पक्षिगान: मानवेतर प्राण्यांत माणसाप्रमाणे बोलून जरी आपले विचार दुसऱ्यास व्यक्त करून सांगता येत नसले, तरी संचारणाचे (संदेशवहनाचे) निरनिराळे उपाय योजून कार्यभाग साधला जातो. असे उपाय स्वाभाविकच संकेतप्रधान असतात. म्हणजेच त्यात खाणाखुणा करून संदेश दिले जातात. सर्व समाजप्रिय प्राण्यांत सांकेतिक संचारणास अनन्यसाधारण महत्त्व असते. संकेतप्रकार व त्यातून सुचविले जाणारे अर्थ हा प्राणिवर्तनाचा एक भाग असून आचारशास्त्रात (प्राणिवर्तनशास्त्रात) त्याचा अभ्यास केला जातो. संचारणाच्या देवाण-घेवाणीसाठी योग्य अशी शरीररचना असावी लागते. संकेत गंधादि (वास इ.) रासायनिक स्वरूपाचे, तापमान, प्रकाश, ध्वनी (आवाज) यांसारख्या भौतिक प्रकारचे किंवा हावभाव, अंगस्थिती अशा शारीरिक स्वरूपाचेही असू शकतात.

संचारण पद्धतीत आवाजी संकेतास बरेच महत्त्व आहे. आवाजाचा उपयोग अनेक प्राण्यांत सर्रास केला जातो. कारणपरत्वे सूचक असे निरनिराळे आवाजही केले जातात. रातकिडे, मासे, बेडूक, कुत्रा, मांजर वगैरे अनेक प्राणी जरी आवाजी संकेत देत असले, तरी पक्षी वर्गात त्यांचा विशेष वापर केला जातो.

पक्ष्यांच्या आवाजाचे मुख्यत: दोन प्रकार पडतात : कंठजन्य (कंठातून निघालेला) व अकंठजन्य (कंठातून न निघालेला). पहिला प्रकार पक्ष्यांत सामान्यत: (पेलिकन व इतर काही अघोषी–आवाज काढू न शकणारे–पक्षी वगळता) आढळतो. दुसऱ्या प्रकारात लयबद्ध रीतीने झाडाच्या खोडावर चोचीने जोरात टक् टक् आवाज करणारा सुतार, चोचीचा चिपळ्यांसारखा वापर करून सु. पाऊण किमी. लांब अंतरावर ऐकू जाईल असा खडखडाट करणारे काही बलाक यांचा समावेष होतो. तसेच मोर्निंग डोव्ह, गोल्डन आय डक (सोनेरी डोळे असलेले बदक), चिमनी स्विफ्ट, वुडकॉक हे पक्षी पंख किंवा शेपटीच्या पिसांचा वापर करून निरनिराळे आवाज करतात.

पक्ष्यातील कंठजन्य आवाज हा श्वासनालाच्या बुडाशी असलेल्या कूजित्र (सिरिंक्स) ह्या स्वरयंत्रामुळे निर्माण होतो. आत घेतलेल्या हवेमुळे स्वरयंत्रातील अर्धचंद्राकृती स्नायुमय पटलांच्या जोडीच्या कंपनाने ध्वनिनिर्मिती होते. 

पक्ष्यातील कंठजन्य आवाजाचेही दोन प्रमुख प्रकार पडतात : साद स्वर (कॉल नोट्‌स) आणि गान किंवा गाणे. पहिल्या प्रकारातील आवाज सरळ (साधा) व त्रोटक (कमी अवधीचा) असतो आणि मानवाप्रमाणे भाषण शक्य नसल्याने पक्ष्यांची ही बोली उद्‌गारासारखी भासते. साद स्वरांचा पक्ष्यांना फार उपयोग होतो उदा., भयाची सूचना देणे, पीडा, क्लेश किंवा आपत्तीत सापडल्याचे सुचविणे ह्यासाठी त्यांचा उपयोग होतो. चक्रवाक व चक्रवाकी रात्री विरही आक्रंदन करतात असे उल्लेख संस्कृत वाङ्‌मयात आढळतात. तसेच एकत्रित येण्यासाठी, शत्रूचा सामूहिक मुकाबला करण्यासाठी, अन्न मिळण्याची शक्यता आहे हे इतर स्वजातीयांना सांगण्यासाठी, विणीचा हंगाम, घरटी बांधणे इ. सुचविण्यासाठी, ओळख पटविण्यासाठी भिन्न जातींतील पक्षी निरनिराळ्या साद स्वरांचा उपयोग करतात.

पक्ष्यांत साद स्वर फार उपयोगी पडत असले, तरी त्यांचे मधुर, मंजूळ गाणे ह्या दुसऱ्या उपयोगी कंठजन्य आवाजाचा प्रकार आपल्याला अधिक मोहून टाकतो. म्हणूनच आपण पक्षिगान हे एक पक्षिवैशिष्ट्य समजतो. साद स्वर व पक्षिगान ह्यांत बराच भेद असला, तरी त्यांची निश्चित अशी व्याख्या करता येत नाही. सर्वसामान्यपणे पक्ष्याचे गाणे हा अधिक सूचक, सतत, अधिक काळ चालणारा किंवा अखंड पुनरावृत्ती असलेला, शास्त्रीय दृष्ट्या काहीसा भिन्न आणि जटिल (गुंतागुंतीचा) मोठा पण कानाला गोड वाटणारा संचारण प्रकार आहे. 

कोकिळ (नर), नाइटिंगेल, हिमालयातील ग्रे विंग्ड (करडे पंख असलेला) ब्लॅकबर्ड, बँटिंग, बिटर्न, चॅफिंच, रॉबिन, शमा, स्टार्लिंग, टिट, वॉर्व्लर, वुडपेकर, डोव्ह, वुडपिजन, स्कायलार्क, बुलबुल, डोंगरी मैना, कार्डिनल, कस्तूर, चॅट्‌स, ओव्हनबर्ड किंवा यूरोपीयन विलो रेन वगैरे सु. पन्नास जातींचे पक्षी गाऊ शकतात. प्रसिद्ध भारतीय पक्षिशास्त्रज्ञ सलीम अली यांच्या मते हिमालयातील ग्रे विंग्ड ब्लॅकबर्ड (टर्डस बुलबुल) हा भारतातील सर्वोत्कृष्ट गाणारा पक्षी आहे. त्याच्या खालोखाल मलबार व्हिसलिंग थ्रश–कस्तूर–(मायोफोनियस हॉर्सफिल्डाय) आणि शमा (कॉप्सिकस मलबॅरीकस) यांचा क्रम लागतो. पॅसेरिफॉर्मिस गणात बऱ्याच प्रगत गानपक्ष्यांचा समावेश होतो. सामान्यत:  पक्षिगान हे नराचे (उदा., कोकिळ) वैशिष्ट्य असल्याचे आढळून येते. असे असले तरी स्वॅलो, डिपर, रॉबिन, स्टार्लिंग इ. जातींत मादीही गाते. नराच्या संप्रेरक द्रव्यांचे (हार्मोनांचे) अंत:क्षेपण केल्यास (शरीरात टोचल्यास) मादी गाण्यास प्रवृत्त होते, असे प्रयोगांवरून आढळून आले आहे. 


पक्ष्यांत गाण्याचा उपयोग पुढील मुख्य कारणांसाठी केला जातो : (१) प्रादेशिक अधिकार किंवा सार्वभौमत्व — ह्यात नर घरटे बांधण्यापूर्वी जागा निश्चित करतो. जागेची निश्चिती होताच तेथील झाडांचा शेंडा, धुराड्याचे टोक इ. उंच जागी बसून तो आपले सार्वभौमत्व गाण्याने सर्वांस जाहीर करतो. अशा गाण्याने इतर नरप्रतिस्पर्ध्यास परावृत्त होण्याची सूचना तर दिली जातेच, पण आसपास उडणाऱ्या मादीस निमंत्रणही दिले जाते. म्हणूनच ह्या गाण्यास ‘जाहिरातीचे गाणे’ म्हटले जाते. (२) काही पक्षी गाऊन आपल्या जातीचा सहचर किंवा सहचारिणीस आकृष्ट करतात. वॉर्ब्लरसारख्या काही पक्ष्यांत आकृष्ट झालेली मादी जवळ आल्यावरही नरास आपले गाणे जोरजोरात चालू ठेवावे लागते, नाही तर ती त्याला सोडून जाते. (३) गाण्यावरून पक्ष्याची जाती तसेच वैयक्तिक ओळख पटू शकते. त्यामुळे पक्ष्यात गाणारा पक्षी हा सहचर आहे की प्रतिस्पर्धी आहे हे ओळखता येते. विणीच्या हंगामातील एका जोडीतील नर व मादी स्थलांतरात अलग झाले असतील, तर पुढील हंगामात गाण्याने एकमेकांस ओळखून परत जोडीने राहू शकतात. मोठ्या भागातील (प्रदेशातील) अनेक नर एकमेकांना गाण्याने ओळखतात व त्या प्रदेशात कोणी नव्याने शिरकाव करू पहात असेल, तर परकीय म्हणून ओळखून हाकलून लावू शकतात. काही पक्षिगान अभ्यासक नुसत्या गाण्यावरून पक्षी वैयक्तिक रीत्या ओळखू शकतात. (४) काहींत नर-मादी जोडीने द्वंद्वगीत गातात. पक्ष्यांतील द्वंद्वगीत हा एक अलगूज किंवा घंटेसारखा नाद होणारा व कर्णमधुर असा गानप्रकार आहे. ओव्हनबर्ड (यूरोपीयन विलो रेन), बेल श्राइक किंवा फक्त आफ्रिकेत आढळणाऱ्या लॅनिअरिअस गणाच्या सु. १५ जाती ह्या द्वंद्वगीतासाठी फार प्रसिद्ध आहेत. श्राईकांच्या द्वंद्वगीताचा  डब्ल्यू. एच्. थॉर्प व त्यांचे सहकारी यांनी सखोल शास्त्रीय अभ्यास केला आहे. काही वेळा जोडीऐवजी शेजारच्या भागातील पक्षी सहभागी झाल्याने तीन, चार किंवा पाच पक्षी सामूहिक रीत्या गाणी गात असल्याचे त्यांना आढळून आले. थॉर्प ह्यांच्या मते द्वंद्वगीताचा उपयोग प्रामुख्याने दाट झाडीत जिथे सहचर दिसणे अवघड होते अशा वेळी एकमेकांशी संचारण ठेवण्यासाठी होऊ शकतो. घुबडांच्या काही जातींतही द्वंद्वगीत गायले जाते. (५) हॉर्न्ड लार्क, गोल्ड फिंच, ओव्हनबर्ड, कस्तूरक (ब्लॅकबर्ड), रेन्स वगैरे पक्षी उडताना (आकाशात झेपावताना) गाणी गातात. (६) काही पक्षी दिवसाच्या विशिष्ट वेळी गाणी गातात. सामान्यत:  दिवस उजाडताच, निवाऱ्याच्या जागेहून बाहेर पडताना पक्षी गाणी गातात. काही संधिप्रकाशाच्या वेळी (अंधार पडण्यापूर्वी) (उदा., रॉबिन), तर काही रात्र झाल्यावरही गात राहतात (उदा., मॉकिंग बर्ड, चॅट्‌स, मार्श रेन इ.), अकॅडियन फ्लायकॅचर सकाळी व संध्याकाळी वेगळी गाणी गातो. पक्षिगान विशेषत: वसंत ऋतूत ऐकू येते (उदा., कोकिळ). (७) काही पक्षी अनुकृती (नक्कल) म्हणून गातात अगर शब्दोच्चार करतात. असे पक्षी दुसऱ्या जातींच्या गाण्यांची हुबेहूब नक्कल करतात (उदा., ब्राउन थ्रॅशर, कॅटर्बा, बॉबव्हाइट, पोपट इ.). अनुकृती नेमकी का केली जाते, तिला अतिजीवितेच्या (बिकट परिस्थितीत जिवंत राहण्याच्या) दृष्टीने महत्त्व आहे काय यावर शास्त्रज्ञांत एकमत नाही. (८) वरील कारणांखेरीज इतरही काही कारणांसाठी पक्षी गातात उदा., अंडी उबविताना आळीपाळीने ते ते काम करण्यासाठी नर-मादी गाऊन सुचवितात. भावनांना वाट देण्यासाठी, त्या व्यक्त करण्यासाठी, तर काही भांडताना एकमेकांना गाऊन आव्हान देतात.

  

पक्षिगान हे जटिल असून त्याच्या शास्त्रीय गुणधर्मांचा आजकाल बराच सखोल अभ्यास केला जात आहे. एका पाळलेल्या नाइटिंगेलचे गाणे सर्वप्रथम ध्वनिमुद्रित केले गेले. पक्ष्यांच्या आवाजाच्या, पक्षिगानाच्या ध्वनिमुद्रिका एच. एम. व्ही. कंपनीने लंडन येथे १९०८ साली व लूटव्हिक कॉख यांनी तयार केलेल्या ध्वनिमुद्रिका बर्लिन येथे १९१० साली विक्रिस ठेवल्या गेल्या पण त्यांच्या प्रती आज उपलब्ध नाहीत. त्यानंतर १९२२ पासून अशा ध्वनिमुद्रिका तयार करणे परत सुरू झाले. १९३२ साली वेगवेगळ्या सु. ९ १९४२ मध्ये सु. ५० १९५२ मध्ये सु. १००, तर १९६२ सालापर्यंत अधिक वेळ चालणाऱ्या ध्वनिमुद्रिकांसह सु. २५० ध्वनिमुद्रिका जपान, रशिया, अमेरिका, यूरोपमध्ये विक्रीस ठेवण्यात आल्या.

 अगदी सुरुवातीस पक्षिगानाचे ध्वनिमुद्रण ही एक खटाटोपाची व जिकिरीची बाब असे. त्याकरिता लागणारे साहित्य अवजड असे व त्याचा पसाराही फार होत असे. आता फीतमुद्रक, अन्वस्ती (पॅराबोलिक) ध्वनिग्राहक इ. सुवाह्य (वाहून नेण्यास सुलभ असलेल्या) ध्वनिमुद्रण सामग्रीमुळे पक्षिगानमुद्रण फार सुलभ झाले आहे. १९६२ सालापर्यंत सु २,३०० पक्ष्यांचे आवाज ध्वनिमुद्रित केले गेले. आता तर सु. २/३ यूरोपीयन व उत्तर अमेरिकेतील पक्ष्यांचे आवाज फीतमुद्रित केले गेले आहेत. 

  

पक्षिगानाचा अभ्यास मानक (प्रमाणभूत) संगीतलेखन तसेच दोलनलेखक, ध्वनिवर्णपटलेखक व अन्य इलेक्ट्रॉनीय पद्धतींचा अवलंब करून मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणाने केला जातो. त्यावरून दोन किंवा अधिक पक्ष्यांच्या गाण्यांचा तुलनात्मक अभ्यास करता येतो.  पक्षिगानात ध्वनीची उच्चनीचता, गरिमा (ध्वनीचा लहानमोठेपणा), गुणवत्तात्मक फरक (उदा., शीळ घातल्यासारखा, घोघरा, शोकपूर्ण, सकंप, तंतुमय आवाज इ.) स्वरातील फरक वगैरे परिवर्ती प्रकार व त्याची कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांची संख्या) ह्यांचा विचार केला जातो. उदा., शृंगी घुबडाच्या घुमण्याची (घू घू आवाज करण्याची) कंप्रता सु. १५० असते. ह्या अभ्यासाने पक्ष्याच्या वैयक्तिक गायन प्रकारात निरनिराळ्या किती गाण्यांचा (उदा., दोन ते सात) साठा आहे, त्या जातीत किती साठा आहे त्यातील बोलीमध्ये काही फरक आहे काय, त्यात परिस्थितिजन्य बदल होतात काय (उदा., माणसाची चाहूल लागल्याने सकाळ, दुपार इ. वेळी होणाऱ्या प्रकाशातील बदलाने पक्षिगानात बदल होतात) दिवसभरात पक्षी किती गातो [ उदा., रेड आईड (लाल डोळ्यांचा) व्हिरिओ उजाडल्यापासून अंधार पडेपर्यंत सु. २२,१९७ वेळा गातो] असाही अभ्यास केला जातो.

पक्ष्यात गाणे कसे निर्माण झाले ह्या विषयीही शास्त्रज्ञांत एकवाक्यता नाही. काहींच्या मते प्रथम साद स्वर व नंतर गाणे निर्माण झाले. पक्षिगान काहींत जननिक (आनुवंशिकतेने उदा., फांदीसारख्या आधाराला घट्ट पकडून बसणारे–पर्चिंग–बहुतेक पक्षी) तर इतरांत अध्ययनाने निर्माण होते. काही पक्ष्यांत बाल्यावस्थेत अध्ययनाने ही कला आत्मसात केली जाते. काहींत अध्ययनाचा क्रांतिक काल असतो. पक्षिगानाचे शास्त्रीय विवेचन असे जटिल असले, तरी सामान्यत:  पक्षिगान हे कानाला मधुर वाटणारे व मोहून टाकणारे असते, ह्यात शंकाच नाही.

संदर्भ : 1. Armstrong, E. A. A Study of Bird Song, New York,  1963.

    2. Thorpe, W. H. Bird Song, London, 1961.

परांजपे, स. य.