हेल्माँट, यान बाप्टिस्टा व्हान (व्हॅन) : (१२ जानेवारी १५८० – ३० डिसेंबर १६४४). बेल्जियन रसायनशास्त्रज्ञ, शरीरक्रियावैज्ञानिक व वैद्य (चिकित्सक) . त्यांनी पृथक् (विविक्त) वायूंचे अस्तित्व दाखविले व कार्बन डाय-ऑक्साइड वायू ओळखला. 

 

हेल्माँट यांचा जन्म ब्रूसेल्स (बेल्जियम) येथे झाला. त्यांनी किमयाव रसायनशास्त्र यांच्यातील परस्परसंबंध ठरविण्यासाठी कार्य केले. त्यांचा कल जरी गूढवादाकडे होता व त्यांचा परिसावर विश्वास होता, तरी ते काळजीपूर्वक निरीक्षण करणारे व यथार्थपणे प्रयोग करणारे शास्त्रज्ञ होते. वातावरणातील हवेपेक्षा भिन्न असे वेगळे वायू अस्तित्वात असल्याचे त्यांनी दाखवून दिले. वास्तविक त्यांनी ‘गॅस’ (वायू) हा शब्द शोधून काढला. स्पिरिट्स सिल्व्हेस्ट्री (वाइल्ड स्पिरिट, प्रत्यक्षात कार्बन डाय--ऑक्साइड) हा जळणाऱ्या लोणारी कोळशाने बाहेर टाकलेला वायू आणि किण्वन (आंबविण्याची क्रिया) होत असलेले मस्ट किंवा द्राक्षांचा रस यातून निर्माण होणारा वायू हे एकच असल्याचे त्यांनी ओळखले होते. पाणी हे द्रव्याचे मुख्य – पण एकमेव नसलेला – घटक आहे, असे त्यांनी मानले होते. त्यांनी आपली ही कल्पना मोजून घेतलेल्या मातीत वृक्ष वाढवून स्थापित केली होती. पाच वर्षे केवळ पाणी देऊन वाढविलेल्याया वृक्षाचे वजन १६४ पौंड (सु. ७० किग्रॅ.) वाढले, तर जमिनीचेवजन काही औंसांनीच कमी झाले होते (१ औंस ⇨ सु. ३० ग्रॅ.).

 

हेल्माँट हे पचन व पोषण यांविषयीच्या संशोधनात शरीरक्रिया-वैज्ञानिक समस्यांच्या अभ्यासात रासायनिक तत्त्वांचा वापर करणारे पहिले संशोधक होते. यामुळे त्यांना जीवरसायनशास्त्राचे जनक म्हटले जाते. तथापि या कार्यामुळे आपल्या परिकल्पनांमध्ये (अटकळींमध्ये) त्यांनी अलौकिक किंवा अतिभौतिक कर्तृत्वशक्तींच्या प्रणालीचाही अंतर्भाव केला. या कर्तृत्वशक्ती शरीराच्या कार्यांवर नजर ठेवतात व त्यांना दिशा देतात. त्याचबरोबर स्वत:ची औषधे निवडताना त्यांना रासायनिक तत्त्वांनी मार्ग दाखविला. उदा., पाचकरसांची गैरवाजवी अम्लता योग्य तेवढी करण्यासाठी क्षार (अल्कली) वापरणे. त्यांचे संकलित लेखन १६४८ मध्ये प्रसिद्ध झाले. 

 

हेल्माँट यांचे स्पॅनिश नेदरर्लंड्समधील (आताच्या बेल्जियममधील) व्हिल्व्हॉर्द येथे निधन झाले. 

दीक्षित, रा. ज्ञा.