अश्क’—उपेंद्रनाथ अश्क : (१४ डिसेंबर १९१०— ). आधुनिक हिंदी नाटककार, कादंबरीकार व कथाकार. जलंदर (पंजाब) येथे जन्म. शिक्षण बी. ए., एल्एल्. बी. पर्यंत. काही काळ ते ‘आकाशवाणीत’ नोकरीस होते. तथापि त्यानंतर लेखन हाच त्यांचा व्यवसाय झाला आहे. आरंभीचे काही लेखन उर्दू आणि पंजाबी भाषांतून केल्यानंतर त्यांनी हिंदी लेखनास सुरुवात केली (१९३५). छठा बेटा (१९४०), अंजोदीदी (१९५३-५४) आणि कैद (१९४३—४५) ही त्यांची उत्कृष्ट नाटके मानली जातात. मोजक्या संवादांत पात्रांच्या व्यक्तिरेखा ठळकपणे उभ्या करणे हे त्यांच्या नाट्यलेखनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. प्रयोगशीलतेच्या आणि तंत्रांच्या दृष्टीनेही त्यांची नाटके महत्त्वाची आहेत. त्यांनी लिहिलेल्या व एकांकिका (एकांकी) सु. ५० असून त्यांतील काही प्रायोगिक दृष्ट्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी (उपन्यास) गिरती दीवारें (१९४५), गर्म राख (१९५२), शहर में घूमता आईना (१९६३), एक नन्ही किन्दील (१९६९) ह्या यथार्थवादी (वास्तववादी) परंपरेतील महत्त्वपूर्ण कादंबऱ्या होत. आपल्या कादंबऱ्यांतून मध्यमवर्गीय जीवनाचे त्यांनी केलेले चित्रण अत्यंत वस्तुनिष्ठ आणि रेखीव आहे. त्यांच्या कथा (कहानी) यथार्थवादाच्या आदर्शोन्मुख आणि विशुद्ध अशा दोन्ही परंपरांतील आहेत. त्यांनी लिहिलेल्या सु. दोनशे कथा, छीटे, चट्टान,बैंगन का पौधा, जुदाई की शाम का गीत, काले साहब, दो धारा, कहानी लेखिका और जेहलम के सात पुल  इ. संग्रहांत समाविष्ट आहेत. यांखेरीज निबंध, लेख, समीक्षा, संस्मरणिका, अनुवाद इ. स्वरूपांतही त्यांनी विपुल लेखन केले आहे. हिंदी साहित्यातील यथार्थवादी परंपरा समृद्ध करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. बदलत्या वाङ्‌मय समस्यांची व प्रवृत्तींची जागरूकतेने दखल घेऊन स्वत:चे वाङ्‌मय व्यक्तिमत्त्व निरंतर विकसनशील ठेवणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होय. ललितकला अकादमीने १९६५ मध्ये एक श्रेष्ठ नाटककार म्हणून पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.

संदर्भ :   १. जयनाथ नलिन, हिंदी नाटककार, दिल्ली, १९६१.

२. मदान, इंद्रनाथ, संपा. उपन्यासकार अश्क, अलाहाबाद, १९६०.

बांदिवडेकर, चंद्रकांत