नीलारूणी रोग : (परप्युरा). ज्या विकृतीमध्ये त्वचेच्या वा श्लेष्मकलेच्या (शरीरातील आतडे, गर्भाशय इ. नलिकाकार पोकळ्यांच्या आतील भागावरील बुळबुळीत अस्तराच्या) वा दोहोंच्याही खाली आपोआप व जागजागी रक्तस्राव होतात त्या सर्वांना मिळून नीलारुणी रोग अशी संज्ञा वापरतात. हे रक्तस्राव जेव्हा टाचणीच्या डोक्याच्या आकाराएवढे छोटे असतात तेव्हा त्यांना ताम्रवर्णी ठिपके म्हणतात. मोठ्या पसरट आकाराच्या रक्तस्रावांना नीलत्वचा म्हणतात. हे रक्तस्राव बिंबाणूंच्या (रक्तातील लाल कोशिकांपेक्षा – पेशींपेक्षा – बऱ्याच लहान असलेल्या २ – ४ मायक्रॉन व्यासाच्या अनियमित आकाराच्या तबकड्यांच्या १ मायक्रॉन = १०-३ मिमी.) गुणधर्मांतील किंवा संख्येतील दोषापासून किंवा केशवाहिन्यांच्या (सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या) भित्तिदोषापासून उद्‌भवतात. रक्त साकळण्याच्या क्रियेशी बिंबाणू संबंधित असून त्यांची संख्या प्रती घ. मिमी. निरोगी रक्तात २,००,००० ते ५,००,००० असते.

वर्गीकरण : नीलारुणी रोगांचे दोन प्रमुख वर्ग पाडतात : (१) बिंबाणुजन्य नीलारुणी रोग आणि (२) अबिंबाणुजन्य नीलारुणी रोग. यांनाच अनुक्रमे (१) महाकवच कोशिकाजन्य व (२) अमहाकवच कोशिकाजन्य असेही म्हणतात (महाकवच कोशिका या अस्थिमज्जेत – हाडांच्या मध्यवर्ती पोकळीतील संयोजी म्हणजे जोडण्याचे कार्य करणाऱ्या कोशिकासमूहात – असणाऱ्या मोठ्या आकारमानाच्या कोशिका असून त्यांच्या तुकड्यांपासून बिंबाणू बनतात. या मूळ मोठ्या कोशिका रक्तप्रवाहात कधीही नसतात).

याशिवाय नीलारुणी रोगांचे संप्राप्तिनुरूप (कारणांनुरूप) वर्गीकरण करता येते. बिंबाणुजन्य नीलारुणी रोगांचे उपवर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात.

(अ) अज्ञानहेतुक बिंबाणुजन्य नीलारुणी रोग.

(आ) नीलारुणी रोगांचे दुय्यम प्रकार :

लाल रक्तकोशिका आणि बिंबाणू : एकच लाल रक्तकोशिका दाखवलेली असून इतर सर्व बिंबाणू आहेत.

(क) रासायनिक व इतर कारके(क) औषधग्राहितेशी संबंधित : (१) मलेरियारोधके – क्विनीन (२) उपदंशरोधके – आर्सेनिकयुक्त, बिस्मथ, पोटॅशियम आयोडाइड (३) संमोहके – फिनाबार्बिटोन, ब्युटोबार्बिटोन (४) सूक्ष्मजंतुरोधके – सल्फॉनामाइडे, क्लोरँफिनिकॉल, पेनिसिलीन इ. (५) मूत्रल (लघवी साफ करणारी) औषधे – थायझाइडे, ॲसिटाझोलामाइड (६) शांतके – मेप्रोबामेट (७) संधिवातरोधके – फिनिलब्युटाझोन (८) ज्वरशामके – सॅलिसिलेटे, अँटिपायरीन (९) झटकारोधके – ट्रायडिओन (१०) हृदयविकारावरील औषधे – डिजिटॉक्सीन, क्विनीडीन (११) ⇨ अवटू ग्रंथींच्या विकृतीवरील औषध – थायोयूरिया (१२) मधुमेहावरील औषधे – टॉलब्युटामाइड, क्लोरप्रोपामाइड (१३) इतर विविध पदार्थ – डीडीटी (क्लोरोफिनोथेन), स्टिबोफेन, डायनायट्रोफिनॉल, इस्ट्रोजेने (स्त्रीमदजन हॉर्मोने), केसांना लावण्याचे कार्बनी (सेंद्रिय) कलप, अरगट इत्यादी.

(क) मात्रेच्या प्रमाणामुळे परिणाम होणारी – कोशिका – विषारी (विशिष्ट अवयवाच्या कोशिकांवर विषारी परिणाम करणारी) औषधे, नायट्रोजन मस्टर्ड, मायलेरान वगैरे.

(क) शाकाहारी अन्नपदार्थ.

(क) सर्पविषे, कीटकदंश.

(ख) रक्तासंबंधीच्या विकृती : रक्तार्बुदे (कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेल्या रक्ताने युक्त असलेल्या गाठी), अस्थिमज्जेच्या विकृती, कर्करोग व क्षय.

(ग) प्लीहावृद्धीयुक्त विकृती : (पानथरीची वाढ होणाऱ्या विकृती).

(१) गौचर रोग : (पी. सी. ई. गौचर या फ्रेंच शरीरवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारा रोग). या आनुवंशिक रोगात प्लीहावृद्धी, रक्तक्षय व त्वचावर्णकता (त्वचेवर विशिष्ट रंगद्रव्य साचणे) ही प्रमुख लक्षणे असतात.

(२) फॅन्कोनी लक्षणसमूह : (जी. फॅन्कोनी या स्विस बालरोगतज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारा लक्षणसमूह). यात प्लीहावृद्धी व संधिवाताभ संधिशोथ (सांध्यांना दाहयुक्त सूज येणारा एक विकार) ही प्रमुख लक्षणे असतात.

(घ) संक्रामणजन्य विकृती : ⇨ जंतुरक्तता, अल्पतीव्र सूक्ष्मजंतुजन्य हृद्-अंतःस्तर शोथ, गोवर, प्रलापक सन्निपात ज्वर (टायफस ज्वर) वगैरे.

(च) इतर विविध प्रकार : ग्रंथिक रोग (लसीका ग्रंथींची वृद्धी असणारा, त्वचा व अंतस्त्यांना होणारा रोग लसीका ग्रंथ म्हणजे रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतील कोशिकांचा पुंज अंतस्त्य म्हणजे छाती व उदर यांतील अवयव), ⇨ आरक्त चर्मक्षय (या त्वचा रोगात चेहऱ्यावर नाक व दोन्ही गालांवर मिळून फुलपाखरासारख्या आकाराची लाली व फोड येतात).

वरील विवेचनावरून हे स्पष्ट ध्यानात येईल की, नीलारुणी रोग हे वस्तुतः रोगाचे नाव नसून अनेक विकृतींमध्ये आढळणाऱ्या एका लक्षणाचे नाव आहे. क जीवनसत्वाच्या न्यूनतेमुळे होणाऱ्या ⇨ स्कर्व्ही या रोगातही नीलारुणी रोग हे एक लक्षण असते.

अज्ञानहेतुक बिंबाणुजन्य नीलारुणी रोग किंवा वर्लहॉफ रोग: (पी. जी. वर्लहॉफ या जर्मन शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून ओळखण्यात येणारा रोग). तीव्र रक्तस्राव होणाऱ्या मानवी रोगांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक असते. बहुतकरून लहान मुलांत आणि कुमारावस्थेत आढळणाऱ्या या रोगात त्वचा व श्लेष्मकलेच्या खाली अकस्मात ताम्रवर्णी ठिपकेवजा रक्तस्राव होतात. कोणताही लहानसहान आघात नीलत्वचा उद्‌भवण्यास पुरेसा असतो. रोगाचे कारण समजून न आल्यामुळे त्यास ‘अज्ञानहेतुक’ म्हटले आहे. बिंबाणु-अल्पता (बिंबाणूंची संख्या नेहमीच्यापेक्षा कमी होणे) हे एक लक्षण असते. या रोगात बिंबाणूंची संख्या प्रती घ. मिमी. रक्तामध्ये ५०,००० पेक्षाही कमी आढळते.


या रोगाचे दोन प्रकार आढळतात. (१) तीव्र : बहुधा स्वमर्यादित आणि परिवर्तनशील असणारा (उलटण्याची शक्यता असणारा) प्रकार. (२) चिरकारी : पुनरावर्ती आणि प्रत्यावर्ती असणारा प्रकार – रोगाची सुरुवात बहुधा एकाएकी होते. रक्तस्राव हे प्रमुख लक्षण असते. शरीराच्या निरनिराळ्या भागांत रक्तस्राव होतात. रक्तस्रावाचे प्रमाण अत्यल्प ते अतिगंभीर व कधीकधी मारक ठरण्याइतकेही असू शकते. रोगाची सुरुवात होण्यापूर्वी एखादा संसर्गजन्य रोग नुकताच होऊन गेल्याचे किंवा विशिष्ट औषध सेवन केल्याचे आढळून येते. दोन्ही पायांचे खालचे भाग, दोन्ही बाहू व खांदे आणि छातीवर जत्रु-अस्थींच्या (उरोस्थीच्या वरच्या भागापासून दोन्ही खांद्यांकडे जाणाऱ्या आडव्या हाडांच्या) खालच्या भागावर ताम्रवर्णी छोटे छोटे रक्तस्राव आढळतात. घोळणा फुटणे (नाकातून रक्तस्राव होणे), हिरड्यांतून रक्तस्राव होणे व गर्भाशयातून रक्तस्राव होणे ही लक्षणे आढळतात. कधीकधी वर दिलेले रक्तस्राव हेच प्रमुख लक्षण असून त्वचेवर परिणाम झालेला आढळत नाही. रक्तमिश्रित मूत्र, गुदद्वारातून रक्तस्राव वा रक्तमिश्रित मल, तसेच रक्तमिश्रित उलट्याही होण्याचा संभव असतो. कधीकधी मेंदूतील रक्तस्रावामुळे बेशुद्धी आणि मृत्यूही संभवतो. प्लीहावृद्धी आढळत नाही किंबहुना प्लीहावृद्धी आढळल्यास ती हा रोग नसल्याची खूण समजली जाते.

काचपट्टीवर रक्त घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास बिंबाणुअल्पता आढळून येते. चिरकारी प्रकारात फार मोठ्या आकारमानाचे विचित्र बिंबाणू दिसतात. बिंबाणूंची प्रती घ. मिमी. संख्या एक लाखापेक्षा कमी असणे, रक्तस्राव काल वाढणे (बोट किंवा कानाच्या पाळीवर सुईने टोचून त्यामधून होणाऱ्या रक्तस्रावमापनास ‘रक्तस्रावकाल’ म्हणतात व निरोगी शरीरात तो १ ते ३ मिनिटांचा असतो), अपुरे रक्तक्लथन (रक्त साकळणे) व क्लथित गुठळीचे अपुरे प्रत्याकर्षण (मागे ओढले जाण्याची क्रिया) या गोष्टी निदानास उपयुक्त असतात. मात्र ‘रक्तक्लथन काल’ (रक्ताचा एक बिंदू गोठण्यास लागणारा वेळ निरोगी शरीरात तो २ ते ८ मिनिटे असतो) नेहमी प्रमाणेच आढळतो. दाबपट्टी चाचणी परीक्षेत किंवा डब्ल्यू. आर्. हेस यांच्या परीक्षेत म्हणजे रक्तदाबमापक उपकरणाचा उपयोग करून, कोपराच्यावर भुजावर ८० मिमी. दाब ५ मिनिटे ठेवल्यास नंतर खालच्या भागावर (प्रकोष्ठावर) छोटे छोटे रक्तस्राव आढळतात. अस्थिमज्जा तपासणीत महाकवच कोशिका प्रमाणापेक्षा वाढलेल्या आढळतात, तसेच त्यांच्यापासून नेहमीप्रमाणे बिंबाणु उत्पादनही होत नाही.

अज्ञानहेतुक बिंबाणुजन्य नीलारुणी रोग अल्पकाल टिकणारा आणि आपोआप उतार पडणारा असतो. तीव्र प्रकारात फलानुमान उत्तम असते, तर चिरकारी प्रकारात, विशेषेकरून स्त्रियांमध्ये त्याचा अंदाज बांधता येत नाही.

इलाजामध्ये जरूर तेव्हा ताज्या रक्ताचे आधान (शरीरात रक्त भरण्याची क्रिया) करावे लागते. अतिशय गंभीर रोगात बिंबाणुधिक्य असलेले रक्त (प्लॅस्टिक किंवा सिलिकॉनाच्या विशिष्ट उपकरणात असे रक्त नेहमी तयार ठेवतात) द्यावे लागते. वरील कारणाकरिता रोग्यास रुग्णालयात ठेवणे जरूर असते. सुरुवातीसच दररोज ६० मिग्रॅ. प्रेडनिसोलोनाची मात्रा देतात. जसजशी बिंबाणूंची संख्या वाढते तसतसे या औषधाचे प्रमाण कमी करतात. चिरकारी प्रकारात प्लीहा-उच्छेदन शस्त्रक्रिया विचारात घ्यावी लागते. या शस्त्रक्रियेमुळेच सर्वच रोग्यांना आराम पडत नसून २/३ रोग्यांत ती गुणकारी ठरण्याची शक्यता असते व १/३ रोग्यांत रोगलक्षणांचे गांभीर्य कमी होते. गर्भारपणात हा रोग झाल्याचे आढळल्यास त्यावर गंभीर विचार करावा लागतो. पुष्कळशा स्त्रिया गंभीर स्वरूपाचा रक्तस्राव न होता प्रसूत होऊ शकतात. कॉर्टिकोस्टेरॉइडे देताना त्यांच्या गर्भावरील संभाव्य दुष्परिणामाकडे लक्ष पुरवावे लागते. कधीकधी गर्भारपणाच्या शेवटी शेवटी प्लीहा-उच्छेदन शस्त्रक्रिया व छेद प्रसूती (सीझेरियन छेदन) शस्त्रक्रिया दोन्ही कराव्या लागतात (उदर छेदन व गर्भाशय छेदन करून मूल बाहेर काढण्याच्या शस्त्रक्रियेला सीझेरियन छेदन म्हणतात).

दुय्यम प्रकार : नीलारुणी रोगांच्या इतर प्रकारांपैकी फक्त काहींचेच वर्णन येथे दिले आहे.

(१) प्लीहावृद्धिजन्य बिंबाणुन्यूनता : पुढील रोगांमध्ये बिंबाणुन्यूनता आणि प्लीहावृद्धी एकाच वेळी आढळतात : ⇨ हिवताप, ⇨ काळा आजार, क्षय, व्हायरसजन्य संक्रामणे उदा., संक्रामणजन्य मोनोन्यूक्लिओसिस (एककेंद्रकी पांढऱ्या कोशिकांचे रक्तातील प्रमाण अतिशय वाढणे एककेंद्रकी म्हणजे कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा एकच जटिल गोलसर पुंज असणाऱ्या), हिस्टोप्लाझ्मोसिस (हिस्टोप्लाझ्मा कॅप्सुलॅटम नावाच्या कवकापासून – बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीपासून – होणारा रोग), मारक लसीका मांसार्बुद (लसीकाभ कोशिकासमूहापासून बनलेले अर्बुद).

प्लीहा-उच्छेदन शस्त्रक्रियेनंतर बिंबाणूंची संख्या नेहमीच वाढते. कारण अस्थिमज्जेतून रक्ताभिसरणात सोडल्या जाणाऱ्या बिंबाणूंच्या संख्येवर प्लीहेमध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट पदार्थाचे नियंत्रण असते. प्लीहावृद्धीबरोबरच या पदार्थाचे उत्पादन वाढते व त्यामुळे बिंबाणूंच्या सुटकेत अडथळा येतो. प्लीहा-उच्छेदन शस्त्रक्रियेमुळे हा पदार्थ नाहीसा होऊन बिंबाणूंची संख्या वाढते. प्राकृत (सर्वसामान्य अवस्थेतील) प्लीहा काही विकृत बिंबाणूंचा नाश करण्याचे कार्य करते. वाढलेली प्लीहा बिंबाणूंचा सरसकट (चांगल्या व वाईट) नाश करीत असावी.

(२) फोन व्हिलेब्रान्ट रोग: (ई. ए. फोन व्हिलेब्रान्ट या फिनिश शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारा रोग). हा एक आनुवंशिक रोग ग्रेगोर मेंडेल यांच्या नियमाप्रमाणे प्रभुत्व असलेला स्त्री व पुरुष या दोहोंमध्ये आढळतो. बालवयापासूनच घोळणा फुटणे, मूत्रातून व जठरांत्र मार्गातून रक्तस्राव होणे तसेच त्वचेतील रक्तस्रावही आढळतात. रक्तस्राव काल व रक्तक्लथन काल दोन्ही वाढलेले आढळतात. रोगाचे निश्चित कारण अज्ञात असून केशवाहिन्यांतील दोष कारणीभूत असावा असे वाटते.

(३) ग्लान्झमान रोग : (ई. ग्लान्झमान या जर्मन शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून ओळखण्यात येणारा रोग). क्वचित आढळणाऱ्या या आनुवंशिक रोगात बिंबाणु-कार्य-विकृती प्रामुख्याने आढळते. क्लथित गुठळीचे प्रत्याकर्षण नीट होत नाही व वर वर्णन केलेल्या रोगाप्रमाणेच जागजागी रक्तस्राव होतात.

(४) अत्यधिहर्षतासदृश नीलारुणी रोग : या प्रकारात रक्तस्रावाबरोबरच अत्यधिहर्षतेची लक्षणे, उदा., शोफ (कोशिकासमूहांत किंवा शरीरातील पोकळ्यांत प्रमाणाबाहेर द्रव पदार्थ साचणे), पित्त उठणे, निरनिराळ्या प्रकारचा त्वक्‌रक्तिमा आढळतात. क्वचित आढळणाऱ्या या विकृतीचे काही प्रकार दिसून येतात.

(अ) साधा नीलारुणी रोग : काही सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणापासून विशेषेकरून स्ट्रेप्टोकोकाय संक्रामणात ही विकृती आढळते व म्हणून संधिज्वर, ⇨ लोहितांग ज्वर (स्कार्लेट ज्वर) या रोगांत ती आढळते. छोट छोटे रक्तस्राव हातापायावर किंवा सबंध शरीरावरही आढळतात.


(आ) हेनॉक-शन्‌लाइन नीलारुणी रोग : (जर्मन बालरोगतज्ञ ई. एच्. हेनॉक व जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक जे. एल्. शन्‌लाइन यांच्या नावांनी ओळखण्यात येणारा रोग). ही विकृती लहान मुले व कुमारावस्थेत आढळते. आंत्रमार्गाच्या भित्तीत रक्तस्राव झाल्यामुळे आंत्रवेदना होतात व रक्तमिश्रित मल सापडल्यामुळे आंत्रांत्रनिवेश (आतड्याचा काही भाग दुसऱ्या जवळच्याच भागात शिरणे) असल्याची शंका येते. सांध्यासभोवतालच्या ऊतकात (कोशिकासमूहात) अभिस्यंदन (रक्तातील द्रव ऊतकात पसरणे) झाल्यामुळे सांध्याला वेदनामय सूज येते. कधी पित्त उठणे व वाहिनीतंत्रिकाजन्य (रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या मज्जाविकृतींमुळे होणारा) शोफ ही लक्षणे आढळतात. बिंबाणूंची संख्या, रक्तस्राव काल, रक्तक्लथन काल प्राकृत आढळतात.

इलाजामध्ये इतर इलाजांबरोबरच ⇨ हिस्टामीनविरोधी औषधे उपयुक्त असतात. स्ट्रेप्टोकोकाय कारणीभूत असल्यास योग्य ती प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देतात.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.

पशूंतील नीलारुणी रो: घोड्यामध्ये अज्ञानहेतुक नीलारुणी रोग आढळून येतो. नाक, डोळे व ओठ यांच्या श्लेष्मकलेवर ताम्रवर्णी ठिपकेवजा रक्तस्राव, पोटाखाली व चेहऱ्यावर दोन्ही बाजूंस शोफ, नाकावाटे रक्तमिश्रित उत्सर्ग, ताप इ. लक्षणे दिसून येतात. अंगावरील व चेहऱ्यावरील सूज थंड असून दुखरी नसते व तीवर आंगठ्याने दाबल्यास काही काळपर्यंत (आंगठा काढून घेतल्यावर सुद्धा) दाबल्याची खूण तशीच राहते. अधिहर्षतेमुळे (ॲलर्जीमुळे) रोग होत असावा असा अंदाज आहे. हिस्टामीनविरोधी औषधांचा उपयोग होतो.

दीक्षित, श्री. गं.

संदर्भ : 1. Scott, R. B., Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1973.

           2. Vakil, R. J., Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.