरा वाघ विशेष लक्ष वेधून घेतो. त्याच्या मलईसारख्या रंगाच्या देहावर गडद पिंगट, चॉकोलेटी वा लालसर काळ्या रंगाचे ठळक पट्टे उठून दिसतात. काही वाघांच्या पट्ट्यांत रंजकद्रव्ये नसतात. अन्य रंगांच्या वाघापेक्षा तो आकारमानाने मोठा व वजनाने जास्त असतो. भारतातील पांढऱ्या वाघाची उत्पत्ती केसाच्या रंगाच्या प्रभावी जीनच्या किंवा जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील नेणाऱ्या सूक्ष्म घटकांत–जीनमध्य–अचानक बदल झाल्यामुळे) झाली असावी, असे म्हणतात. जंगलातील काही वाघांत अंतःप्रजनाने प्रभावी जीनचा प्रसार हळूहळू झाला असावा. प्रभावी जीन असलेल्या  वाघ-वाघिणींच्या समागमाने होणाऱ्या चार छाव्यांत एक पांढरा असण्याची शक्यता असते. १९०७ मध्ये प्रथम पांढरा वाघ आढळला. मे १९५१ मध्ये मध्य प्रदेशातील रेवा संस्थानचे राजा धीरज मार्तंडसिंग पांढऱ्या वाघाचा ९ महिन्यांचा बछडा मिळाला. त्याचा एका वाघिणीशी संकर करून झालेल्या १० पिलांतील एका वाघिणीशी पुढे संकर होऊन चार पांढरी पिले झाली. भारतातील पांढरे वाघ तीन वंशावळींतील आहेत.  


पांढरे वाघ अत्यंत दुर्मिळ असून १९९१ च्या सुमारास भारतात अशा प्रकारचे एकूण ४५ वाघ होते. त्यांपैकी २४ ओरिसातील भुवनेश्वरच्या नंदनकानन प्राणिसंग्रहालयात होते. यांखेरीज म्हैसूर, कलकत्ता, गौहाती, हैदराबाद, त्रिवेंद्रम, पाटणा, भोपाळ येथील प्राणिसंग्रहालयांत प्रत्येकी १-२ वाघ होते. नंदनकानन प्राणिसंग्रहालयातील पांढरा वाघ पुण्याच्या पेशवे उद्यानात आणण्यात आला असून महाराष्ट्रातील हा पहिला पांढरा वाघ हस्तीदंती रंगाचा व त्यांवर कॉफी रंगाचे पट्टे असलेला व निळ्या डोळ्यांचा आहे.  

इ. स. १९९१ च्या सुमारास जगात ६५ पांढरे वाघ होते. भारताखेरीज अमेरिकेत व इंग्लंडमध्ये ते आहेत. दुर्मिळतेमुळे त्यांची किंमत वाढत असून एका जोडीची किंमत १० ते १२ लाख रूपये होती.  

वर्तन : वाघ मुख्यत्वे एकाकी राहतात पण ते असामाजिक नव्हेत. दोन प्राणी एकमेकांना प्रेमाने भेटून एकमेकांचे गाल चाटतात. वाघिणी नराशी मुक्तपणे वागतात. मात्र नर मादीशी विरोधी वर्तन करतात. आपले अस्तित्व समजावे म्हणून ते गर्जना करतात व झाडाझुडपांवर लघवीचे फवारे मारतात. शक्यतो वाघ झाडावर चढत नाहीत पण भीतीने वा जखमी झाल्यावर ते झाडावर चढतात. खांसी व जैंतिया (मेघालय) टेकड्यांवर १२.२ मी. उंचीच्या झाडाच्या फांद्यांवर वाघ बसलेले आढळले आहेत. ते उत्तम प्रकारे पोहतात. चालताना त्यांच्या पावलांच्या खुणा उमटतात.  

प्रजनन :  वयाच्या चवथ्या-पाचव्या वर्षी वाघ-वाघीण वयात येतात. त्यांचा समागम काळ पावसाळ्यानंतर येतो. डरकाळी (गर्जना) फोडून वाघीण वाघाला साथ घालते. दोन आठवडे ते एकत्र राहतात. ९८ ते १०९ दिवसांचा गर्भावधी असतो. मादी एकावेळी १ ते ६, विशेषेकरून २-३ छाव्यांना जन्म देते. नवजात छावे डोळे मिटलेले व असाहाय्यही असतात. त्यांचे वजन १.२ ते १.८ किग्रॅ. असते. ६ ते ८ आठवडे ते लपलेल्या अवस्थेत असतात. अंगावर पिण्याचा काळ संपताच आईपासून ते दूर होतात. वाघ हा एकाच वाघीणीशी संबंध ठेवतो, असे नाही. नवजात छाव्यांपैकी निम्मे वर्षाचे होण्याच्या आतच मरतात. वर्षानंतर प्राणी कसे पकडून खावेत याचे शिक्षण मादी पिलांना देते. दोन वर्षांनंतर छावा स्वतंत्रपणे हिंडू फिरू लागतो. वाघांची जननक्षमता १० वर्षे असते. वाघ व वाघीण यांचे प्रमाणे ४८: ५२ आहे. सर्वसाधारणपणे एका विणीत २.९  छावे जन्मतात पण त्यांपैकी १.९ च जगतात, असे आकडेवारीवरून दिसते. वाघाचे आर्युमान अंदाजे २०  वर्षे असते.  

आहार : दिवसाला वाघाला सामान्यतः ५.५ ते ६.८ किग्रॅ. मांस लागते. जे जे पकडणे शक्य असते त्याचे तो भक्षण करतो. त्यात बेडूक, मासे, माकडे, तसेच मुख्यत्वे खुरी प्राणी उदा. हरिण, डुकरे, व गुरे यांचा समावेश असतो. तो शिकार मुख्यत्वे अंधारात तसेच दिवसाही करतो.  

पुढच्या पायांनी प्राण्याला वाघ ताकदीने दाबून आपल्या वक्राकार नखरांनी (नख्यांनी) ओढून घायाळ करतो व मान चावून वा गळा घोटून ठार करतो. वाघ एका वेळी सु. २३ किग्रॅ. तर भुकेला वाघ ९० किग्रॅ.पर्यंत मांस खाऊ शकतो. गायीएवढा प्राणी मारल्यानंतर त्याचे मांस तो थांबून थांबून तीन दिवस खातो. काही वाघ हत्तीच्या पिलांवर हल्ले करण्याचे धाडस करतात. त्याला साळ आवडते पण तिच्या काट्यांमुळे वाघाला इजा होण्याची शक्यता असते. तीक्ष्ण नजर, कान व घ्राणेंद्रिय यांद्वारे तो भक्ष्यांचा माग काढतो. त्याचे दात भक्ष्य पकडण्याच्या किंवा मांसाचे तुकडे करण्याच्या दृष्टीने सोयीचे असतात. वाघ काही अंतर चपळाईने जाऊन ९ मी. उंच उडी मारतो. शिकार लवकर पकडता आली नाही, तर त्याला ती सोडावी लागते कारण तो लवकर थकतो. तो २३० किग्रॅ. वजनाची शिकार ०.४ किमी.पर्यंत ओढून नेऊ शकतो. आहारानंतर भरपूर पाणी पिऊन तो डुलकी घेतो. तो कुजके मांसही खातो. माणसाच्या मांसाची त्याला चटक लागू शकते. एखादा वाघ आनुवंशिकतेमुळे नरभक्षक का होऊ शकतो मात्र सुंदर वनातील सर्व वाघ नरभक्षक का असावेत, याची उकल झालेली नाही.  

भक्ष्याला मारल्यावर तो थोडा वेळ शांत पडून राहतो. पकड ढिली न करता तो त्याचे रक्त पितो. आहाराबाबत तो चित्त्याच्या तुलनेत स्वच्छतेचा भोक्ता आहे. भक्षाचे जठर व आतडे बाजूला करून तो अन्य मांसल भाग खातो. भक्ष्याचा फडशा पाडल्यावर तो नखर झाडाच्या सालीवर घासून स्वच्छ करतो.  

काही विशिष्ट परिस्थितींत, प्राणीसंग्रहालयात, वाघाचे सिंहीणीबरोबर संकरण होऊ शकते. अशा संकरित संततीला ‘टायगन’ आणि सिंह व वाघीण यांच्या संततीला ‘लायगर’ म्हणतात. मात्र असे संकरण जंगलात आढळत नाही. असे मानले जाते की, सर्वच नव्हे पण विशेषत्वाने नर लायगर व टायगन वंध्य असतात. मात्र प्रसंग विशेषी मादीला पिले होऊ शकतात.  


रक्षण : १९८० च्या सुमारास जगातल्या घनदाट अरण्यांमध्ये सुमारे २५ हजार वाघ होते. वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड या संस्थेच्या म्हणण्यानुसार सध्या (१९९३) जगात सात हजार वाघ असावेत. वाघाचे विविध अवयव अनेक देशांत हजारो औषधांत वापरले जातात. त्यासाठी त्यांची होणारी हत्या शिकार, खेळ व कातडी यांसाठी त्यांची होणारी हत्या यांमुळे त्यांची संख्या रोडावू लागली. जीवशास्त्रज्ञांच्या मते गेली १० लाख वर्षे पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकवून असलेला वाघ लवकर इतिहासजमा होईल की काय अशी शंका द वर्ल्ड कॉन्झर्व्हेशन युनियनच्या कॅट स्पेशॅलिस्ट ग्रुपचे अध्यक्ष पीटर जॅक्सन यांनी व्यक्त केली आहे. 

वाघाचे निर्दालन हा चिंतेचा विषय ठरला आहे. ते रोखण्यासाठी काही देश कार्यरत आहेत. लंडनमध्ये स्पेशल टायगर ट्रस्ट हॉटलाइन नावाची खास फोनसेवा वाघाची अभिनव माहिती देण्यासाठी सुरु झाली आहे. 

चीनमध्ये हिलांग जियांग नेटिव्ह प्रॉडक्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट या संस्थेने वाघाचे प्रजनन वाढीस लागावे म्हणून अभयारण्य उभारले. प्रारंभी त्यांच्याकडे ४ सायबीरियन वाघ होते. आता या प्रजनन क्षेत्रावर ६२ वाघ आहेत. इ. स. २००० पर्यंत ६०० वाघांची पैदास करण्याचा या केंद्राचा विचार आहे. या कामी प्रत्येक वाघावर वार्षिक सु.  ४,५०० डॉलर्स खर्च होतो.  

इ. स. १९०० साली भारतात वाघांची संख्या ४०,००० होती. १९७२ साली २००० पर्यंत खाली आली. व्याघ्र प्रकल्पामुळे ती १९९१ साली ३००० झाली होती. भारतातील बहुतेक राज्यांनी १९७२ सालचा वन्य जीवांच्या संरक्षणाचा कायदा अमलात आणला असून या कायद्यान्वये विशेषतः नामशेष होण्याचा धोका असलेल्या जातींच्या प्राण्यांचे संरक्षण विविध उपाययोजनांद्वारे करण्यात येत आहे. यामुळे वाघांची संख्या वाढली आहे. [⟶ वन्य जीवांचे रक्षण]. 

भारतात वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याची कल्पना १९७३ मध्ये मांडण्यात आली. तेव्हा राज्य सरकारे यात सहभागी होण्यास फारशी तयार नव्हती. १ एप्रिल १९७३ रोजी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात हा प्रकल्प सुरु करण्यात आला. मग यात मानस (आसाम), सुंदरबन (प. बंगाल), पालामाऊ (बिहार), रणथंभोर (राजस्थान), कान्हा (मध्य प्रदेश), सिमलीपाल (ओरिसा), मेळघाट (महाराष्ट्र) व बंदिपूर (कर्नाटक) या जंगलांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला. १९८० मध्ये सारिस्का (राजस्थान), व पेरियार (केरळ) तर १९८४ मध्ये इंद्रावती (मध्य प्रदेश) व कुक्‌सार (प. बंगाल) आणि १९८९ मध्ये नागार्जुनसागर (आंध्र प्रदेश), नामदफा (अरुणाचल प्रदेश), वाल्मीकी (बिहार), मुदननुराई (तमिळनाडू) व दुद्‌वा (उत्तर प्रदेश) या जंगलांचा व्याघ्र प्रकल्पात अंतर्भाव करण्यात आला. नंतर इंद्रावती हे प्रचंड क्षेत्र व अधिक गावांमुळे यांतून वगळण्यात आले आणि पेंच (मध्य प्रदेश) जंगल समाविष्ट करण्यात आले. या प्रकल्पामुळे वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली (उदा., १९७३ साली कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात ३१८ वाघ होते. १९८९ साली तेथील वाघांची संख्या १,१२४ पर्यंत वाढली होती). मात्र कातडी व हाडे यांसाठी वाघांची चोरटी शिकार होत असते. यामुळे वाघांच्या संख्येत ५ ते १० टक्के घट होत असावी, असा अंदाज करण्यात आलेला आहे  (उदा., राजस्थानात एका वर्षात वाघांची संख्या ४८ वरून १८ वर आल्याचे एका पाहणीत आढळले होते.) 

परिक्षेत्र : आपापली हद्द वाघ ठरवून घेतात. हे परिक्षेत्र ६५ ते ६४७ चौ. किमी.पर्यंत असू शकते. आपल्या मूत्राने व ग्रंथिस्त्रावाने तो आपल्या हद्दीच्या खुणा करतो. या वासांमुळे अन्य वाघांना या क्षेत्राची माहिती होते. एक वा अधिक वाघिणींसह तो यामध्ये राहतो.  

आर्थिक महत्त्व : शिकारी, छायाचित्रकार व प्रवासी यांचे वाघ हे एक आकर्षण आहे. त्यांची किंमत खूप असल्याने परकीय चलनाच्या दृष्टीने त्याला महत्त्व आहे. वाघाची नखरे व हाडे डूल म्हणून, कल्ले (गालमिशा) ताईतासाठी वापरतात, तर मांस खाल्याने शक्ती येते, असे मानतात. वाघाची चरबी (वसा) संधिवातावर आणि सांधेदुखीवर वापरतात. चीनमध्ये शक्तिवर्धकात वाघाची हाडे वापरतात. एक किग्रॅ. हाडाची किंमत सु. पावणे दोन लाख रूपये असते. त्याच्या सुळ्यांपासून तयार करण्यात येणारे मलम केसतुडावर व गळवांवर लावतात. वाघाचे रक्त डांग्या खोकल्यावर गुणकारी आहे. वाघाचे कातडे विजयाचे स्मारक म्हणून जतन करण्याची दीर्घ परंपरा आहे. त्याला किंमतही खूप येते. आसन व वस्त्र यांसाठी ते भारतात वापरात आहे. 

वाघाविषयी अनेक लोककथा व गैरसमज विविध साहित्यांतून आढळतात. 

पहा : मांसाहारी गण. 

कुलकर्णी, सतीश वि.


तपकिरी वाघतांबूस व पांढऱ्या छाब्यांसह वाघीणपांढरा वाघम्हैसूरच्या प्राणिसंग्रहालयातील वाघवाघाच्या मुद्राटायगन : वाघ आणि सिंहीण यांचा संकर

वाघाच्या मुद्रा