बाळकडू : पाने, कळ्या व फूल.

बाळकडू: (कडू हिं. खोरासनी कुटकी गु. कडू क. कटकरोहिणी सं. कटुकी, वक्राग्र, कटुरोहिणी इं. ब्लॅक हेलेबोर, ख्रिसमस रोझ लॅ. हेलेबोरस नायगर कुल-रॅनन्क्युलेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨ मोरवेलीच्या कुलातील ही सदापर्णी बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी)⇨ओषधी दक्षिण आणि मध्य यूरोपात, पश्चिम आशियात व भारतात (घाटांत व डोंगराळ भागांत) आढळते. सोळाव्या शतकापासून परदेशात ही उद्यानांत लागवडीत आहे. हिचे भूमिस्थित खोड [मूलक्षोड ⟶ खोड] निसर्गतः बहुधा खडकाळ जागी वाढते. पाने मूलज (गाजराच्या किंवा मुळ्याच्या पानांप्रमाणे, पण मूळ खोडापासून वर वाढलेली), लांब देठाची, गुळगुळीत, वर हिरवी गर्द पण खालच्या बाजूस फिकट, उभट, संयुक्त व अनियमित हस्ताकृती दले ७ – ९, अंशतः दातेरी फुलांचा दांडा, साधा किंवा एकदाच फांद्या फुटलेल्या व त्यांवर सच्छद मोठी (सु. ६ सेंमी. व्यासाची), पांढरी किंवा फिकट जांभळी, १-२ फुले हिवाळ्याच्या मध्यास (नाताळाच्या – ख्रिसमसच्या – सुमारास) येतात म्हणून त्यास ‘ख्रिसमस रोझ’ हे इंग्रजी नाव पडले आहे त्या सणापूर्वी ह्या वनस्पतीची बागेत भरपूर लागवड करतात. संदले ५, मोठी, पांढरी, सतत राहणारी व प्रदलसम (पाकळ्यांसारखी) पण फलनानंतर हिरवी पाकळ्या ८ – १३, मधुरसयुक्त, लहान नळीसारख्या केसरदले सर्पिल व अनेक किंजदेल ५ – १० व सुटी काही केसरदलांचे रूपांतर मधुप्रपिंडात (मधाच्या ग्रंथींत) झालेले असते [⟶ फूल]. ५ – १० पेटिकाफलांचे घोस येतात. बियांतील पुष्क (गर्भाभोवतीचा अन्नांश) तैलयुक्त अभिवृद्धी (लागण) बिया व खोडाचे तुकडे लावून करतात.

ह्या वनस्पतीच्या मूलक्षोडाचे बारीक करंगळीएवढे सुरकुतलेले पांढरट तुकडे बाजारात मिळतात कधीकधी त्यांत काळ्या कुटकीच्या [⟶ कुटकी] तुकड्यांची भेसळ असते कापलेल्या भागातील संरचनेतील फरकांमुळे ते ओळखू येतात. नेपाळ, हिमालय व अरबस्तानातून ते इकडे येतात. त्यात हेलेब्रिन, हेलेबोरीन, हेलेबोरेन ही ग्लुकोसाइडे असतात. ठराविक काळाने उद्‌भवणाऱ्या रोगलक्षणांचा (उदा., तापाचा) प्रतिबंध करण्यासाठी हे मुलांना योग्य प्रमाणात देतात, त्यामुळे ‘बाळकडू’ हे नाव पडले आहे. मूलक्षोड, पाने व मुळे विषारी असल्याने ती देताना सावधगिरी बाळगावी लागते जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास पेटके, आचके, ओकाऱ्या व क्वचित मृत्यूही येतो. मूलक्षोड विरेचक, आर्तवजनक (मासिक पाळी सुरु करणारे) व कृमिनाशक असते. डिजिटॅलिसप्रमाणे [⟶ डिजिटॅलिस पुर्पुरिया] हृदयाला बळ देणारे व स्थानिक (विशिष्ट जागी) बधिरता आणणारे असून त्याचा काढा मध घालून काविळीवर, चूर्ण मधाबरोबर ओकारी व उचकीवर आणि साखर घालून गरम पाण्याबरोबर कफ-पित्त ज्वरावर उपयुक्त असते. त्वचाविकारांवर चूर्ण गुणकारी असते.

पहा : रॅनन्क्युलेसी रॅनेलीझ.

संदर्भ : 1. Chopra, R. N. Nayar, S. L. Chopra, I. C.Glossary of Indian Medicinal Plants, New Delhi, 1956.

२. देसाई, वा. ग. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.

३. पदे, शं. दा. वनौषधी-गुणादर्श, मुंबई, १९७३.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.