अंतस्त्य-प्रतिरोपण : ऊतक अथवा त्याचा काही भाग एका स्थानापासून काढून दुसऱ्या स्थानात अथवा दुसऱ्या शरीरात बसविण्याच्या क्रियेला ‘प्रतिरोपण’ असे म्हणतात. वृक्क, ह्रदय यांसारखे एखादे संबंध अंतस्त्य (इंद्रिय) दुसऱ्या शरीरात बसविण्याच्या क्रियेला ‘अंतस्त्य-प्रतिरोपण’ असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील ऊतक त्याच व्यक्तीच्या शरीरात इतरत्र बसविले तर त्या क्रियेला ‘स्व-प्रतिरोपण’ असे नाव असून स्वजातीय व्यक्तीच्या शरीरातील ऊतक त्याच जातीच्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात बसविल्यास त्या क्रियेला ‘सम-प्रतिरोपण’ म्हणतात. विजातीय शरीरात बसविल्यास तिला पर-प्रतिरोपण म्हणतात.

प्रतिरोपणाची कल्पना जुनीच असून भाजून अथवा जळून नष्ट झालेल्या त्वचेच्या जागी त्याच व्यक्तीच्या शरीरातील दुसरीकडील त्वचा बसविण्याची ‘स्व-प्रतिरोपण’ क्रिया गेली ५०-७५ वर्षे प्रचारात आहे. डोळ्यातील स्वच्छमंडलाचे (बुबुळाच्या पुढच्या पारदर्शक भागाचे) ‘सम-प्रतिरोपण’ दुसऱ्या व्यक्तीवर करण्याची शस्त्रक्रियाही बरीच वर्षे करण्यात येत आहे. गेल्या ८-१० वर्षात ह्रदय, यकृत यांसारखी महत्त्वाची अंतस्त्ये एका व्यक्तीच्या शरीरातून काढून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात बसविण्यात येऊ लागली आहेत. त्यासाठी अपघातात मृत झालेल्या तरुण व्यक्तींची अंतस्त्ये मृत्यूनंतर लगेच काढून दुसऱ्या व्यक्तीची त्या त्या रोगग्रस्त अंतस्त्याच्या जागी बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वृक्कविकारासारख्या काही रोगांत कृत्रिम वृक्काचा उपयोगही करण्यात येतो.

ऊतकाचे प्रतिरोपण त्याच व्यक्तीच्या शरीरात केल्यास ते बहुधा यशस्वी होते. समजातीयांतील स्वचछमंडल-प्रतिरोपणही असेच यशस्वी होते. परंतु समजातीय व्यक्तीचे दुसरे कोणतेही प्रतिरोपण अगदी क्वचितच यशस्वी होते. विजातीय व्यक्तीतील प्रतिरोपित मात्र पूर्णपणे फसते म्हणजे प्रतिरोपिता अंतस्त्य ग्राहक शरीराशी आत्मसात होऊच शकत नाही.

या विषयाचा अभ्यास व संशोधन करताना असे दिसून आले, की स्वच्छमंडलात रक्तवाहिन्या नसतात तर इतर प्रतिरोपित अंतस्त्यांत रक्तवाहिन्या व त्यांतून वाहणारे रक्त असते. म्हणून प्रतिरोपित अंतस्त्ये आत्मसात न होण्याच्या रक्ताशी काही संबंध असावा असे वाटू लागले. एका ⇨अंडापासून उत्पन्न होणाऱ्या जुळ्यांचे रक्त पूर्णपणे एकसारखे असल्यामुळे त्यांच्यातील प्रतिरोपण यशस्वी होते, परंतु निरनिराळ्या अंडापासून उत्पन्न होणाऱ्या जुळ्या भावंडांतील प्रतिरोपणाला नैसर्गिक विरोध होतो. या गोष्टीचा रक्ताशी संबंध असला पाहिजे असे वाटू लागले. रक्ताचा अभ्यास करतानाही असे आढळले होते, की रक्ताच्याही चार जाती असून एका जातीचे रक्त दुसऱ्या जातीच्या व्यक्तीला चालेलच असे नाही. या संशोधनामुळे कोणाचे रक्त कोणास चालू शकते यासंबंधी ज्ञान झाले [ →रक्ताधान].

शरीरामध्ये कोणताही बाह्य पदार्थ आला तर त्याच्यापासून शरीराला अपाय होऊ नये यासाठी शरीरात विशिष्ट यंत्रणा असते. उदा., रोगजंतूचा शरीरात प्रवेश झाला तर त्यांच्यामुळे रोगोत्पत्ती होऊ नये यासाठी त्या रोगजंतूंचा नाश, अथवा त्या जंतूंपासून उत्पन्न होणाऱ्या विषांचा नाश करण्यासाठी विशिष्ट कोशिकांमध्ये ‘प्रतिपिंडे’उत्पन्न करण्यासाठी शक्ती असते.⇨यौवनलोपी ग्रंथी आणि इतरत्र उत्पन्न होणाऱ्या श्वेतलसीका कोशिकांमध्ये [ →लसीकी तंत्र]⇨प्रतिपिंडे उत्पन्न करण्याची शक्ती विशेष प्रमाणात असते. रोगजंतूंपासून होणाऱ्या विषांशी सलंग्न होऊन त्या विषांचा विषारीपणा नष्ट करण्याची ही प्रक्रिया ⇨प्रतिजन-प्रतिपिंडप्रक्रिया या नावाने ओळखली जाते. शरीरीत येणारा बाह्यपदार्थ प्रतिपिंडे उत्पन्न होण्यास कारणीभूत होतो म्हणून त्याला ⇨प्रतिजन असे म्हणतात. शरीराची रोगप्रतिबंधक शक्ती म्हणजे ⇨प्रतिरक्षा ही या प्रक्रियेवर अवलंबून असते. शरीराशी आत्मसात होण्यासारख्या पदार्थांच्या बाबतीत ही ‘प्रतिजन-प्रतिपिंड’ प्रक्रिया होत नाही, परंतु इतर पदार्थांविरूद्ध मात्र प्रतिपिंड तयार होऊन ते पदार्थ निर्विष होतात. म्हणजेच ‘स्व’ म्हणजे आत्मसात होणारे पदार्थ आणि ‘पर’ म्हणजे परके पदार्थ वेगवेगळे ओळखून त्यानुसार योग्य अशी प्रतिक्रिया कोशिका-विशेषतः श्वेतलसिका-कोशिका-करू शकतात. प्रतिपिंडे उत्पन्न करण्याची शक्ती एकदा निर्माण झाली म्हणजे पुढे केव्हाही ती विशिष्ट प्रतिजने शरीरात आली तर प्रतिपिंडे त्वरेने तयार होऊन त्या प्रतिजनांचा नाश करतात. ही नैसर्गिक प्रतिरक्षायंत्रणा ‘बाह्य’ किंवा ‘पर’ अशा प्रतिरोपित अंतस्त्यांचा नाश करण्यास कारणीभूत होते. प्रतिरोपित ऊतकांभोवती श्वेतलसीका-कोशिका प्रचंड संख्येने जमून हळूहळू त्या ऊतकांचा नाश करतात त्यामुळे प्रतिरोपित अंतस्त्य ग्राहक शरीरात टिकू शकत नाही. थोडक्यात म्हणजे जी नैसर्गिक प्रतिकारशक्ती (प्रतिरक्षा) एरव्ही शरीरसंरक्षक असते तीच प्रतिरोपण अयशस्वी करण्यात कारणीभूत होते. प्रतिरोपण यशस्वी व्हावयाचे तर प्रतिरोपित अंतस्त्यविरूद्ध होणारी ही प्रतिक्रिया बंद झाली पाहिजे.

श्वेतलसीका-कोशिकांचे प्रतिपिंड-जननाचे कार्य काही काळ बंद पडावे असा प्रयत्न करण्यात येत आहे. घोड्याच्या शरीरात श्वेतलसीका-कोशिका वाढत्या मात्रेने टोचीत गेल्यास त्याच्या रक्तात श्वेतलसीका-कोशिकाविरोधी प्रतिपिंडे उत्पन्न होतात. अशा घोड्याच्या रक्तातील द्रव्य शस्त्रक्रियेपूर्वी व पुढेही टोचल्यास श्वेतलसीका-कोशिका निष्प्रभ होतात व त्यामुळे प्रतिरोपित अंतस्त्य टिकून राहण्याचा अधिक संभव असतो. म्हणून ही लस अथवा रक्तरस टोचण्याचा प्रयोग करून पाहण्यात येत आहे.

या लशीला ‘श्वेतकोशिका-विरोधी रक्तरस’ (अँटिलिफोसाइट सिरम-ए एल एस) असे म्हणतात. अशा प्रकारे रक्तरस देण्यामध्ये एक मोठा धोका आहे. तो म्हणजे श्वेतलसीका-कोशिका निष्प्रभ झाल्यामुळे शरीराची सर्वच प्रतिरक्षाक्रिया बंद पडल्यामुळे रोगजंतूंचा संसर्ग होण्याचा संभव वाढतो. असा हा पेचप्रसंग असून त्यावर तोंड काढण्यासाठी जगातील शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत.

अंतस्त्य आत्मसात होईपर्यंत श्वेतलसीका-कोशिकांचे कार्य बंद रहावे म्हणून ६ मरकॅप्टोपूरिन आणि ऑझाथायोप्रीन (इम्यूरान) अशी नवीन औषधे बनविण्यात आली असून त्यांचे प्रयोगही चालू आहेत.

आणखी एक प्रयत्न करण्यात आहे. दात्याचे अंतस्त्य ग्राहकाच्या शरीरात घालण्यापूर्वी त्या अंत्यसंस्कारावर क्ष-किरण प्रेरित केले असता श्वेतलसीका-कोशिका अशा अंतस्त्याच्या जवळ येऊ शकत नाहीत त्यामुळे त्या अंतस्त्याचा नाश होण्याची शक्यता कमी होते.

अशा तऱ्हेने ग्राहक शरीरातील विनाशन (प्रतिषेध)-प्रक्रिया नाहीशी करण्याचे प्रयत्न चालू असून अजून त्या बाबतीत यश आलेले नाही.

एकीकडे अंतस्त्य-प्रतिरोपणासाठी ह्या खटपटी चालू असता, दुसरीकडे कृत्रिम अंतस्त्ये तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. कृत्रिम वृक्क करण्याच्या बाबतीत बरेच यश आले असून कित्येक मोठ्या रुग्णालयांत असे कृत्रिम वृक्क आता वापरण्यात येत आहे. ह्रदयाचे योग्य वेळी आकुंचन उत्पन्न करण्याचे ‘गतिकारक’ साधनही कृत्रिम तऱ्हेने करण्यात आलेले आहे. पुढेमागे संपूर्ण कृत्रिम ह्रदय तयार होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षात प्रतिरोपणाचे अनेक प्रयत्न झाले. वृक्क, फुप्फुस, यकृत, अग्निपिंड आणि ह्रदय या अंतस्त्यांचे प्रतिरोपण करण्यात येत असून त्या कामी थोडेबहुत यशही येत असल्यासारखे दिसते. १९७१ पर्यंत प्रतिरोपणाच्या क्रिया किती झाल्या व त्यानंतर ग्राहक व्यक्ती किती काळ जगल्या, हे खालील तक्त्यात दिले आहे. ज्या व्यक्ती जिवंत राहू शकल्या त्या कितपत कार्यक्षम राहिल्या त्याचा तपशील उपलब्ध नाही. एवढे मात्र खरे, की सध्या या विषयाकडे सर्व विषयाकडे सर्व जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील डॉ. क्रिश्चन बर्नार्ड यांनी ह्रदयाचे प्रतिरोपण केले, त्यावेळी अपघातात मरण पावलेल्या एका तरूण व्यक्तीचे ह्रदय ह्रदयविकार पीडित अशा ५६ वर्षांच्या एका दंतवैद्याच्या ह्रदयाच्या जागी बसविले.

१९७१ अखेर करण्यात आलेली अंतस्त्य-प्रतिरोपणे

अंतस्त्य

प्रथम प्रतिरोपण केल्याचे वर्ष

प्रतिरोपण-शस्त्र-क्रिया करणारी पथके

प्रतिरोपण

ग्राहक

कार्यकारी प्रतिरोपण

अधिक काळ जगण्याची मर्यादा

अग्निपिंड

१९६६

१९

२४

२४

१२

महिने

अस्थिमज्जा *

२४

१३१

१७

४० महिने

प्लीहा†

१९६३

?

फुप्फुस

१९६३

१९

२८

२८

१० महिने

यकृत

१९६३

३४

१५५

१५३

४१ महिने

वृक्क

१९५४

१९६४

१९६

८,२५६

७,६६९

४,०००

१७ वर्षे

(समजातीय जुळे)

ह्रदय

१९६७

५९

१८४

१८१

२९

४० महिने

* १ जानेवारी १९६८ नंतरची आकडेवारी. † १९६८ पर्यंतची आकडेवारी.

ते बसविण्यापूर्वी त्या दंतवैद्याच्या शरीरातील प्रतिरक्षाक्रिया वर वर्णन केलेली लस (रक्तरस) देऊन थांबविण्यात आली होती. जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. प्रतिरोपित ह्रदय सु. १.५ वर्षपर्यंत कार्यक्षम होते परंतु नंतर त्या दंतवैद्याला मरण आले. त्याच्या शरीराची मरणोत्तर परीक्षा केली तेव्हा असे आढळले,की त्या दंतवैद्याच्या मूळ ह्रदयाला जो विकार होता तोच प्रतिरोपित ह्रदयालाही झाला होता. ही एक नवीनच समस्या उत्पन्न झाली असून मूळ रोगाचा प्रतिबंध करणे ही गोष्ट

महत्त्वाची मानली जात आहे.  

भारतातही मुंबईच्या एका रुग्णालयात अशीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु ती यशस्वी झाली नाही.

शस्त्रविद्येच्या आधुनिक विकासामुळे अंतस्त्य-प्रतिरोपण-शस्त्रक्रिया आता तुलनेने सुलभ झाली असली तरी तिला विशेष सुसंस्कृत असे म्हणता येणार नाही. एखाद्या नादुरूस्त यंत्राचा बिघडलेला भाग काढून टाकून त्याच्या जागी दुसरा नवा भाग बसविणे ही गोष्ट ज्याप्रमाणे आता शक्य झाली आहे, तसेच रक्तधानासाठी जशा रक्तपेढ्या स्थापन केल्या जात आहेत तशा प्रतिरोपणासाठी अंतस्त्यांच्या पेढ्या व त्या ठिकाणी रक्त तपासण्याप्रमाणेच अंतस्त्य, प्रतिरोपणासाठी योग्य आहे की नाही हे तपासण्याची व्यवस्था होईल, अशी शक्यताही कित्येकांनी वर्तविली आहे.

एक गोष्ट मात्र निश्चित आहे, की अंतस्त्य-प्रतिरोपणाच्या निमित्ताने प्रतिजन-प्रतिपिंड-प्रक्रिया आणि शरीराची ‘स्व’ आणि ‘पर’ इतके ओळखण्याची यंत्रणा यांसंबंधी जे संशोधन सर्वत्र चालू आहे त्यामुळे ऊतकोत्पत्ती,ऊतकवृद्धी इ. कोशिकाप्रक्रियांसंबंधी पुष्कळ नवीन माहिती प्रकाशात येऊन त्यामुळे वैद्यक विषयात फार मोठी व मोलाची भर पडेल असे मानण्यास जागा आहे.

आणखी एका विषयाचा उल्लेख केला पाहिजे. अंतस्त्य-प्रतिरोपण अधिकाधिक सुलभ होत गेले तर अनेक नैतिक आणि नैर्बंधिक प्रश्न उपस्थित होणार आहेत. त्याबद्दलचा विचार सर्वत्र चालू आहे. उदा., अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे हृदय अथवा इतर अंतस्त्य काढून ते दुसऱ्याला बसविण्यापूर्वी त्या अंतस्त्याची मालकी कोणाची? त्या व्यक्तीला मृत्यू आला हे कसे, कोणी व कोणत्या तत्वांवर ठरवावे? किंबहुना मृत्यू म्हणजे काय, हा प्रश्नही उपस्थित होतो. पूर्वी ह्रदय बंद पडले म्हणजे मृत्यू आला असे मानीत. आता त्यासंबंधीही संशय उत्पन्न झाला असून मृत्यू म्हणजे नक्की काय होते यासंबंधी विविध मते प्रदर्शित करण्यात येत असूनही यासंबंधी अजून एकमत झालेले नाही. दोन रोग्यांना अंतस्त्य-प्रतिरोपण करण्याची जरुरी आहे पण एकच अंतस्त्य उपलब्ध आहे अशा वेळी त्या दोघांपैकी कोणत्या रोग्याला प्रतिरोपित अंतस्त्य द्यावे, हे ठरविण्याचा अधिकार कोणाचा? म्हणजे जगण्याचा अधिक अवसर कोणाला द्यावा, हे ठरविण्याची जबाबदारी वैद्याने घ्यावी की नाही? आज एक वृक्क प्रतिरोपित केले तर सु. एक लाख रूपये खर्च येतो, असा अमेरिकेतील अंदाज आहे. हा खर्च पुढेमागे कमी होईलही. परंतु कितीही कमी झाला तरी त्याचा फायदा श्रीमंतालाच मिळावा, गरिबाला मिळू नये, हे ठरविण्याचा अधिकार वैद्याला असणे योग्य आहे काय? प्रतिरोपणासंबंधी असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात असून नजीकच्या भविष्यकाळात त्या प्रश्नांना उत्तर दिल्याशिवाय प्रतिरोपण संपूर्णपणे यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही.

या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी इतर प्राण्यांच्या अंतस्त्याचे प्रतिरोपण करावे असे प्रयत्नही चालू असून ते प्रत्यक्षात घडण्यापूर्वी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

संदर्भ : 1. Bailey, H. Love, M.A Short  Practice of Surgery, Londan, 1962.

           2. Boyd, W.Textbook of  Pathology, Philadelphia, 1961.

           3. Rose W. Carless, A. Manual of Surgery  London, 1960.

ढमढेरे, वा. रा.