परिफुप्फुसशोथ : (प्ल्युरसी). फुप्फुसावरील लसी-कला आवरणाला (स्रावोत्पादक पातळ पटलमय आवरणाला) परिफुप्फुस किंवा फुप्फुसावरण म्हणतात व त्याच्या दाहयुक्त सुजेला परिफुप्फुसशोथ म्हणतात. या लसी-कलेची अंतर्वलनामुळे बनलेली बंद पिशवी प्रत्येक फुप्फुसाचे आच्छादन असते. यामुळेच हे आच्छादन दोन थरांचे बनते. या थरांपैकी आतला आणि फुप्फुसाच्या पृष्ठभागाशी संलग्न असणारा व फुप्फुसाच्या दोन खंडांमधील भेगांतही शिरणारा जो थर असतो त्याला अंतस्त्यसंबंधी किंवा फुप्फुस परिफुप्फुस म्हणतात. बाहेरचा थर बरगड्या, मध्यपटल (छातीची पोकळी व उदर पोकळी यांना विभागणारे पटल) आणि छातीच्या मध्यावकाशाशी (मधल्या पोकळीशी) संलग्न असून त्याला भित्तीय परिफुप्फुस म्हणतात. निरोगी व्यक्तीत हे दोन्ही थर नेहमी एकमेकांशी संलग्न असतात व दोहोंमधील संभाव्य पोकळीला परिफुप्फुस गुहा म्हणतात. लसी-कलेच्या स्रावामुळे या थरांचे एकमेकांवर घर्षण होत नाही. कारण हा स्राव वंगणासारखे कार्य करतो. या दोन थरांमध्ये जेव्हा द्रव किंवा हवा गोळा होते तेव्हाच परिफुप्फुसगुहा स्पष्ट दिसते. या दोन थरांपैकी फक्त भित्तीय परिफुप्फुसालाच संवेदना असतात.

प्रकार : परिफुप्फुसशोथाचे दोन प्रमुख प्रकार आढळतात. (अ) तीव्र आणि (आ) चिरकारी (दीर्घकालीन). तीव्र प्रकारात (१) शुष्क परिफुप्फुसशोथ आणि (२) आर्द्र किंवा लसी-तंत्वात्मक परिफुप्फुसशोथ असे दोन उपप्रकार आहेत. शुष्क प्रकारात दाहयुक्त सूज येते आणि गुहेत द्रवसंचय नसतो, तर आर्द्र प्रकारात द्रवसंचय हेच प्रमुख लक्षण असते. ज्या वेळी हा द्रव पू असतो त्या वेळी या विकृतीला पूयपरिफुप्फुस म्हणतात.

शुष्क परिफुप्फुसशोथ : ही तीव्र स्वरूपाची विकृती बहुधा फुप्फुसाच्या न्यूमोनिया, विद्रधी (पूयुक्त पोकळी), क्षय, श्वासनलिकाविस्फार, अभिकोथ (रक्तपुरवठा कमी पडून ऊतकनाश–पेशीसमूहाचा नाश–होणे) किंवा मारक अर्बुद (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी व शरीरक्रियेस निरुपयोगी असणारी गाठ) यांसारख्या विकृतींचा दुय्यम परिणाम म्हणून उद्भभवते. प्राथमिक स्वरूपाचा शुष्क परिफुप्फुसशोथ बहुतकरून क्षयरोगजन्यच असतो. उदरगुहेतील यकृत विद्रधी, पर्युदरशोथ (उदरगुहेच्या पटलमय अस्तराची दाहयुक्त सूज) यांसारख्या विकृतींमुळे मध्यपटलाशी संलग्न असलेल्या परिफुप्फुसातही विकृती होऊ शकते. कधीकधी हा रोग व्हायरस संक्रामणाचा परिणाम असू शकतो. उदा., बॉर्नहॉल्म रोगातील (बॉर्नहॉल्म या डॅनिश बेटाच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या रोगातील) बी-कुक्सॉकी व्हायरसामुळे होणारी विकृती, मूत्रविषरक्तता (मूत्रातील घटकांचा रक्तात प्रवेश झाल्याने निर्माण होणारी अवस्था), तीव्र संधिज्वर यांसारख्या सार्वदेहिक विकृती या रोगाचे मूळ कारण असू शकतात. छातीवरील आघातही या रोगाचे कारण असू शकते.

परिफुप्फुसशोथ : डाव्या फुप्फुसाचा उभा छेद : (१) परिफुप्फुस, (२) भित्तीय परिफुप्फुस, (३) अंतस्त्यसंबंधी परिफुप्फुस, (४) शुष्क परिफुप्फुसशोथ, (५) आर्द्र परिफुप्फुसशोथ. छेदरहित उजवे फुप्फुस प्राकृतिक (सर्वसामान्य) अवस्थेतील आहे.

छातीतील वेदना, ज्वर व खोकला ही लक्षणत्रयी बहुधा आढळते. खोकताना व श्वास खोल घेताना वेदना वाढतात. रोग्यास बोलण्याची व खोल अंतःश्वसनाची भीती वाटते. ज्वर साधारणपणे ३७·८से. ते ३८·३ से. असतो. लक्षणत्रयीची सुरुवात एकदमच होते. खोकला कोरडा असतो. स्टेथॉस्कोपने छाती काळजीपूर्वक तपासल्यास ज्या जागी वेदना अधिक असतात त्या ठिकाणी ‘परिफुप्फुस घर्षणध्वनी’ (सुजलेले थर एकमेकांवर घासल्याने उत्पन्न होणारा विशिष्ट आवाज) ऐकू येतो. हे चिन्ह निदानात्मक स्वरूपाचे असते. ज्वर दोन दिवस ते एक आठवडा टिकतो. वेदना हळूहळू कमी होतात व रोगी दोन आठवड्यांत बरा होतो. पुष्कळ वेळा शुष्क प्रकाराचे आर्द्र प्रकारात रूपांतर होऊन गुहेत द्रवसंचय होतो. द्रवसंचयाबरोबरही वेदना कमी होतात. प्राथमिक स्वरूपाच्या विकृतीनंतर क्षयरोग उद्भवण्याचा नेहमी धोका असतो. तीव्र स्वरूपात तात्काळ करावयाच्या इलाजामध्ये छाती शेकणे, अँस्पिरिनासारखी वेदनाशामके देणे, खोकल्यावर कोडिनाचे चाटण देणे आणि प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देणे यांचा समावेश होतो. अज्ञानहेतुक शुष्क परिफुप्फुसशोथानंतर वर्षभर क्षयरोग प्रतिबंधक इलाज चालू ठेवणे, मधून मधून छातीची क्ष-किरण तपासणी  आणि रक्ततपासणी करून घेणे हितावह असते. दुय्यम स्वरूपाच्या रोगात मूळ कारण शोधून त्यावर इलाज करतात.  

आर्द्र परिफुप्फुसशोथ : ज्या परिफुप्फुसशोथात परिफुप्फुस गुहेत द्रवसंचय झाल्याचे साध्या वैद्यकीय तपासणीत वा क्ष-किरण तपासणीत लक्षात येते त्या विकृतीला आर्द्र  परिफुप्फुसशोथ म्हणतात.  

कोणत्याही प्रकारच्या शुष्क परिफुप्फुसशोथाचे रूपांतर या विकृतीत होण्याची शक्यता असते. किंबहुना प्रत्येक आर्द्र परिफुप्फुसशोथ सुरुवातीस शुष्कच असतो. ज्या वेळी इतर सर्व अंतस्त्ये (छाती व उदरगुहेतील इंद्रिये) निरोगी असतात व या विकृतीस अज्ञानहेतुक संबोधितात त्या वेळी ती बहुतकरून क्षयरोगजन्य असते. सर्वसाधारणपणे न्यूमोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस आणि मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू या विकृतीचे कारण असतात व त्यांपैकी ८० ते ९० % शेवटच्या सूक्ष्मजंतूमुळे (क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूमुळे) होतात. १५ ते ३५ वयोगटातील स्त्री-पुरुषांत ही विकृती सारख्याच प्रमाणात आढळते. चाळीशीच्या पुढे फुप्फुस, स्तन, जठर इ. अवयवांच्या कर्करोगाचा दुय्यम फैलाव म्हणूनही हा रोग उद्भवतो. स्त्रियांमध्ये क्वचितच अंडाशय अर्बुदाबरोबरच आर्द्र परिफुप्फुसशोथही आढळतो व या विकृतीला मेग्ज लक्षणसमूह (जे. व्ही. मेग्ज या अमेरिकन शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावावरून) म्हणतात.


शुष्क परिफुप्फुसशोथातील लक्षणत्रयीनेे रोगाची सुरुवात होते किंवा रोगाची सुरुवात अलक्ष्य (लक्षात न येण्यासारखी) असते. बहुधा ज्वर असतो आणि रोग संक्रामणजन्य असेल, तर ज्वराचे स्वरूप गंभीर असते. क्षयरोगजन्य असल्यास ज्वर सौम्य प्रकारचा असतो. आर्द्र परिफुप्फुसशोथाचे प्रमुख लक्षण कष्टश्वसन हे असते. ज्या बाजूस द्रवसंचय झाला असेल, त्या बाजूच्या छातीची हालचाल कमी होते किंवा बंद पडते. छातीच्या मध्यावकाशातील अंतस्त्ये (हृदय, ग्रसिका–घशापासून जठरापर्यंत अन्न वाहून नेणारी नलिका–वगैरे) विरुद्ध बाजूकडे सरकल्याचे दिसते. अभिताडनाने (हाताच्या बोटांनी ठोकून तपासण्याने) रोगट बाजूस मंद ध्वनी मिळतो. परिश्रवणाने (निदानाकरिता शरीरांतर्गत आवाज ऐकण्याच्या कृतीने) छातीतील नेहमीचे श्वसनध्वनी ऐकू येत नाहीत. क्वचितच परिफुप्फुस घर्षणध्वनी ऐकू येतो. क्ष-किरण तपासणीत द्रवसंचय स्पष्ट दिसतो व त्याचे प्रमाणही समजते. कधीकधी खात्री करून घेण्याकरिता रोगट बाजूस छातीत सुई घालून द्रव काढून बघतात (चूषण). हाच द्रव प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवितात व त्याकरिता कमीत कमी ५० मिलि. द्रव लागतो. आर्द्र परिफुप्फुसशोथाचे कारण शोधण्याकरिता निरनिराळ्या परीक्षा कराव्या लागतात. यामध्ये वरील तपासणीशिवाय रक्त तपासणी, थुंकी तपासणी, द्रव काढून घेतल्यानंतर क्ष-किरण तपासणी आणि परिफुप्फुस ऊतकाची जीवोतक परीक्षा (जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकाची परीक्षा) महत्त्वाच्या असतात. श्वासनलिकादर्शकाने केलेली तपासणी व मानेतील लसीका ग्रंथीची (ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या नलिकेतील ग्रंथीसदृश ऊतकपुंजाची) जीवोतक परीक्षा रोगाचे मूळ कारण शोधण्यास मदत करतात. कारणपरत्वे इलाज करतात.

पूयपरिफुप्फुस : याचे मुख्य दोन प्रकार आढळतात. पूसंचय पातळ किंवा घट्ट असू शकतो. क्षयरोगजन्य आणि क्षयरोगविरहित असे याचे दोन प्रकार असून दोहोंमध्ये पू चूषित्राने (चूषणक्रियेने द्रव काढून घेण्याच्या उपकरणाने) किंवा जरूर पडल्यास शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो. इतर इलाज सूक्ष्मजंतूंच्या प्रकारावर अवलंबून असतात.  

चिरकारी परिफुप्फुसशोथ : हा प्रकार क्वचित आढळतो. अलीकडील प्रतिजैव औषधांच्या वापरानंतर त्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. या प्रकाराला अभिलग्न परिफुप्फुस किंवा घन परिफुप्फुस म्हणतात. आर्द्र प्रकारानंतर गुहेतील द्रव हळूहळू रक्तात शोषला जातो परंतु काही द्रवाचे तंत्वात्मक संगठन (तंतुमय एकत्रित पुंजका) होऊन त्या थरामुळे परिफुप्फुसच जाड बनते. अधूनमधून वेदना होतात. तसेच परिश्रवणात मोठा घर्षणध्वनी कित्येक महिने ऐकू येतो. परिफुप्फुसाची जाडी पुष्कळ वाढल्यानंतर हे लक्षण कमी होते. कालांतराने ज्या बाजूस रोग असेल त्या बाजूची छातीची भित्ती आत ओढली जाते. मध्यावकाशस्थ अंतस्त्ये रोगट बाजूकडे खेचली जातात. या प्रकाराची चिकित्सा करण्याची बहुधा जरूर नसते. श्वसनक्रियेतच अडथळा आल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : फुप्फुस व फुप्फुसावरण ही दोन्ही कफाची स्थाने आहेत. जेव्हा फुप्फुसावरणामध्ये वायू प्रकुपित होतो तेव्हा कफाचे आर्द्र स्निग्धादी गुण कमी होऊन शुष्क रूक्षादी गुण वाढतात. पार्श्व हा अवयव श्वासोच्छ्वासाने  संकोचन-विकसनशील असल्यामुळे त्या वेळी घर्षण निर्माण होते व वेदना निर्माण होतात. शूल निर्माण होताच हिंग, पादेलोण, बीडलोण, सैंधव, चिरफळ, हिरडा, पुष्करमूल ह्यांपैकी एकाचे वा अनेकांचे चूर्ण जवाच्या काढ्याबरोबर प्यायला द्यावे. हिंग तुपामधून द्यावा. महाळुंगाच्या बियांनी दूध सिद्ध करून ते द्यावे किंवा एरंडेल तेल दूध, मांसरस, दह्याची निवळ किंवा मध ह्यांबरोबर पाजावे. प्लीहोदरामध्ये सांगितलेले षट्पलघृतही द्यावे. दुधाबरोबर जांगल प्राण्याच्या मांसरसाबरोबर आहार द्यावा. ह्यात ज्वराकरिता त्रिभुवन कीर्तीरस द्यावा. ह्यात पाणी झाल्यास व शोथ दिसू लागल्यास जलोदराची सर्व चिकित्सा करावी. पू होत आहे असे वाटल्यास सुवर्ण राजवंग, वंगभस्म, गंधकरसायन ही मधाबरोबर द्यावीत आणि आरंभापासून दशांग व शोथ दिसल्यावर इतर शोथहर लेप लावावेत. रक्तस्राव करावा..

पटवर्धन, शुभदा  अ.

संदर्भ : 1. Davidson, S. Macleod, J., Ed. Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

2. Scot, R. B., Ed. Price’s Textbook of Practice of Medicine, London, 1973.