खेळणी : मुख्यतः मुलांच्या खेळाची व करमणुकीची रंगीबेरंगी साधने ही चेंडूसारखी साधी किंवा बाहुल्या, प्राण्यांची चित्रे यांसारखी प्रतीकात्मक असतात. खेळण्यांचे स्वरूपही साचेबंद नसते. काठीसारख्या एका साध्या लाकडाच्या तुकड्याचा लहान मूल आपल्या कल्पनेने घोडा बनविते. त्या मुलापुरती ती काठी किंवा कधीकधी घरातील मोठ्या माणसाची पाठ सुद्धा घोड्याचे प्रतीक बनते. लहान वयात खेळण्यांचे स्वरूप असे साधे असते, पण मोठ्या मुलांची किंवा माणसांची खेळणी इतकी साधी रहात नाहीत. या खेळण्यांतून मानवी गरजांचे आणि कल्पनांचे प्रतिबिंब पडते.

लहानपणातील खेळणी मोठ्या वयामध्येही आकर्षक वाटतात. मुलाच्या खेळण्यांतील विजेवर चालणारी आगगाडी अथवा  ‘मेकॅनो’ यांसारख्या खेळामध्ये वडिलांचेही मन रमते. लहानपणातील आवडती खेळणी आणि मोठेपणीचे आपले उद्योग व आपल्या आवडीनिवडी यांचा परस्परसंबंध असतो. यामुळे करमणुकीचे वा विरंगुळ्याचे साधन इतकेच मर्यादित स्वरूप खेळण्यांना राहत नाही.

अगदी प्रारंभाला जी खेळणी निर्माण झाली, ती मानवाच्या स्वसंरक्षणाच्या भावनेतून उत्पन्न झालेली असावा, असे वाटते. प्राण्यांचीआकर्षक खेळणीही याच कल्पनेतून तयार झाली असावी. त्याकाळी अनेक जमाती आपल्या मुलांना हत्यारांचे शिक्षण देत असत. त्या काळच्या खेळांत चढाओढ आणि शारीरिक बळाला प्राधान्य असे. या खेळांची साधने विविध प्रकारची शस्त्रेच असत. त्या काळच्या लढाऊ हत्यारांचे प्रतिबिंब खेळण्यांत दिसून येते.

स्थिर राहणारी आणि हालचाल करणारी खेळणी असे खेळण्यांचे दोन प्रकार करता येतात. त्यांचे अनुकरणात्मक आणि बोधप्रद असेही वर्गीकरण होऊ शकते. प्रत्येक देशातील कारखानदार व योजक यांनी विभिन्न प्रकारची नवीन नवीन खेळणी प्रत्येक काळात निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक नवीन संशोधनाबरोबर नवीन खेळण्यांची कल्पना सुचत आली आहे. कृतिप्रेरक खेळणी (उदा., मेकॅनो) जिची प्रतिकृती असेल त्या वस्तूप्रमाणे हुबेहूब कार्य करणारी खेळणी (उदा., घोडा, बैलगाडी इ.) ज्यांना चालविण्याकरता विशेष हिकमतीची जरूरी आहे अशी खेळणी (उदा., संगणक, प्रक्षेपणास्त्र, विमाने इ.). ही खेळणी हल्ली लोकप्रिय आहेत. कारण स्वस्थ बसण्यापेक्षा काहीतरी हालचाल किंवा कृती करण्याची उपजतच आवड मुलांत असते. त्याचप्रमाणे परिचित वस्तूंच्या व नमुन्याच्या खेळण्याबद्दल त्यांना अधिक आकर्षण वाटते. एखाद्या खेळण्यात वरीलपैकी दोन्ही किंवा तीनही गोष्टी आढळून येतात. म्हणून ही वर्गवारी कप्पाबंद समजण्याचे कारण नाही. या वर्गातील अनेक खेळण्यांचा उपयोग शास्त्रीय ज्ञान मिळविण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेही होतो.

खेळण्यांचे विविध नमुनेबाहुली किंवा प्राण्याचे चित्र ही खेळण्यांची अगदी प्राथमिक अवस्था किंवा प्रकार होय. इतर खेळण्यांचा उल्लेख मानवाच्या लिखित इतिहासात आढळत नाही.

चलनवलन करणाऱ्या खेळण्यांचे अनेक प्रकार दिसतात. या खेळण्यांची कक्षा मोठी असते आणि हालचालीही आकर्षक असतात. शारीरिक रचनेचे आणि क्रियांचे ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानाच्या आधारानेही खेळणी तयार केलेली असावीत.

चक्राकार गती, तोल, उड्डाण, झोका यांसारख्या क्लृप्त्याव स्प्रिंग, लोहचुंबक यांसारखी साधने यांचा उपयोग करून विविध प्रकारची खेळणी तयार करण्यात येतात.

गोट्या, सागरगोटे यांसारख्या चपलपणा अंगी बाणविणाऱ्या खेळण्यांमुळे लहानपणी जे वळण लागते, त्याच्या आधारे मोठेपणी अनेक प्रकारचे कौशल्य प्राप्त करून घेता येते. बुद्धिबळे, विविध कोडी, चेकर्स या खेळांमुळे प्राथमिक आणि बौद्धिक शक्ती वाढते.

खेळणी टिकाऊ नसतात, त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या खेळण्यांची फारशी माहिती आपल्याला मिळत नाही. इतिहासपूर्व काळातील खेळणी खडखड वाजणारी, चेंडू, प्राणी, बाहुल्या या प्रकारांतीलच असावी असे वाटते. ख्रि. पू. २००० वर्षे लाकडी व हालचाल करणारी खेळणी ईजिप्तमध्ये असल्याचे आढळून येते. या खेळण्यांचे अनेक नमुने ब्रिटिश संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहेत. जुन्या ग्रीक भांड्यांवर चेंडू खेळणाऱ्या मुलांची, मोठ्या माणसांची आणि चित्रविचित्र मुखवट्यांची चित्रे आहेत. ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्त्याने पडणाऱ्या वाळूच्या आधारे तसेच पाऱ्याने हालचाल करणाऱ्या खेळण्यांचे उल्लेख केलेले आहेत. गेल्या शतकात पुढे आलेली जशी उड्या मारणारी आणि नाचणारी खेळणी होती, तशीच ती ग्रीक खेळणी होती. ग्रीक लोकांच्या खेळण्यांत पट्टे, डोलणाऱ्या घोड्यांचे नमुने वगैरे प्रकार असत. ते लाकडी घोड्यांच्या पोटात ठेवीत असत. इंग्लंडमध्ये सापडलेल्या रोमन अवशेषांत बाहुल्यांचे फर्निचर, एखाद्या पत्र्याचा सैनिक, दोरीने हालविता येणारे चित्र, तसेच मातीच्या, तारांच्या आणि चिंध्यांच्या बाहुल्या आहेत.


 ऋग्वेदात  बाहुल्यांचा उल्लेख आढळतो. त्यावेळी बाहुल्यांचा उपयोग खेळणी म्हणून आणि अभिचार कर्मासाठी करीत असत.

अश्मयुगापासून पुढील काळात जी खेळणी प्रचलित असावी, त्यांपैकी काहींचे अवशेष उत्खननांत वेळोवेळी सापडले आहेत. दगड, माती, लाकूड, धातू, कापड, हाडे, शिंगे, मौल्यवानरत्ने इ. वस्तूंची खेळणी त्यांत आढळून येतात. वाघ, सिंह, डुक्कर, हत्ती, घोडा, गाय, बैल, कुत्रा, मोर, माकड या प्राण्यांप्रमाणेच माणसांच्या मूर्तीही त्यांत आढळतात. मोहें-जो-दडो आणि हडप्पा येथील उत्खननांत सापडलेली खेळणी मातीची असून त्यांतील बाहुल्या पूजेच्या का खेळण्यांतल्या हे निश्चित सांगता येत नाही.

पाटणा, मथुरा, कौशांबी येथे मौर्य आणि त्या पूर्वीच्या काळातील खेळणी सापडलेली आहेत. ती भाजलेल्या मातीची आहेत. येथे काही साचेही सापडलेले आहेत. ही खेळणी साच्यात दाबून किंवा ओतकाम करून तयार करण्यात येत असावी, असे दिसते. कौशांबी येथील उत्खननांत बैलगाड्यांचे नमुने सापडलेले आहेत. शुंग काळात (१८५ इ.स.पू. ते ७३ इ.स.पू.) मेंढे जुंपलेल्या गाड्यांची खेळणी प्रचारात असावी. कुशाण काळाच्या बाहुल्या चारही बाजूंनी कोरलेल्या सापडतात. गुप्त काळातील मातीच्या बाहुल्या सुंदर आणि लांबट चेहऱ्याच्या व कुरळे आणि मोकळे केस लावलेल्या असत.

बाराव्या-तेराव्या शतकांतील घोड्यांचा आणि सरदारांच्या प्रतिमा चांगल्या स्वरूपात आढळतात. चौदाव्या शतकातील हस्तलिखितांत फ्रान्सच्या इझाबेला या राजकन्येची खेळातील पवनचक्की एका सोनाराने दुरुस्त केल्याचा उल्लेख सापडतो. पंधराव्या शतकात प. जर्मनीतील न्यूरेंबर्ग येथे खेळणी तयार करीत असत. ‘येना’ संग्रहालयात पंधराव्या शतकातल्या बाहुल्यांच्या घराचे (डॉल्स हाऊस) काही अवशेष ठेवलेले आहेत.

सोळाव्या शतकापासून रूढ असलेल्या खेळांची जास्त माहिती मिळते. फ्रेंच लेखक राब्ले आपल्या बालपणीच्या खेळण्यांतल्या पवनचक्कीचे व एका मोठ्या लाकडी घोड्याचे वर्णन करतो. या खेळण्यांना चाके होती का ती फक्त डोलणारी होती हे कळत नसले, तरी ती हालत असावी यात मात्र शंका नाही. या काळातील चित्रांत चेंडू-फळी, कप आणि चेंडू, पतंग, पट्टे, ढोल यांची चित्रे दिसतात. धातूंचे सरदार, त्यांची चिलखते, पितळी तोफा, कागदाच्या लगद्याच्या खेळणी, लाकूड, माती, मेण यांची या काळातील खेळणी पुष्कळ सापडतात.

सतराव्या शतकामध्ये श्रीमंतांच्या मुलांना मोठमोठ्या आकाराची खेळणी देत. प. जर्मनीतील न्यूरेंबर्ग येथे एका खेळण्यातल्या घराचे प्रदर्शन भरलेले होते. त्याचे वर्णन १६३१ सालच्या एका पत्रात सापडते.

पूर्वी स्वयंचलित खेळण्यांचे प्रकार माहीत असले, तरी ते बाजारात तयार मिळत नसत. यांत्रिक युगामुळे अठराव्या शतकात त्यांचा प्रसार झपाट्याने झाला. मॅजिक लँटर्न याच वेळी प्रचारात आला. लाकडी फलकावर चिकटविलेले नकाशे व चित्रे विकेंद्री पद्धतीने कापून ठेवीत असत. ती जुळविणे इतकेच ‘जिगसॉ’कोड्यांचे प्राथमिक स्वरूप होते. पुढे पुष्कळच प्रगती होऊन ही कोडी अधिक आकर्षक झाली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात ‘गिलोटीन ’ची खेळणी विकत मिळत असत. आपल्या वडीलधारी माणसांचे अनुकरण करून फ्रेंच मुले बड्या बड्या (खेळण्यांतल्या) लोकांची मुंडकी उडविण्याचा भयानक खेळ खेळत असत.

एकोणिसाव्या शतकात झालेल्या शास्त्रीय प्रगतीमुळे अठराव्या शतकात शोधण्यात आलेली खेळणी मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येऊ लागली आणि साहजिकच ती बाजारात स्वस्त किंमतीत मिळू लागली. त्याचप्रमाणे नव्या शास्त्रीय शोधांचा उपयोग करून नवीन खेळणीहीतयार होऊ लागली. या खेळांनी शास्त्रीय शब्दांसारखी अवघड नावे देण्याची प्रथा रूढ झाली. फॅरडे हा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ तर मुलांच्या खेळण्यांच्या सर्वांत मोठ्या तत्त्वज्ञानविषयक वस्तू म्हणत असे.

खेळणी तयार करावयाचा व्यवसाय सर्वांत जुना व्यवसाय आहे. एकोणिसाव्या शतकात जर्मनी हा देश खेळण्यांच्या कारखानदारीच्या केंद्रस्थानी होता. पहिल्या महायुद्धानंतरही दहा ते बारा वर्षे जर्मनीच प्रामुख्याने अमेरिकेस खेळणी निर्यात करीत असे. पण १९२९ ते १९४१ या काळात जपानने या बाबतीत जर्मनीवर मात केली. आजही (१९७३) खेळण्यांच्या उत्पादनात जपान आघाडीवर आहे.

जरी प्लॅस्टिकचे माध्यम १८६९ पासून माहीत असले, तरी अमेरिकेत प्लॅस्टिकची खेळणी १९३० सालापासून बनविण्यात येऊ लागली. प्लॅस्टिकची खेळणी कमी किंमतीत देणे शक्य होऊ लागले. याच काळात लाकडाचा भुसा, राळ, खळ यांच्या लगद्याचा उपयोग खेळणी बनविण्याकरिता होऊ लागला. पुढे झाडाच्या पांढऱ्या चिकापासून बाहुल्या आणि त्यांचे केस व डोळे प्लॅस्टिकचे बनविण्याचे तंत्र वापरात आले. त्यानंतर एक इंग्रज कारखानदाराने भरीव जर्मन खेळण्यांच्याऐवजी ओतकाम करून केलेली पोकळ खेळणी तयार करावयास सुरुवात केली. त्या काळातील खेळणी म्हणजे प्रत्यक्षात वापरात असलेल्या वस्तूंची लहान प्रतिकृतीच असे.

विसाव्या शतकात ‘मेकॅनो’ या लिव्हरपूल येथे तयार करण्यात आलेल्या खेळण्याने नव्या रचनात्मकपद्धतीच्या खेळण्यांची सुरुवात केली. ‘मेकॅनो’मध्ये सारख्या अंतरावर भोकेपाडलेल्या लोखंडी पट्ट्या, चाके, दांड्या, स्क्रू वगैरे वस्तू विविधप्रकारच्या यांत्रिक वस्तूंच्या प्रतिकृती कल्पकतेने तयार करता येण्याचीसाधने असतात. पुढे या नव्या खेळण्यांत चावी देऊन वा विजेवर चालणाऱ्याआगगाड्या, विमाने, मोटारी, नावा इ. अनेक प्रकारच्या खेळण्यांची भर पडली. हल्ली प्लॅस्टिकची अनेकविध प्रकारची खेळणी तयार करण्यात येतात. ती आकर्षकअसली तरी फारशी टिकाऊ नसतात.

भारतात खेळण्यांचे उत्पादन फार जुन्या काळापासून होत असावे, असे सिंधु-गंगांच्या खोऱ्यातील त्याचप्रमाणे कोसाम, सारनाथ, बक्सार, राजघाट, अहिच्छत्र, रंगमती, पाँडिचेरीजवळील अरिकामेडू, म्हैसूरमधील चंद्रवली व ब्रह्मगिरी, अमरावती, नागार्जुनकोंडा इ. ठिकाणांच्या उत्खननांत सापडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण खेळण्यांवरून दिसून येते. इटलीतील पाँपेई शहराच्या उत्खननात एक सुंदर हस्तिदंत बाहुली सापडली. ती पहिल्या शतकातील असावी. असे म्हणतात की, रोमच्या व्यापाऱ्यांनी ती भारतातून रोमला नेली असावी. आजही तसल्या प्रकारची हस्तिदंती व चंदनाची खेळणी म्हैसूरमध्ये बनविली जातात.

भारतात बनणाऱ्या बाहुल्यांतून प्रांतीय वैशिष्ट्ये दिसून येतात. राजस्थानातील लावण्य, बंगालचे मोहकत्व, महाराष्ट्राचा कणखरपणा, उत्तर प्रदेशाची अदब व बुजरेपणा, आंध्रचा चाणाक्षपणा, तमिळनाडूची आनंदी व चोखंदळ मनोवृत्ती यांसारखी वैशिष्ट्ये त्या त्या प्रांतात तयार होणाऱ्या खेळण्यांतून प्रकर्षाने दृग्गोचर होतात. उंची कपडे व परंपरागत दागिन्यांनी सजविलेल्या राजस्थानमधील भरतपूर येथे तयार झालेल्या बाहुल्या खूपच आकर्षक असतात. लाल व निळ्या रंगांतील पोषाखात असलेली बंगाली पुरुषाकृती खेळणी चित्ताकर्षक असतात. मुलांना, विशेषतः महाराष्ट्रातील मुलांना, आवडणारी किल्ल्याची खेळणी इतिहासाची आठवण करून देतात. बनारस व मथुरा येथील खेळणी पुराणकाळातील राधा-कृष्णांची आठवण करून देतात. गुजरात व मध्य प्रदेशातही कृष्णकथेवर आधारित असलेली खेळणी सुंदर आणि आकर्षक असतात. राजस्थानमधील उंट, मणिपूरमधील नृत्यांगना, दक्षिण भारतातील हत्ती, बैलगाडी व टांग्याचा तट्टू, काश्मीरमधील शिकारा, मद्रास व म्हैसूरमधील मुलींच्या बाहुल्या, बंगालमधील गवई, जनावरे यांच्या आकारातील खेळणी तसेच बाहुल्या प्रसिद्ध आहेत.


भारतात मातीच्या मूर्ती व खेळणी पुष्कळ ठिकाणी बनतात. उत्तर प्रदेश राज्य व महाराष्ट्र राज्य यांचा उल्लेख यांबाबतीत विशेषत्वाने करणे आवश्यक आहे. सावंतवाडी, आग्रा, लखनौ व बेळगाव जिल्हा या भागांत विशेषतः मातीची हुबेहूब फळे बनविण्यात येतात. लखनौमध्ये बनविली जाणारी मातीची फळे एवढी हुबेहूब असतात की, बारकाईने पाहिल्याशिवाय खऱ्या फळांतव नकली फळांत भेदभाव करता येत नाही. भाजीपाल्यांच्या नमुनाकृतीतही लखनौचा क्रम वरचा लागतो. मानवाच्या व जनावरांच्या मातीच्या मूर्ती तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश राज्यांतील काही ठिकाणी करण्यात येतात.

मातीची रंगीत खेळणी त्याचप्रमाणे लाकडी खेळणी यांबद्दल कृष्णनगर, कलकत्ता, पुणे, लखनौ ही शहरे विशेष प्रसिद्ध आहेत. अनुरूप आणि मोहक रंगांनी त्याचप्रमाणे बारकाईने केलेले खेळण्यांवरील चित्रण हे कृष्णनगरच्या कारागिरांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे लक्ष्मी, गणपती, वीणेसह सरस्वती इ. मूर्तींचे कलाकाम वैशिष्ट्यपूर्ण असते.

रंगीत लाकडी व पितळी खेळणी भारतात केली जातात. या बाबतीत बनारसची विशेष ख्याती आहे. मदुराई व बेल्लारी येथे सागाची आणि लाल लाकडांची खेळणी आजही बनविली जातात. दक्षिणेतील कोंडापल्लीची लाकडाची रंगीत खेळणी त्यांच्या सुबकतेबद्दल व मोहकतेबद्दल प्रसिद्ध आहेत. अंबारीसह असलेला तसेच शृंगारलेला हत्ती, इतर पशूंच्या प्रतिकृती, कोल्लाटम नर्तक, मंदिरे, विष्णू, झोपड्या इ. आकारांतील खेळणी जुन्या भारतीय पद्धतीने सुबकतेने रंगविलेली असतात. लाकडी खेळण्यांचा रंग अधिक काळ टिकावा म्हणून बंगालमध्ये त्यांवर लाखेचे रोगण करण्यात येते. हैदराबादच्या परिसरातही लाकडी खेळणी बनविण्यात येतात. सर्वसाधारणतःलोकप्रिय असलेली लाकडी खेळणी हलक्याफुलक्या लाकडापासून कोरून आणि रंगवून तयार केलेली असतात.

भारतात धातूंचीही खेळणी बनविण्यात येतात. ही खेळणी मुख्यतः पितळेची असल्याने जड असतात.बैलगाडी, रथ, हिंदू पुराणातील दृश्ये त्याचप्रमाणे चित्रित केलेले खेड्यातील व शहरातील जीवन इ. प्रकार या खेळण्यांतून दिसून येतात. खरे म्हटले तर हे प्रकार शोभेकरिता उपयुक्त, पण भारतीय मुली या सर्वांचा उपयोग हौसेने भातुकलीमध्ये करतात.

धातूंची खेळणी वा बाहुल्या बनविण्याकरिता अनुभव, ज्ञान व कुशलतेबरोबरच खूप परिश्रमाचीही गरज असते. आज या गुणांचीवाण दिसू लागली आहे. याचा परिणाम साहजिकच खेळण्यांच्या उत्पादनावर झालेला आहे. अशा खेळण्यांचे उत्पादन घटण्याचे आणखी एक कारण म्हणजे ती कारखान्यांतून तयार होणाऱ्या स्वस्त खेळण्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाहीत. असे असले तरी भारतात अत्याधुनिक खेळण्यांबरोबरच हस्तनिर्मित खेळणी आजही त्यांच्या परंपरागत वैशिष्ट्यांसह विपुल प्रमाणात दिसून येतात.

भारतात कित्येक ठिकाणी कापडी खेळणीही बनविण्यात येतात. त्यांचा रंग व पोषाख इतका चांगला असतो की, लोकांचे लक्ष त्यांच्याकडे आपोआप वेधले जाते. मेणाचाही उपयोग खेळणी बनविण्याकरिता करण्यात येतो. विशेषतः प. बंगालमधील बांकुरा व आसपासच्या जिल्ह्यांत राहत असलेले माल जातीतील लोक मेणाचा उपयोग करताना दिसतात. हे लोक खेळणी करण्याकरिता साधी माती, मुंग्यांच्या वारूळापासून व उंदरांच्या बिळापासून मिळविलेली चिकण माती, रेती आणि तांदळाच्या साळीचा भुसा यांच्या विशिष्ट मिश्रणाने बनविलेल्या मातीचा उपयोग करतात. भाजताना अनाठायी भेगा पडू नयेत म्हणून रेती व तांदळाच्या साळीचा भुसा ते वापरीत असावेत. आकृतीवरवितळलेल्या मेणाचा लेप देण्यात येतो. त्याचप्रमाणे दोराचे वेष्टनही त्यावर करण्यात येते. दोऱ्यावर ही राळ व मेणाचे मिश्रण लावण्यात येते. त्यानंतर संपूर्ण आकृतीवर वर उल्लेखिलेल्या विशिष्ट मातीचे थरावर थर देण्यात येतात. थर देण्यापूर्वी या विशिष्ट मातीच्या मिश्रणात तागाचे तुकडे टाकण्यात येतात. आकृतीच्या वरच्या बाजूस एक भोकपाडण्यात येते. त्या भोकातून धातूंचे लहान लहान तुकडे टाकण्यात येतात. हा साचा गरम करताना विशिष्ट कोनात ठेवण्यात येतो. गरम होऊन ज्यावेळी भोकातून धूर निघू लागतो, त्यावेळी तात्काळ साचा संपूर्णपणे सरळ करण्यात येतो. थंड झाल्यावर साच्यातून तयार झालेली आकृती काढून घेण्यात येते. बांकुराच्या ह्या आकृतीचे साम्य आफ्रिकेतील बेनन ब्राँझशी आहे.

भारतात तयार होणाऱ्या खेळण्यांमधून भारतीय जीवनातील विविध पैलूंचे दर्शन घडते. त्यांचे कार्य विविध आहे. काही खेळण्यांचा उपयोग धार्मिक कारणाकरिता होत असला, तरी त्यांचेमहत्त्वाचे कार्य मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचे असते. मुलांच्या सौंदर्यदृष्टीत व मानसिक वाढीत ती भर घालतात. गोष्टींच्या पुस्तकांची उणीव भरून काढण्याच्या दृष्टीनेही त्यांचा उपयोग होऊ शकतो.

संदर्भ : 1. Dongerkery, K. S. A Journey Through Toyland, Bombay, 1954.

          2. Leslie, D. Children’s Toys Throughout the Ages, London, 1963.

          3. Mookerjee, A. Folk Toys in India, Calcutta, 1956.

गोखले, श्री. पु. खोडवे, अच्युत