चार्ली

ब्रॉड, चार्ली डनबार : (३० डिसेंबर १८८७ – ११ मार्च १९७१). रसेल आणि मुर यांच्या नंतरच्या पिढीतील ब्रिटिश तत्ववेत्ते. रसेल आणि मुर यांप्रमाणेच जे. एम्. ई. मक्टॅगर्ट आणि डब्ल्यू. ई. जॉन्सन ह्या केंब्रिज तत्त्ववेत्त्यांचा ब्रॉड यांच्यावर विशेष प्रभाव होता. ज्ञानमीमांसा, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र आणि इतिहासाचे तत्त्वज्ञान ही ब्रॉड यांच्या तात्त्विक चिंतनाची प्रमुख क्षेत्रे होती. पण ह्याबरोबरच अतींद्रिय मानसान्वेषण ह्या बऱ्यचशा उपेक्षित आणि संशयास्पद मानल्या गेलेल्या क्षेत्रातही ब्रॉड यांनी पद्धतशीरपणे काम केले. त्यांचा जन्म लंडनच्या हर्लेस्डन ह्या उपनगरात झाला. शिक्षण डल्विच कॉलेज आणि नंतर ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे. ब्रॉड हे प्रथम विज्ञानाचे विद्यार्थी होते आणि नंतर तत्त्वज्ञानाकडे वळले. वैज्ञानिक संकल्पनांचे आणि उपपत्तींचे त्यांना असलेले विस्तृत व चोख ज्ञान तत्त्वज्ञानातील समस्यांचे विश्लेषण करताना त्यांना निःसंशय उपयुक्त ठरले. तत्त्वज्ञानाचे अध्यापक म्हणून सेंट अँड्र्यूझ विद्यापीठ, ब्रिस्टोल विद्यापीठ आणि केंब्रिज विद्यापीठ येथे त्यांनी काम केले. १९३३ ते ५३ पर्यंत ते केंब्रिज विद्यापीठात ‘नैतिक तत्त्वज्ञानाचे नाइट् ब्रिज प्राध्यापक’ होते.

ब्रॉड यांना स्वतःचा तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन नव्हता. समग्र विश्वाच्या स्वरूपाविषयीचे तत्त्वमीमांसक ‘दर्शन’ किंवा तर्कबद्ध आणि सुव्यवस्थित अशी सिद्धांतप्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. तत्त्वज्ञानात प्रचलित असलेल्या समस्यांना आतापर्यंत जी उत्तरे तत्त्ववेत्त्यांनी दिली होती त्यांची चिकित्सा करून, त्यांत सारअसार असा भेद करून ह्या समस्यांचे विवेचन त्यांनी केले. ह्या समस्या मुख्यतः ज्ञानमीमांसा, मनाचे स्वरूप, नीतिशास्त्र, विगमन आणि अतींद्रिय मानसान्वेषण या क्षेत्रांत मोडतात.

ज्ञानमीमांसा हा ब्रॉड यांच्या चिंतनाचा एक प्रमुख विषय होता. प्रत्यक्षज्ञानाच्या संदर्भात ते ‘वेदनदत्त उपपत्ती’ (सेन्स-डेटम थिअरी) स्वीकारतात. जेव्हा एखाद्या भौतिक वस्तूचे-उदा., रुपयाचे नाणे-आपल्याला प्रत्यक्षज्ञान होत असते तेव्हा त्याच्यामध्ये एका वेदनदत्ताची आपल्याला झालेली साक्षात् जाणीव अंतर्भूत असते आणि ह्या वेदनदत्तापासून त्याचे कारण असलेल्या भौतिक वस्तूचे आपण अनुमान करीत असतो अशी ही उपपत्ती आहे. वेदनदत्ताचे गुणधर्म आणि संबंधित भौतिक वस्तूचे गुणधर्म यांच्यात कोणते आणि किती प्रमाणात साधर्म्य असते, ह्या प्रश्नाचे उत्तर संबंधित पुराव्याचा विचार करून दिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. वेदनदत्त-उपपत्ती ही प्रत्यक्षज्ञानाचे वर्णन करण्यासाठी रचण्यात आलेली केवळ एक पर्यायी परिभाषा आहे,-भौतिक वस्तूंच्या परिभाषेला पर्यायी असलेली परिभाषा-हे ए. जे. एअर ह्यांचे मत ब्रॉड नाकारतात.

केंब्रिजमधील आपले पूर्वसूरी हेन्री सिज्विक ह्या तत्ववेत्त्यांप्रमाणे ब्रॉड ह्यांनीही अतींद्रिय मानसान्वेषणामध्ये पद्धतशीरपणे आणि चिकित्सक दृष्टिकोन कधी न सोडता बराच भाग घेतला. ज्यांना अधिसामान्य (पॅरानॉर्मल) घटना असे म्हणण्यात येते – उदा., परचित्तज्ञान, दूरवस्तुचालन (टेलीकायनेसिस), पूर्वज्ञान (प्रिकॉग्निशन) इ. – त्या जर खरोखर घडून येत असतील तर ही गोष्ट ध्यानात घेऊन तत्वज्ञानातील कित्येक मूलभूत समस्यांकडे वेगळ्या दृष्टीने पहावे लागेल, असे त्यांचे म्हणणे होते. उदा., कार्यकारणभाव ह्या संबंधाचे स्वरूप, मन आणि शरीर यांचा संबंध इ. समस्या. अधिसामान्य घटना तर्कतःच आत्मविसंगत असतात, हे मत खोडून काढायचा ब्रॉड ह्यांनी प्रयत्न केला आणि त्या घडून येतात ही शक्यता खुली ठेवून शरीर व मन यांच्यामधील संबंधाचे विवरण त्यांनी केले. मेंदूत घडणाऱ्या घटनांवर मानसिक घटना अवलंबून असतात हा अनुभव आहे पण आत्मा किंवा मन हे मरणानंतर अस्तित्वात राहते असे असेल, तर काही मानसिक घटना मेंदूतील घटनांवर अवलंबून नसतात हे मान्य करावे लागते. ह्याचा उलगडा करण्यासाठी ‘मनोनिर्माता’ असा एक घटक असतो हे गृहीतक ब्रॉड यांनी स्वीकारले आणि आपल्या परिचयाच्या मानसिक घटना ह्या मज्जासंस्था आणि मनोनिर्माता घटक या दोहोंचा संयुक्त आविष्कार असतात अशी शक्यता पुढे केली. ज्या मानसिक घटना मरणोत्तर घडून येतात त्या केवळ मनोनिर्मात्या घटकाचा आविष्कार असतात असे मग मानता येते.

वैज्ञानिक उपपत्ती ह्या अनुभवजन्य पुराव्याच्या निकषावर प्रमाण किंवा अप्रमाण ठरतात, पण तत्वज्ञानात्मक उपपत्ती ह्या वेगळ्या प्रकारच्या असतात असे ब्रॉड यांचे मत होते. विश्वाची जी मूलभूत आणि सार्वत्रिक वैशिष्ट्ये आहेत त्यांचा शोध तत्वज्ञानात घेतला जातो आणि ह्या वैशिष्ट्यांचे वर्णन करणारी तत्वे जरी आपल्या अनुभवात प्रत्ययाला येत असली, तरी वैज्ञानिक नियमांप्रमाणे त्यांचे प्रामाण्य अनुभवावर आधारलेले नसते, असे त्यांनी प्रतिपादन केले. म्हणून अंतःप्रज्ञ वा प्रातिभज्ञान प्राप्त करून देणारी ज्ञानशक्ती असते आणि तिच्यामुळे कित्येक सार्वत्रिक आणि मूलभूत तत्वांचे अनुभवनिरपेक्ष असे ज्ञान आपल्याला होते, अशी ब्रॉड यांची भूमिका आहे. ह्या भूमिकेचा भाग म्हणून आपल्या सर्वच संकल्पना अनुभवजन्य नसतात, तर काही संकल्पना पूर्वप्राप्त असतात हे मत ते स्वीकारतात.

संभाव्यता आणि विगमन ह्या समस्येविषयी ब्रॉड यांनी जो सिद्धांत मांडला तोच स्वतंत्रपणे जे. एम्. केन्स यांनीही मांडला. हा सिद्धांत असा, की विगमन ही वस्तूंविषयी सत्य विधाने प्रस्थापित करण्याची एक प्रमाण पद्धती आहे असे जर मानायचे असेल, तर विश्वाची घडण एका विशिष्ट स्वरूपाची आहे असे मानावे लागते. हे स्वरूप असे, की विश्वात जे भिन्न असे मूळ वस्तुप्रकार आहेत ते मर्यादित आहेत आणि हे वस्तुप्रकार वेगवेगळ्या प्रकारे संघटित झाल्याने विश्वातील सर्व विविधता निर्माण होते. ‘मर्यादित स्वतंत्र विविधतेचे तत्व’ ह्या नावाने हा सिद्धांत ओळखला जातो आणि तो सत्य आहे असे मानायला आधार आहे, असे ब्रॉड यांचे मत होते.

नीतिशास्त्रामध्ये प्रचलित नैतिक उपपत्तींची चिकित्सा करण्यावर ब्रॉड यांनी भर दिला. ह्या उपपत्तींमधील प्रकारभेद त्यांनी स्पष्ट केले आणि त्या कोणत्या गृहीत कृत्यांवर आधारलेल्या आहेत व त्यांच्यापासून कोणते निष्कर्ष निष्पन्न होतात ह्याचे विवरण केले. उदा., ‘हे कृत्य योग्य आहे’ ह्या वाक्याने (१) ह्या कृत्याविषयीच्या वक्त्याची आवड किंवा इच्छा व्यक्त होते किंवा त्याने दिलेल्या आदेश व्यक्त होतो (२) किंवा त्या कृत्याविषयीची वक्त्याची पसंतीची भावना व्यक्त होते (३) किंवा त्या कृत्याच्या अंगी एक विशिष्ट धर्म आहे असे प्रतिपादन करणारे वस्तुनिष्ठ विधान व्यक्त होते अशा वेगवेगळ्या नैतिक उपपत्ती प्रचलित आहेत. त्यांचे विश्लेषण ब्रॉड यांनी केले पण कोणत्याही विशिष्ट उपपत्तीचा ठामपणे स्वीकार केला नाही किंवा स्वतःची अशी स्वतंत्र उपपत्तीही विकसित केली नाही.

ब्रॉड यांचे विशेष महत्वाचे ग्रंथ असे : पर्सेप्शन, फिजिक्स अँड रिॲलिटी (१९१४), साइंटिफिक थॉट (१९२३), द माइंड अँड इट्स प्लेस इन नेचर (१९२५), फाइव टाइप्स ऑफ एथिकल थिअरी (१९३०), एक्झामिनेशन ऑफ मक्टॅर्ग्ट्‌स फिलॉसॉफी (२ खंड, १९३३, १९३८), एथिक्स अँड द हिस्टरी ऑफ फिलॉसॉफी (१९५२), लेक्चर्स ऑन सायकीकल रिसर्च (१९६३) इत्यादी. केंब्रिज येथे ते निधन पावले.

संदर्भः Schilpp, P. A. Ed. The Philosophy of C. D. Broad, New York, 1959.

रेगे, मे. पुं.