हरिवंश-१ : एक पुराणसदृश प्राचीन ग्रंथ. हे महाभारताचे खिल पर्व होय. खिल म्हणजे परिशिष्ट किंवा मागून जोडलेले. हे एकोणिसावे पर्व होय. त्याला हरिवंशपुराण असेही म्हणतात. महाभारताच्या सुरुवातीस संग्रह पर्वात हरिवंशाचा महाभारताबरोबरचा संबंध निर्दिष्ट केलेला आहे. हरिवंश हा महाभारताचाच एक अंश असल्याने त्याचेच मंगलाचरण त्यालाही व्यासांनी लागू केले आहे तथापि काही विद्वानांच्या मते हा भाग नंतर महाभारताच्या संहितेत प्रक्षिप्त केला असावा. हरिवंश हा वैशंपायनाने जनमेजयाला सांगितला आहे. पुराणाच्या पाच लक्षणांपैकी ब्रह्मांडाची उत्पत्ती, ईश्वरी अवतार, पुण्यश्लोक राजे आणि त्यांच्या वीरगाथा ही चार लक्षणे या ग्रंथात आढळतात. हरिवंशा त मुख्यत्वे श्रीकृष्णाची पूर्वपीठिका, त्याचे चरित्र आणि कलिमाहात्म्य वर्णिले आहे. वैशंपायन म्हणतात की, हरिवंश हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या त्रिमूर्तींचे साक्षात शरीरच आहे. हरिवंश हा सनातन असे जे शब्दब्रह्म तद्रूपच आहे आणि शब्दब्रह्मात कोणताही पुरुष निष्णात होईल, तेव्हाच त्याला परब्रह्मप्राप्ती होत असते. हरिवंश ही त्याची पायरी आहे. हरिवंश श्रवणाने कायिक, वाचिक व मानसिक पातके नष्ट होतात. या ग्रंथाचे हरिवंशपर्व, विष्णुपर्व व भविष्यपर्व असे तीन भाग असून त्यांची अध्यायसंख्या अनुक्रमे ५५,१२८ आणि १३५ आहे. या सर्व अध्यायांत एकूण वीस हजारांवर श्लोकआहेत. बहुतेक सर्व श्लोक अनुष्टुभ छंदात आहेत. महाभारतातील अनेक कथांची पुनरुक्ती यात आढळते. ब्रह्मांडपुराणातून हरिवंशातील मजकूर उसना घेतल्याचेही एक मत असून हरिवंशाचा काळ तज्ज्ञांच्या मते इ. स. चे चौथे शतक असा येतो.

हरिवंश पर्वात प्रामुख्याने आदिसर्ग, दक्षाची उत्पत्ती इ. प्रसंग सांगितले असून पुढे पृथूचे संक्षिप्त चरित्र दिले आहे. तीत पृथ्वी निःसत्त्व व वांझोटी झाल्यावर सर्वत्र दुष्काळ पडून तृणधान्यादी काहीच उगवेना. लोकांची अन्नान्न दशा झाली. ती पाहून पृथूला राग अनावर झाला आणि तो पृथ्वीला शिक्षा करण्यास सरसावला. तेव्हा पृथ्वी म्हणाली, ‘स्त्रीवध हे पाप असून तू ते करू नको.’ तेव्हा पृथूने तिला राजधर्माचे कर्तव्य सांगितले आणि म्हणाला, ‘धान्य उत्पन्न करणे आणि लोकांची उपजीविका चालविणे, हेतुझे कर्तव्य आहे. ते तू करीत नाहीस हा तुझा अपराध आहे. तेव्हा तुला शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे तू स्त्री आहेस म्हणून मी तुझी गयकरणार नाही.’ तेव्हा पृथ्वीने गायीचे रूप घेऊन त्याला प्रतिसाद दिला.मग पृथूने निरनिराळे वत्स तिच्या कासेला लावून तिच्यातून सर्व जीवनो-पयोगी वस्तू दोहून घेतल्या. पुढे या पर्वात स्वायंभुव मनूपासून वैवस्वतमनू , मन्वंतरे व कालगणना दिली आहे. सोमवंशाच्या वर्णनात इलेची उत्पत्ती व बुधाचा जन्म यांची माहिती दिली आहे. शऱ्याती राजाने मथुरेच्या अरण्यात धुंधूनामक राक्षसाचा वध केला, ही कथा त्रिशंकूचे आख्यान व इक्ष्वाकू वंशाचे वर्णन आहे. या वंशातील भगीरथ राजाने गंगेला भूतलावर आणले. शिवाय यात श्राद्धविचार, पितृपूजा, पितृकल्प वगैरेंचा अंतर्भाव असून पुरुरवा-उर्वशी यांची प्रेमकहाणी आहे. पुरुरव्याने अग्नीचे दक्षिणाग्नी, गार्हपत्याग्नी व आहवनीयाग्नी हे तीन प्रकार शोधून काढले. या कथां-बरोबरच समुद्रमंथन आणि त्यातून बाहेर आलेले अमृतकुंभ व धन्वंतरी यांचे वर्णन आहे. तोच पुढे काशीराजाच्या पोटी अवतरला.

विष्णुपर्वात उद्ध्वस्त वाराणसी क्षेत्राचे पुनर्वसन, नहुषचरित्र दिले आहे. नहुष शंभर यज्ञ करून इंद्रपद प्राप्त करतो. त्याला इंद्रायणीची अभिलाषा निर्माण होते. त्या प्रयत्नांमुळे तो शापित होऊन सर्पयोनीत जातो. यापर्वातच वृष्णिवंशाचे वर्णन असून त्यात श्रीकृष्णाचा जन्म दिला आहेव श्रीकृष्णचरित्र विस्ताराने दिले आहे. त्यात त्याच्या बाल्य व कुमार अवस्थांतील लीलांचे वर्णन आहे.

भविष्यपर्व या अखेरच्या भागात जनमेजयाच्या अश्वमेधाचा विचार उत्पन्न झाल्यापासूनचा कथाभाग आहे. चार युगांतील मानवी आचारविचार आणि पुढील कलियुगात लोक कसे वागतील त्याचे वर्णन तसेच नारायण, ब्रह्माची उत्पत्ती, हिरण्यकशिपूचा वध, समुद्रमंथन, वामनावतार, श्रीकृष्णाचे कैलासगमन, अनेक व्रते, विधी व मंत्र इत्यादींचे वर्णन आढळते.

पहा : महाभारत.

पोळ, मनीषा