भगोल : पृथ्वीवरील निरीक्षकाला अवकाशातील तारे वगैरे स्वस्थ पदार्थ ज्या अनंत त्रिज्येच्या एका विस्तीर्ण गोलाला आतून जडविल्यासारखे दिसतात किंवा विस्तार्ण गोलावर प्रक्षेपित झालेले दिसतात. त्या गोलाला भगोल असे म्हणतात. भगोल हा ज्याच्या त्रिज्येची लांबी निश्चित नाही असा काल्पनिक गोल आहे. याचा मध्य वास्तविक पृथ्वीच्या मध्याशीच असतो परंतु खगोलीय अंतरे इतकी प्रचंड आहेत की, त्यांच्याशी तुलना करता पृथ्वीचा आकार अगदी क्षुल्लक होतो व पृथ्वीवर कोठेही असलेला निरीक्षक हाच भगोलाचा मध्य मानला, तरी भगोलाच्या दृश्यावरून काढलेल्या निष्कर्षात फरक पडत नाही. उत्तरे – कडून पाहताना पृथ्वीच्या अपसव्य (घड्याळ्याच्या काट्यांच्या गतीच्या विरुद्ध दिशेत) अक्षभ्रमणामुळे भगोल एका नाक्षत्र दिवसात एक सव्य (घड्याळ्याच्या काट्यांच्या गतीच्या दिशेत) फेरी पूर्ण करीत असल्याप्रमाणे भासतो. भगोल जरी काल्पनिक असला, तरी ज्योतिषशास्त्रात स्वस्थ पदार्थांचे स्थान निश्चित करणे व भगोलावर प्रत्यक्ष दाखविणे यांसाठी तो फार उपयुक्त ठरला आहे. भिन्न अंतरावर असणारे तारे भगोलावरच आहेत असे मानल्यामुळे स्वस्थ पदार्थांची एकमेकांपासूनची प्रत्यक्ष अंतरे दाखविता येतात. निरीक्षकाला कोणत्याही क्षणी क्षितिजावरील भगोलाचा वरचा अर्धा भागच दिसू शकतो. ताऱ्यांना भिन्न दिशांत गती असली, तरी ते प्रचंड अंतरावर असल्यामुळे भगोलावरील त्यांची परस्परसापेक्ष स्थाने कित्येक वर्षांत बदललेली आढळून येत नाहीत. सूर्य, चंद्र व ग्रह यांची स्थाने मात्र सतत बदलत असलेली दिसतात.

पृथ्वीचा अक्ष दोन्ही अंगास वाढविल्यास भगोलास ज्या दोन बिंदूत छेदतो, त्या बिंदूना भगोलाचे उत्तर व दक्षिण ध्रुवबिंदु असे म्हणतात. या दोन बिंदूना जोडणारी रेषा भगोलाचा अक्ष दाखविते. या अक्षाभोवती भगोल ताऱ्यांसह (उत्तरेकडे जाऊन पाहिल्यास) सव्य दिशेने फिरताना दिसतो. पृथ्वीच्या विषुववृत्ताचे प्रतल (पातळी) भगोलास ज्या वर्तुळात छेदते ते भगोलाचे विषुववृत्त असते. प्रत्येक ताऱ्याचा दैनिक मार्ग वर्तुळाकारी असल्याचे दिसते. या वर्तुळाचा मध्य अक्षावर असून वर्तुळाचे प्रतल विषुववृत्ताच्या प्रतलाला समांतर असते. विषुववृत्तावरील कोणत्याही बिंदूपासून ध्रुवबिंदू ९० अंशावर असतात. पृथ्वीच्या कक्षीय पातळीच्या भगोलावरील छेदाने जे वर्तुळ मिळते, त्यास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या वृत्तावर सूर्य पूर्वेकडे सरकत जाऊन एका वर्षाच्या कालावधीनंतर भगोलावर एक फेरी पूर्ण करतो. विषुववृत्त व क्रांतिवृत्त एकमेकांशी सु. २३.५ अंशांनी कललेली असून ती ज्या दोन बिंदुंत छेदतात, त्यांस संपातबिंदू असे म्हणतात. क्रांतिवृत्तवरील सर्वांत उत्तरेचा व सर्वांत दक्षिणेचा बिंदू यांना सस्तंभ बिंदू म्हणतात. या वृत्ताचा भूमध्यगामी लंब भगोलास ज्या बिंदुत छेदतो त्यास कदंब म्हणतात.

भगोलावरील संदर्भबिंदू व संदर्भवर्तुळे

पृथ्वीवरील भिन्न स्थानांवरुन पाहताना भगोलाची गती क्षितिजसापेक्ष भिन्न प्रकारची दिसते. उत्तर ध्रुवावरील निरीक्षकाच्या दृष्टीने भगोलाचा अक्ष तेथील क्षितिजपातळीशी काटकोन करीत असतो. यामुळे भगोलाचा ध्रुवबिंदु निरिक्षकाच्या बरोबर डोक्यावर येऊन ताऱ्यांचे मार्ग क्षितिजाला समांतर असल्यासारखे दिसतात.

विषुववृत्तावरील निरीक्षकाच्या दृष्टीने भगोलाचा अक्ष क्षितिजपातळीतच असतो आणि क्षितिजावरील उत्तर व दक्षिण बिंदुतून जातो. या अक्षाभोवती वलन करणाऱ्या ताऱ्यांच्या मार्गांचे क्षितीजाने दोन सारखे भाग पडतात व त्यांच्या मार्गाचीप्रतले क्षितिजाशी काटकोन करतात .

पृथ्वीच्या ध्रुव व विषुववृत्त यामधील इतर कोणत्याही अक्षांशावरील स्थानावरुन निरीक्षण करताना भगोलाचा अक्ष क्षितिजपातळीशी कोन करीत असतो. उत्तर गोलार्धात निरीक्षकाच्या स्थानाचे जे अक्षांश असतात, तितक्या अंशांचा कोन अक्ष व क्षितिज यांमध्ये असतो म्हणजेच क्षितिजापासून तितक्या अंशांवर ध्रुवबिंदू दिसतो. यामुळे ताऱ्यांच्या मार्गांची प्रतले क्षितिजपातळीला कललेली असून क्षितिज सापेक्ष ताऱ्यांचे मार्ग तिरके दिसतात.

भगोलावरील स्थाने निश्चित करण्यासाठी पुढील संदर्भबिंदू व संदर्भवर्तुळे वापरली जातात. खस्वस्तिक, अधःस्वस्तिक, क्षितिज, पूर्व बिंदु, पश्चिम बिंदू, उत्तर बिंदू, दक्षिण बिंदू, विषुववृत्त, उत्तर ध्रुवबिंदु, दक्षिण ध्रुवबिंदु, उत्तर कदंब, दक्षिण कदंब, क्रांतिवृत्त, वसंत संपात, शरत् संपात, मध्यमंडल, उत्तर संस्तंभ, दक्षिण संस्तंभ वगैरे (आकृती पहा).

पहा : ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धती.

मराठे, स.चिं. नेने, य. रा.