ब्लोएम्बरगेन, निकोलास : (११ मार्च १९२० – ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. १९८१ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक ब्लोएम्बरगेन यांना अमेरिकन भौतिकीविज्ञ ⇨ आर्थर लेनर्ड शॉलो यांच्याबरोबर अर्धे आणि स्वीडिश भौतिकीविज्ञ ⇨ काई सीग्वान यांना अर्धे असे विभागून मिळाले. द्रव्यांच्या आणवीय व रेणवीय संरचनांची गुपिते शोधून काढण्याकरिता नवीन पद्धती शोधून काढल्याबद्दल ब्लोएम्बरगेन आणि शॉलो यांना हे पारितोषिक देण्यात आले.

ब्लोएम्बरगेन यांचा जन्म नेदर्लंड्समधील डॉडरेख्ट येथे झाला. त्यांनी उत्रेक्त विद्यापीठातून भौतिकी विषयातील बी. ए. (१९४१) आणि एम्. ए. (१९४३) या पदव्या संपादन केल्या. दुसऱ्या महायुद्धात १९४४ सालच्या खडतर हिवाळ्यामध्ये एच्. ए.क्रॅमर्स यांचे ⇨ पुंजयामिकीवरील पुस्तक वाचून त्यांनी स्वतः या विषयाचा अभ्यास केला. १९४६ मध्ये त्यांनी अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठात ई. एम्. पर्सेल यांच्याबरोबर आपल्या प्रबंधाकरिता संशोधन केले. १९४८ साली त्यांना लायडन विद्यापीठाची भौतिकी विषयातील पीएच्. डी. पदवी मिळाली. त्याच वेळी त्या विद्यापीठात ते संशोधन साहाय्यक होते. १९४९ – ५१ या काळात ते हार्व्हर्ड येथील सोसायटी ऑफ फेलोज या संस्थेमध्ये कनिष्ठ अधिछात्र होते. त्यानंतर हार्व्हर्ड विद्यापीठात १९५१ मध्ये ते सहप्राध्यापक आणि १९५७ मध्ये  अनुप्रयुक्त भौतिकीचे गॉर्डन माके प्राध्यापक झाले. पुढे १९७४ – ८० मध्ये त्यांनी भौतिकीचे रम्फर्ड प्राध्यापक म्हणून त्याच विद्यापीठात काम केले. पॅरिस विद्यापीठ व कॅलिफोर्निया विद्यापीठ (बर्कली) येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून तसेच लायडन विद्यापीठात अभ्यागत लोरेन्ट्स प्राध्यापक व बंगलोर विद्यापीठात अभ्यागत रामन प्राध्यापक (१९७९) म्हणून कार्य केले.

नीच तापमानाला होणाऱ्या स्फटिकांतील चुंबकीय अनुस्पंदनाचा [→ अनुस्पंदन] अभ्यास करीत असताना ब्लोएम्बरगेन यांना ⇨ मेसरकरिता वापरण्यास योग्य अशी त्रिस्तरीय व बहुस्तरीय पंपिंग पद्धतीची कल्पना सुचली. १९५६ साली त्यांनी या पद्धतीवर अविरत कार्य करणारा घन-अवस्था मेसर कसा बनविता येईल, याकरिता योजना सुचविली. ब्लोएम्बरगेन यांनी सुचविलेल्या लवणांपैकी गॅडोलिनियम एथिल सल्फेट या लवणाचा वापर करून बेल टेलिफोन लॅबोरेटरीमध्ये एच्. ई. डी. स्कोव्हील यांनी १९५६ साली पहिला बहुस्तरीय मेसर कार्यान्वित करण्यात यश मिळविले. १९५७ साली ब्लोएम्बरगेन व त्यांचे सहकारी यांनी २१ सेंमी. तरंगलांबीचे प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) उत्सर्जित करणारा मेसर तयार केला. यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी विविध तरंगलांबी असलेले मेसर कार्यान्वित करून ब्लोएम्बरगेन यांनी दिलेल्या सैद्धांतिक मीमांसेचा अचूकपणा सिद्ध केला. सर्व लेसरांच्या [प्रकाशीय मेसरांच्या→लेसर] कार्यात बहुस्तरीय (दोनपेक्षा अधिक स्तर असलेल्या) ऊर्जा प्रणालीमधील पंपिंगचे तत्त्व वापरले जाते.

ब्लोएम्बरगेन व त्यांचे सहकारी यांनी प्रयोगाने असे दाखविले की, आणवीय वा रेवणीय प्रणालीची विद्युत् अपारक प्रणवता [→विद्युत्अपारक पदार्थ] ही त्यावर पडत असलेल्या लेसर प्रकाशाच्या क्षेत्रावर अवलंबून असते (प्रकाश म्हणजे सतत स्थानांतरण करणारी विद्युत् चुंबकीय क्षेत्रे असतात). सामान्य प्रकाशकीचे नियम अथवा सिद्धांत लेसर प्रकाशाकरिता यथार्थ ठरत नाहीत, त्याकरिता नैकरेषीय सैद्धांतिक मीमांसा उपयुक्त ठरते [→नैकरेषीय आविष्कार]. नैकरेषीय प्रकाशकीच्या मूलभूत तत्त्वाचा शोध, त्याचे सुसूत्रीकरण व स्थापना यांमध्ये ब्लोएम्बरगेन यांचा महत्त्वाचा वाटा होता. दोन किंवा अधिक लेसर कंप्रतांचे नैकरेषीय प्रकाशकीय मिश्रण करून त्यापासून नवीन मूल्यांच्या लेसर कंप्रता निर्माण करता येतात, असे त्यांनी दाखविले. या पद्धतीचा उपयोग करून अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) व जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) वर्णपट क्षेत्रांमध्ये उत्सर्जन देणारे लेसर त्यांनी तयार केले.अशा लेसरांच्याद्वारे अणू व रेणू यांच्या संरचनांचा अचूक अभ्यास करणे शक्य झाले आहे. ब्लोएम्बरगेन यांनी तीव्र शक्तीच्या लेसर शलाकेच्या साह्याने अणू व रेणू उत्तेजित करून अशा प्रकारे मिळणार्‍या नैकरेषीय लेसर वर्णपटविज्ञानाच शोध लावला. विरुद्ध दिशेने वेगात जाणार्‍या दोन लेसर प्रकाशकणांचे (फोटॉनांचे) एखाद्या रेणूने जर एकाच वेळी शोषण करून वर्णपट रेषा उत्सर्जित केल्या, तर ऊष्मीय हालचालींमुळे उत्पन्न होणार्‍या ‘डॉप्लर रुंदावणी’ [→वर्णपटविज्ञान]या दोषापासून त्या मुक्त असतात. एकमेकांच्या अतिशय जवळ असणार्‍या रेणूच्या ऊर्जापातळ्यांचे विभेदन करून त्यांचे अचूक मापन करता येते, असे त्यांनी दाखविले. लेसराचा उपयोग बंध-विवेचक वर्णपटविज्ञानाकरिता त्यांनी केला. रेणूमधील एखाद्या विवक्षित बंधाचे विच्छेदन करण्याकरिता अचूक ऊर्जा असणाऱ्या लेसर स्पंदाचा प्रकाश रेणूवर टाकून फक्त इष्ट त्या बंधाचे विच्छेदन करण्याकरिता ब्लोएम्बरगेन यांनी एक नवी व प्रभावी पद्धत विकसित केली. या पद्धतीचा उपयोग करून रेणवीय जीवविज्ञान व रसायनशास्त्र यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा रेणूंचे अपघटन (घटक द्रव्ये अलग करण्याची क्रिया) वा पुनर्निर्मिती करता येते, असे त्यांनी दाखविले.

मेसरांची कार्यशक्ती वाढविण्यासाठी वापरण्यात येणारा स्फटिक अती नीच तापमानापर्यंत थंड केला जातो (याकरिता ४ के. तापमानाच्या द्रवरूप हीलियमाचा उपयोग करण्यात येतो). अशा प्रकारे थंड केला गेल्यामुळे त्यामधील ऊष्मीय गोंगाटाचे [→ विद्युत् गोंगाट]प्रमाण अत्यंत कमी होते आणि त्यामुळे योग्य प्कारे कार्यान्वित केल्यास मेसर प्रणालीचा नीच गोंगाट असलेला विवर्धक म्हणून उपयोग करता व रुंद कंप्रता पट्ट्यात कार्य करण्याची क्षमता हे दोन महत्त्वाचे गुणधर्म या विवर्धकात मिळतात. रेडिओ दूरदर्शकांत व पृथ्वीवर रडारद्वारे मार्गनिरीक्षण करणार्‍या स्थानकांत अशा मेसर विवर्धकाचा फार उपयोग होतो.⇨  अंतर्ज्वलन-एंजिनात इंधनवायूच्या मिश्रणाचे विस्फोट कसे होतात यासारख्या समस्येपासून ते सजीव ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांमध्ये) रेणूंची हालाचाल कशा प्रकारे होते यासारख्या विविध प्रक्रियांविषयीची माहिती या उपकरणाच्या साहाय्याने मिळविता येते.

नोबेल पारितोषिकाखेरीज ब्लोएम्बरगेन यांना अमेरिकन फिजिकल सोसायटीचे बर्कली पारितोषिक (१९५८), इन्स्टिट्यूट ऑफ एंजिनियर्सचे मॉरिस लीपमान पारितोषिक (सी. एचं. टाऊन्स यांच्याबरोबर, १९५९), फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे ल्यूअर्ट बॅलेंटाइन पदक (१९६१), नॅशनल मेडल ऑफ सायन्स (१९७४), रॉयल डच अँकॅडमी ऑफ सायन्सेसचे लोरेन्ट्स पदक (१९७८), ऑप्टिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचे फ्रेंडरिक आइव्ह्झ पदक (१९७९) वगैरे बहुमान मिळालेले आहेत. १९६० मध्ये अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. रॉयल डच अँकॅडेमी ऑफ सायन्सेस व इंडियन अँकॅडेमी ऑफ सायन्सेस (बंगलोर) या संस्थांचे ते परदेशी सदस्य आहेत. त्यांनी न्युक्लिअर मॅग्नेटिक रिलॅक्सेशन्स (१९४८) व नॉनलिनियर ऑप्टिक्स (१९६५) हे ग्रंथ व विविध शास्त्रीय नियतकालिकांत सु. २०० निबंध लिहिलेले आहेत.

   सूर्यवंशी, वि. ल. चिपळोणकर, व. त्रिं.