लावालावा : हा पक्षी फॅजिॲनिडी कुलातला आहे. याच्या प्रसाराचे क्षेत्र मोठे आहे. तो आशिया, यूरोप आणि आफ्रिकेत आढळतो. भारतात याच्या सात-आठ जाती आढळतात. त्यांपैकी सगळीकडे आढळणारी एक सामान्य जाती करडा लावा ही होय. शिकारी लोकांत बटेर (लाहोरी) या नावाने ही प्रसिद्ध आहे. हिचे शास्त्रीय नाव कोटर्निक्स कोटर्निक्स असे आहे. भारतात आढळणारा लावा येथीलच रहिवाशी आहे परंतु पश्चिम आणि मध्य आशियात राहणारे या जाताचे पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून भारतात येतात, यामुळे हिवाळ्यात यांच्या संख्येत फार मोठी भर पडते. हे आलेले पाहुणे मार्च-एप्रिलमध्ये परत जातात.

लावा ⇨कबूतराएवढा असतो. तो गुबगुबीत बसका असून ⇨तितरासारखा दिसतो. पाठीकडचा रंग बदामी तपकिरी असून त्यावर फिकट रेषा व ओबडधोबड ठिपके असतात, शिवाय तांबूस तपकिरी आणि काळे पट्टे असतात. खालची बाजू पांढरी असते. नरच्या गळ्यावर जहाजाच्या नांगराच्या आकृतीचे काळे चिन्ह असते. लावीच्या (मादीच्या) गळ्यावर ते नसते. शेपूट अगदीच लांडे असते. चोच तपकिरी, पाय फिक्कट तपकिरी किंवा पिवळे असतात.

शेतातल्या उभ्या पिकात, झुडपांत किंवा उंच गवतात हे रहातात. झाडांवर कधीच बसत नाहीत. धान्य, बी, किडे हे याचे भक्ष्य होय. बहुधा यांची जोडपी असतात परंतु शेतातले धान्य टिपण्याकरिता त्यांचे मोठे थवे जमा होतात. शेतातून किंवा गवतातून हुसकल्यावर सबंध थवा उडून न जाता दोनदोन, चारचार पक्षी उडून जातात व काही अंतरावर जाऊन बसतात.

लाव्याचे मांस स्वादिष्ट असल्यामुळे यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होते. शिवाय या पक्ष्यांना जाळ्यात पकडून त्यांना नीट काळजी घेऊन पाळतात व नंतर मांसाकरिता विकून टाकतात. पुष्कळ लोक यांना पिंजऱ्यांत ठेवतात व त्यांच्या झुंजी लावतात.

विणीचा हंगाम मुख्यतः मार्च ते मे असतो. गवतात किंवा उभ्या पिकांत जमिनीत उथळ खळगा खणून त्यात थोडे गवत घालून लावा घरटे तयार करतो. लावी त्यांत अंडी घालते. ती तांबूस किंवा पिवळसर बदामी रंगाची असून त्यांवर गर्द तपकिरी ठिपके असतात.

 कर्वे, ज. नी.

 पालन : यांच्या पालनासाठी कोंबडीच्या पिंजऱ्यासारखे पिंजरे असतात. एका पक्ष्याला १००-१५० चौ. सेंमी. जागा लागते. दोन माद्यांमागे एक नर या प्रमाणात पक्षी ठेवतात. मादी पिलू सहा आठवड्याचे झाल्यावर अंडी घालू लागते. ते दोन ते अडीच वर्षे अंडी देते. सुरुवातीच्या चार आठवड्यांत ५०% पर्यंत अंडी घातली जातात व त्यापुढील चार आठवड्यांत जास्तीत जास्त अंडी मिळतात. एक मादी १००-१२० अंडी घालते. साधारण २०-२४ आठवड्यांपर्यंत फलित अंड्यांचे प्रमाण उत्तम असते. ती १३० से. तापमान व ८०% आर्द्रता असलेल्या खोलीत साठवतात.

अठरा दिवसांत अंड्यांतून पिले बाहेर पडतात. उबवणी यंत्रात अंडी उबण्याचे प्रमाण ६०%पर्यंत असते. कोंबडीच्या पिलांप्रमाणेच या पिलांची काळजी घेतात. सुरुवातील पिलांना २७% प्रथिने व २,८०० कॅलरी ऊर्जा असलेले खाद्य देतात नंतरचे तीन आठवडे २४% प्रथिने व २,८०० कॅलरीयुक्त खाद्य देतात. तर अंडी घालणाऱ्या पक्ष्यांना २२% प्रथिने व २,९०० कॅलरीयुक्त खाद्य देतात. खाद्यात जीवनसत्त्वे व औषधे मिसळून देतात. ५-६ आठवड्यांत पिलांची वाढ पूर्ण होते आणि त्यांचे वजन साधारणातः १५० ग्रॅम होते. असे पक्षी विक्रीयोग्य होत. त्यांचे मांस चविष्ट असल्यामुळे त्याला भरपूर मागणी असते. त्यांच्या अंड्यांनाही मागणी असते. या पक्ष्यांना रोगराईचा फारसा उपद्रव होत नाही. यांच्या पालनासाठी वन खात्याच्या परवान्याची आवश्यकता असते. [→ कुक्कुटपालन].

 जमदाडे, ज. वि.