धनेश : या पक्ष्यांची चोच फार मोठी व शिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिलेले आहे. या पक्ष्यांचे एकंदर स्वरूप असामान्य असते. ब्यूसेरॉटिडि या पक्षिकुलात यांचा समावेश केलेला आहे. आफ्रिकेत सहाराच्या दक्षिणेस व द. आशियात भारतापासून फिलिपीन्स बेटांपर्यंत ते आढळतात. पण ऑस्ट्रेलियात मात्र ते नाहीत, यांच्या एकूण सु. ४५ जाती आहेत.

भारतात धनेशाच्या पाचसहा जाती आहेत. यांपैकी ‘मोठा धनेश’ (ग्रेट हॉर्नबिल) सगळ्यांत मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ब्यूसेरॉस बायकॉर्निस असे आहे. ही जाती पश्चिम घाटात मुंबईपासून कन्याकुमारीच्या भूशिरापर्यंत आणि हिमालयाच्या खालच्या रांगांमध्ये १, ५२५ मी. उंचीपर्यंत आढळते. बाकीच्या जातींपैकी करडा धनेश वा सामान्य धनेश ही जाती फक्त भारतातच आढळणारी असून तिचे शास्त्रीय नाव टॉकस बायरोस्ट्रीस असे आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून खाली सगळीकडे (मलबार किनारा, थोडा राजस्थान व आसाम वगळून) ती आढळते. बाकीच्या जाती वेगवेगळ्या भागांत आढळतात.

आ. १. मोठा धनेश

मोठ्या धनेशाची लांबी सु. १३० सेंमी. असते. डोके, पाठ, छाती वा पंख काळे असून पंखांवर आडवा पांढरा पट्टा असतो मान व पोट पांढरे असते शेपटी लांब व पांढरी असून तिच्या टोकाजवळ काळाआडवा पट्टा असतो नराचे डोळे तांबडे व मादीचे पांढरे असतात चोच मोठी, मजबूत, बाकदार व पिवळी असते डोके आणि चोचीचे बूड यांवर एक मोठे ‘शिरस्त्राण’ असते त्याचा रंग पिवळा असून वरचे पृष्ठ खोलगट असते पायांचा रंग काळपट असतो.

हा  अरण्यात राहणारा पक्षी असून फार मोठ्या व उंच झाडांवर लहान थवे करून ते राहतात. याच्या असामान्य स्वरूपामुळे तो सहसा नजरेतून सुटत नाही. उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज दीड किमी.वर तरी ऐकू जातो. झाडावर स्वस्थ न बसता हे ओरडून गोंगाट करीत असतात.

फळे हा जरी यांचा मुख्य आहार असला, तरी ते किडे, सरडे किंवा इतर अन्न खात असल्यामुळे त्यांना सर्वभक्षी म्हणता येईल. फळे किंवा इतर खाद्यपदार्थ खाण्याची यांची रीत मोठी विलक्षण आहे. ते पदार्थ चोचीने वर उडवून आ वासतात व तो घशात पडला म्हणजे गिळतात.

आ. २.करडा धनेश

याच्या विचित्र शिरस्त्राणाच्या उपयोगाविषयी काहीही माहिती नाही. ते भरीव नसून त्याचा आतला भाग स्पंजासारखा असल्यामुळे हलके असते.

मोठ्या धनेशाच्या प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासून एप्रिलपर्यंत असतो. या काळातले याचे एकंदर वर्तन करड्या धनेशासारखेच असते.

करडा धनेश घारीएवढा असून त्याची लांबी सु. ६० सेंमी. असते. दिसायला हा बेढब असतो. वरचा भाग तपकिरी करड्या रंगाचा असतो शेपटी लांब, निमुळती व तपकिरी रंगाची असते शेपटीतील प्रत्येक पिसाच्या टोकाजवळ काळा पट्टा असतो व टोक पांढरे असते छाती करड्या रंगाची व पोट पांढरे असते चोच मोठ, बाजूंनी चपटी, वाकडी व काळी असते आणि तिच्यावर टोकदार नळकांड्यासारखे शिरस्त्राण असते.


हा पूर्णपणे वृक्षवासी असून विशेष दाट झाडी नसलेल्या प्रदेशातील मोठ्या जुनाट झाडांवर राहतो. कधीकधी बागांत किंवा झाडीतही तो दिसतो. यांचे लहान थवे असतात. निरनिराळ्या प्रकारची फळे, कोवळे कोंब, किडे, सरडे, उंदराची पिल्ले ते खातात. यांना फार जोराने उडता येत नाही. यांचा आवाज किंचाळल्यासारखा असून घारीच्या आवाजाची आठवण करून देतो. यांच्या विणीचा हंगाम एप्रिल ते जून असतो. मादी २-३ पांढरी अंडी घालते. या हंगामातले यांचे आणि बाकीच्या बहूतेक धनेशांचे वर्तन असामान्य असते खाली दिलेली माहिती सर्वांना सारखीच लागू पडणारी आहे.

प्रियाराधनानंतर नर-मादीचा जोडा जमतो. अंडी घालण्याच्या सुमारास मादी एखाद्या उंच झाडाच्या खोडातल्या तीन मी. पेक्षा जास्त उंचीवर असलेल्या ढोलीत जाते. ही ढोली यांचे घरटे होय. स्वतःची विष्ठा आणि नराने आणलेला चिखल यांच्या आणलेला चिखल यांच्या मिश्रणाने ती ढोलीचे दार आपल्या चोचीने लिंपून बंद करते पण चोच शिरेल एवढी उभी फट त्यात ठेवते. मादी या वेळी खरीखुरी बंदीवान होते. नर वरचेवर खाद्यपदार्थ आपल्या चोचीतून आणतो आणि ती फटीतून चोच बाहेर काढून ते खाते. पिल्ले सु. १५ दिवसांची झाल्याशिवाय मादी ढोलीबाहेर येत नाही. ती बाहेर पडेपर्यंत तिला भरवावे लागत असल्यामुळे नर या जास्त श्रमांमुळे रोडावतो पण मादी चांगली गुबगुबीत होते. बंदीवासात असताना मोठ्या धनेशाच्या मादीची पिसे गळून पडतात व नवी उगवतात.

पिल्ले १५ दिवसांची झाल्यावर मादी ढोलीवरील लिंपण चोचीने फोडून बाहेर पडते, पण पिल्ले आतच असतात. सामान्यतः बाहेर पडल्यावर मादी दार पुन्हा लिंपून टाकते. यानंतर पिल्ले मोठी होऊन बाहेर येईपर्यंत नर  आणि मादी त्यांना भरवतात.

कर्वे, ज. नी.