पॅरामिशियम : प्रोटोझोआ (आदिजीव) संघातील सिलिएटा वर्गातील हा एक आदिजीव आहे. या वर्गातील प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शरीरावर पक्ष्माभिका (ज्यांच्या लयबद्ध फटकार्‍यांनी प्राणी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतात वा द्रव पदार्थात प्रवाह उत्पन्न करतात अशा पेशींपासून निघालेल्या केसांसारख्या वाढी) असतात आणि त्यांचा उपयोग संचलनाकरिता (हालचालीकरिता) होतो. कुजणारे गवत किंवा वनस्पती असणार्‍या गोड्या पाण्याच्या डबक्यात पॅरामिशियम विपुल असतात. डबक्यातले थोडेसे पाणी परीक्षानलिकेत घेऊन ती उजेडासमोर धरली, तर त्या पाण्यात बारीक ठिपक्यांसारखे पॅरामिशियम इकडेतिकडे हिंडत असलेले दिसतात. ते अतिशय बारीक असल्यामुळे त्यांची संरचना सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यावरच दिसू शकते. पॅरामिशियमाच्या आठनऊ जातींपैकी पॅरामिशियम कॉडेटम  आणि पॅरामिशियम ऑरेलिया  या दोन सामान्य जाती होत. येथे दिलेले वर्णन पॅरामिशियम कॉडेटम या जातीचे आहे.

आ. १. पॅरामिशियमाची आंतररचना : (१)मुख-खाच, (२) कोशिकामुख, (३) कोशिका-ग्रसनी, (४) गुदद्वार, (५) तयार होत असलेली अन्नरिक्तिका, (६) परिसंचारी अन्नरिक्तिका, (७) पक्ष्माभिका, (८) दंशांगे, (९) तनुच्छद, (१०) तयार होत असलेली संकोची रिक्तिका, (११) बृहत्-केंद्रक, (१२) लघुकेंद्रक, (१३) संकोची रिक्तिका, (१४) अरीय नाल, (१५) पुढील बाजू, (१६) मागील बाजू.

आंतररचना : शरीर एकाच कोशिकेचे (पेशीचे) बनलेले असून लांबट असते. त्याची लांबी ०·३ मिमी. असते. पुढचे टोक बोथट असून मध्य भागाच्या मागे शरीर रुंद असते. व ते मागच्या टोकाकडे निमुळते झालेले असते. शरीराचे बाह्य पृष्ठ एका लवचिक कलेने–तनुच्छदाने (पातळ त्वचेने) – झाकलेले असते आणि त्याच्यावर सारख्या लांबीच्या सूक्ष्म पक्ष्माभिकांच्या अनुदैर्ध्य (उभ्या) ओळी असतात. मागच्या टोकावर लांब पक्ष्माभिकांचा गुच्छ असतो. तनुच्छदाच्या आत दाट व स्वच्छ बहि:प्रद्रव्याचा पातळ थर असतो आणि त्याच्या आतली सगळी जागा कणिकामय व पातळ अंत:प्रद्रव्याने भरलेली असते. बहि:प्रद्रव्यामध्ये पुष्कळ तर्कूच्या (चातीच्या) आकाराची दंशांगे असून ती पक्ष्माभिकांच्या बुडांमध्ये एकाआड एक याप्रमाणे असतात. ही लांब सूत्रांच्या (तंतूंच्या) रूपात बाहेर टाकली जातात व त्यांचा उपयोग एखाद्या वस्तूला चिकटण्याकरिता किंवा स्वसंरक्षणाकरिता होता. पुढच्या टोकापासून एक उथळ खोबण (मुख-खाच) निघते ही तिरकस होऊन शरीराच्या मध्याच्या मागे अधर (खालच्या) पृष्ठावर जाते या खोबणीच्या मागच्या टोकाशी मुख अथवा कोशिका-मुख असते. कोशिका-मुख एका आखूड नलिकाकार कोशिका-ग्रसनीत (कोशिकेच्या घशासारख्या भागात) उघडते. कोशिका-ग्रसनीचा अंतप्रद्रव्यात शेवट होता. अंत:प्रद्रव्यामध्ये अन्नरिक्तिका (कोशिकेतील अन्नपदार्थयुक्त पोकळी) असून त्यात पचन होत असलेले अन्न असते. शरीराच्या पुढच्या आणि मागच्या टोकांकडे एकेक मोठी संकोची रिक्तिका (आकुंचन पावणारी कोशिकेतील जलमय विद्राव व स्राव असलेली पोकळी) असते. शरीरात एक लहान लघुकेंद्रक (कोशिकेतील कार्यावर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर लहान पुंज) आणि एक मोठा बृहत्-केंद्रक असतात.

विशिष्ट अभिरंजन (रंजक द्रव्याचा विद्राव) वापरून पॅरामिशियमाचे सूक्ष्मदर्शकाखाली परीक्षण केले, तर तनुच्छदाच्या खाली तंतुकांच्या एका तंत्राचे (संरचनेचे) अस्तित्व दिसून येते. पक्ष्माभिकांच्या आधार कणिका (आधार देणारे तळाशी असलेले बारिक कण) या तंतुकांनी एकमेकींना जोडलेल्या असतात. उच्च श्रेणीच्या प्राण्यांच्या तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) सारखेच हे तंत्र असते, म्हणून याला तंतुक-तंत्र म्हणतात.

संचारण: पॅरामिशियम पक्ष्माभिकांचे फटकारे मारून पाण्यात जलद पोहत जातो. सामान्यत: पक्ष्माभिका मागच्या बाजूकडे वाकवून हे फटकारे मारलेले असतात त्यामुळे प्राणी पुढे जातो पण फटकारे उलट्या बाजूला मारले म्हणजे प्राणी मागे पोहत जातो. तथापि पॅरामिशियम सरळ रेषेत पोहत जात नाही. त्याचा मार्ग नागमोडी असतो. त्याचप्रमाणे शरीर त्याच्या लंब अक्षाभोवती वाटोळे फिरत असते. 

अन्नपचन: पाण्यातील जंतू आणि बारीक आदिजीव हे मुख्यत: पॅरामिशियमाचे भक्ष्य होय. पक्ष्माभिकांच्या हालचालींनी हे अन्न प्रथम मुख-खोबणीत जाऊन तेथून मुखातून कोशिका-ग्रसनीत जाते. हिच्यात असणार्‍या आंदोल-कलेच्या आंदोलनांनी अन्न ग्रसनीच्या टोकाशी जमा होऊन एका पाण्याच्या थेंबात (रिक्तिकेत) गोळा केले जाते, ही अन्नरिक्तिका होय. ही अन्नाने पूर्णपणे भरल्यावर ग्रसनीपासून अलग होते. अंत:प्रद्रव्याच्या अभिसरणामुळे अन्नरिक्तिकेचे शरीरात एका ठराविक मार्गाने अभिसरण होते आणि ते होत असताना अन्नरिक्तिकेत पाचक एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणार्‍या प्रथिनयुक्त पदार्थांच्या) स्रावाने अन्नाचे पचन होते. अन्नरिक्तिका लागोपाठ तयार होऊन शरीरात फिरत असतात. पचलेले अन्न भोवतालच्या जीवद्रव्यात (जिवंत कोशिकाद्रव्यात) शोषले जाते आणि न पचलेले अन्न मुख व शरीराचे मागचे टोक यांच्या मधे असणार्‍या गुदद्वारातून बाहेर पडते.

श्वसन आणि उत्सर्जन : ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांची अदलाबदल तनुच्छदामधून होते. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन विसरणाने (रेणू एकमेकांत मिसळण्याच्या क्रियेने) शरीरावरील लवचिक आवरणातून आत जातो आणि शरीरात उत्पन्न झालेला कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडतो. संकोची रिक्तिकांच्या मार्गाने कार्बन डाय-ऑक्साइड बहुतकरून काही प्रमाणात बाहेर पडत असावा.

संकोची रिक्तिका दोन असून त्या बहि:प्रद्रव्यात उत्तर (वरच्या) पृष्ठाजवळ असतात आणि त्यांच्या भोवती असणार्‍या अरीय नालांच्या (त्रिज्यीय मार्गांच्या) द्वारे त्यांचा शरीराशी संबंध असतो. प्रत्येक संकोची रिक्तिकेच्या भोवती सहा ते अकरा अरीय नाल असतात. शरीरात योग्य प्रमाणापेक्षा जास्त झालेले पाणी हे नाल गोळा करतात व संकोची रिक्तिकेत थेंबाथेंबांनी टाकतात. रिक्तिका पूर्ण भरली म्हणजे तिचे आकुंचन होऊन पाणी एका छिद्रातून बाहेर जाते. अशा प्रकारे संकोची रिक्तिकांच्या नियंत्रणाने शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखले जाते. अमोनिया, यूरिया यांच्यासारखी निरूपयोगी नायट्रोजनी द्रव्ये संकोची रिक्तिकांमधून बाहेर टाकली जातात.


संवेदनक्षमता: पॅरामिशियम ⇨अमीबापेक्षा जास्त क्रियाशील आहे. त्याच्या हालचाली आपोआप होणार्‍या अथवा बाह्य उद्दीपनांमुळे घडून येणार्‍या असतात. उद्दीपनामुळे पॅरामिशियम दोन प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करतो: आकर्षी व प्रतिकर्षी, ज्यात बरेच पॅरामिशियम आहेत अशा पाण्याच्या एका मोठ्या थेंबाच्या मधोमध जर दुर्बल अम्लाचा एक थेंब टाकला, तर लगेच अथवा थोड्या वेळाने पाण्यातले सगळे पॅरामिशियम अम्लाच्या थेंबात शिरतात आणि तेथेच घोळका करून राहतात. हे आकर्षी प्रतिक्रियेचे उदाहरण होय. पॅरामिशियम पोहत असताना मार्गात काही अडथळा आला किंवा त्याच्या संवेदी (संवेदनाशील) अग्र टोकाला जर आपण बारीक काडीने स्पर्श केला, तर तो काही अंतरापर्यंत मागे पोहत जातो व नंतर पुन्हा पूर्वीच्या मार्गाने पुढे पोहायला सुरुवात करतो किंवा पूर्वाच्या मार्गाशी कोन करणार्‍या मार्गाने पोहत जातो ही दुसरी प्रतिक्रिया असून तिला परिहरण-प्रतिक्रिया म्हणतात पण मार्गात जर पुन्हा अडथळे आले, तर निरनिराळ्या दिशांना प्रयत्न करून तो सुरक्षित मार्ग शोधून काढून त्याने पुढे जातो, याला प्रयत्न-प्रमाद पद्धती (चुकत-माकत पद्धती) म्हणतात, स्पर्श, पाण्याचे प्रवाह, गुरुत्व, काही रसायने, तापमान, प्रकाश, विद्युत् प्रवाह इ. बाह्य उद्दीपकांना हे प्राणी प्रतिसाद देतात.

प्रजोत्पादन : साध्या द्विभाजनाच्या (धओ सारखे भाग होण्याच्या) क्रियेने पॅरामिशियम प्रजोत्पादन करतो. प्राण्याच्या शरीराचे आडवे विभाजन होऊन दोन तुकडे पडतात. द्विभाजनाच्या प्रक्रियेत लघुकेंद्रक आणि बृहत्-केंद्रक यांचे द्विभाजन होते, दोन नवीन संकोची रिक्तिका उत्पन्न होतात, कोशिका-प्रसनीपासून मुकुलनाने (अंकुरासारखा बारीक उंचवटा उत्पन्न होऊन) एक नवीन ग्रसनी तयार होते आणि नंतर एका संकोचनाने प्रांण्याच्या शरीराचे दोन आडवे तुकडे पडतात यांची वाढ फार लवकर होते आणि सर्व गोष्टी अनुकूल असल्या, तर सु. २४ तासांत त्यांचे चार वेळा द्विभाजन होऊन नवी प्रजा निर्माण होते.

आ. २. पॅरामिशियमाचे द्विभाजन : (अ) लघुकेंद्रकाच्या सूत्री विभाजनाची सुरूवात: (१) लघुकेंद्रक, (२) बृत्-केंद्रक, (३, ४) संकोची रिक्तिका, (५) मुख-खाच (आ) लघुकेंद्रकाच्या सूत्री विभाजनाची पुढची पायरी : बृत्-केंद्रक लांब होऊन त्याच्या संकोचनाला सुरूवात झाली आहे, मुख-खाच नाहीशी होत आहे (इ) लघुकेंद्रकाचे दोन भाग होत आहेत, बृत्-केंद्रकाचेही विभाजन होत आहे व दुसर्‍या मुख-खाच तयार होत आहेत (ई) दोन नवीन संकोची रिक्तिका उत्पन्न झाल्या असून शरीराच्या मध्य भागावर संकोचन होऊ लागले आहे (उ) पूर्ण तयार झालेले दोन पॅरमिशियम.

खंड न पडता सारख्या चालू असलेल्या द्विभाजनाच्या प्रक्रियेमुळे एक वेळ अशी येते की, उत्पन्न झालेल्या व्यक्ती दुर्बल झालेल्या असतात आणि त्या द्विभाजनाने प्रजोत्पादन करू शकत नाहीत.  पॅरामिशियमाच्या या अवस्थेला अवनती म्हणतात. या अवस्थेतील पॅरामिशियमांचा बृहत्-केंद्रक वाढून मोठा झालेला असतो. संयुग्मनाच्या (दोन पॅरामिशियमांच्या तात्पुरत्या संयोगाच्या वा एकमेकांत मिसळअयाच्या) प्रक्रियेतून गेल्याशिवाय अशा प्राण्यांच्या अंगी द्विभाजनाची शक्ती येत नाही.

आ. ३. पॅरामिशियमाचे संयुग्मन: संयुग्मनाच्या प्रक्रियेमधील निरनिरळ्या अवस्था. (या अवस्थांचे स्पष्टीकरण मजकुरात दिलेले आहे).

संयुग्मन: या प्रक्रियेमध्ये दोन पॅरामिशियम एके ठिकाणी येऊन एकमेकांना अधर पृष्ठांनी चिकटतात. त्यांची अधर पृष्ठे समोरासमोर असून मुख-विभागामध्ये त्या दोहोंना जोडणारा एक जीवद्रव्य-सेतू तयार होतो. प्रत्येक संयुग्मकातील लघुकेंद्रक आपली जागा सोडून बृहत्-केंद्रकापासून दूर जातो आणि आकारामानाने मोठा व लांबट होऊन विभाजनाने त्याच्यापासून दोन लघुकेंद्रक तयार होतात. याला प्रथम परिपक्वन विभाजन म्हणतात. दोन्ही लघुकेंद्रकांचे लगेच विभाजन होऊन चार लघुकेंद्रक उत्पन्न होतात. हे द्वितीय परिपक्वन विभाजन होय. चार लघुकेंद्रकापैकी तीन जीवद्रव्याने शोषून घेतल्यामुळे नाहीसे होतात व एक शिल्लक राहतो. बृहत्-केंद्रकाचे देखील विघटन होऊन (बारीक तुकडे होऊन) तो जीवद्रव्यात शोषला जातो. टिकून राहिलेल्या लघुकेंद्रकाचे पुन्हा विभाजन होऊन एक लहान व एक मोठा असे दोन असमान केंद्रक उत्पन्न होतात. लहान केंद्रकाला पुं-प्राक् केंद्रक व मोठ्याला  स्त्री-प्राक् केंद्रक म्हणतात. पुं-प्राक् केंद्रक   क्रियाशील आणि स्त्री-प्राक् केंद्रक अक्रिय असतो. प्रत्येक संयुग्मकातील पुं-प्राक् केंद्रक जीवद्रव्य-सेतूवरून दुसर्‍या संयुग्मकात जातो व तेथे त्याचे स्त्री-प्राक् केंद्रकाशी एकीकरण होऊन युतकेंद्रक बनतो. अशा प्रकारे निषेचन (फलन) घडून येते.

निषेचनक्रिया पूर्ण झाल्यावर संयुग्मक एकमेकांपासून अलग होतात. अलग झालेल्या या व्यक्तींना पूर्वसंयुग्मी म्हणतात. यानंतर होणारे बदल दोन्ही पूर्वसंयुग्मींमध्ये सारखेच असतात. युतकेंद्रकाचे तीन वेळा सूत्री विभाजन [⟶ कोशिका] होऊन आठ लघुकेंद्रक उत्पन्न होतात त्यांच्यापैकी चार बृहत्-केंद्रक बनतात. बाकीच्या चार लघुकेंद्रकांपैकी तीन नाहीसे होऊन फक्त एक शिल्लक राहतो. यानंतर पूर्वसंयुग्मीचे विभाजन होऊन दोन अपत्य-व्यक्ती उत्पन्न होतात. प्रत्येकात दोन बृहत्-केंद्रक जातात. मागच्या टप्प्यात शिल्लक राहिलेल्या लघुकेंद्रकाचे विभाजन होऊन दोन लघुकेंद्रक तयार होऊन ते प्रत्येक व्यक्तीत (पूर्वसंयुग्मीपासून उत्पन्न झालेल्यात) एक याप्रमाणे जातात. अशा प्रकारे उत्पन्न झालेल्या दोन्ही अपत्य-व्यक्तींपैकी प्रत्येकीचे पुन्हा विभाजन होऊन प्रत्येकीपासून दोन लहान पॅरामिशियम उत्पन्न होतात. प्रत्येकात एक बृहत्-केंद्रक आणि एक लघुकेंद्रक (विभाजनाने उत्पन्न झालेला) असतो. अशा रीतीने प्रत्येक पूर्वसंयुग्मीपासून अखेरीस चार लहान पॅरामिशियम उत्पन्न होतात.

संयुग्मनाच्या क्रियेमध्ये दोन पॅरामिशियम एके ठिकाणी येऊन त्यांच्यात केंद्रकीय द्रव्याची अदलाबदल व पुनर्रचना होते आणि दोन्ही प्राण्यांना शरीरीक्रियात्मक उत्तेजन मिळते पण पॅरामिशियमाच्या काही जातींमध्ये (उदा., पॅरामिशियम ऑरेलिया) संयुग्मन न होता एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये फेरफार होऊन केंद्रकीय द्रव्याची पुनर्रचना होते. या प्रक्रियेला अंतःमिश्रण म्हणतात. या प्रक्रियेमध्ये बृहत्-केंद्रक विघटनाने नाहीसा होतो आणि लघुकेंद्रकाचे पुन:पुन्हा विभाजन होऊन उत्पन्न झालेल्या लघुकेंद्रकांपैकी एक शिल्लक राहून बाकीचे नाहीसे होतात. या एका लघुकेंद्रकापासून नंतर बृहत्-केंद्रक आणि लघुकेंद्रक उत्पन्न होतात. पॅरामिशियमाच्या ज्या जातींमध्ये संयुग्मन होते, त्यांत कधीकधी अंतःमिश्रणही होत असल्याचे दिसून आले आहे.  

संदर्भ : 1. Hickman, C. P. integrated Principles of Zoology, St. Louise, 1966.

   2. Kotpal, R.L. Agarwal, S. K. Kheterpal, R. P. Modern Textbook of Zoology : Invertebrates, Meerut, 1975.

कर्वे, ज. नी.