बन्सन (बुन्सेन), रोबेर्ट व्हिल्हेल्म :(३१ मार्च १८११-१६ ऑगस्ट १८९९). जर्मन रसायनशास्त्र. ⇨गुस्टाक रोबेर्ट किरखोफ यांच्या बरोबर बन्सन यांनी लासायनिक वर्णपटीय विश्लेषणाचा [→वर्णपटविज्ञान] पाया घालण्याची महत्वाची कामगिरी केली. प्रयोगशाळेत नित्य वापरण्यात येणाऱ्या बन्सन ज्वालकाच्या [→ज्वालक] शोधाकरिता ते विशेष प्रसिद्ध आहेत.

त्यांचा जन्म गटिंगेन येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण तेथील विद्यापीठातच झाले व १८३० मध्ये आर्द्रतामापन या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली. १८३०-३३ या काळात त्यांनी पुष्कळ प्रवास करून युस्टुस फोन लीबिक, आइलहार्ट मिचर्लिख इ. यूरोपातील त्या काळातील मह्त्वाच्या रसायनशास्त्रज्ञांच्या भेटी घेतल्या, तसेच विविध कारखाने व प्रयोगशाळा पाहिल्या. १८३३ मध्ये गटिंगेन येथे परतल्यावर तेथील विद्यापीठत ते अध्यापक झाले. १८३६ मध्ये कासेल येथील तांत्रिक विद्यालयात त्यांची नेमणूक झाली. नंतर १८३८ मध्ये ते मारबुर्ख विद्यापीठात गेले व १८४१ मध्ये तेथे प्राध्यापक झाले. १८५१ साली ब्रेस्लौ येथील वास्तव्यात किरखोफ यांच्याशी त्यांची ओळख झाली. पुढील वर्षी हायडल्‌बर्ग विद्यापीठात त्यांची नेमणूक झाली व १८८९ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी तेथेच काम केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्राच्या अभ्यासाचे ते एक जगप्रसिद्ध केंद्र झाले.

सुरुवातीला १८३४ मध्ये त्यांनी आर्सेनियस अम्लाच्या लवणांच्या अविद्राव्यतेसंबंधी (न विरघळण्यासंबंधी) संशोधन करून सजल फेरिक ऑक्साइड हे आर्सेनिकाच्या विषबाधेवर उतारा म्हणून उपयुक्त आहे असे दाखविले व आजही या शोधाचा उपयोग केला जातो. १८३५-३६ मध्ये दुहेरी सायनाइडांवर संशोधन करीत असताना त्यांनी अमोनियम फेरोसायनाइड व अमोनियम क्लोराइड या दुहेरी लवणाचा शोध लावला. कॅकोडिल या कार्बनी संयुगाच्या अनुजातांसंबंधी (एका संयुगापासून तयार करण्यात येणाऱ्या इतर संयुगांसंबंधी) संशोधन करून त्यांनी १८३७-४२ या काळात त्यासंबंधी पाच निबंध प्रसिद्ध केले आणि त्यामुळे लीबिक व जे. जे. बर्झिलियस यांनी मांडलेल्या कार्बनी संयुगाच्या मूलक सिद्धांताला [→मूलके] महत्वचा आधार मिळाला. १८३८-४६ या काळात जर्मनीतील बिडाच्या उत्पादनाचा अभ्यास करताना भट्टीतून बाहेर पडणाऱ्या वायूंचे विश्लेषण करणाऱ्या दृष्टीने त्यांनी विविध पद्धती विकसित केल्या. या संशोधनावर आधारलेला आणि त्यांनी लिहिलेला एकमेव ग्रंथ Gasometrische Methoden १८५७ मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथामुळे ⇨वायू विश्लेषण ही एक अचूक विज्ञानशाखा म्हणून प्रस्थापित झाली. वायू विश्लेषणासाठी त्यांनी तयार केलेली शोषकतामापक व इतर उपकरणे ही त्यांच्या वैयक्तिक कौशल्याची द्योतक होती.

आइसलँड येथील मौंट हेल्ला या ज्वालामुखीच्या १९४५ मधील उद्रेकानंतर एक वर्षाने पाहणीसाठी गेलेल्या संशोधकांच्या गटात त्यांनी काम केले व तेथे त्यांनी ज्वालामुखीजन्य खडकांचा रासायनिक दृष्ट्या अभ्यास केला.या संदर्भात त्यांनी केलेली निरीक्षणे आधुनिक शिलाविज्ञानाच्या विकासात महत्वाची ठरली आहेत. तेथील ⇨गायझरांचाही (गरम पाण्याच्या नैसर्गिक कारंज्यांचाही) त्यांनी अभ्यास केला व त्यांच्या निर्मितीसंबंधी स्पषटीकरण मांडले.

इ. स. १८४० नंतरच्या दोन दशकांत बन्सन यांनी विद्युत् घटमालेत अनेक सुधारणा केल्या. १८४१ मध्ये त्यांनी कार्बनचे ऋणाग्र व नायट्रिक अम्ल वापरून एक विद्युत् घटमाला (बन्सन घटमाला) तयार केली. ४४ घटक असलेल्या घटकमालेपासून बन्सन यांनी तीव्र विद्युत् प्रज्योत निर्माण केली व तिच्या प्रकाशाचे मापन करण्यासाठी तेलाच्या ठिपक्याचा प्रकाशमापक [→प्रकाशमापन] त्यार केला. पुढे त्यांनी नायट्रिक अम्लाऐवजी क्रोमिक अम्ल आणि जस्त व कार्बन यांच्या पट्टया विद्युत् अग्रे म्हणून घटमालेत वापरल्या. १८५२ मध्ये आपल्या विद्युत् घटाचा उपयोग करून विद्युत् विच्छेदन (विद्रावातून वा वितळलेल्या संयुगातून विद्युत् प्रवाह नेऊन त्यातील घटक अलग करण्याची क्रिया) पद्धतीने त्यांनी क्रोमियम व मॅग्नेशियम या धातू त्यांच्या क्लोराइडांपासून शुद्ध स्वरूपात मिळविल्या. त्यानंतर याच पद्धतीचा विकास करून त्यांनी ॲल्युमिनियम, सोडियम इ. धातू त्यांच्या वितळलेल्या क्लोराइडांपासून शुद्ध स्वरूपात मिळविल्या आणि त्यामुळे पुढे विद्युत् विच्छेदनाने धातुकापासून (कच्च्या रूपातील धातूपासून) शुद्ध धातू मिळविण्याच्या प्रक्रिया विकसित होण्यास चालना मिळाली.

बन्सन यांनी १८५२-६२ या काळात सर हेन्री रॉस्को यांच्या समवेत हायड्रोजन व क्लोरीन या वायूंच्या रासायनिक संयोगावर प्रकाशाच्या होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करून प्रकाश रसायनशास्त्राचा पाया घालण्यास मदत केली. या अभ्यासावरून बन्सन यांनी सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणाचे (तरंगरूपी उर्जेचे) अंदाजी मूल्य काढण्याचा पहिला प्रयत्न केला.

त्यांनी त्यांचा प्रसिद्ध ज्वालक १८५० नंतरच्या दशकात विकसित केला. मायकेल फॅराडे व एमे अरगँड यांच्या शोधांचा या कामी त्यांना उपयोग झाला. या ज्वालकाचा उपयोग बन्सन यांनी धातू व त्यांची लवणे त्यांच्या विशिष्ट रंगयुक्त ज्योतींवरून ओळखण्याकरिता केला.

बन्सन व किरखोफ यांनी १८६० नंतरच्या दशकात वर्णपटविज्ञनात मह्त्वाचे संशोधन केले. १८५९ मध्ये किरखोफ यांना असे आढळून आले की, तापविलेल्या पदार्थंच्या रंगीत ज्योती सामान्यतः तेजस्वी व रेखीव उत्सर्जन वर्णपट देतात पण त्या एखाद्या तीव्र प्रकाश उद्‌गमाच्या मार्गात ठेवल्यास इतर वेळी उत्सर्जित होणाऱ्या त्याच तरंगलांबीच्या प्रकाशाचे त्या शोषण करतात व वैशिष्ट्यपूर्ण शोषण वर्णपट देतात. पृथ्वीवरील व अवकाशातील द्रव्यांचे रासायनिक संघटन निर्धारित करण्यासाठी त्यांच्या शोषण वर्णपटांचे विश्लेषण करणे उपयुक्त ठरेल, असे बन्सन यांना दिसून आले. तसेच अत्यल्प प्रमाणात उपस्थित असलेली अथवा पारंपरिक रासायनिक तंत्राने ज्ञात मूलद्रव्यांपासून वेगळी अशी ओळखता येणार नाहीत अशी नवी मूलद्रव्ये वर्णपटीय विश्लेषणाने ओळखता येतील. असेही त्यांनी प्रतिपादन केला. या पद्धतीने बन्सन व किरखोफ यांनी १८६० मध्ये सिझियम आणि १८६१ मध्ये रुबिडीयम या मूलद्रव्यांचा शोध लावला. नंतरच्या काळात इतर शास्ज्ञज्ञांनी कित्येक नवीन मूलद्रव्यांचा (उदा., थॅलियम, इंडीयम इ.) वर्णपटीय विश्लेषणाने शोध लावला.

वरील कार्यांखेरीज बन्सन यांनी मुक्त आयोडिनाचे अनुमापन [→अनुमापन], प्लॅटिनम काढून घेतल्यावर राहिलेल्या धातुकातील पॅलॅडियम, रुथेनियम इ. धातू अलग मिळविण्याच्या पद्धती, उष्णतामापन इत्यादींसंबंधी महत्वाचे संशोधन केलेले होते.

अनेक यूरोपीय वैज्ञानिक संस्थांनी बन्सन यांना सन्मान दिले. लंडनची केमिकल सोसायटी (१८४२) आणि रॉयल सोसायटी (१८५८) आणि फ्रान्सची ॲकॅडेमी दे सायन्सेस (१८८२) या संस्थांचे ते परदेशी सदस्य होते. रॉयल सोसायटीने बन्सन यांना १८६० मध्ये कॉल्पी पदक आणि बन्सन व किरखोफ यांना १८७७ साली पहिले डेव्ही पदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. बन्सन यांनी उद्योगधंद्यांना उपयुक्त अशा केलेल्या वैज्ञानिक कामगिरीबद्दल इंग्लिश सोसायटी ऑफ आर्ट्‌स या संस्थेने १८९८ मध्ये त्यांना ॲल्बर्ट पदकाचा बहुमान दिला. ते हायडल्बर्ग येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि. घाटे, रा. वि.