व्यक्तिवृत्त : (आँटोजेनी). प्राण्याच्या विकासाच्या सुरुवातीपासून (गर्भधारणेपासून) ते त्याला प्रौढ अवस्था प्राप्त होईपर्यंत त्याच्यात रचनेच्या, प्रागतिक फेरबदलांच्या ज्या श्रेणी उत्पन्न होतात आणि त्यांच्याच बरोबर ज्या दैहिक प्रक्रिया घडत असतात, त्या सगळ्यांना ‘व्यक्तिवृत्त’ म्हणतात.

 प्राणिजगतात प्रजोत्पादन अलैंगिक आणि लैंगिक या दोन रीतींनी होते. अलैंगिक प्रजोत्पादनाचे बरेच प्रकार आहेत पण त्यापैकी जीवाचे दोन वा अधिक भागांत विभाजन होऊन प्रत्येक भागापासून पूर्ण नवीन जीव तयार होण्याला ‘विखंडन’ असे म्हणतातआणि आधीच्या व्यक्तीचे उद्वर्ध (बाह्यवाढ) या रूपात रूपांतरण होऊन नवीन जीवाची निर्मिती होण्याला ‘मुकुलन’ असे म्हणतात. व्यक्तिवृत्तात हे दोन मुख्य प्रकार आढळतात. उच्च प्रतीच्या प्राण्यांमध्ये लैंगिक रीतीने प्रजोत्पादन होते. काही प्राण्यांमध्ये अलैंगिक आणि लैंगिक अशा दोन्ही प्रकारांनी प्रजोत्पादन होते.

 लैंगिक प्रजोत्पादनामध्ये शुक्राणूंच्या (पुं-जनन कोशिकेच्या म्हणजे पेशीच्या) संयोगाने अंडाणूचे (स्त्री-जनन कोशिकेचे) निषेचन (फलन) होते आणि दोहोंच्या केंद्रकांचे (कोशिकेतील काऱ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजांचे) एकीकरण होऊन युग्मनज उत्पन्न होतो. व्यक्तिवृत्ताचा हा आरंभ होय. युग्मनजाचे वारंवार विदलन (उपविभाजन) होऊन अनेक लहान कोशिका उत्पन्न होतात. व्यक्तिवृत्ताची ही पूर्व अवस्था होय. या अवस्थेत कोशिकांचे एक बाहेरचा, एक आतील आणि एक मधील असे तीन स्तर बनतात आणि या स्तरांपासूनच प्राण्याची विविध अंगे तयार होतात. याच्या पुढील अवस्थांमध्ये वृद्धीची गती वाढते आणि प्राणी तयार होतो.

 सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या विकासाचा मार्ग सरळ प्रौढ अवस्थेपर्यंत जाणारा नसून वळणावळणाने तेथपर्यंत पोहोचणारा असतो. पुष्कळदा तर या विकासात अशा काही संरचना उत्पन्न होतात की, त्यांचे मूळ स्वरूप अजिबात पालटते किंवा कालांतराने त्यांची जरूरी नसल्यामुळे त्या पूर्णपणे नाहीशा होतात. याचे साधे उदाहरण वेस्ट इंडीजमध्ये आढळणारा हायलोड्स हा बेडूक होय. आपल्याकडे आढळणाऱ्या सामान्य बेडकाच्या (राना टायग्रिना) विकासाची हायलोड्सच्या विकासाशी तुलना केली, तर असे दिसून येते की, या दोहोंत पुष्कळच फरक आहे. सामान्य बेडकाच्या अंड्यातून क्लोमांच्या साहाय्याने श्वसन करणारा मुक्तप्लावी ⇨ भैकेर (टॅडपोल) बाहेर पडतो. भैकेर ही प्राण्याची डिंभावस्था म्हणजे भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी, पण प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यत: क्रियाशील पूर्व अवस्था असते. ही अवस्था काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत टिकते. बेडकाच्या काही जातींत तर ती दोन वर्षेही टिकते. नंतर या अवस्थेचे बेडकात रूपांतर होत. हायलोड्सची मादी अंडी पाण्यात न घालता झुडपांच्या पानांवर घालते. या अंड्यांत अन्नपीतकाचा (पोषक द्रव्याचा) भरपूर साठा असून सामान्य बेडकाच्या अंड्यांपेक्षा ती बरीच मोठी असतात. अन्नाच्या या अतिरिक्त पुरवठ्यामुळे अंड्यांपासून ते बेडकापर्यंतचा सगळा विकास अंड्याच्या आत दोन-तीन आठवड्यांत पार पडतो. भैकेर अवस्था अतिशय संक्षिप्त असते. अंडे फुटून त्यातून बेडूक बाहेर पडतो पण याला लहान शेपूट असते व ते एका दिवसातच नाहीसे होते. भैकेराच्या रूपांतराने बेडूक उत्पन्न होतो, हे दाखविण्यापुरतेच या शेपटांचे महत्त्व असते.

 तथापि भैकेर अवस्थेची जरूरीच काय? अंड्यापासून प्रत्यक्ष बेडकाची उत्पत्ती होणे, हा सरळ आणि सोपा मार्ग आहे. याचे संभाव्य उत्तर असे की, एके काळी हायलोड्सच्या व्यक्तिवृत्तात इतर बेडकांप्रमाणेच मुक्तप्लावी भैकेर अवस्था होती परंतु अन्नाच्या भरपूर पुरवठ्यामुळे भ्रूणाची अंड्यातच जास्त वाढ होते. तथापि जनन-कोशिकांतील आनुवंशिक प्रभावामुळे वाढणारा भ्रूण विकासाच्या जुन्या मार्गालाच चिकटून राहण्याचा जोरात प्रयत्न करतो.

 पहा : जातिवृत्त पुनरावर्तन सिद्धांत भ्रूणविज्ञान वृद्धि, प्राण्यांची.             

                   गर्दे, वा. रा.