गलशोथ : (व्हिन्सेंट गलशोथ मुखपाक). गिलायू (टॉन्सिल), हिरड्या, घसा आणि गालांच्या आतील श्लेष्मावरण (बुळबुळीत आवरण) या ठिकाणी विशिष्ट जंतूमुळे येणाऱ्या शोथाला (दाहयुक्त सूजेला) ‘गलशोथ’ असे म्हणतात. व्हिन्सेंट या फ्रेंच वैद्यांनी या रोगाबद्दल संशोधन करून सविस्तर वर्णन प्रथम केले म्हणून त्याला ‘व्हिन्सेंट  गलशोथ’ असे म्हणतात. तर्कूच्या (चातीच्या) आकाराचे फ्युझिफॉर्मिस फ्युझिफॉर्मिस हे जंतू आणि व्हिन्सेंट यांनी शोधिलेला बोरेलिया व्हिन्सेंटाय हा जंतू यांच्या एकत्रित संसर्गामुळे हा रोग होतो, असे मानतात. या दोन्ही जंतूंचे शरीराबाहेर संवर्धन करणे फार कठीण असल्यामुळे त्यांचा या रोगाशी असलेला कार्यकारणसंबंध अजून सिद्ध झालेला नाही परंतु या रोगाच्या सर्व रोग्यांच्या ग्रस्त भागात हे जंतू हटकून सापडत असल्यामुळे असाच संबंध असावा असे मानण्यात येते. काही शास्त्रज्ञांच्या मते या रोगाचे कारण एखादा विषाणू (व्हायरस) असावा असे आहे. ब आणि क जीवनसत्त्वांची कमतरता पडल्यास हा रोग होतो असेही काही तज्ञ मानतात. तुटलेल्या दाताची तीक्ष्ण कड जिभेवर घासत राहिल्याने त्या ठिकाणी व्रणोत्पत्ती होऊन त्या व्रणामध्ये वरील दोन जंतूंचा संसर्ग झाल्यास हा रोग होऊ शकतो. इतर अनेक मुखरोगांतही हे जंतू आढळतात.

हा रोग अशक्त माणसांत व वसतिगृहे, लष्करी छावण्या, शालागृहे वगैरे गर्दीच्या जागी साथीच्या स्वरूपात आढळतो. दोन्ही जागतिक महायुद्धांत सैनिकांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक होते.

लक्षणे : या रोगाची सुरुवात विशेष तीव्र नसते. अस्वस्थता व ३८-३९ से. इतका ज्वर असतो. सर्वांगात वेदना होतात. तुटक्या दाताच्या कडेवर घासत असलेल्या जिभेच्या भागावर लाल रंगाचे व्रण उत्पन्न होतात. गिलायू, हिरड्या, गालांच्या आतील श्लेष्मावरण आणि घसा या ठिकाणीही असे व्रण उत्पन्न होऊ शकतात. या व्रणांच्या कडा जाड व लाल असून त्यांच्या तळाशी घट्ट पिवळट पांढरट रंगाचा साका पडद्यासारखा चिकटलेला दिसतो. तो साका टिपून काढण्याचा प्रयत्न केल्यास व्रणातून रक्तस्राव होतो. काही वेळा हा साका फार घट्ट व जाड होऊन त्यामुळे सबंध व्रण झाकून टाकणाऱ्या मृत ऊतकासारखा (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहासारखा) दिसतो. व्रण ज्या बाजूला असेल त्या बाजूच्या मानेतील लसीका ग्रंथी (ऊतकातून रक्तात जाणारा आणि रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतील ग्रंथीसदृश पुंजके) सुजलेल्या असून स्पर्शासह्य (स्पर्श सहन न होणार्‍या) असतात. श्वासाला विशिष्ट दुर्गंधी येते. गिलायू व ग्रसनी येथे व्रण झाल्यास गिळण्याची क्रिया वेदनायुक्त होते. सु. ७-८ दिवसांनंतर व्रणावर साका तयार होण्याची क्रिया बंद होऊन व्रण हळूहळू भरून येऊ लागतो.

निदान : घटसर्प आणि उपदंशज (गरमी या रोगात उद्‌भवणारे) व्रण यांची लक्षणे बरीचशी सारखी असल्यामुळे काही वेळा व्यवच्छेदक (दोन सारखी लक्षणे दाखविणाऱ्या रोगांतील सूक्ष्म फरक ओळखून) निदान करणे कठीण होते. घटसर्पाचे विशिष्ट जंतू सापडणे, व्हिन्सेंट यांनी वर्णन केलेले जंतू सापडणे व उपदंशाची इतर लक्षणे यांच्यामुळे निदानास मदत होते.

चिकित्सा : पेनिसिलीन व इतर प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे फार गुणकारी आहेत. सोमलापासून (आर्सेनिकापासून) बनविलेल्या औषधांचाही उपयोग होतो. हायड्रोजन पेरॉक्सॉइड या औषधाच्या द्रावणाने गुळण्या केल्यास व्रण स्वच्छ होऊन त्वरित भरू लागतो. बोरेलिया व्हिन्सेंटाय  या जंतुवर गुणकारी अशी सोमलयुक्त औषधे व्रणावर बाहेरून लावल्यासही व्रण लवकर भरून येण्यास मदत होते.

रोग मारक नसून ७/८ दिवसांत रोगी पूर्ण बरा होतो. दातामध्ये दोष असल्यास योग्य तो उपाय केल्यास रोग पुन्हा उपस्थित होत नाही. अशक्त रोग्यांना ब आणि क जीवनसत्वे उपयुक्त ठरतात.

अभ्यंकर, श. ज.