तरळी : क्लुपिइडी मत्स्यकुलातील सार्डिनेला  या वंशाचा मासा. याचे शास्त्रीय नाव सार्डिनेला लाँगिसेप्स  हे आहे. सार्डिनेला वंशात बऱ्याच जाती आहेत. क्लुपिइडी कुलात हेरिंग आणि सार्डीन माशांचा समावेश होतो. तरळी सार्डीन गटातील असून तिच्यापासून तेल मिळते म्हणून तिला इंग्रजी भाषेत ‘ऑइल सार्डीन’ म्हणतात.

एके काळी आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यापासून (भारताचा पूर्व किनारा) सिंधच्या किनाऱ्यापर्यंत (भारताचा पश्चिम किनारा) हे मासे मुबलक आढळत असत, पण अलीकडे पूर्वकिनाऱ्यावर त्यांची संख्या बरीच कमी झालेली आहे. मलबार आणि कानडा या प्रदेशांच्या किनाऱ्यांवर ते विपुल असल्यामुळे तेथे ते फार मोठ्या प्रमाणावर पकडले जातात.

तरळीची लांबी २२–२३ सेंमी. पर्यंत असते पण मत्स्योद्योगात जाळ्यात पकडले जाणारे या जातीचे मासे यापेक्षा लहान म्हणजे सु. १२–१५ सेंमी. लांबीचे असतात. पाठीचा रंग निळसर तपकिरी असून त्यात मधूनमधून सोनेरी चमक दिसून येते. कधीकधी पाठीचा रंग व बाजूंचा रंग अलग करणारी एक सोनेरी रेषा प्रत्येक बाजूवर आढळते. पोट रुपेरी असून त्यावर जांभळ्या रंगाची तकाकी असते. प्रच्छदावर (कल्ल्यांच्या खाचांवरील बाह्य छिद्रे झाकणाऱ्या पातळ कलेच्या झाकणावर) मोठा हिरवा सोनेरी ठिपका असतो. पृष्ठपक्ष (पक्ष म्हणजे हालचालीस उपयुक्त अशी त्वचेची स्नायुमय घडी) आणि पुच्छपक्ष हिरवट तपकिरी रंगाचे असतात. खालचा जबडा वरच्यापेक्षा किंचित लांब असतो व त्यावर सूक्ष्म दात असतात किंवा मुळीच नसतात. जिभेवर अगदी बारीक दात असतात. तरळीचे आयुष्य ३–४ वर्षे असते. मादी वयाच्या तिसऱ्या वर्षी अंडी घालते.

तरळी (सार्डिनेला लाँगिसेप्स)

औद्योगिक दृष्ट्या तरळी माशांना भारतात मोठे महत्त्व आहे. अन्न म्हणून फार मोठ्या प्रमाणावर यांचा उपयोग केला जातो. ताजे आणि वाळवून खारवलेले असे दोन्ही प्रकारचे मासे खातात. तरळ्यांचे तेल काढतात. हा एक कुटिरउद्योग असून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्त्वाचा धंदा आहे. तरळीच्या तेलाचे अनेक उपयोग आहेत. उत्तम प्रतीचे तेल खाण्याकरिता वापरतात. यात अ जीवनसत्त्व असते. यापेक्षा कमी प्रतीचे तेल तागाचे प्रतवार गठ्ठे तयार करण्याकरिता व कातडे कमविण्याकरिता वापरतात वंगण म्हणून त्याचा उपयोग करतात कीटकनाशक साबण तयार करण्याकरिता व धातूंना पाणी देण्याकरिता त्याचा उपयोग करतात. तेल काढून घेतल्यावर शिल्लक राहिलेल्या वाळवलेल्या चोथ्याला ‘ग्वानो’ म्हणतात. ग्वानोमध्ये नायट्रोजन व फॉस्फरस जास्त प्रमाणात असल्यामुळे तंबाखू, कॉफी, चहा इ. पिकांकरिता खत म्हणून ग्वानो वापरतात.

कर्वे, ज. नी. यार्दी, ह. व्यं.