व्हार्मस, हॅरल्ड एलियट : (१८ डिसेंबर १९३९–   ). अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ व विषाणुशास्त्रज्ञ. कर्करोग कसा उत्पन्न होतो हे विशद करणारे संशोधनकार्य त्यांनी मायकेल बिशप यांच्याबरोबर केले. या कार्यासाठी या दोघांना १९८९ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक संयुक्तपणे देण्यात आले.

व्हार्मस यांचा जन्म अमेरिकेतील ओशनसाइड (न्यूयॉर्क राज्य) येथे झाला. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एम.ए. (१९६२) आणि कोलंबिया विद्यापीठातून एम.डी. (१९६६) या पदव्या संपादन केल्या. नंतर बेथेस्डा (मेरिलँड) येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी सूक्ष्मजंतूंविषयी अध्ययन केले (१९६८-७०). १९७० साली ते कॅलिफोर्निया विद्यापीठात (सॅन फ्रॅन्सिस्को) सूक्ष्मजीवशास्त्र विभागात व्याख्याते झाले. तेथेच त्यांनी बिशप यांच्याबरोबर कर्करोगविषयक संशोधन केले. व्हार्मस तेथे १९८२ साली जीवरसायनशास्त्र व जीवभौतिकी या विषयांचे प्राध्यापक आणि १९८४ साली अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे संशोधन प्राध्यापक झाले.

शरीरातील निरोगी कोशिकांमधील (पेशींमधील) प्राकृत जीन म्हणजे जनुके [आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणारे सूक्ष्म घटक → जीन] विशिष्ट परिस्थितींमध्ये कर्करोगाला कारणीभूत होऊ शकतात. या जीनांना आँकोजीन (कर्कजनुके) म्हणतात. सर्वसाधारणपणे आँकोजीन कोशिकेची वाढ व विभाजन यांचे नियंत्रण करतात परंतु ते जर संक्रामक (संसर्गी) व्हायरसांमुळे बाधित झाले, किरणोत्सर्गी कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात आले अथवा त्यांच्यावर रासायनिक कर्कजन (कर्करोगास कारणीभूत होणाऱ्या) पदार्थांचा परिणाम झाला, तर त्यांच्यात अचानक बदल होऊ शकतात. विषाणु-जनुक हे कर्कजनाने क्रियाशील होईपर्यंत निष्क्रीय वा सुप्त अवस्थेत असते व ते कोशिकांच्या प्राकृत द्रव्याहून वेगळे असते. अशा रितीने त्यांच्या संशोधनामुळे कर्करोगामागील कारणे अधिक स्पष्ट झाली व या संशोधनास नवी दिशा मिळाली.

व्हार्मस यांनी मॉलेक्युलर बायॉलॉजी ऑफ ट्यूमर व्हायरसेस (१९८२) व रीडिंग्ज इन ट्यूमर व्हायरॉलॉजी (१९८३) या दोन पुस्तकांचे संपादन केले आहे.

व्हार्मस यांना त्यांच्या संशोधनाबद्दल अनेक मानसन्मान लाभले. यांपैकी काही त्यांना बिशप यांच्याबरोबर मिळाले. तसेच अमेरिकन सोसायटी ऑफ व्हायरॉलॉजी यांसारख्या काही वैज्ञनिक संस्थांचे सभासदत्वही त्यांना मिळाले.

पाटील, चंद्रकांत प.