गिर्यारोहण : पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणू आज त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यास एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे.

गिर्यारोहणात दहा — पंधरा मीटर उंचीची टेकडी चढण्यापासून ते मौंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार येतात. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची, कुशलतेची व योग्य त्या साधनसामग्रीची आवश्यकता असते. या गोष्टींच्या अभावी गिर्यारोहण घातक ठरण्याचा संभव असतो.

गिर्यारोहणाची प्रेरणा : निसर्गावर विजय मिळविण्याची व जे अजिंक्य दिसते ते जिंकण्याची मानवाची नैसर्गिक इच्छा, त्याची साहसी वृत्ती, अज्ञात क्षेत्राचे संशोधन करण्याची त्याची जिज्ञासा या गिर्यारोहणाच्या प्रेरक शक्ती आहेत. गिर्यारोहणात घडणारे निसर्गाचे उदात्त दर्शन व व्यावहारिक रुक्ष जीवनातून होणारी

हिमविदर ओलांडणारे प्रशिक्षार्थी गिर्यारोहक

सुटका यांमुळेही लोकांना गिर्यारोहणाचे आकर्षण वाटते. जितके शिखर उंच व चढण्यास कठीण, तितके मानवाचे प्रयत्न अधिक व उत्साहही दांडगा दिसून येतो. माणसाच्या विजिगीषू महत्त्वाकांक्षेला आव्हान देणारा एक क्रीडाप्रकार म्हणून गिर्यारोहण दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. गिर्यारोहणाच्या खेळात स्वतःच्याच सामर्थ्यावर, सहनशीलतेवर व निर्णयबुद्धीवर अवलंबून राहावे लागते. निसर्गच गिर्यारोहकाला कार्यक्षेत्र देतो व प्रतिस्पर्धी म्हणून विरोधही करतो. एकूण मानवजात विरूद्ध निसर्ग असा हा अद्वितीय व चित्तथरारक खेळ आहे. या खेळातील धोकेच मानवाला या खेळाकडे अधिकाधिक प्रवृत्त करीत आले आहेत. मनोरंजनाबरोबर त्याला आपले सर्वसामर्थ्य पणास लावण्याची जिद्द पुरी करता येते इतकेच नव्हे, तर उंच पर्वतक्षेत्रात शास्त्रीय संशोधन व अभ्यास करणे त्यास शक्य होते आणि लष्कराला देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने पर्वताच्या युद्धशास्त्रात निपुणही करता येते.

खडकारोहण : गिर्यारोहणाचे दोन प्रकार आहेत : (१) खडकारोहण (रॉक क्लाइंबिंग) व (२) हिमारोहण (आइस क्लाइंबिंग). उच्च शिखरावर अगदी वरच्या चढणीत साधारणतः खडकारोहण करण्याचा 

खडकारोहण करताना प्रशिक्षार्थी