विदूषक : एक सर्वपरिचित विनोदी पात्र. सर्कस, मूकनाट्य, नाटक (विशेषतः प्राचीन संस्कृत नाटक) यांतून या पात्राचे भिन्न भिन्न विविध आविष्कार दिसून येतात. प्राचीन ग्रीक नाट्याच्या संदर्भात ॲरिस्टॉटलने विनोदी पात्राचे त्रिविध वर्गीकरण केले आहे : एक केवळ हास्यविषय असलेला मूर्खाचा नमुना (बफून) दुसरा वरवर मूर्खाचे सोंग आणले, तरी तल्लख डोक्याचा आणि आपल्या व्यावहारिक शहाणपणाची जाणीव असलेला (ऐरॉन) आणि तिसरा खोट्या शौर्याच्या व शहाणपणाच्या बुरख्याखाली आपला स्वाभाविक भित्रेपणा व मूर्खपणे दडवू पाहणारा ढोंगी (इंपोस्टर). संस्कृत नाटकांतील विदूषकांत हे तिन्ही नमुने थोड्याफार फरकाने पाहावयास मिळतात.

प्राचीन ग्रीक व रोमन प्रहसने, ⇨मूकनाट्ये यांत दुय्यम विनोदी व्यक्तिरेखा असत. त्या मुख्य पात्रांच्या विडंबनात्मक नकला करीत. विदूषकी परंपरेचे मूळ त्यात आढळते. मध्ययुगीन ‘जेस्टर्स’-म्हणजे दरबारी खुषमस्करे-आपल्या मूर्ख हास्यास्पद चाळ्यांनी जनतेचे मनोरंजन करीत. इटालियन ‘कोग्मेदीआ-देल्ला-आर्ते’ या प्रकारातील विनोदी प्रहसनांचे गावोगावी प्रयोग करणाऱ्या भटक्या नाटकमंडळ्यांनी ‘हर्लेक्वीन’(किंवा ‘अर्लेच्चिनो’) हे लक्षणीय विदूषकी पात्र निर्माण केले (सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध). त्याला साऱ्या यूरोपभर प्रसिद्धी मिळाली. सुरुवातीला विनोदी हुजर्यारच्या वा खुषमस्कर्याशच्या (झान्नी) रूपात असलेले हे पात्र पुढे कसरतपटू, कौशल्याची व साहसाची कामे करणारे, भडक रंगभूषा-वेशभूषा करणारे हरहुन्नरी पात्र म्हणून विकसित झाले. आजच्या सर्कसमधल्या विदूषकाची पूर्वपरंपरा त्यात आढळते. पोकळ बांबूने सटासट आवाज करीत सोबत्याच्या पार्श्वभागावर फटके मारण्याच्या विदूषकी चाळ्याचे मूळ हर्लेक्वीनच्या ‘स्लॅपस्टिक’ विनोदात आढळते. मध्ययुगीन रहस्यानाटकांतील (मिस्टरी प्ले) दुष्ट व्यक्तिरेखांत इंग्लिश विदूषकाचे मूळ आढळते. सैतान व त्याचे दुर्गुण यांना इंग्लंडमध्ये विनोदी पात्रांचे रूप आले. ‘बफून’ (किंवा प्रँकस्टर) सारख्या मूर्ख पण दुष्ट व्यक्तिरेखा विदूषकाच्या निर्मितीला पोषक ठरल्या. पुढे एलिझाबेथच्या काळात इंग्रजी रंगभूमीवरून दुर्गुणाचे पात्र गेले आणि त्याची जागा शेक्सपिअरच्या नाटकांतील ‘क्लाउन’ ने (विदूषकाने) घेतली. प्रारंभीच्या व्यावसयिक इंग्रजी रंगभूमीवरील प्रख्यात विदूषकांमध्ये रिचर्ड  टार्लेटन (?-१५८८), विल्यम केंप (?-सु.१६०३) व रॉबर्ट अर्मीन (सु. १५६८-सु.१६११) यांचा उल्लेख आवश्यक ठरतो. ते शेक्सपिअरच्या नाटकमंडळीतील नट होते. अशा भटक्या विदूषकी नटांच्या प्रभावातून जर्मनीमध्ये रंगभूमीवरील विदूषकांची परंपरा निर्माण झाली. ‘पिकेलहेरिंग’ हे अशा प्रकारचे विदूषकी पात्र जर्मनी मध्ये एकोणिसाव्या शतकापर्यंत लोकप्रिय होते. फ्रेंच ‘प्येअरो’ (किंवा पेद्रोलिनो) हा पिठासारख्या पांढर्यानसफेद चेहर्या चा (व्हाइट फेस) टकल्या विदूषक सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम अवतीर्ण झाला. मूळ प्राचीन ग्रीक परंपरा असलेला मूकनाट्य हा प्रकार अठराव्या शतकात इंग्रजी रंगभूमीवर जोमाने पुढे आला. झां-गास्पार्द देबुरॉ (१७९६-१८४६) या फ्रेंच मुकाभिनयपटूने एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रेमासाठी झुरणार्याम खिन्न उदास, रडवेल्या व केविलवाण्या विदूषकाची प्रतिमा निर्माण केली. रडक्या विदूषकाची ही प्रतिमा आजही लोकप्रिय आहे. प्रख्यात फ्रेंच मुकाभिनयपटू मार्सेल मार्सो (१९२३- ) हा पांढऱ्या सफेद चेहऱ्याच्या रंगभूषेसाठी व विलक्षण लवचीक मुद्राभिनयासाठी तसेच चपळ हालचालींसाठी प्रसिद्ध असून, त्याच्या ‘माइमोड्रामा’ या आधुनिक मूकनाट्यप्रकारातून त्याने अनेकविध भिन्न भिन्न व्यक्तिरेखा साकार केल्या आहेत. ‘बिप’ ही त्याची विदूषकाची व्यक्तिरेखा अविस्मरणीय आहे.

प्रसिद्ध जर्मन विदूषक ल्यू याकॉपसर्कशीतील विदूषक : प्रारंभकाळातील सर्कस-विदूषक हे कुशल कसरतपटू व घोडेस्वार असत, तसेच सुरुवातीला ते गाणारी-बोलणारी विनोदी पात्रे म्हणून काम करीत. खर्याअ सर्कस-विदूषकाचा सर्वांत आद्य आविष्कार जोसेफ ग्रिमाल्डी (१७७८-१८३७) या इंग्लिश नटाने घडवला. कोलांच्या उड्या मारणे, धडपडणे, पोकळ बांबूने फटके मारणे इ. शारीर विदूषकी क्लृप्त्यांमध्ये तो अतिशय निष्णांत होता. त्याची विदूषकाची भूमिका व रंगभूषा पुढे सर्कसमध्ये अवतीर्ण झाली. कोम्मेदीआ प्रकाराकील झान्नी, धूर्त कोटीबाज हर्लेक्वीन, बेडौल, चमत्कारिक पेद्रोलिनो या पारंपारिक व्यक्तिरेखांचाही आधुनिक विदूषकाच्या जडणघडणीत वाटा आहे. सैल घोळदार चोळणा, सैलसर ढगळ अंगरखा व रुंदी कडांची टोकेरी वा शंकाकृती हॅट ही विदूषकी वेषभूषेची खास वैशिष्ट्ये या परंपरेतूनच आली आहेत. एकोणिसाव्या शतकातील सर्वांत लोकप्रिय अमेरिकन सर्कसपटू विदूषक डॅन राइस (१८२३-१९००) हा नृत्य, गायन, संभाषणचातुर्य, शारीर कसरती व चलाख्या, करामती इत्यादींद्वारा लोकांची मने रिझवत असे. तो एक-रिंगणी (वनरिंग) सर्कशीत आपले खेळ करीत असे. पुढे एक-रिंगणी सर्कस मागे पडून तीन-रिंगणी (थ्री रिंग) सर्कस एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रचारात आली. एकाच वेळी तीन रिंगणांत वेगवेगळे खेळ केले जाऊ लागले तेव्हा बोलक्या विदूषकाचा आवाज सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने, केवळ दृश्य विनोदावर आधारित करामती व झगमगीत भडक रंगभूषा-वेशभू षा करणारे मूक विदूषक प्रचारात आले. त्याच्या केवळ दृश्य विनोदी करामतींत कोलांट्या उड्या, धडपडणे, पोकळ बांबूची फटकेबाजी, मूकाभिनय वगैरे प्रकारांचा समावेश असे. हल्लीच्या सर्कशीतही विदूषकाला अशाच प्रकारचे अष्टपैलू कौशल्याचे प्रदर्शन करावे लागते. झूल्यावरचे झोके, कसरतींचे नानविध प्रकार, घोड्यावरच्या विविध कुशल रपेटी, पशूंना हाताळणे इ. कौशल्ये त्याला उत्तम प्रकारे अवगत असावी लागतात. त्याला मुख्य कसरतपटूचे विडंबनात्मक अनुकरण करून व त्यात धडपडीचा कृत्रिम आभास उत्पन्न करून हास्य निर्माण करावे लागते. सुप्रसिद्ध अमेरिकन सर्कसप्रवर्तक पी. टी. बार्नम (१८१०-९१) यांच्या मतानुसार विदूषक हे सर्कसच्या तंबूच्या खुंट्यांसारखे आहेत. त्यांच्याच आधारावर सर्कस चालते. [⟶सर्कस].


१८६० च्या दशकात ‘ऑग्युस्ते’ हा हलक्यासलक्या, हास्यास्पद मूर्खपणाच्या कृती करणाऱ्या विदूषकाचा वर्ग उदयास आला. लांबलचक मोठे नाक. सैल ढगळ कपडे. पायात फताडे बूट असा त्याचा अवतार असे. त्याच्या हालचालींमध्ये गबाळेपाणा व धांदरटपणा असे. पांढऱ्या चेहऱ्याच्या विदूषकाचा साथीदार म्हणून तो रंगमंचावर येऊन त्याचे सर्व करामती खेळ त्यांत अडथळे आणून उधळून लावत असे. व्यक्तिदर्शी विदूषकांचाही (कॅरॅक्टर क्लाउन) एक वर्ग असून, ते आपल्या अभिनयकौशल्याने अनेकविध विदूषकी व्यक्तिरेखा साकार करतात. एमेट केली (१८९८-१९७९) याने साकार केलेला उदास रडक्या चेहऱ्याचा भटक्या विदूषक, तसेच ⇨चार्ल्‌स चॅप्लिनचा (१८८९-१९७७) भटक्या (ट्रॅम्प) ही व्यक्तिदर्शी विदूषकाची उत्कृष्ट उदाहरणे होत.

संस्कृत नाटकातील विदूषक : भरताने नाट्यशास्त्रात प्राचीन संस्कृत रंगभूमीवरील प्रमुख पात्रांच्या जोडीचे लोकप्रिय विनोदी पात्र म्हणून विदूषकाचा निर्देश केला आहे. ‘दूष’ (दूषणे देणे, दोष दाखविणे, बिघडवून टाकणे) या धातूवरून त्याची व्युत्पत्ती सांगता येते. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने दोष दाखविणारा आणि सरळ असलेले बिघडून टाकणारा, असा जो नाटकीय पुरुष तो विदूषक. स्पष्टवक्ता टीकावर व हास्यनिर्माता विनोदकार या दोन्ही भूमिका त्याच्या ठायी एकवटल्या आहेत. देवाचा सहचर विदूषक असा प्रकारही भरताने मानला आहे. नारद हे त्याचे उदाहरण होय. प्रारंभीच्या संस्कृत नाटकांचे स्वरूप देव व असुर यांच्या द्वंद्वाचे होते, त्या प्रयोगांत असुराच्या वा दुष्ट व्यक्तीच्या रूपाने विनोदी पात्राचा-म्हणजेच विदूषकाचा-अवतार रंगभूमीवर प्रथम झाला. विदूषकाचे दुर्गुण व शारीर व्यंगे वा विकृती ही या असुरी सोंगात असत. शिवाय हे विदूषक बहुधा ब्राह्मण असत. उदा., मालविकाग्निमित्रातला गौतम, मृच्छकटिकातला मैत्रेय, नागानंदातला आत्रेय इत्यादी. विद्रूपता, खादाडपणा व वाचाळता ही विदूषकाची काही लक्षणे होत. त्याची असंबद्ध अर्थशून्य, अतिशयोक्त बडबड अथवा चतुर कोटीबाजपणा यांतूनही विनोद निर्माण होतो. तसेच दोष दाखविताना वा टीका करताना तो थट्टेखोरपणे, गंमतीने बोलतो आणि चालू प्रसंगाला विनोदाने कलाटणी देतो. नाटकातील नायक राजाचा तो सहचर असून प्रेमात पडलेल्या नायकाला उत्तेजन देणे, मदत करणे, विरहप्रसंगी त्याच्या दुःखावर हळुवार फुंकर घालणे अशा प्रकारची त्याची नाट्यगत कार्ये असतात. शृंगाररसाच्या दर्शनात ‘नर्मसचिव’ वा ‘कामसचिव’ अशी त्याला संज्ञा आहे. रंगभूमीवरील नायकाचा प्रवेश तो सूचित करतो, तसेच सेवकाचे वा निरोप्याचे कामही त्याला करावे लागते. तो राजाचा दरबारी खुषमस्कऱ्या असतो. त्याचा वेष बावळा असला, तरी अंतरी नाना कळा असतात. त्याच्याजवळ व्यवहारचातुर्य व शहाणपणाही असते. नाटकाचे कथानक गतिमान राखणे व गंभीर प्रसंगाचा ताण विनोदाने हलका करणे, हीही त्याच्या भूमिकेची वैशिष्ट्ये आहेत. विदूषक हा नाटकात सर्वसामान्यांची प्राकृत भाषा वापरतो व सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून वावरतो. ⇨तमाशातील सोंगाड्याच्या विनोदाची जातकुळीही साधारणतः विदूषकी पठडीतील असते.

संदर्भ : भट, गो. के. विदूषक, कोल्हापूर, १९५९.

इनामदार, श्री. दे.